अगदी खरं बोलायचं तर काव्यविश्वातला ‘समस्यापूर्ती’ हा काव्यप्रकार मला लहानपणापासून फारसा आवडत नाही. केवळ रसिक म्हणूनही नाही आणि कवी म्हणून तर नाहीच नाही.. बुद्धीच्या कोलांटउडय़ा मारून कसरत करायची आणि जादूगारानं दृष्टिभ्रम निर्माण करून काही चमत्कार दाखवावा तसे कवितेशी खेळ करायचे, यात कधी रसच वाटला नाही. पण तरीही त्याविषयी तुच्छतेनं बोलावं हेदेखील मान्य नाही. कारण त्यापाठीमागे एक दरुगधीयुक्त आढय़ता दडलेली असते. कुठल्याही नवनिर्मितीसाठी काही ना काही प्रतिभा किंवा किमान उच्च कौशल्य आवश्यक असतं, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे कवी म्हणून हा किंवा कुठलाच प्रकार मी कधी वज्र्य मानला नाही. आणि योग असा की, माझं अगदी नवागत कवीपण प्रथम जगासमोर आलं ते समस्यापूर्तीच्या एका अनोख्या आव्हानातूनच. ते सारं घडलं ते असं-
आमची हेमाताई लग्न होऊन कलिनाच्या एअर इंडिया कॉलनीत सुस्थिर झाली होती. दादा दिल्ली मुक्काम संपवून मुंबईत नाटय़चित्रविश्वात आपला जम बसवू लागला होता. सजग हेमाताईने एकेदिवशी एका वर्तमानपत्रात एक छोटंसं निवेदन वाचलं- ललित-कलादर्श या नाटय़संस्थेनं त्यांच्या गाजत असलेल्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाच्या शतकमहोत्सवी प्रयोगाच्या निमित्ताने एक अभिनव समस्यापूर्ती काव्य स्पर्धा जाहीर केली होती. त्या काळात अभिव्यक्ती या बाबतीत अस्मादिकांच्या आघाडीवर सारी सामसूम होती. पण आमच्या वडिलांचं कवित्व जोमात असल्याने हेमाताईनं त्यांच्यासाठी ते कात्रण पाठवलं असावं. साहजिकच ते माझ्याही नजरेला पडलं. मघाशी म्हटल्याप्रमाणे समस्यापूर्ती हा प्रकार तसा रसिक म्हणूनही फारसा भावणारा नव्हता. पण ज्या काही पाच सहा ओळी दिल्या होत्या त्यातील एका ओळीनं माझं लक्ष्य वेधलं. नेहमीच्या ओळीपेक्षा ती ओळ साधीसुधी आणि तरीही वेगळी होती ‘कवन असे विसरेल कुणी का?’ नकळत अंतर्मनातले धागे काहीतरी विणू लागले. न विसरली गेलेली काव्यं म्हटल्यावर आठवलं वाल्मीकीरामायण, कालिदासाची मेघदूत, शाकुंतल ही महाकाव्य आणि बृहत्कथा स्वत:च्या रक्ताने लिहिणारा आणि स्वत:च्या हाताने ती जाळूनही टाकणारा कवी गुणाढय़.. संस्कृत शिक्षक शं. गो. आपटय़ांनी सांगितलेली त्या कवीची करुण गंभीर कथा हृदयाचा ठाव घेणारी होती. परिणामी नियोजित तारखेच्या आधी एक समस्यापूर्ती ललितकलादर्शच्या पत्त्यावर रवाना झालीही. या कानाची गोष्ट त्या कानाला तर सोडाच पण या हाताचं कर्म त्या हातालाही कळू न देता..
मुंबईत झालेल्या महोत्सवी प्रयोगाच्या आदल्या प्रयोगात त्या काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर झाला. ‘समस्यापूर्ती काव्यस्पर्धेचा प्रथम क्रमांक विजेता आहे, कवी सुधीर मोघे, किलरेस्करवाडी..’ केवळ योगायोगाने तिथे उपस्थित असलेले श्रीकांत मोघे हे ऐकून तीन ताड उडालेच.. त्यानं आणि हेमाताईने हर्षभराने मला अभिनंदनाचं पत्र पाठवलं आणि मुंबईला बोलावून घेतलं. त्या पारितोषिक वितरण सोहळ्यातील पंडितराज जगन्नाथ यांच्या वेशातील भालचंद्र पेंढारकर हे पारितोषिक देत असतानाचं ते छायाचित्र आणि त्यातला तो पोरगेला सडसडीत बांध्याचा विजेता कवी पहाताना आज फार मौज वाटते. आणि इतक्या वर्षांनी त्या ओळी पहाताना जाणवते एक अनोखी अपूर्वाईही.
‘मूर्तिमंत कारुण्य’ जन्मले उदय,अहेतुक क्रौंच-वधातून
‘मेघदूत’ जगि चिरंजीव हो प्रणयी जीवांच्या विरहव्यथेतून
‘वंचनेतल्या वेदने’तुनी तेजस्वी ‘शाकुंतल’ घडले
‘बृहत्कथे’स्तव गुणाढय़ कवीने निजरक्ताचे सिंचन केले..
जगीं निरंतर महाकवींच्या दु:खाश्रूचे मोती बनले
ऐरणीवरी आपत्तीच्या काव्य नित्य उजळून चमकले.
‘व्यथा बोलते काव्य चिरंतन’ सत्य कुणी हे नाकारिल का?
मरणी अमरता चेतविणारे ‘कवन’ असे विसरेल कुणी का?
‘नकला-कार’ आणि ‘नक्कल’ हे पूर्वग्रहदूषित शब्दप्रयोग कुणा महाभागानं योजले आहेत कोण जाणे. वरकरणी दिसणाऱ्या व्युत्पत्तीनुसार पहायला गेलं तर जो ‘न-कलाकार तो नकलाकार किंवा ‘न अक्कल’ ती नक्कल असे ‘अनर्थ’ ओढवतात. सुप्रसिद्ध नकलाकार भोंडे (आमच्या प्रकाश भोंडे यांचे आजोबा) यांचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी त्यांच्या चरित्रातील त्यांची छायाचित्रं मी अगदी विद्यार्थिदशेत पाहिली होती आणि केवळ थक्क झालो होतो. रॅंग्लर र. पु. परांजपे, हरीभक्तपरायण पांगारकर, भालाकार भोपटकर अशा विविध व्यक्ती एकाच व्यक्तिमत्त्वातून प्रकट होताना दिसत होत्या. ते सर्वार्थानं खरंखुरं व्यक्तिदर्शनच होतं. त्याच परंपरेतील सदानंद जोशी यांची व्यक्तिदर्शनं तर मी स्वत: पाहिली-अनुभवली होती. अभिजात व्यक्तिदर्शन हे त्या त्या व्यक्तिमत्त्वाच्या डोळस आणि सखोल अभ्यासातून उभं राहू शकतं आणि त्यालाही एक वेगळी प्रतिभा लागते याविषयी एक निर्मळ, चोखंदळ रसिक म्हणून मला मुळीच संदेह नाही. पण शब्दातून व्यक्तिदर्शन हा अनोखा अनुभव कवी म्हणून आपल्याला घ्यावा लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तोही योग पुण्यात स्थलांतरित होताना अगदी सलामीलाच आला आणि तोही पुन्हा एकप्रकारे समस्यापूर्ती म्हणूनच.
खास युवकांसाठी अशी एक स्वतंत्र भूमिका घेऊन संपादक दत्ता सराफ यांच्या नेतृत्वाखाली साप्ताहिक ‘मनोहर’नं जणू कात टाकून टवटवीत नवं रूप घेतलं होतं. आणि त्यातलाच एक भाग म्हणून एक काव्यस्पर्धा योजली होती. काही काव्यपंक्ती दिल्या होत्या आणि त्या ओळी मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर काव्यरूपात कसे साकार करतील, असं ते एक मजेदार आव्हान होतं. दिलेल्या काव्यपंक्तीतील एका छोटय़ाशा ओळीनं पुन्हा एकदा माझं लक्ष्य वेधलं. ‘वेदनेचा ना उरे हव्यास आता..’ पुन्हा एकदा व्यक्तिदर्शन.. म्हणजे खरं तर एक आभास पण तरीही पुरेसा सकस, प्रभावी आणि अभिजातही.. इथंही मी पुन्हा पारितोषिक विजेता ठरलो होतो. सगळ्या ओळी आता स्मरत नाहीत, पण वानगी म्हणून ही अवतरणे. प्रथम कवी पाडगावकर..
‘नितळ निळे आकाश.. त्यातून ढगाचे शुभ्र पक्षी
हिरवीगार कुरणं.. त्यावर सावल्यांची अवखळ नक्षी
केशरी उन्हांत भिजलेले तुझे निळे डोळे
त्या डोळ्यांत मी हरखून बघतो सारे विश्व निळे’
१९६८ सालची ही गोष्ट आहे. तेव्हा अजून बहुधा ‘श्रावणात गहन निळा’ बरसला नव्हता. निदान मी नक्की ऐकला नव्हता. पण तरीही, ‘रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी.. निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी’ची चाहूल अलगद आली होती. कविवर्य कुसुमाग्रज हे एकाच वेळी दूरस्थ, नितळ, निर्मळ आणि तरीही अवघड अनवट कवित्व.. त्याचा हा केवळ शब्द आभास
‘गहन अंधाऱ्या तमाचे जहर मी
तप्त काळे.. लक्ष वेळा प्राशिले
आणि अंगारात समिधा होऊनी
भाग्य जळण्यातीलही मी भोगिले..’
मात्र माझ्यातील कवी खराखुरा जमून रंगला तो कविराज बोरकर साकार करताना..
‘सांध्यवेला.. रंगरेखा धुंद गगनी पोहती
अन् प्रमाथी भाव- उर्मि रागिणी झंकारती
आज गात्रांतून तृप्त सांद्र गीते छेडिते
प्राण झाले तरल पक्षी.. दिव्य त्यांची कुजीते
खंत ना, ना खेद, नाही शल्य.. नाही आर्तता
वेदनेचा ना उरे हव्यास आता..
संथ शांत अथांग जलाशयातून एक ओंजळ घेऊन पुन्हा त्या जलाशयालाच वाहून टाकावी. तसाच काहीसा हा सर्व अनुभव होता, असं आज मागे पहाताना वाटतं. अशा प्रकारे आवडत नाही, भावत नाही असं म्हणता म्हणता ‘समस्यापूर्ती’ या अनोख्या काव्यबंधाला मी त्या आरंभ-काळात सामोरा गेलोच.. ‘म्यां केले, नच केले, करिन, न करणार.. प्रौढ ही न टिके..’ हे आमच्या वडिलांचं काव्य-वचन वारंवार त्यांच्या तोंडून ऐकायचो. त्यांची ही साक्षात प्रचिती म्हणावी का?
नंतर पुढच्या काळात मात्र सर्वार्थानं एक स्वतंत्र, स्वयंभू आयुष्य स्वीकारून वाटचाल सुरू केल्यावर समस्यापूर्ती हा व्यक्ती म्हणून एक सक्तीचा दैनंदिन अटळ अनुभव बनून गेला.. त्यामुळे माझ्या कविता-सखीला पुन्हा कधी ती बिकट वाट – वहिवाट दाखवायला न्यावं असं वाटलं नाही आणि कधी नेलंही नाही..
अगदी थेट आजमितीपर्यंत..

Story img Loader