आत्ता आत्ताच या सदरात ‘परछाईयां’ या काव्यानुवादाची जन्मकथा मी सांगितली. तेव्हाच वाटत होतं की, याच विषयावर आपण पुन्हा एकदा लिहिणार आहोत. त्या दीर्घकाव्याचं पुढे काय झालं, ते प्रकाशात आलं की नाही, ही उत्सुकता तुम्हा रसिकांच्या मनात असणार, तेव्हा तो उत्तरार्धही सांगायला हवा. मात्र, आज तो सांगत असताना त्याला एका खोल शोकात्मतेची गडद किनार वेढणार आहे याची पुसटशीही कल्पना यापूर्वी मनाला शिवली नव्हती. योगायोग असा की, मागच्याच ‘येणारच तू..’ या लेखात माझ्यातली सुप्त मरण-जाणीव सहजचिंतनासारखी प्रकट झाली होती. खरं तर असा एकच सूर कायम लावून ठेवायला मला स्वत:लाच आवडत नाही, पण तरीही तो धागा इथेही पुन्हा सूत्ररूप येणं तसं अपरिहार्यच म्हणावं लागेल.
‘शिशिरऋतूच्या पुनरागमे
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
नकळे उगाच रडावया’
कविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या या ओळी प्रथम वाचनात आल्या तेव्हा तशी काही पाश्र्वभूमी नसतानाही आत कुठेतरी गलबलून आलं होतं. आता इतके पावसाळे पाहिल्यावर आणि सर्वागानं अनुभवल्यावर अशी पानगळ ही गोष्ट खरं म्हणजे अंगवळणी पडायला हवी. पण मागच्या दोन-तीन वर्षांत आसभास नसताना जिवलग मित्र आणि निकटवर्तीय यांची मालिकाच ज्या प्रकारे एकामागे एक निखळत गेली, ती जणू या शब्दांच्या निखाऱ्यांची दाहक प्रचीतीच होती. सुरेश अलुरकर, अजित सोमण, सतीश कदम, उदय धर्म, शरद चितळे, देबू देवधर आणि अगदी आत्ता नुकताच, ध्यानीमनी नसताना काळाच्या पडद्याआड गेलेला प्रभाकर वाडेकर.. ‘परछाईयां’चा जो उत्तरार्ध सांगायचा आहे, त्या हकीकतीचा नायक प्रभाकर वाडेकर आहे.
१९७० ते १९८० हे दशक हे अस्मादिकांच्या निरंकुश आयुष्यातले सर्वार्थानं मंतरलेले दिवस होते. त्या मंतरलेपणाचं सर्वाधिक श्रेय जातं ते फग्र्युसन रोडवरील ‘कॅफे डिलाईट’ नामक तत्कालीन अवर्णनीय सांस्कृतिक अड्डय़ाला. ते प्रकरण काय होतं हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी माझ्या ‘निरंकुशाची रोजनिशी’ नामे पुस्तकातील ‘दुसरं घर’ हे प्रकरण आवर्जून वाचावं. समाजकारण, राजकारण, कलाकारण (हा शब्द आहे की नाही कोण जाणे. पण नसलाच तर ‘असो’!) अशा सर्व क्षेत्रांतील नामवंत असलेली आणि होऊ पाहणारी माणसं तिथं पडीक असायची. आजची अनेक- आजच्या भाषेत ‘दिग्गज’ व्यक्तिमत्त्वं त्यात होती. त्यातील ‘महाआचार्यपद’ मजकडे आपसूक आलं होतं. (कारण इतका फुलटाइम पडीक मिळणं दुरापास्त.) तेव्हा जो मौल्यवान गोतावळा माझ्याभोवती जमला, त्यात आघाडीवर होता प्रभाकर वाडेकर. बहुधा नुकताच कॉमर्स पदवीधर झाला होता. पण अजून ती कोवळीक सर्वागावर तरळत होती. एक अनोखा चमकदारपणा त्याच्या अवघ्या अस्तित्वातून दरवळत होता. पण बहुतेक वेळी त्यासोबत येणारा उथळपणा इथं नावालाही नव्हता. त्यामुळे पाहता पाहता तो जवळचा झाला. एके दिवशी अचानक म्हणाला, ‘‘अजून तुझं व्हिजिटिंग कार्ड नाही? मी करतो.’’ आणि खरोखरच माझं पहिलंवहिलं कार्ड त्यानं मस्तच केलं. त्यावर माझी लफ्फेदार सही वापरायची कल्पनाही त्याचीच. माझ्या सर्व वर्तुळात ते कार्ड खूप प्रिय झालं होतं. आनंद मोडकसारख्या मित्रांना तर ते आजही तपशीलवार आठवतं.. म्हणजे जणू दिसतंच! तात्पर्य, माझ्यासारख्या भटक्या पक्ष्याला अधिकृत ओळख देऊन त्यानं सुस्थिर केलं.
असेच दिवस चालले होते आणि पुरुषोत्तम करंडकचे सुगंधी वारे वाहू लागले. एके दिवशी अचानक प्रभाकर म्हणाला, ‘‘मला पुरुषोत्तमसाठी एकांकिका लिहून दे.’’ मी अंमळ पडलोच. कारण ‘कवी’ नामक प्राण्याला कवितेशिवाय दुसरं काही येऊ नये, म्हणजे येत नसतंच. आणि समजा, येत असलं तरी त्यानं ते करता कामा नये, असा एक सार्वजनिक आग्रह निदान त्याकाळी तरी होता. कथा, कादंबरी हा माझा प्रांत नाही. पण पुण्यात येण्यापूर्वीच्या कॉलेजवयात मी प्रामुख्यानं नाटकातच रमलो होतो. त्यामुळे नाटय़लेखन हा काही माझ्यासाठी खूप परका प्रांत नव्हता आणि नाही. तरीही त्याकडे मन वळत नव्हतं. पण रंगमंचीय प्रयोग याविषयी मनात खूप ओढ होती.. काही कल्पनाही होत्या. त्यातलीच एक मी त्याला सुचवली. त्याला म्हणालो, ‘‘माझ्याकडे एक दीर्घकाव्य आहे. त्याचं नाव आहे- ‘परछाईया.’ साहिर लुधियानवीच्या एका दीर्घकाव्याचा तो मी केलेला अनुवाद; नव्हे, ‘अनुनाद’ (हा शब्द अजित सोमणचा!) आहे. मला त्यात रंगमंचीय शक्यता दिसतात. प्रभाकर उतावीळपणे म्हणाला, ‘‘दे मला..’’ माझ्या स्मरणकोशात निवांत पहुडलेली ती दीर्घकविता प्रथमच कागदावर येऊन हस्तांतरित झाली. तेव्हाच असंही ठरलं की, त्याला त्यात काही गरज भासलीच तर पूरक काव्य मी लिहून द्यायचं. काही दिवसांतच त्यानं मला त्या जागा दाखवल्या. मी त्याला माझी एक आधी लिहिलेली कविता दिली. ‘लहरती वाऱ्याचे नि:श्वास, मिसळले त्यात कळीचे श्वास, हे श्वास कुणाचे? माझे.. की तुझे?’ आणि शिवाय एक नवी कविता लिहिली- ‘हे फूल कसे जगेल?’
आणि खरोखरच बी. एम. सी. सी. कॉलेजतर्फे प्रभाकरनं त्या दीर्घकवितेचा संस्मरणीय रंगमंचीय प्रयोग साकार केला. मी त्याच्या काही तालमी पाहिल्या होत्या. छान वाटत होतं. त्यावेळी मी मुंबईत चित्रपट व्यवसायात व्यग्र होतो. त्यामुळे स्पध्रेतील प्रयोग मी पाहू शकलो नाही. पण त्याचा प्रभाव पडला, ही हकिकत ऐकली होती. परीक्षक समितीला तो प्रयोग ‘एकांकिका’ या सदरात घ्यावा की नाही, असा संभ्रम पडला असेल तर त्यात नवल नाही. त्यामुळे पारितोषिक अर्थातच मिळालं नाही. पण तरीही त्याचा गाजावाजा खूप झाला. माधव वझेंनी समीक्षणात त्याची स्वतंत्र दखल घेतलेली मी स्वत: वाचली. ‘रंगमंचीय प्रयोगांना एक वेगळं वळण देऊ पाहणारा प्रयोग’ असं म्हणून त्यांनी आवर्जून प्रशंसा केली होती. नंतरही त्याचे एक-दोन प्रयोग झाले. आज इतकी र्वष होऊनही संबंधितांच्या आणि जाणकारांच्या मनात त्याचं स्मरण जागं आहे.
या सर्व श्रेयाचा सर्वेसर्वा अधिकारी अर्थात प्रभाकर होता. पण त्यात सहभागी झालेल्या व्यक्तींची नावं आज मागे वळून पाहताना खूप मौज येते. त्याचं संगीत दिग्दर्शन राहुल घोरपडेनं केलं होतं. समीरण वाळवेकर, रवींद्र खरे, अपर्णा पणशीकर, डॉ. वसंतराव पटवर्धनांची कन्या ही मंडळी त्यात होती. पण याखेरीजही एक नाव विसरून चालणारच नाही- चित्रा देवभानकर. पुढच्याच वर्षीच्या पुरुषोत्तममध्ये तिनं केलेली मनोरुग्ण शालेय मुलीची भूमिका मी आजही विसरलेलो नाही. ‘परछाईयां’च्या तालमी पाहताना माझ्या मनात उगीचच डोकावलेली एक चाहूल खोटी ठरली नाही. कारण हीच चित्रा पुढे अल्पावधीत सौ. वाडेकर झाली. प्रभाकरबरोबरचं सहजीवन तिनं सर्वार्थानं सिद्ध केलं, हे मला इतक्या दुरूनही जाणवलं आहे.
‘कवितासखी’च्या वाटचालीत हा सगळा परामर्श अपरिहार्यच होता. वाटत होतं, हे आपण सगळं सविस्तर लिहू. पुन्हा एकदा तो काळ, तो आनंद या सर्वासमवेत मनोमन वाटून घेऊ. मग प्रभाकरचा उत्फुल्ल फोन येईल. पण जे घडलं ते विपरीतच. खरं म्हणजे मीही काही कारणानं त्या दिवशी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्येच सातव्या मजल्यावर होतो. खाली प्रभाकर किडनी स्टोनसाठी दाखल झाला. अचानक ब्रेन हॅमरेजनं कोमात गेला आणि पाहता पाहता दूर दिगंतात विरूनही गेला. त्यावेळी मी बाहेर गेलो होतो. हे कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मनात घोळणाऱ्या सुखद स्मरणरंजनाची अकल्पितपणे श्रद्धांजली व्हावी, यापरता दैवदुर्वलिास कोणता?
‘परछाईयां’च्या रूपानं आम्हाला कायमचं एकत्र जोडणाऱ्या साहिरचे शब्दच अशा वेळी मनात जागे होतात..
कदम कदम पर होनी बठी
अपना जाल बिछाए
इस जीवन की राह में आखिर
कौन कहाँ रह जाए ..
कौन कहाँ रह जाए..
आत्ता आत्ताच या सदरात ‘परछाईयां’ या काव्यानुवादाची जन्मकथा मी सांगितली. तेव्हाच वाटत होतं की, याच विषयावर आपण पुन्हा एकदा लिहिणार आहोत. त्या दीर्घकाव्याचं पुढे काय झालं, ते प्रकाशात आलं की नाही, ही उत्सुकता तुम्हा रसिकांच्या मनात असणार, तेव्हा तो उत्तरार्धही सांगायला हवा. मात्र, आज तो सांगत असताना त्याला एका खोल शोकात्मतेची गडद किनार वेढणार आहे
आणखी वाचा
First published on: 07-07-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व कविता - सखी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poet sudhir moghe writes on poems