माद्रिद हे स्पेनच्या राजधानीचे शहर पाहून आम्ही पोर्तुगालमध्ये पोटरे या शहरात आलो. माद्रिद ते पोटरे या सुमारे चारशे कि. मी.च्या प्रवासात दुतर्फा हिरवे हिरवे गार गालीचे दिसत होते. पोटरे हे नऊशे वर्षांपूर्वीचे प्राचीन शहर डोरो नदीच्या मुखाजवळ आहे. १९९७ मध्ये युनेस्कोने या शहराचा ‘वर्ल्ड हेरिटेज’मध्ये समावेश केला. एकेकाळी इथूनच पोर्तुगालचा राज्यकारभार चाले. नव्या जगाच्या शोधार्थ निघालेल्या धाडसी पोर्तुगीज दर्यावर्दीसाठी जहाजांचे बांधकाम येथील गोदीत झाले. पोटरेतील अरुंद, खूप उताराच्या दगडी रस्त्यांवरून ट्रॅमपासून सर्व वाहने धावत होती. अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूला एकमेकींना चिकटलेल्या इमारती होत्या. मोठय़ा चौरस्त्याच्या मधोमध सुंदर पुतळे उभारले होते. सांता क्लारा चर्चच्या अंतर्गत लाकडी नक्षीकामावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. उंच क्लॉक टॉवर्स होते. छोटय़ा छोटय़ा बागेतल्या दगडी चौथऱ्यांवर स्त्रिया, मुले, इतिहासातील पराक्रमी योद्धे, दर्यावर्दी यांचे पुतळे उभारलेले दिसतात. येथे अनेक शिल्पसंग्रहालये आहेत.
पोटरेची आणखीन एक वेगळी ओळख म्हणजे डोरो नदीवरील देखणे पूल! निळसर समुद्राप्रमाणे भासणाऱ्या डोरो नदीवरील पूल हे स्थापत्यशास्त्रातील कलात्मकतेचे उत्तम नमुने आहेत. मारिया पाया हा साठ मीटर लांबीचा नदीवरून रेल्वे-वाहतूक करणारा पूल संपूर्ण धातूने बांधला आहे. एकाच लोखंडी कमानीवर तोललेल्या या पुलाचे डिझाइन गुस्ताव आयफेल यांनी केले आहे. १८७७ मध्ये पूर्ण झालेला हा पूल अजूनही उत्तम स्थितीत आहे. गुस्ताव आयफेल यांचे शिष्य टोफिलो सिरिंग यांनी या नदीवर डी लुईस हा पूल १८८६ मध्ये बांधला. गुरूप्रमाणेच त्यांनीही हा पूल संपूर्ण धातूचा व एकाच कमानीवर तोललेला असा बांधला आहे. त्यावरून सतत वाहतूक सुरू असते. याशिवायही डोरो नदीवर आणखी तीन सिमेंट काँक्रिटचे पूल बांधण्यात आले आहेत. नदीचे विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांना केबलकारची सोयही करण्यात आली आहे. पोटरेची आणखी एक खासियत म्हणजे इथली जगप्रसिद्ध पोटरेवाइन (पोर्टवाइन). पोटरेच्या आसपास व डोरो व्हॅलीतील द्राक्षांपासून ही गोडसर चवीची रेड वाइन बनवली जाते. मोठय़ा लाकडी िपपांतून (बॅरल्स) ती साठवली जाते व जगभर निर्यात होते.
पोटरेहून आम्ही कोइंब्रा इथे आलो. माँडेगो नदीकाठी असलेल्या या शहरामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कोइंब्राची स्थापना १५३७ साली झाली. ‘विद्यार्थ्यांचे शहर’ अशीच या शहराची ओळख आहे. कारण शहराच्या दीड लाख लोकसंख्येपैकी विद्यार्थ्यांची संख्या २१ हजार इतकी आहे. उच्च शिक्षण व संशोधनासाठी ही युनिव्हर्सिटी नावाजली जाते. प्रारंभी इथे कला, धर्म व वैद्यक शाखांचे शिक्षण दिले जाई. आता रसायन- भौतिकशास्त्र, गणित, इंजिनीअरिंग, इतिहास, भाषाशास्त्र, कायदा, मानववंशशास्त्र अशा अनेक शाखांचे अध्यापन येथे केले जाते. शिक्षणाची भाषा पोर्तुगीज आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीचा काळा, लांब गाऊन घालावा लागतो. युरोपमधील विद्वान प्रोफेसरांची इथे नेमणूक केली जाते.
येथे खूप मोठय़ा प्रांगणातील उंच बेल टॉवरची घंटा तब्बल चार टनांची आहे. सुमारे दोन लाख पुस्तके असलेली इथली लायब्ररी पाहण्यासारखी आहे. प्राचीन हस्तलिखिते, सोळाव्या व अठराव्या शतकातील तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्रावरील अमूल्य ग्रंथसंपदा इथे आहे. षटकोनी आकाराच्या खूप उंच अशा या लायब्ररीचे कमानीसारखे प्रवेशद्वार लाकडी आहे, पण प्रत्यक्षात ते मार्बलसारखे वाटते. ओक व जॅकारंडा वृक्षांचे लाकूड वापरून भिंतीपासून उंच छतापर्यंत कोरीवकाम केले आहे. हे कोरीवकाम खऱ्या सोन्याच्या रंगाने रंगवले आहे. पुस्तके ठेवण्यासाठी उंच, उघडी कपाटे खाली सर्व भिंतींना व त्यावरील माडीवर केलेली आहेत. छताजवळील उंच कोपऱ्यात चारी दिशांना चार सुंदर देवतांचे पुतळे चार खंडांचे प्रतीक म्हणून आहेत. खूप उंचावर काचेची तावदाने असलेल्या उघडता-मिटता येतील अशा लांबट खिडक्या आहेत. त्यातून आत छान प्रकाश झिरपतो. या लायब्ररीमधील कोणतेही पुस्तक वाचण्यासाठी बाहेर नेता येत नाही. गाइडने सांगितले की, इथले संपूर्ण लाकूड न किडणाऱ्या वृक्षांचे आहे. तरी रात्री, पावसात इथे किडेमकोडे येतातच. त्यासाठी इथे वटवाघळे पाळली आहेत. त्यांना रात्री पिंजऱ्याबाहेर सोडले जाते. वटवाघळे किडेमकोडे खातात आणि पुस्तके सुरक्षित राहतात.
इथल्या मोनेस्ट्रीची दोन मीटर लांबीची लाकडी भिंत सुंदर पेंटिंग्जनी सजवलेली आहे. मोनेस्ट्रीचे छत सपाट आहे. पण विशिष्ट तऱ्हेने केलेल्या रंगकामामुळे ते अर्धगोलाकार वाटते. युनिव्हर्सिटीतून बाहेर पडल्यावर या मोनेस्ट्रीचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. ते खूप उंचावर व किल्ल्याच्या तटबंदीसारखे आहे. मूरीश लोकांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली होती.
युनिव्हर्सिटी बििल्डगमधील आतला उंच जिना चढून आम्ही एका अरुंद गॅलरीत आलो. या अर्धगोल गॅलरीच्या काचेच्या बंद दरवाजातून खालच्या भव्य हॉलमध्ये दोन-तीन कायद्याच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा चालली होती, ती दिसली. लाल डगल्यातील उच्चासनावर बसलेले तीन परीक्षक परीक्षा घेत होते. त्याचवेळी एक अधिकारी स्क्रीनवर त्याचे चित्रण करताना दिसला. तिथल्या दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडल्यावर समोरच मोंडेगो नदी व शहराचे तिथल्या गॅलेरीतून उंचावरून दर्शन होते. मिनव्र्हा या ज्ञानदेवतेचा भव्य, उंच पुतळा होता.
पूर्वीच्या काळी या विद्यापीठात फक्त विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असे. ज्ञानार्जनाच्या काळात या शहरातील तरुणींबरोबर त्यांची मैत्री होई, पण शिक्षण पूर्ण करून जाताना त्यांना मैत्रिणींना सोडून जावे लागे. विद्यार्थ्यांनी रचलेली अनेक विरहगीते युनिव्हर्सिटीपासून थोडय़ाच अंतरावरील एका दरीकाठच्या लांबट, उभ्या दगडांवर कोरून ठेवलेली गाइडने दाखविली. या गीतांना फाडो असे म्हटले जाते. फाडोचा अर्थ ‘दैव’! आम्ही रात्री तिथल्या एका फाडो शोला गेलो. काळ्या कपडय़ातील दोन गायक स्पॅनिश गिटार व व्हायोलिनच्या साथीने गाणी म्हणत होते. पण पोर्तुगीज भाषा समजत नसल्याने त्या विरहगीतांचा आस्वाद मात्र आम्ही घेऊ शकलो नाही.
प्राचीन पोर्टो नगरी
माद्रिद हे स्पेनच्या राजधानीचे शहर पाहून आम्ही पोर्तुगालमध्ये पोटरे या शहरात आलो. माद्रिद ते पोटरे या सुमारे चारशे कि. मी.च्या प्रवासात दुतर्फा हिरवे हिरवे गार गालीचे दिसत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Porto old city