या दीर्घकवितेत कोकणातील राजकीय-सामाजिक संघर्ष आहे, जनजीवन आहे, मालवणी बोलीच्या अक्कडबाज आणि ठाशीव शब्दांची पखरण आहे. कविता दीर्घ असल्याने तिला आख्यानाची गती आहे. त्यात उपहास, उपरोध, राग, संताप आहे. तिला लोककथेचाही बाज आहे. शिवाय कोकणापुरतेच भाष्य नसून व्यापक प्रयत्न आहे.
नव्वदोत्तर काळात लिहू लागलेल्या तरुण कवींमध्ये अजय कांडर हे एक लक्षणीय नाव आहे. कोकणासारख्या निसर्गसमृद्ध प्रदेशात वास्तव्याला असलेल्या कांडर यांचं आपल्या तांबडय़ा मातीशी आणि संस्कृतीशी असलेलं नातं अगदी घट्ट स्वरूपाचं आहे. त्यातूनच त्यांची कविता आकाराला आली आहे. सात वर्षांपूर्वी आलेला त्यांचा ‘आवानओल’ हा पहिला कवितासंग्रह त्यांच्या कवितेतील वेगळेपणाची साक्ष देणारा होता. त्यानंतरही कांडर यांचं कवितालेखन सुरूच होतं. पण या कविता संग्रहरूपात यायला मात्र बराच काळ जावा लागला. अलीकडेच त्यांचा नवा संग्रह ‘हत्ती इलो’ प्रकाशित झाला आहे. ही एक दीर्घकविता आहे. अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या दीर्घकविता प्रकाराला नव्वदोत्तर  काळातील काही कवींनी पुन्हा हात घातला आहे. छंदाकडून मुक्तछंदाकडे आणि मुक्तछंदाकडून पुन्हा दीर्घकवितेकडचा हा प्रवास नव्वदोत्तर कवींचा एक विशेष म्हणून सांगता येण्यासारखा आहे. कविता ही मुळातच एक सर्जनात्मक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती कधी कुठले रूप घेऊन जन्माला येईल, याबाबत बऱ्याचदा स्वत: कवीलाही सांगता येत नाही. आणि कवितेचा प्रकार कुठला आहे, यापेक्षा ती कोणत्या प्रकारे अभिव्यक्त होते, हे जास्त महत्त्वाचे ठरते.
कवी आपल्या भोवतालातूनच घटना निवडून कविता लिहीत असतो. पाहणे, ऐकणे, बोलणे आणि वाचणे या प्रक्रियेतून त्याच्या हाताशी समाजव्यवहारातल्या काही घटनांचे धागेदोरे लागत असतात. त्यामुळे तेथील कला, संस्कृती, रूढी-परंपरा, लोककथा, लोकसंगीत, आख्यायिका, मौखिक-अमौखिक इतिहास यांचा तपशील त्याच्या लेखनातून येत राहतो. त्यातूनच त्याची अभिव्यक्ती आविष्कृत होते. कांडरही याला अपवाद नाहीत. ‘हत्ती इलो’ ही त्यांची दीर्घकविता याचेच उदाहरण म्हणून सांगता येईल.
खेडी आणि शहरे यांतील व्यस्त होत चाललेले जगणे, शहरांची होणारी भरभराट आणि खेडय़ांची ‘जैसे थे’ स्थिती यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातून ग्रामीण जगण्याची फरपट अधिकाधिक दयनीय होत आहे. विकास आणि सामान्यजनांचे जीवन हे बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, जनजीवन न विस्कटता विकासाला गती देता येऊ शकते, याचा फारसा विचार राजकीय पातळीवर होत नसल्याने खेडय़ांच्या नशिबाचे भोग वाढत चालले आहेत, अशी मांडणी पुन:पुन्हा केली जाते आहे. या सर्वामुळे लोकजीवनच नष्ट होत असल्याचा तीव्र सल अजय कांडर यांनी या दीर्घकवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना, तोच या कवितेचा प्रधान विशेष आहे. हे सर्व ज्या राजकीय धोरणांमुळे होत आहे असे त्यांना वाटते, त्यावरही कांडर थेट भाष्य करण्याचा प्रयत्न या दीर्घकाव्यात करतात.
मध्यंतरी दक्षिण कोकणातील काही भागांत हत्तींच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले होते. रात्री-अपरात्री शेतांत घुसून हत्तींनी पिकांच्या भयंकर नासधूस केली होती. या हत्तीलाच रूपक बनवून कांडर यांनी आपल्या कवितेत आणले आहे. हत्तीसारखे बलदंड रूपक वापरल्याने साहजिकच राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक- पर्यावरणीय बाजूही अपरिहार्य ठरतात. त्यामुळे कांडर कवितेतून तिकडेही वळतात.
कांडर यांनी या कवितेची निर्मितीप्रेरणा सांगितली आहे ती काहीशी मजेशीर आहे. प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे कणकवलीमध्ये नाटक बसवण्यासाठी गेले असता त्यांनी कांडर यांना कोकणाच्या बदलत्या राजकीय-सामाजिक पाश्र्वभूमीवर नाटक लिहायला सांगितले. पण मूळ प्रकृती कवीची असलेल्या कांडर यांच्याकडे नाटय़धर्माची नव्हे, तर नाटय़प्रेमाची जोड होती. ते चिंतनाला प्रवृत्त झाले आणि त्यातून  नाटक तयार होण्याऐवजी ही दीर्घकविता आकाराला आली. कवी कविता जगतो असं म्हणतात, पण तो कायम कवितेच्या अंगानेच भोवतालाकडे पाहतो. त्यामुळे त्याची परिणती काव्यरूप घेऊनच जन्माला येते.
कांडर हे पेशाने पत्रकार आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात कोकणातल्या बदलत्या राजकारणाशी त्यांचा या ना त्या कारणाने नित्य संबंध येतो. एरवी शांत असणाऱ्या आणि शांतपणे जगणाऱ्या कोकणवासीयांच्या आयुष्यात या बदलत्या राजकारणाने उलथापालथ घडवायला सुरुवात केली आहे, माणसा-माणसांमध्ये वितुष्ट निर्माण केले जात आहे, असा कांडर यांचा अनुभव आहे. म्हणूनच ते लिहितात, ‘माणूस माणसापासून पारखा झालाच, परंतु कधी नव्हे एवढी राडा संस्कृती इथे बळावली. दर निवडणुकीच्या वेळी माणसाचाच बळी दिला जाऊ लागला.’ पुढे ते म्हणतात, याला कुठलाही एक पक्ष कारणीभूत नसून सर्वच पक्ष जबाबदार आहेत. या राजकारणामुळे कोकणासारख्या निसर्गसंपन्न भागाची मन:शांती ढळू लागली आहे. माणसंच माणसांच्या विरोधात उभी ठाकत आहेत. त्यातून कांडर यांना ‘हत्ती’ हे रूपक सुचले; जे एकाच वेळी व्यक्ती, समाज आणि व्यवस्था यांचे प्रतिनिधित्व करते. हत्तींनी कोकणात उपद्रव द्यायला सुरुवात केली तेव्हाच त्याला काहीही इजा न करता त्यांचं संरक्षण करण्यासाठीही काही लोक पुढे सरसावले. ते म्हणजे तथाकथित पर्यावरणवादी. भ्रष्टाचार करणाऱ्याच्याच पाठीशी उभे राहावे तसा हा प्रकार कांडर यांना वाटला आणि या दोन्ही घटनांमध्ये बरेच साम्यही त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी शोषण करणाऱ्या हत्तीलाच पोसायला निघालेल्या वृत्तीचा माग घेण्याचा प्रयत्न यात केलेला आहे.
या दीर्घकवितेत कोकणातील राजकीय-सामाजिक संघर्ष आहे, जनजीवन आहे, मालवणी बोलीच्या अक्कडबाज आणि ठाशीव शब्दांची पखरण आहे. कविता दीर्घ असल्याने तिला आख्यानाची गती आहे. त्यात उपहास, उपरोध, राग, संताप आहे. तिला लोककथेचाही बाज आहे. आणि विशेष म्हणजे कांडर कोकणापुरतेच भाष्य करत नसून त्याहून व्यापक विधाने करायचाही प्रयत्न करतात.
संग्रहाच्या सुरुवातीला कांडर यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे सविस्तर निवेदन लिहिले आहे. त्याला त्यांनी ‘राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अध:पतन’ असे शीर्षक दिले आहे. म्हणजे या दीर्घकवितेच्या माध्यमातून कांडर ‘पोलिटिकल स्टेटमेंट’ करून पाहत आहेत. अशी ‘स्टेटमेंट्स’ करू पाहण्याचं धाडस नव्वदोत्तरीतले बरेच कवी करत आहेत. पण ते करण्याआधी आणि केल्यानंतर त्याचा अनुक्रमे पूर्वविचार आणि उत्तरविचार मात्र फारसा केला जात नाही असे दिसते. निदान त्याची ग्वाही तरी संबंधित लेखनातून मिळत नाही. सर्जनशील साहित्यातून फार ठाम विधाने करता येत नसतात, पण अलीकडच्या काळात सर्जनशील साहित्याच्या माध्यमातून ठाम विधाने करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण साहित्यिकांनी यात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते.
कवितेचा योग्य आणि सर्वमान्य होईल असा अन्वयार्थ लावणे ही तशी कठीणच गोष्ट असते. कारण खुद्द कवीला त्याच्या कवितेतून अभिप्रेत असलेला अर्थ, त्याचा इतरांनी लावलेला अन्वयार्थ आणि खुद्द कवीला जे सांगायचे आहे ते त्याने नेमक्या शब्दांतून मांडलेले असणे- या तिन्हींची सांगड घालता येत नाही. ही दीर्घकविताही त्याला अपवाद नाही. पण हत्ती या भारतीय संस्कृतीत आदरणीय मानल्या गेलेल्या प्राण्याची नव्या रूपकात मांडणी करणारी ही कविता वाचनीय मात्र नक्कीच आहे एवढे खात्रीने म्हणता येईल.
‘हत्ती इलो’ – अजय कांडर, शब्द पब्लिकेशन, मुंबई, पृष्ठे – ७१, मूल्य- १०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा