सार्वजनिक जीवनात सातत्याने प्रभावशाली राहणे, दीर्घकाळ आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. अशी किमया सेनापती बाळासाहेब ठाकरेंना साध्य झाली होती. त्यांनी ४६ वर्षांपूर्वी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. संघटनेचे नेतृत्व ते एकटेच करतील आणि सेनापतींचा आदेश कुणाही शिवसनिकाला डावलता येणार नाही, हे त्यांनी प्रथमतच स्पष्ट केले होते. संघटनेत ‘लोकशाही’ किंवा ‘सामुदायिक नेतृत्व’अशा निर्थक कल्पनांना वाव असणार नाही ही गोष्ट ते प्रारंभापासून स्पष्टपणे मांडत. पुरोगामी महाराष्ट्रात संघटनांतर्गत लोकशाही नाकारणे, आदेश पद्धतीचा मनोमन स्वीकार करणे, कामगारांच्या संपांना विरोध करणे, श्रमिक वर्गाची एकजूट मोडणे या गोष्टी जनतेच्या पचनी पडतील असे त्या काळात कुणाला वाटले नव्हते. शेकाप, समाजवादी, कम्युनिस्ट हे पक्ष १९६६-६७ काळात प्रभावी होते. देशाच्या राजकारणात अँटीकाँग्रेसिझमचा जमाना सुरू झाला होता. त्यामुळे शिवसेनेसारखी संकुचित वैचारिक धारणेची संघटना समाजमनात मूळ धरू शकणार असेच सर्वाना वाटत होते.
डावे पक्ष तर शिवसेनेबाबत अगदीच बेसावध राहिले. शिवसेनेबाबत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सौम्य धोरण घेत. किंबहुना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अंतस्थ पाठिंब्यावर शिवसेनेचा खेळ उभा आहे असे बोलले जायचे. त्यात तथ्यही होते. वेळप्रसंगी सरकार पाठीशी उभे राहील अशा अपेक्षेने मुंबईतील गुन्हेगार जगत शिवसेनेकडे झुकले. शिवसेनेतून फुटू इच्छिणाऱ्या पुढाऱ्यांना या गुन्हेगारांचा धाक वाटत असे. छगन भुजबळ यांना शिवसेना सोडल्यानंतर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अज्ञातवासात राहावे लागले होते. याउलट इतर पक्षांमधून बाहेर पडणारे निर्धास्तपणे बाहेर पडू शकत. तेही संधिसाधूच असत. पण त्यांना स्वपक्षीयांकडून जिवाला धोका होईल असे कधी वाटत नसे. जनता पक्षातून फुटलेले एक आमदार सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात तात्काळ मंत्री झाले. पण जनता पक्षाचे कार्यकत्रे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करतील असे त्यांना कधी वाटले नाही. शिवसेना अखंड राहिली ती काही अंशी अशा बाह्य़ शक्तींमुळे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा