१९९७ साली आम्ही ‘निनाद’ संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत ‘वंश’ नाटक सादर केलं होतं. लेखक म्हणून जयंत पवारचा आणि दिग्दर्शक म्हणून माझा पूर्ण लांबीचं दोन अंकी नाटक करण्याचा तो पहिलाच प्रयत्न! हे नाटक प्राथमिक आणि अंतिम दोन्ही स्पर्धेत पहिलं आलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे राज्य नाटय़स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं ‘निनाद’चंसुद्धा ‘वंश’ हे पहिलंच नाटक. त्यामुळे आमच्या संस्थेत चैतन्याचं वातावरण होतं. अभिनंदन आणि शाबासकीने आम्ही चिंब झालो होतो. जयंत आणि माझ्याकडून संस्थेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. जयंत मात्र या सगळ्यात तटस्थ होता. एवढं यश मिळूनही आपल्याला जे लिहायचं नव्हतं तेच आपण लिहून बसलो, असं काहीतरी तो बडबडायचा.
मध्यंतरी नामदेव ढसाळांशी जयंतची भेट झाली होती. ‘तू टॅलेन्टेड आहेस. शार्प लिहितोस. पण असलं काही मध्यमवर्गीय लिहू नकोस. हे मिड्ल क्लास कल्चर आपलं नाय. आपलं कल्चर वेगळाय..’ असं काहीतरी ते म्हणाल्याचं जयंत आम्हाला सांगायचा. आम्हाला ते काही कळत नव्हतं. आम्ही यशात, पाटर्य़ा करण्यात दंग होतो. आणि जयंत अस्वस्थ! त्यानंतर जवळजवळ तीन वर्षे जयंतनं काहीच लिहिलं नव्हतं.
जयंतच्या मागे नवीन नाटक लिहून देण्यासाठी आमचा तगादा चालूच होता. पण तो काही दाद देत नव्हता. मी शक्कल लढवली. माझ्या अशोक शिरगोपीकर नावाच्या मित्राची अंधेरीच्या डी. एन. नगरमधली जागा रिकामी होती. म्हणजे त्याचं लग्न होईपर्यंत ती आमच्यासाठी रिकामी असणार होती. त्याचं मुली बघणं सुरू होतं. दर रविवारी तो स्थळ बघायला जायचा. येऊन ‘मुलगी पसंत पडली नाही’ असं सांगायचा. आम्ही खूश व्हायचो. आणखी काही दिवस राहायची हमी मिळायची. तर त्या जागेमध्ये महिन्याभरासाठी जयंतने राहायचं आणि छान नाटक लिहून द्यायचं- असा प्लॅन होता. जेवणासाठी समोरच्या ‘आरती’ हॉटेलची कूपन्स त्याला दिली होती. लेखकाला आणखी काय पाहिजे?
मी काही दिवसांनी त्याला भेटायला गेलो आणि धास्तावलोच. नाटकाची एक ओळही लिहिली नसल्याचं जयंतनं सांगितलं. योगायोगाने त्याच दिवशी आमचा मित्र प्रकाश जाधव सहज आम्हाला भेटायला आला होता. आमची त्या दिवशीची गोची ऐकून थोडासा विचार करून प्रकाश म्हणाला, ‘तू तुझ्या ‘वाळवी’ एकांकिकेचा विचार का करीत नाहीस? तिच्यात नाटकाचं पोटेन्शियल आहे. ते तुझ्या भोवतालचं आहे.. तुझ्या अनुभवातून आलंय. ज्यात तुझा परिसर आहे. त्याचा नाटकासाठी का विचार करीत नाहीस?’ एवढंच बोलून प्रकाश थांबला नाही, तर त्याने ‘वाळवी’ची झेरॉक्स कॉपीही आणून दिली. जयंतने ती वाचून काढली आणि जयंत एखाद्या भोवऱ्यात घुसावा तसा भसकन् त्यात घुसला. गरगरत आत आत जात राहिला. त्याला आता नाटक सुचायला.. दिसायला लागलं होतं. त्या दिवशी जयंतने नवीन रायटिंग पॅड विकत घेतलं. ही ९० सालातल्या ऑगस्टची गोष्ट आहे.
पण ते नाटक पूर्ण व्हायला १९९६ साल उजाडलं. म्हणजे तब्बल सहा वर्षांचा काळ! जयंतसाठी हा काळ फार खडतर होता. ‘वाळवी’चं ‘अधांतर’ होताना खूप बदल होत गेले. जवळजवळ चार खर्डे झाले. यात ‘वाळवी’तल्या धुरी कुटुंबातले पॅरॅलिसिसने आजारी असणारे आणि घरातल्या पार्टिशनच्या मागच्या कॉटवरून ओरडणारे, कण्हणारे मरणासन्न बाबा वारले. एकांकिकेतल्या अविवाहित मंजूचं नाटकात युनियन लीडर राणेबरोबर लग्न होऊन संपामुळे ती परत धुऱ्यांच्या घरात येऊन राहू लागली. खरं तर ‘धुरी’ ही आडनावाची आयडेंटिटी कुटुंबाला नाटकातच मिळाली. आईला सावर्डेकर मामी, मंजूला चित्रा आणि मोहनला सावर्डेकर मामीचा मुलगा राकेश (हा रंगमंचावर येत नाही!) अशा काऊंटर इमेजेस उभ्या राहिल्या. राणेंच्या मार्फत गिरणीतलं युनियनचं राजकारण नाटकात आलं. शेवटच्या ड्राफ्टनंतर तर आम्हाला परळची ‘लक्ष्मी कॉटेज’ स्पष्टच दिसू लागली. जयंतने परळचा भौगोलिक परिसर जसाच्या तसा नाटकात आणला. ‘साहित्य म्हणजे भौगोलिक-सामाजिक दस्तावेज असतो,’ असं नेमाडे म्हणायचे. ‘मराठी साहित्यातून मुंबईचं खरं दर्शन होतच नाही,’ असं दिलीप चित्रे म्हणायचे. जयंतने के. ई. एम. हॉस्पिटल, डोळ्यांचं बच्चूभाई हॉस्पिटल, परळ नाक्यावरचा गौरीशंकर छितरमल मिठाईवाला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय असे स्थळ-काळाचे, साहित्यातल्या वादांचे संदर्भ नावं- तपशिलांसकट नाटकात आणले. हा परिसर जसा स्पष्ट दिसायला लागला तशी भाषाही लालबाग-परळच्या बोलीची वैशिष्टय़ं घेऊन तपशिलात यायला लागली. आता प्रत्येक पात्राचा वेगवेगळा आवाज ऐकू येत होता.
नरूच्या रूपाने तर एक मोठं सामाजिक वास्तवच नाटकात आलं. नरू हा बेकार आणि छोटी-मोठी लफडी करत आता अंडरवर्ल्डच्या वाटेवरून निघालेला तरुण. भूमिपुत्राचा जो एक अ‍ॅरोगन्स असतो, तो नरूमध्ये आला. (उस्मान बैदेवाल्याबरोबरचा राडा!) मोहनला क्रिकेटचं वेड. त्याची खेळण्याची जिगर आणि हौस मोठी. पण बॉलच्या काँट्रिब्युशनसाठी द्यायला त्याच्याजवळ पैसे नाहीत, त्यामुळे चाळीतल्या टीममध्ये त्याला घेत नाहीत. नरूला त्याचा ‘राडा’ आहे, बाबाला त्याचं ‘साहित्य’ आहे, मंजूला वाण्याचा पोरगा आहे; पण मोहनला काहीच नाही. तो एका जागी जखडला गेला आहे. ती त्याची नियती आहे. मुक्ती तशी कोणालाच नाही; पण मुक्ती न मिळण्याच्या शेवटच्या पायरीवर मोहन आहे.
आईपासून नरूपर्यंत प्रत्येकजण आपल्या बोलण्यातून आपलं स्पेसिफिक जग उभं करत असेल तर बाबाने का जनरल बोलावं? आपल्याकडे नाटकातून चुकून लेखकाचं कॅरेक्टर आलंच, तर तो जीवनावर वगैरे जड, अलंकारिक आणि जनरल बोलतो. ‘अधांतर’मधील बाबा थेट आणि आरपार बोलतो. तो साहित्यावर चर्चा करतो. पु. शि. रेगे, आरती प्रभू, ग्रेस, दिलीप चित्रे, नेमाडे यांच्यावर बेछूट शेरेबाजी करतो. त्यात उसना आवेश आहे; पण एक ठसठसही आहे. बाबा भंपक असेल, पण खोटा नाही. त्याचा भंपकपणाही खरा आहे. आतापर्यंत नरूची भाषा जाणवण्याइतपत वेगळी होती; पण आता बाबा आणि मोहनच्या भाषेतला फरकही कळायला लागला. राणे मोहनपेक्षा वेगळं बोलेल- हे लक्षात आलं. आई आणि मंजूच्या तोंडी ‘ऊठ’ऐवजी ‘ऊट’, ‘प्रयत्न’ऐवजी ‘प्रेत्न’ असे शब्दोच्चार येणं- इतकं तपशिलात भाषेवर काम झालं. राणेच्या भाषेत मिलच्या सांकेतिक शब्दांचा वापर होऊ लागला. ‘आऱ्या झाला रे, आऱ्या झाला सगळ्यांचा!’ असा राणे आक्रोश करतो. आऱ्या म्हणजे सत्यानाश! मिलमध्ये खात्यात काम करताना ह्युमिडिटीत बिघाड होऊन बॉबिनच्या तारा तुटल्या आणि काम ठप्प झालं की त्याला ‘आऱ्या झाला’ म्हणत. सगळ्याचाच आऱ्या होणं, हे जणू नाटकाचं सूत्रच होऊन गेलं.
जयंताची आणि माझी दोस्ती ‘निनाद’ संस्थेमुळे झाली. विजय मोंडकर, जयवंत देसाई, प्रेमानंद गज्वी, रघुनाथ मिरगळ, प्रकाश गद्रे, देवीदास फेणाणी, देवदास मासावकर ही सर्व ‘निनाद’ची मंडळी बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी सांभाळून नाटकासाठी जिवाचं रान करत होती. संध्याकाळी सहा वाजता ऑफिस सुटलं की ही मंडळी ‘विजयदीप’ या बी. पी. टी.च्या फोर्टमधल्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर कॅन्टीनमध्ये जमायची. तिथेच तालमी होत. कॅन्टीनचा मालक शेट्टी आम्हाला चहा-नाश्ता देई. (बऱ्याचदा फुकट!) ‘निनाद’ची सगळी नाटकवाली मंडळी मध्यमवर्गीय- कनिष्ठ मध्यमवर्गीय. गिरणगावातून आलेली. त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, विषय सारखे असत. त्यामुळे त्यांना एकमेकांबरोबर सुरक्षित वाटत असे. मलाही या मंडळींत रुळायला फार वेळ लागला नाही. माझं जरा जास्त सख्य झालं ते जयंतबरोबर. जयंत कविता करायचा. अंधेरी ते व्ही. टी. ट्रेनमध्ये टाइमपास म्हणून मी एस. एम. काशीकर, गुरुनाथ नाईक, बाबुराव अर्नाळकरांची पुस्तकं वाचायचो. जयंतकडे भाऊ पाध्ये, नेमाडे, चित्रे, रेगे, खानोलकर, दळवी, तेंडुलकरांची पुस्तकं असायची. तो ती मला वाचायला द्यायचा. ‘महानिर्वाण’, ‘घाशीराम’, ‘छबिलदास’ची ओळख जयंतमुळेच झाली. रिहर्सल संपली की मंडळी गप्पा मारत व्ही. टी. वा चर्चगेट स्टेशन गाठायची. मग तिथून वेगवेगळे ग्रुप मार्गी लागत. मी, जयंत, देवदास मासावकर, प्रकाश पेटकर, विश्वास म्हात्रे, वसंत आंजर्लेकर, जन्या सावर्डेकर हा ग्रुप लोअर परळला उतरत असू. पुन्हा गप्पांना ऊत. शेवटच्या गाडीपर्यंत पाव-भाजीच्या गाडीवर नाटक, सिनेमा, पुस्तकं, राजकारणावर खूप गप्पा. मग धावतपळत शेवटची गाडी पकडून घरी. बऱ्याचदा ती चुकायची. (की चुकवायची?) मग मी कधी विश्वास म्हात्रेकडे, कधी आब्याकडे प्रभादेवीला चाळीच्या गॅलरीत झोपायचो. पहाटे उठून घरी! सकाळी आब्याची आई चहा द्यायची, खायला द्यायची. पुढे आंतर-गिरणी स्पर्धेत मी नाटकं-एकांकिका बसवायचो तेव्हाही बऱ्याचदा प्रभादेवीला राहायचो. हळूहळू मी त्यांच्या घरातलाच एक झालो. ‘काय रे, बरेच दिवस आमच्याकडे येऊक नाय. आवशिक इसारलंस की काय? आता जेऊनच जा,’ असं आब्याच्या आईनं फर्मावलं की संपलंच सगळं! हे सविस्तर सांगायचा उद्देश एवढाच, की मी अंधेरीला डी. एन. नगरमध्ये राहत असलो तरी माझा जीव गुंतला होता तो याच ‘निनाद’च्या मित्रांत आणि पर्यायाने लालबाग-परळ एरियात! ‘अधांतर’बरोबर माझी नाळ जोडली गेली होती ती अशी!
नाटक  लिहून पूर्ण व्हायच्या प्रोसेसमध्ये खूप घडामोडी घडल्या. आम्ही मित्रमंडळी आपापसात  नाटकाचे वाचन करायचो. पुनर्लेखनात बराच काळ चालला होता. राजीव नाईक माझा चांगला मित्र. त्याच्यासमोर मी ‘अधांतर’चा आधीचा (‘अजगर’ या दीर्घाकाच्या स्वरूपातला) ड्राफ्ट वाचला. राजीवला नाटक आवडलं. पण त्याला ते कुठंतरी अपुरं वाटत होतं. मलाही तसं वाटत होतं. मी जयंतला तसं म्हटलं, ‘घाई नको करूस. अजून विचार कर.’ तर तो माझ्यावर चिडला. पण मला माहीत होतं- तो माझ्यापेक्षा स्वत:वरच चिडायचा.
एक दिवस जयंतचा फोन आला- ‘मला असं वाटतंय, की नाटक आता पूर्ण झालंय. वाचू या.’ मी खूश. नाटकाचं वाचन झालं. मला भयानक डिप्रेशन आलं. त्यानंतर तीन-चार दिवस मला ‘अधांतर’शिवाय काहीच सुचेना. आता लवकरात लवकर हे रंगभूमीवर यायला हवं, हा एकच ध्यास लागून राहिला. एखाद्या अनुभवी लेखकाला नाटक वाचून दाखवावं असं मला वाटलं. रत्नाकर मतकरींचं घर हक्काचं! एक दिवस त्यांच्याकडे मी नाटक वाचलं. कमलाकर नाडकर्णीही होते. त्यांना खूप आवडलं. ‘तुम्ही छबिलदास वगैरेला का करता? हे तुम्ही व्यावसायिकवर करा. तिथे हा विषय चालेल,’ असं त्यांचं मत झालं. मी लगेच ‘सुयोग’च्या सुधीर भटांकडे नाटक वाचून दाखवलं. ते उलट म्हणाले, ‘हे व्यावसायिकवर अजिबात चालणार नाही. नाटक बरं आहे; पण धंद्याचं नाही. तुम्ही ‘छबिलदास’ला करताय तेच ठीक आहे.’ पुन्हा फुस्स झालं. दरम्यान, वामन केंद्रेनेही सुचवलं, ‘हे व्यावसायिकवरच करा.’ त्याने चंद्रकांत राऊत या निर्मात्याचं नावही सुचवलं. त्यांच्याकडे वाचन झालं. राऊत तयार झाले. पण एका अटीवर : ‘नाटकात शिव्या आहेत, त्या कापा.’ पण मी मात्र या शिव्यांबद्दल आणि त्याच्या इम्पॅक्टबद्दल जराही साशंक नव्हतो. त्यावेळेपुरतं मी ‘नंतर बघू’ असं म्हणून तो विषय संपवला आणि ‘श्रीचित्र चित्रलेखा’ या संस्थेतर्फे नाटक उभं राहण्याची प्रक्रिया सुरू झाली.
आईच्या भूमिकेसाठी ज्योती सुभाषचं कास्टिंग पहिल्या ड्राफ्टपासून पक्कं झालं होतं. ज्योती उंचीने लहान. आईच्या खांद्यावर अख्ख्या घराची जबाबदारी. घरासाठी तिची अखंड धडपड. त्यातून तिला आलेलं नैराश्य. त्यातून सावरायचा तिचा आटोकाट प्रयत्न. आईचं हे मोठेपण तिच्या छोटय़ा दिसण्यातून प्रभावीपणे ठसायला मदत झाली. संजय नार्वेकरने स्क्रिप्ट वाचली. त्याला ती आवडलीही. आणि भूमिकाही. नरूच्या काही क्वालिटीज् संजयमध्ये आधीच होत्या. विशेषत: त्याची आक्रमकता! भरत जाधव मोहनच्या बाबतीत जरा साशंक होता. त्याचंही बरोबर होतं. संहितेत त्याच्या वाटय़ाला वाक्यं फार कमी होती. मी शांतपणे त्याला मोहनच्या भूमिकेचा ‘आवाका’ समजावून सांगितला. त्याने माझ्यावर विश्वास ठेवून होकार दिला. आता कधी भरत भेटला आणि ‘अधांतर’चा विषय निघाला की मला मिठीच मारतो. त्याच्या प्रत्येक मुलाखतीत ‘अधांतर’चा उल्लेख असतोच. लीना भागवत परफेक्ट मंजू! तालमीत तिचे उच्चार ब्राह्मणी आले की मी खालून फक्त ‘भागवत’ असं ओरडायचो, की लीनाला कळायचं. बाबा किशोर कदम करणार होता, पण त्याला नाही जमलं. अविनाश नारकरही काही दिवस तालमीला आला, पण त्याला त्याचदरम्यान सुयोगचं ‘प्रेमपत्र’ हे नाटक मिळालं. कुणीतरी राजन भिसेचं नाव सुचवलं. राजन भिसे? मला प्रश्न पडला. त्याचं दिसणं, त्याची भाषा? पण त्याच गोष्टी त्याचं कास्टिंग पक्कं करायला कारणीभूत ठरल्या. बाबाचं घरातलं तुटलेपण, त्याची स्वत:ला घरापासून वेगळं मानायची वृत्ती, आणि राजनचं त्या भावंडांतलं वेगळं दिसणं- (नाटकाच्या उत्तरार्धात तो आईच्या चारित्र्यावर संशय घेतो.) हे सगळं एकात एक मिसळून गेलं आणि मी निर्धास्त झालो. राणे आणि बटरच्या भूमिकेत अनिल गवस आणि आशीष पवार आमचे घरचेच. ‘निनाद’वालेच. सविता मालपेकरने दिसणं आणि मालवणी भाषेवरच्या हुकमतीच्या जोरावर सावर्डेकर मामी ठसक्यात उभी केली. प्रदीप सुळेचं नेपथ्य आणि अशोक पत्कींचं पाश्र्वसंगीत लालबाग-परळच्या गल्लीत नेऊन सोडायचं.
२ ऑगस्ट १९९७ रोजी दुपारी ४ वाजता ठाण्याला गडकरी रंगायतनमध्ये ‘अधांतर’चा पहिला प्रयोग झाला. अप्रतिम झाला. ज्या गोष्टीची निर्मात्याला भीती होती- नाटकातल्या शिव्यांबद्दल- ती फोल ठरली. शिव्या कुणालाही खटकल्या नाहीत. उलट, शिव्यांमुळे आलेल्या इम्पॅक्टबद्दल प्रेक्षक भरभरून बोलत होते. नाटकाचा शेवटचा पडदा पडला. प्रेक्षागृहात काही काळ भीषण शांतता! मग टाळ्यांचा आवाज. त्याही तुरळक. मला कळेना, नाटक प्रेक्षकांना आवडलंय की नाही? पण नंतर रंगपटात भेटायला आलेल्या सुन्न झालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकून मी निर्धास्त झालो. नाटकाच्या शेवटाचा इतका परिणाम व्हायचा, की लोक थिजून जायचे. परिस्थितीमुळे कोंडी झालेल्या या माणसांबद्दल त्यांना कमालीची काळजी वाटायची. समूहाने नाटक पाहणारा प्रेक्षक बाहेर पडताना एकेकटा होऊन बाहेर पडायचा. अंतर्मुख व्हायचा. मनात गिरणगावाबद्दल अपार करुणा आणि आपण या समजाचा भाग असूनही काही करू शकलो नाही, याची हतवीर्यता त्यांच्या बोलण्यातून जाणवायची.
अमोल पालेकरांनी नाटक बघितलं आणि मला व जयंतला घरी बोलवून नाटकावर खूप चर्चा केली. ‘मी शिवाजी पार्कला राहिलो. पण पंधरा मिनिटांच्या अंतरावर पलीकडे नायगावात जाऊन तिथल्या लोकांचं जगणं पाहिलं नाही याचा गिल्ट मला आला. तिथे एवढं भयानक आणि विदारक घडत होतं, हे माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवलंत. हे नाटक नाही, तर गिरणगावच्या संपानंतर झालेल्या डिझास्टरचं डॉक्युमेंटेशन आहे,’ असं ते म्हणाले. नाटय़निर्माते शांताराम शिंदे आणि समीक्षक अशोक राणे यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ‘अधांतर’वर परिसंवाद आयोजित केला. तुडुंब भरलेल्या त्या सभागृहात विजय तेंडुलकर म्हणाले, ‘हे नाटक नाही, हॅपनिंग आहे. जागतिक पातळीवर मी अनेक नाटकं पाहिली; पण ‘अधांतर’सारखं मला काही दिसलं नाही. त्यामुळे हे नाटक जागतिकच आहे.’ २००५ साली नामदेव ढसाळांनी मुंबईत भरवलेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेत निमंत्रित परदेशी साहित्यिकांसाठी ‘अधांतर’चा खास प्रयोग रवींद्र नाटय़मंदिरात आयोजित केला होता. गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त प्रमुख संघटक दत्ता इस्वलकरांनी ‘अधांतर’च्या खास प्रयोगाचं आयोजन केलं. १९९९ साली पहिलं विद्रोही साहित्य संमेलन मुंबईत भरलं होतं. त्याला महाराष्ट्रभरातून आलेली आणि नाटक पाहून सुन्न झालेली तरुण विद्रोही मंडळी तडक आंबेडकर कॉलेजच्या वसतिगृहात गेली. तिथे एका रूममध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘अधांतर’वर परिसंवाद घेतला. अध्यक्षस्थानी कवी तुळशी परब होते. किशोर ढमाले, राजू कोरडे, संभाजी भगत असे सोळा-सतराजण पहाटेपर्यंत ‘अधांतर’वर चर्चा करीत होते.
‘अधांतर’ नाटकाला त्यावर्षीचे महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांसह ४८ पुरस्कार मिळाले. हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
‘हे मिड्ल क्लास कल्चर आपलं नाय, आपलं कल्चर वेगळंय..’ नामदेव ढसाळांनी जयंतला दिलेला हा सल्ला आठवतोय. ‘जे तुझं आहे, तुझ्या भोवतालचं, तुझ्या परिसराचं आहे, त्यावर लिही,’ असं प्रकाश का म्हणत होता? ‘वंश’ राज्य नाटय़- स्पर्धेत पहिलं येऊनही कमलाकर नाडकर्णीनी लिहिलं होतं, ‘या यशात ‘निनाद’वाले आनंद मानत असतील तर ते नर्मदेचे गोटे आहेत असे समजावे.’ त्यांनी असं का म्हटलं होतं, ते आता कळतंय. तेव्हा जिंकूनही आम्ही पराभूत झालो होतो का? ‘अधांतर’च्याच एका परिसंवादात संजय पवार यांनी ‘अधांतर’मधल्या ‘बाबा’च्या पराभूततेतलं बोचरेपण नेमकं दाखवलं होतं. ‘कामगार वा खालच्या वर्गातल्या अशा संवेदनशील आणि सृजनशील मुलांची ट्रॅजेडीच होते. ते जर स्वत:ला सिद्ध करू शकले नाहीत तर ते एकटे पडतात. कारण घरचे त्यांना कधीच समजून घेऊ शकलेले नसतात. त्यामुळे त्यांचं अपयशही त्यांना समजत नाही. त्यांना कुणाचाच आधार उरत नाही. ते एकटे पडतात. सिनिक होतात. उलट, हाच ‘बाबा’ जर ब्राह्मण वा उच्चवर्णीय असता तर त्याचं फसणं, त्याचं अपयश त्याच्या समाजात, कुटुंबात समजून घेतलं गेलं असतं आणि त्याला व्यवस्थेत सामावून घेतलं गेलं असतं. पण ‘अधांतर’मधल्या बाबाला ती सोय नाही.’
‘वंश’नंतर ‘अधांतर’ करताना आम्हालाही ती सोय नव्हती.
‘अधांतर’मध्ये मी इतका का गुंतलो होतो? ‘अधांतर’च्या तालमी सुरू होणार त्याचवेळी सुधीर भटांनी मला ‘एका लग्नाची गोष्ट’ची ऑफर दिली होती. प्रशांत दामले-कविता लाडसारख्या कलाकारांनी या नाटकात काम करायचं नक्की झालं होतं. त्यामुळे नाटकाला व्यावसायिक यशाची शंभर टक्के हमी असताना मी सुधीर भटांना ठामपणे सांगितलं होतं.. ‘नाही! मी ‘अधांतर’ आधी करणार.’ मला वाटतं, मी या नाटकात इमोशनली गुंतलो होतो. यातल्या बाबा, मोहन, नरूमध्ये मी स्वत:ला आयडेंटिफाय करत होतो. या नाटकाच्या काही घटना मी जगलोय. या कुटुंबाची जी अवस्था झाली, जी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली, ती त्यांनी निर्माण केली होती का? नाही. भोवतालचं राजकीय, सामाजिक, आर्थिक वातावरण याला जबाबदार आहे. मिलच्या संपामुळे झालेलं डिझास्टर! आज अंडरवर्ल्डमध्ये गेलेल्या त्या तरुण मुलांचा काय ठावठिकाणा आहे? माणसा-माणसांत निर्माण झालेला दुरावा, नात्यांतलं तुटलेपण, फक्त स्वत:चा विचार करायला लावणारी अप्पलपोटी वृत्ती हा सगळा या अस्थिर वातावरणाचा परिणाम आहे.
गिरणगावातले माझे काही मित्र या भीषण संपामुळे संपले. काही निर्वासित झाले. काही गावाला गेले. काही लढत राहिले. या सगळ्यांचा दस्तावेज आज ‘अधांतर’च्या रूपात कुलूपबंद आहे.       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा