डॉ. गिरीश रांगणेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवयित्री शांताबाई शेळके  यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त प्रकाशित झालेल्या ‘बकुळगंध’ पुस्तकातून विविध मान्यवरांच्या लेखांद्वारे शांताबाईंच्या विशाल जीवनपटाचे आकलन होते. १०० मान्यवर, १०० कविता आणि १०० आठवणी असं एकूण ग्रंथाचं अभिनव स्वरूप आहे. पुस्तकात शांताबाईंच्या संपूर्ण ग्रंथसंपदेचा तपशील, पुरस्कार, त्यांच्या गीतांना लाभलेले संगीतकार आणि त्यांच्या शेकडो प्रसिद्ध गीतांची यादी वाचायला मिळते. ‘रेशमाच्या रेघांनी’सारखी लावणी, ‘गजानना श्री गणराया’, ‘गणराज रंगी नाचतो’सारखी भक्तिगीतं, ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’सारखं बालगीत, ‘मराठी पाऊल पडते पुढे’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला’सारखी स्फूर्तिगीतं, ‘मी डोलकर डोलकर’सारखं कोळीगीत.. गीतांच्या सर्व प्रांतांमध्ये शांताबाईंनी वावर केला.  

शांताबाईंचा सविस्तर परिचय या पुस्तकात आहे. इंदापूर तालुक्यातला जन्म, खेड-मंचर इथलं बालपण, हुजूरपागा, एस. पी. कॉलेजमधलं बीए, एमएपर्यंतचं शिक्षण, आचार्य अत्र्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकात ५ वर्षे आणि ‘मराठा’ दैनिकात तीन वर्षे नोकरी, नागपूर आणि मुंबईत विविध महाविद्यालयांत अध्यापन, अनेक वर्षे पुण्यात वास्तव्य आणि या संपूर्ण कालखंडाला व्यापून उरणारा त्यांचा साहित्याच्या विविध प्रांतांमधला संचार!  

‘बकुळरंग’चे अंतरंग आपल्याला खुणावते. अशोक पत्की, श्रीधर फडके, कौशल इनामदार, शौनक अभिषेकी, देवकी पंडित, अभिराम भडकमकर, डॉ. अरुणा ढेरे, मंगला गोडबोले या साहित्य-संगीत क्षेत्रातल्या धुरिणींपासून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, सुशीलकुमार शिंदे यांसारखे राजकारणी तसेच डॉ. विश्वास मेहेंदळे, सुधीर गाडगीळ, भानू काळे, गिरीश प्रभुणे, अण्णा हजारे, राहुल सोलापूरकर, श्रीरंग गोडबोले, विष्णू मनोहर असे विविध क्षेत्रांतले मान्यवर शांताबाईंच्या आठवणींचा जागर करत त्यांना भावलेली एक कविता पेश करतात. आळंदीच्या साहित्य संमेलनासाठी शांताबाई अध्यक्ष होत्या. लतादीदीदेखील व्यासपीठावर होत्या. त्यांच्या भाषणात लतादीदी म्हणाल्या, ‘‘जेव्हा शांताबाई माझ्या घरी येतात तेव्हा शांताबाई गाणी म्हणतात आणि मी ऐकते.’’   

निवेदक सुधीर गाडगीळ आणि शांताबाईंच्या वरचेवर गप्पा, मुलाखती होत. शांताबाईंबरोबरच्या एका मुलाखतीचा उल्लेख गाडगीळ आवर्जून या पुस्तकात करतात. शांताबाई सरकारी नोकरीत होत्या, त्यामुळे त्यांना टोपणनावाने कविता लिहाव्या लागल्या आणि हे टोपणनाव होतं ‘डॉ. वसंत अवसरीकर’. त्यामुळे शांताबाईंना सगळी पारितोषिके मिळाली ती ‘शांता शेळके’ या नावानं नव्हे, तर ‘डॉ. वसंत अवसरीकर’ या नावानं. त्यावर शांताबाई गाडगीळांना म्हणतात, ‘म्हणजे कविता माझ्या आणि बक्षिसं सगळी माझ्या फॅमिली डॉक्टरला!’ अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याच्या या पिढीला सांगून खरं वाटणार नाही असा हा किस्सा आहे. शांताबाईंचे वैशिष्टय़ म्हणजे ‘स्मरणशक्ती’. एकदा वसंत बापट त्यांच्या एका कवितेला चाल देत असताना त्यांना त्यातली एक ओळ आठवेना. त्यामुळे वाद्यवृंद अडला, ते पुस्तकही सापडेना. तेव्हा बापट म्हणाले, ‘‘शांताबाईंना फोन करा, तुम्हाला ताबडतोब उत्तर मिळेल.’’ आणि झालंही तसंच. शांताबाईंना त्यांच्या स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्यासुद्धा निवडक कविता तोंडपाठ होत्या हे वाचून आपल्याला हबकून जायला होतं. ‘डोलकर’ हा गाण्यातला शब्द त्यांना र. वा. दिघ्यांच्या पुस्तकात मिळाला. अशा शब्दप्रतिमा त्या विविध ठिकाणांहून गोळा करत गेल्या. असं शब्दांचं धन त्यांनी आयुष्यभर गोळा केलं असलं तरी अखेरच्या त्यांच्या काळात त्यांचं वेगळं मत होतं. ‘‘आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी  नकोशी वाटते. आता जाणीव होते की, शब्दांना शब्द भेटतीलच असे नाही. शब्दांनी शब्द पेटतीलच असे नाही.’’

शांताबाईंचे शिक्षक श्री. म. माटे यांना कोणी एक प्रश्न विचारला होता, की माणसाचे जिवंतपण कसे ओळखायचे? माणसाचे वय कसे मोजायचे? तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही किती वर्ष त्याची कृतज्ञतेने आठवण काढता तेवढे त्या व्यक्तीचे जिवंतपण असते.’’ आजही आपल्याला शांताबाई आपल्या डोळय़ासमोर दिसतात. ‘असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या असेल गीत हे!’  आशयसमृद्ध असा ‘बकुळगंध’चा ३५० पानांचा ग्रंथ वाचकाला मोहित करतो. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष, कवी राजन लाखे यांची ही मूळ संकल्पना. त्यांनी आणि परिषदेच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी कष्टाने पूर्ण करून मराठी ग्रंथसंपदेत मोलाची भर घातली आहे. ग्रंथाचं देखणं मुखपृष्ठ ‘रविमुकुल’ यांनी सजवलं आहे.

‘बकुळगंध’ – ग्रंथनिर्मिती : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड, प्रतिमा पब्लिकेशन, पाने- ३५०, किंमत- ४०० रुपये.

girishrangnekar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet shanta shelke memories in book bakulgandh zws
Show comments