(तृ षार्त वसुंधरेवर जेव्हा कृष्णकाळ्या जलदांची दाटी होते, विजांच्या लखलखाटाने आकाशाचा घुमट उजळून निघतो, सोसाटय़ाचा वारा मंद मृद्गंध घेऊन आपली नासिकाग्रे सुखावून जातो [किंवा मग मान्सून अमुक अमुक तारखेस केरळात पोचला वगरे बातम्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानी दिसू लागतात] तेव्हा आमुच्यासारख्या कविहृदयाच्या ललित लेखकूंच्या प्रतिभेला बहर येतो.. बॉलपॉइंट लेखणी सफेदधवल कागदी उतरण्यास सरसरू लागते.. मन:पटलावर काव्यफुले उमलू लागतात.. गेलाबाजार ललितलेख तर हमखासच सुचू लागतो..
या पावसाळी ललितलेखांचे एक बरे असते. यमके वगरे जुळवण्याची वाङ्मयीन भानगड तेथे नसते. आपण फक्त एक करायचे, इतरांची काव्यफुले घ्यायची आणि ती गोग्गोड शब्दांमध्ये ओवत सुटायचे. अर्थात हेही ते येरागबाळ्याचे काम नोहे! महाविद्यालयात असताना कविता पाडण्याचा किंवा निवृत्तीनंतर वाचकपत्रे लिहिण्याचा अनुभव गाठीशी असल्याशिवाय ते जमणे नाही. आम्ही जन्मोजन्मीचे उपसंपादक. त्यामुळे आम्हांस ते छानच जमते. तुम्हीच पाहा..)
..
पाऊस..
अहाहा.. ओहोहो!
तृषार्त वसुंधरेवर जेव्हा कृष्णकाळ्या जलदांची दाटी होते, विजांच्या लखलखाटाने आकाशाचा घुमट उजळून निघतो, सोसाटय़ाचा वारा मंद मृद्गंध घेऊन आपली नासिकाग्रे सुखावून जातो, (होय. हे रिपिट होतंय हे आम्हांस माहीत आहे. पण प्रत्येक वेळी नवीन नवीन वाक्ये आणायची कुठून, संपादक महोदय?) आणि एका क्षणी आभाळातून मोत्यांसम टपटप थेंब धरतीच्या कुशीत कोसळू लागतात.. तो मोद काय वर्णावा?
अवघी धरती आनंदभुवन होऊन जाते आणि निरागस निष्पाप देवाघरची फुले जी की मुले ती अंगणी फेर धरून गाऊ लागतात..
ये रे ये रे पावसा
तूच देतो पसा
पसा झाला मोठा
पावसाला जरी तोटा
ये गं ये गं सरी
माझे कंत्राट भरी
सर आली धावून
रस्ते गेले वाहून
अरण्यात राहून वरुणाची प्रार्थना करणाऱ्या ऋषींच्या ऋचेतील भावपूर्ण याचनेची आणि या बालगीताची तुलना कोण बरे करणार नाही? हीच मुले पुढे भान हरपून गाऊ लागतात..
पाऊस पडला झिमझिम
टँकरलॉबी ओलीचिंब
पाऊस पडला मुसळधार
तरी टँकरलॉबी हिरवीगार
पाऊस पडला टक्क्याचा
खड्डय़ांमधल्या धक्क्याचा
एकेक खड्डा कोटीचा
वाहतूककोंडीतल्या खोटीचा
पण हा पाऊस नुसतीच कोंडी करीत नसतो. तो कधी-कधी वेदनादायीही असतो.. कवी अनाम म्हणतो,
पाऊस पडला गारांचा
डोळ्यांमधल्या धारांचा
धोधो पडला रानात
सिंगल कॉलम पानात
पाऊस पहिल्या धारेचा
तुटक्या छत्रीच्या तारेचा
पाऊस रपट जाण्याचा
चिखलामधल्या न्हाण्याचा
..
सरींवर सरी आल्या गं
सचल चाळी न्हाल्या गं
चाळीत शिरले नाले गं
बघण्या मेयर आले गं
लोकल झाल्या भिजुनी चिंब
थरथर कांपति सिग्नलखांब
रुळांत रुसुनी गेल्या गं
सरींवर सरी आल्या गं
पाण्यात रूळ जाय बुडून
गर्दी डब्यात पदी थिजून
सरभर गोपी झाल्या गं
सरींवर सरी आल्या गं
निळ्या छपरांखाली कोणी
उंबऱ्याआडून उपसे पाणी
तलाव झाल्या खोल्या गं
असा हा पाऊस.. रात्रंदिन कोसळतोच आहे.. थांबण्याचे नावच घेत नाही.. ओला दुष्काळ पडण्याची वेळ येते. विरोधक पॅकेजची मागणी करू लागतात.. तेव्हा कवीच्या ओठांतून आपोआप प्रार्थना फुटते..
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
नको करू गारपिटी ऐन सेशनाच्या काळी
नको नाचू तडातडा अस्सा वावरांमधून
पुन्हा पेरणीच्या साठी आणू बीबियाणे कोठून
नको करू झोंबाझोबी माझे नाजूक सरकार
कुठून आणू पॅकेज माझी तिजोरी भिकार
असा हा मोदमयी, मोहमयी पर्जन्य! मनामाणसांना सुखावणारा!
त्याचा आनंद लुटायचा तर त्यात भिजावयासच हवे..