जगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या आपल्या प्रेरणा कोणत्या? असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्वं समोर येतात. शब्द आणि सूर.. ह्यात आधी नंतर, पहिलं-दुसरं असं ठरवता येणं अवघड व्हावं इतक्या ह्या दोन गोष्टी परस्परात गुंतलेल्या आहेत. किंबहुना त्यांचा आपसूक विणत गेलेला आणि आजही विणला जाणारा गोफ म्हणजे आपलं जगणं ही एव्हाना एकप्रकारे अंतरीची खूण झाली आहे. पण तरीही कालानुक्रम लावायचाच ठरवला तर एक गोष्ट नक्की की अंतर्मनाला झालेला पहिला मधुर दंश हा ‘स्वरा’चाच होता.. त्यानंतर अल्पावधीतच त्यामध्ये शब्द ओवले गेले.. आणि कानामागून आलेलं हे शब्द नावाचं भावंड पाहता पाहता तिखट? नाही.. कधी तिखट, कधी आंबटगोड, पण परिणामी मधुर मधुरच होत गेलं.. पण म्हणून स्वरांची मातब्बरी थोडीही उणावली नाही. शब्द नेहमीच आपला उगम असलेल्या त्या ‘स्वर’ नावाच्या अमूर्ततेकडे आणि त्या पलीकडे विस्तीर्ण पसरलेल्या अथांग मौनाकडे ओढ घेत राहिले..
मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचे झाले
वितळले क्षितिज गंधात, रंगातून रूप निथळले
मौनाच्या संध्याकाळी स्पर्शाचा सुटला वारा
त्या तसल्या वादळ-प्रहरी विरघळून जाय किनारा
मौनाच्या संध्याकाळी एकांत बहरुनी फुलला
हृदयाचा झाला थेंब आभाळ होऊनी झरला
अनेक वर्षांनी ह्या कवितेकडे पाहताना आता अचानक जाणवतंय की माझा कलावंत आणि माणूस म्हणून झालेला आजवरचा सगळा प्रवास ह्या कवितेत सामावला आहे. जो मौनातून उगवून आला आणि मौनातच विरून जायचा आहे..
मौन हाच जर मूलभूत पाया मानला तर शब्द, सूर, रेषा, रंग हा अमूर्ताकडे जाणारा एक जिना ठरतो. जो पुन्हा अमूर्त अथांग मौनातच पोचणार आहे. पण हाच प्रवास उलटा करून पहायचा झाला तर, मौनाच्या सर्वात जवळ रंग-रेषा असतात, ज्यांच्या दृश्य रूपांत एक अबोल अरूप असतं.. त्या रेषांतूनच मग अबोल अक्षर आकार घेतं.. नंतर खरोखरच काही बोलू पहाणारे स्वर येतात, कारण त्यांना नाद, ध्वनी चिकटला आहे. मौन रूढ अर्थानं प्रकट होऊ लागल्याची ती पहिली पायरी. आणि मग येतात शब्द. कारण ते नादाला अर्थ देऊ लागतात. पण पुन्हा अर्थाचं प्रकट आणि अप्रकट विश्व हा एक प्रचंड अवकाश ध्यानी घ्यावा लागतो. कारण त्या अर्थाचे पुन्हा अनेक पापुद्रे.. ‘गीतातला शब्दार्थ तू, शब्दातला भावार्थ तू, भावातला गूढार्थ तू’ असा एक पुन्हा अमूर्ताकडे नेणारा प्रवास तिथेही असतोच. शिवाय मध्ये पुन्हा ‘स्पर्श’नामक अरूप बोलकं मौन डोळे मिचकावीत उभं.. म्हणजे ह्या सर्व अमूर्ताला पुन्हा साक्षात मूर्ताकडे आणणारं उष्ण अस्तित्व. गंमत म्हणजे त्या रक्तामांसाच्या जाणिवेवरही अंतिम स्वामित्व ‘मन’ नामक अमूर्त संकल्पनेचं, म्हणजे पुन्हा ते आदिम – अंतिम तत्त्व म्हणजेही ‘मौन’च असं हे सगळं उलट-सुलट रसायन आहे.
थोडक्यात, शब्द, नाद, रंग, रूप, रस, गंध आणि स्पर्श ह्यांचा अविरत चाललेला खेळ आणि कल्लोळ म्हणजे आपलं जगणं.. मात्र ही सगळी गुंतागुंत स्वीकारून आणि पचवूनही पुन्हा माझं साधसुधं म्हणणं हेच असेल की माझ्या अस्तित्वाच्या आणि आविष्काराच्या दोन मूलभूत वाटा म्हणजे शब्द आणि सूर.. कवी, गीतकार, संगीतकार ह्या माझ्या तीनही भूमिका आजवर साकार झाल्या आणि पुढेही होत राहतील त्या प्रामुख्याने ह्या दोन प्रेरणांतूनच.. त्यातील सर्वप्रथम झालेला स्वराचा दंश आणि नंतर शब्दांनी घेतलेली पकड ही मजेदार जन्म-जोड पाहताना आज असं जाणवतं की माझी कविता सखी सर्वार्थाने स्वयंभू असूनही, तिच्या कळत अथवा नकळत ती अखंड स्वरांचा वेध घेत राहिली आहे. कवी होण्याच्या दिशेकडे नुकताच वळत होतो तेव्हाची एक खूप जुनी कविता आता अचानक समोर उभी राहिली आहे.
सूर कुठूनसे आले अवचित पथी जाता जाता
उलगडल्या मानसी.. दिवाण्या स्वप्नधुंद वाटा
निर्विकार मन होते केवळ
तोच स्वरांचा आला परिमळ
गंधित धूसर जादू घडली आणि बघता बघता
रूप स्वरांचे तरल अपार्थिव
कणाकणातून दुखरे आर्जव
शब्दांपलीकडलेसे काही अस्फुट ये हाता..
नादमयी त्या वाटेवरती
धूसर स्वप्निल गाठीभेटी
अहेतुकाची प्रसन्न संगत अनाम मधुगीता
सूर भवतीचे सरले विरले
काळजात पण अक्षय उरले
मनात ओल्या मृदुल स्वरांच्या लाटांवर लाटा..
आज मी निश्चितपणे सांगेन की कुठल्याही एका क्षणापुरत्या अनुभवातून ही कविता उगवलेली नसणार.. किंवा कदाचित नकळत्या वयापासून तनामनावर पसरलेली स्वर-मोहिनी ह्या कवितेचं निमित्त करून प्रकट झाली असेल. कारण ती स्वरमोहिनी पुढेही माझ्या कविता आणि गीतातून अखंड वाहताना दिसते..
कळले ना,
जगणे गाणे आहे सारे
कोणीही गावो.. लागलेत तंबोरे’’
‘‘हळूहळू.. उमलते.. कोणते हे नाते?
तुझ्या वीणेवर माझे मन कसे गाते?’’
‘‘पाऊस कोसळे, चौखूर उधळे
घरटे आपुले शोधताहे
त्रिखंडात आज पावसाची गाज
पावसाचा षड्ज नादताहे..
माझ्या कवितेनं घेतलेल्या स्वरवेधाच्या अशा खूप खुणा ठायी ठायी दाखवता येतील. पण ह्या प्रवासात घेतलेला साक्षात स्वरवेध म्हणजे रागचित्रांच्या कविता.. एक कलाकार म्हणून अखंड मला खुणावत राहिलेलं, भयचकित करणारं आणि तरीही ओढ लावणारं तरल धूसर क्षितिज म्हणजे आपलं अभिजात भारतीय रागसंगीत.. शब्दांनी गारूड केलं नसतं तर ह्या निखळ स्वरज्योतीवर झेपावून जळून जाणारा पतंग झालोच नसतो असं म्हणवत नाही.. तो योग नव्हता.. पण निदान कवी म्हणून तरी ते रागसंगीत थोडं फार आळवता आलं हेही भाग्यच.. अर्थात, हेही श्रेय मुळात पं. जितेंद्र अभिषेकी आणि पुरुषोत्तम दारव्हेकर ह्या दोघांचं.
‘कटय़ार काळजात घुसली’मधली ती सुप्रसिद्ध रागमालिका सर्वपरिचित आहे. केवळ त्या मालिकेचाच एक स्वतंत्र प्रयोग करावा असे अभिषेकींच्या मनात आलं. त्यांना जोडणारी शब्दसंहिता मंचावरून सादर करण्यासाठी माझी योजना केली होती. तो प्रयोग झाला. रसिकांना आवडलाही. मी मात्र समाधानी नव्हतो. असं वाटत होतं की नाटकासाठी लिहिलेली ती संहिता अशी वेगळी काढून बोलू पहाणं योग्य नव्हे. त्यासाठी एक स्वतंत्र संहिता लिहायला हवी. पण त्यासाठी प्रियकराची प्रतीक्षा करणाऱ्या विरहिणीचं एकसुरी सूत्र नको.. आणि मग मनात आलं, की राग आणि प्रहर यांची जी जोड आपल्या संगीत परंपरेत रूढ आहे तिचाच काव्यात्म वेध घेऊ या.. राग प्रकृती, तिचे स्वर-स्वभाव यांचा मागोवा घेत कलती दुपार ते रात्रीच्या सर्व अवस्था संक्रमित होत त्यातून येणारी पहाट हा काळ उलगडत नेऊ या.
मुलतानी, पूरिया, मारवा, यमन, जयजयवंती, मालकंस, दरबारी, आसावरी, भैरव आणि मग कालनिरपेक्ष सदारंगिनी भैरवी.. आणि मग खरोखरच एकेदिवशी सूर लागला आणि हा सगळा स्वरवेध शब्दांतून आपसूक अलगद साकार झाला. कधी रागलक्षण हे रागवैशिष्टय़ त्या त्या प्रहराच्या वैशिष्टय़ात माझ्याही नकळत सामावलं.. मग, ‘उन्हाच्या तीव्र मध्यमाची देहावर जडलेली असते भूल/ संधीप्रकाशाचा कोमल ऋषभ त्यातून देत असतो चाहूल’ असा मुलतानी आकाराला आला. तर क्षितिजाचा षड्ज धूसर होतो, दाटून येतं एकटेपण/ घर असूनही बेघर व्हावं तसं एक विचित्र अधांतरीपण अशी मारव्यातली ‘रुखी आर्तता’ प्रकट झाली. काही राग तर केवळ त्यांची भावस्थिती घेऊन आले.
‘‘तारे दुरावतात.. ज्योती अधुऱ्या होतात
मध्यरात्रीचे अखेरचे क्षण मिठीमध्ये उरतात
स्वप्नात असतानाच त्या स्वप्नाचं यावं पुरतं भान
तशी कुठेतरी आत आत जागी होते जाण
काळोखाच्या काळजाला व्हावा उजेडाचा दंश
.. तसा असतो दुखरा, गहिरा, जागृत मालकंस
अभिषेकींच्या कार्यक्रमातून ही रागमालिका सादर झालीय. पण माझ्या कविता पानोपानीतून तब्बल पंचवीस वर्ष रसिकांच्या साक्षीनं रंगभूमीवर ही स्वर – शब्द – चित्रं मी सर्वागानं अनुभवली. बालपणीच जाणिवेत रुजलेलं शब्द-स्वरांचं सायुज्य त्यातून अधिक खोलवर उमगलं आणि मग माझ्याच ‘लय’ मधील एका सप्तपदीतून प्रगटही झालं.
हा सूर अनाहत
कोठून आला येथे?
हा जिथे तरंगे
तेथे गाणे उमटे
हा अखंड अविरत अथक वाहता राहे
हा सूर जणू.
.. शब्दाचे हृद्गत आहे..