श्रीनिवास बाळकृष्ण
सध्या कुठला ऋतू आहे हे पोटलीबाबाला काही समजून नाही राहिले. तुझ्याकडे तिथं ऑक्टोबर हिटमध्ये पाऊस पडत असला तरी माझ्याकडे इथं बेक्कार उन्हाळा लागलाय. स्विमिंग पूलमध्ये फ्रिजमधला बर्फ टाकून त्यात म्हशीसारखं पडून तुझ्यासाठी गोष्ट लिहितोय. तहान तर इतकी, की पूलमधलं पाणी र्अध मीच प्यायलोय. या ऋतूला साजेशी गोष्ट कुठली असेल? ठरलं तर मग.. ‘तहानलेला चतुर कावळा’ ही वाचून, ऐकून चोथा झालेली गोष्टच तुला आज नव्याने दाखवायची.
‘जुगनू प्रकाशना’ने हिंदी आणि चित्रभाषेतून ‘गर्मियों में एक बार’ हे पुस्तक आणलंय. यात नेहमीचाच उन्हाळा, नेहमीचाच उकाडा आणि नेहमीचाच तहानलेला कावळा आहे. फक्त ही आजची गोष्ट असल्याने रस्त्यावर जागोजागी पाण्याची मडकी नाहीयेत, तर पाण्याची बॉटल आहे. बाटलीत दगड टाकायचा नेहमीचा प्रयत्न त्याने केला. पण.. इथं काही ते शक्य झालं नाही. मग या आजच्या कावळ्याने काय शक्कल लढवली? कसा पाणी प्यायला? हे समजून घ्यायला हे पुस्तक वाचा. या गोष्टीला धमाल ट्विस्ट देणारी गोष्ट चित्ररूपात सांगणारा लेखक-चित्रकार आहे के. जी. सुब्रमण्यम!
के. जी. सुब्रमण्यम यांची ओळख ही केवळ पुस्तकांसाठी चित्रं काढणारे इल्स्ट्रेटर म्हणून नाही, तर ते खरेखुरे चित्रकार होते. केरळमधला जन्म, इकॉनॉमिक्समधली पदवी आणि ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात सामील होणारे ‘कलपथी गणपती सुब्रमण्यम’! पुढे ते रवींद्रनाथ ठाकूर यांच्या कलेला वेगळ्या रूपात पाहायला शिकवणाऱ्या ‘शांतीनिकेतन’मध्ये रमले. त्यांनी अनेक आर्ट्स कॉलेजांमध्ये शिकवलं. खूप प्रकारची चित्रं पाहिलेली असल्याने त्यांच्या चित्रांत केरळ, बंगाल, ओडिशातील कालीघाट, पट्टचित्रसारखी लोककला आणि कंपनी चित्रांचा प्रभाव होता. चित्रांसोबतच ते कविता, पुस्तक लेखनही करीत.
१९६९ सालापासून त्यांनी पुस्तकांसाठी इल्स्ट्रेटर म्हणून काम सुरू केलं. त्यातलीच एक काळ्या-पांढऱ्या चित्रांची शैली त्यांनी या पुस्तकाला वापरली असावी असा पोटलीबाबाचा अंदाज आहे.ही चित्रं पाहा.. एकदम वेगळी. वेगवेगळे आकार घेत, टिंब व ठिपक्यांच्या वापराने एकेक फॉर्म बनवला. एकच रंग असूनही या वेगळ्या कारागिरीमुळे गोष्ट पाहता येतेय. पूर्वी छपाई तंत्रज्ञान फार नसायचे, महाग असायचे. त्या काळात मुलांसाठीची पुस्तकं सजवताना अशी पद्धत चित्रकारांनी शोधली. तो दृश्य परिणाम आजच्या मुलांना द्यावासा वाटला असेल का? खूप रंगांचा भडीमार केला म्हणजे मुलांसाठी पुस्तक बनलं असा गैरसमज तुझा तरी होणार नाही याची खात्री आहे म्हणून हे पुस्तक मी आणलंय.
हे कोलाज असावं का? कोलाज आणि त्यावर पुन्हा पांढरा रंग? कलपथी जिवंत असते तर ताबडतोब फोन करून या पुस्तकामागची कल्पना, ती करताना आलेली गंमत असं सर्व नक्कीच विचारलं असतं. आता एक गंमत करूयात. काळ्या कागदाचे आकार काप. पणती, पाऊस, फुलबाज्या, भुईचक्र, बंदूक, टिकल्या असे कसलेही आकार असू शकतात. सुई, टूथपीक घुसवून, पेटत्या अगरबत्तीचे ठिपके देत कागदी आकारावर तुझ्या कल्पनेने टेक्श्चर दे. हे आकार कुठे वापरायचे? तर मित्रा, दिवाळी येतेय. रेडिमेड आकाशकंदिलाच्या आतल्या बाजूने काळ्या कागदाच्या तुकडय़ांचे हे आकार लावून पाहा. आतला दिवा पेटला की तुझ्या कल्पनेला आकार मिळेल.
shriba29@gmail.com