‘आपण कविताच लिहितो,’ असा सुप्रसिद्ध कवयित्री उषाताई मेहतांचा असा समज होता. पण अचानक त्यांना त्यांचे वेगवेगळ्या वेळी लिहिलेले पेटाराभर लेख सापडले आणि आपल्या हातून गद्यालेखन झाल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. त्या शोधातून स्वत:लाच नव्याने भेटत त्यांनी त्या लेखांचं आकर्षक जोडचित्र ऊर्फ ‘कोलाज’ नावाचं संकलन केलं. त्या जोडचित्राची सुरुवात उषाताईंपासूनच होते. त्यांचं राष्ट्र सेवा दलाच्या छायेतलं आणि तरीही फुलपाखरासारखं बागडणारं, स्वच्छंद बालपण, त्यांच्या छळवादी मनाच्या आत्मशोधातून जन्मलेल्या त्यांच्या अतिशय खासगी कविता… त्यांचे ‘आभास’, ‘अप्रूप’, ‘निरंतर’ हे संग्रह, ‘मितवा’ ही मालिका कविता आणि त्यांचं दिनकर गांगल, विजयाबाई राजाध्यक्ष, अवधूत परळकर यांसारख्या मान्यवरांकडून झालेलं स्वागत आणि कौतुक यांच्या हकिकतीतून आपली उषाताईंशी मैत्री होते. उषाताईंच्या सांगण्यातून विजयाबाईंच्या निगर्वी मोठेपणाची जाणीव होते, हात जुळतात. त्यानंतर वसंत बापट, विंदा आणि पाडगावकर या दिग्गजांवरचे, निरनिराळ्या कारणांनी निरनिराळ्या काळात लिहिलेले प्रत्येकी दोन-तीन लेख सलगपणे दिले आहेत. त्यामुळे त्याच कवीच्या कवितांच्या भिन्न पैलूंचा लखलखाट कालातीत दृष्टिकोनातून अनुभवता येतो. जीवनानंदाचा आविष्कार काव्यातून घडवणारे वसंत बापट, शब्दांनी नादावणारे आणि गाणं गाऊन दाखवावं तसं जगणं मरणाला देऊन चिरंतन फुलत राहिलेले पाडगावकर, वाचकाच्या व्यक्तिगत मर्यादा आणि सादर होणारं कवितेचं स्वरूप यांच्या संवादातून काव्यानंद निश्चित होतो म्हणणारे फणशी स्वभावाचे विंदा हे सारे उषाताईंच्या नजरेतून दिसतात. त्या तिघांच्या कवितांच्या तीन तऱ्हा, काव्यवाचनाची वेगवेगळी ढब, त्यांनी एकमेकांना दिलेल्या कोपरखळ्या हे प्रत्यक्ष ऐकल्या-पाहिल्याचा आनंद कोलाज वाचताना मिळतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा