शब्दांच्या नकळत येती
शब्दांच्या ओठी गाणी
शब्दांच्या नकळत येते
शब्दांच्या डोळा पाणी..
माझ्या प्रिय ‘शब्दधून’मधली ही माझी एक लाडकी कणिका.. (या चार ओळींच्या कवितांना काय म्हणून संबोधावे, या पेचात असताना अचानकपणे माझ्या लहानपणी रूढ असलेला हा शब्दप्रयोग अगदी नकळत आठवला. शब्दांचे कण कण वेचून आकार घेतलेल्या ‘शब्दधून’साठी ‘कणिका’इतका सुंदर शब्दप्रयोग दुसरा नसेल.) मुळात कविता कवीकडे येतात कशा? हा एक युगानुयुगे अधांतरी तरंगत राहिलेला प्रश्न आहे. त्याचं स्वत:पुरतं एक उत्तर एव्हाना स्वानुभवातून पक्कं झालंय. कवितांना यायचं असलं की त्या येतातच. (आणि तर आणि तरच त्या येतात!) अगदी ‘इरेस पडलो जर बच्चमजी..’ असं हट्टाला पेटलं तरी ‘एकांत, लेखणी, कागद वाया सारे/ मन कागदाहूनी निरिच्छ आणि कोरे’ असाच अनुभव कुणाही सच्च्या कवीला येतो. (गडकऱ्यांनी म्हटलेल्या ‘ऐशी काव्ये कराया, इकडून-तिकडून आणलेली बुद्धी दे चक्रपाणी’ अशा तिकडम्बाज मंडळींची गोष्ट वेगळी.) पण म्हणून कविता ही कुठूनतरी ‘वरून’ अंतराळातून वगैरे येते असं मुळीच नाही. किंवा तसं असेलच, तर ते अंतराळ स्वत: कवीच्या अस्तित्वातच सामावलेलं असतं. जगण्याच्या अतक्र्य खेळात लहान-मोठय़ा लाटांमागून लाटा येऊन धडकत असतात. त्यातून क्षणांचे नाना रंगीबेरंगी शिंपले फेकले जातात. कुठल्या शिंपल्यात कवितेचा टपोरा मोती लपलाय, हे फक्त स्वत: त्या मौल्यवान कवितेलाच ठाऊक असतं. तिची वेळ आली की ती प्रगटते आणि मागची नाळ अलगद तोडून अवकाशात मनमौजी तरंगू लागते. त्या कवितेच्या जन्माला निमित्तमात्र झालेले ते क्षण, त्या घटना मात्र काळाच्या उदरात गडप होतात. पण कधी एखाद्या चुकार क्षणी स्वत: कवीलाच त्यांचं स्मरण होतं. आणि त्या गतक्षणांना पुन्हा क्षणमात्र नवी टवटवी येते. तर असंच आज मनात जागं झालेलं हे अनाहूत स्मरण.
कोणे एकेकाळची गोष्ट. चारमजली दगडी इमारतीच्या लाकडी जिन्याच्या अरुंद पायऱ्या पोरसवदा दिसणारा कवी खूप उत्साहात चढत होता. सोबत एक समवयस्क मित्र. दोघांचंही वय असं, की उत्साहाला एरवी काही कारणच लागू नये. पण आज मात्र एक जरा वेगळंच कारण होतं. कवीचा पहिलावहिला कवितासंग्रह प्रकाशित होणार होता.
पुस्तकाच्या पाठीवर एका श्रेष्ठ कविवर्याचा आशीर्वादाचा हात फिरला होता. आणि संध्याकाळी प्रकाशनाच्या निमित्ताने पाठीवर शाबासकीचा हात टाकायला दुसरे कविश्रेष्ठ येणार होते.. म्हणून ही सगळी अपूर्वाईची पायपीट! ज्या घरी आता ते दोघे चालले होते ते घर तसं काही फार नेहमीच्या वळणातलं होतं असं नाही. घरातील प्रौढ दाम्पत्य तसं जुजबी तोंडओळखीचं. नाही म्हणायला त्यांची कॉलेजात नुकतीच जाऊ लागलेली षोडशवर्षीय कन्या हा जरा कळीचा मुद्दा होता. रूढ अर्थानं सौंदर्यलक्षणयादी सोडा; पण तिच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वात एक अनोखा गोडवा होता, हे नक्की. अर्थात हे सगळं वाटणं केवळ ‘कलेसाठी कला’ या स्वरूपाचं. म्हणजे तिथं कसल्याही ‘इतर’ नाजूक शक्यता ध्यानीमनीही नव्हत्या. परंतु एकूणच त्या वयात ‘न जाने इन में किसके वास्ते हूं मैं, न जाने इन में कौन है मेरे लिये’ या अवस्थेतून आपण सगळेच केव्हातरी जात असतोच. तितपतच अर्थ इथंही.
मुख्य म्हणजे ही वेळ तिच्या कॉलेजची असल्याने ती घरी असायची शक्यता सुतराम नव्हती. त्यामुळे केवळ तीर्थस्वरूप मंडळीच्या हातात निमंत्रण अर्पण करून तिथून पाय काढता घ्यायचा, हे न बोलताही ठरलं होतं. याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे सोबतचा शिस्तखोर दोस्तही ‘वेळ’ याबाबतीत भलताच काटेकोर होता. म्हणजे काटे आणि कोरणे या दोन्ही शब्दांचं मूर्तिमंत सार्थक करणारा काटेकोरपणा. शिवाय कुरुक्षेत्रावर कर्णाचा तेजोभंग करणाऱ्या शल्याइतकाच तोही या ‘शल्यकर्मा’त निष्णात होता. प्रस्तुत कवी आणि त्याचा एक एकांकिका लिहिणारा मित्र ही या शल्यमहाराजांची आवडती गिऱ्हाईकं. संधी मिळताच ओठावर खास ए. एच. पी. (म्हणजे आत्महत्या-प्रेरक) हास्य खेळवीत, ‘तुमचा एकूण आजवरचा पूर्वेतिहास पहाता..’ अशी झाडाझडती सुरू व्हायची.
– तर अशा एकूण आणीबाणीच्या मन:स्थितीत कविराजानी बंद दारावरची बेल दाबली. काही काळ काहीच प्रतिसाद नाही. मग एका क्षणी दरवाजा उघडला. दारात एक म्हाताऱ्या मोलकरीणबाई उभ्या होत्या. ‘‘घरचे लोक भायेर ग्येले हाईत..’’ ‘‘अरे वा..’’ (सोबत एक सुटकेचा नि:श्वास. आता वेळ जायचा मुद्दाच नाही.) तेवढय़ात पुढचं वाक्य कानावर पडलं- ‘‘फकस्त ताई घरात हायेत.. ’’ ‘‘ओं..’’ या आश्चर्यवाचक उद्गारानंतर पुन्हा एकदा तोच आनंदोद्गार. अधिक विस्तृत आणि ठाय लयीत- (मात्र मनातल्या मनात!) ‘‘अरे वा ऽऽऽऽऽ..’’ तेवढय़ात पुढची मौलिक माहिती- ‘‘आंघुलीला गेल्यात. थांबताय का?’’ आता खरं म्हणजे निमंत्रणपत्रिका ठेवून कटायला काहीच हरकत नव्हती. पण ते वर्तमान आणि भविष्यसूचक वाक्य ऐकून कविराजांची पावलं जणू जमिनीने गिळून टाकली होती. त्यामुळे आसनस्थ होणं ओघानंच आलं. एकीकडे शल्यमहाराज दबत्या स्वरात- ‘‘जाऊया.. उगीच वेळ जातोय..’’ वगैरे कुजबुजत होते. पण इथे कानाला जणू दडे बसलेले. या संधीचा फायदा घेऊन मोलकरीणबाई घराची जबाबदारी या पाहुण्यांवर सोपवून दिसेनाश्या झालेल्या. पुन्हा एकदा सस्पेन्स.. वेळ मुंगीच्या पावलानी चाललेला.. कविराज एव्हाना भानावर येऊन पश्चात्तापदग्ध होण्याच्या बेतात.. तेवढय़ात आतून कुठूनतरी नळ बंद होणे.. दाराच्या कडीचा आवाज.. सपाता इकडून तिकडे जाण्याचे आवाज.. अशी नादवलयं एकामागून एक उमटू लागली. अजूनही अंत पाहणारी प्रतीक्षा चालूच होती. आणि मग अचानक जलतरंगाची लहर उमटावी तसे शब्द झंकारले.. ‘‘आले हं.’’
प्रभाकर पेंढारकरांच्या ‘अरे संसार.. संसार’ या नितांतसुंदर लघुकादंबरीत या ‘‘आले हं..’’मधली अनाकलनीय जादू फार सुंदर उलगडून रेखाटली आहे. ती जरा मनात घोळतेय तोच दारावरचा पडदा बाजूला सारून टॉवेलनं ओले केस पुसत हसतमुखाने समोर साक्षात् ‘ती’ उभी. क्षणापूर्वी दबत्या आवाजात धुमसणारे शल्यमहाराजदेखील समोरचा ‘नजारा’ पाहून एव्हाना पार गारद झालेले. मग कवीराजांची काय कथा!
‘सचैल.. सुस्नात’ हे शब्द साकार करणारी एक रूपगंधा लावण्यमयी लालस अनुभूती समोर सदेह उभी होती. ‘उमटले कळीवर पाय दंवांचे ओले’ या जाणिवेच्या नाजूक, ओलसर खुणा सर्वागावर उमटलेल्या. आणि त्यातून हलके हलके उठू लागलेली अनोखी, उत्कट सुगंधाची वलयं.. ‘अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग, अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे गं’ ही प्रचीती अगदी थेट पुढय़ात अवतीर्ण झाली होती. काही कळण्यापूर्वी कुठूनतरी केशरी धुक्याच्या लाटा आसमंत व्यापत चालल्या.. आणि त्यामध्ये सगळे तपशील.. ती खोली, तिथली ती तीन अस्तित्वं, त्यांचं नाव-गाव हे सगळं धूसर होत दूर दूर गेलं. जाणीव-नेणिवेत रंगांची उधळण सुरू झाली होती. कविमित्र रमेश गोविंद वैद्यांची एक देखणी रुबाई आहे..
चाहूल लागली, पण ना पाऊल दिसले
चांदणे झरावे तसे कुणीसे हसले
जणू गुलाबकलिका धुक्यात न्हाली होती
भेटाया मजला कविता आली होती..
आणि खरोखरच, एरवी लाख आर्जवं, मिनत्या करूनही दाद न देणारी कवितासखी रंगांचा कल्लोळ झालेल्या त्या सुगंधी धुक्याच्या अनिवार आणि अलवार लाटांतून हलके हलके सन्मुख झाली. इतकंच नाही, तर पाहता पाहता शब्दांतून उलगडतही गेली..
नाहूनिया उभी मी सुकवीत केस ओले
..वेडय़ा मुशाफिराने त्याचेच गीत केले
अवकाश भारलेला.. माझे मला न भान
अनिवार एक होती ओठांवरी तहान
श्वासांचिया लयीत संगीत पेरलेले..
साधून हीच वेळ.. आला कुठून वारा
सुखवीत फूल.. त्याने लुटला पराग सारा
मग होय चंदनाचे अस्तित्व तापलेले..
दाही दिशांत तेव्हा आली भरून तृप्ती
अंगांग.. तेवणारी होई निवांत ज्योती
येई न सांगता जे; असले घडून गेले
.. वेडय़ा मुशाफिराने त्याचेच गीत केले