काही वर्षांपूर्वी पुण्याला जा की नागपूरला, जिकडे तिकडे सायकलीच सायकली दिसायच्या. नंतर पाहता पाहता सायकली वापरणाऱ्यांची महानगरातली संख्या रोडावली. युरोपात सायकल चालवणे आजही अप्रतिष्ठितपणाचे लक्षण मानले जात नाही. आपणही सायकलीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, कारण पेट्रोल महाग होतच राहणार..
सायकल शिकायला सुरुवात करताना मध्ये पाय घालून शिकणं आणि एकदा तरी सायकलसकट पडणं हे अनुभवलेलं असतं. एकदा का सायकल यायला लागली की, कोणाला तरी मागे बसव किंवा थोडं मोठं झाल्यावर पुढे बसव असे उद्योग सुरू होतात. मामा मला पुढच्या दांडय़ावर बसवून गावभर फिरून आणायचा तेव्हा पुढच्या चाकाकडे पाहणं आवडायचं. सायकल चालवता यायला लागल्यावर भाडय़ाची सायकल घेऊन गावभर फिरवायचा उद्योग मजेचा असायचा. चार आणे तास भाडं असायचं. आई दोन आणे द्यायची मग अर्धा तास सायकल चालवायला मिळायची. मोठी मुलं सांगायची सायकल चालवणं आणि पोहोणं माणूस कधी विसरत नाही. खरं आहे ते.
१८१८ साली म्हणजे इंग्रजांचं र्सवकष राज्य भारतावर झालं तेव्हा जर्मनीत सायकल रस्त्यावर आली. अनेक दशकांनंतर ती भारतातल्या रस्त्यांवर आली आणि तिनं वाहनव्यवहारात क्रांती केली. पुण्याला जा की नागपूरला जिकडे तिकडे सायकलीच सायकली दिसायच्या. शाळेत जाणारे चालत जायचे, पण नोकरीवर जाणारे सायकली हाणायचे. वडील घरी आले की पोरं सायकली घेऊन पसार व्हायची. पुण्यात रात्री सायकल चालवताना दिवा सक्तीचा असे. त्या रॉकेलच्या दिव्याची वात ती केवढी! आणि ती मिणमिण दोन फुटांपलीकडेपण पोचायची नाही. पोलिसाला दिव्यात डोकावून पाहा म्हणजे दिवा दिसेल असे सांगणारे महाभाग होते, पण नियम म्हणजे नियम. लोक कसा का होईना दिवा लावायचे. थोडय़ा जास्त पैसेवाल्यांच्या सायकलीला डायनामो असायचा. ती जरा वेगानं चालवली तरच उजेड पडायचा. नाही तर दिव्यात डोकवायला लागायचे.
फार मागचा इतिहास नाही, पण ‘बसपा’चे कांशीराम यांनी सायकलीने फिरून आपले विचार लोकांसमोर मांडले होते. २००० साली भारतात एक कोटी सायकली बनवल्या होत्या तर चीनने पाच कोटी. दोन्ही देश सायकलींची निर्यात करतात.
४०-४५ वर्षांपूर्वी इटालियन लँब्रेटा आणि व्हेस्पा स्कुटरी आपल्या देशात आल्या. पाहता पाहता सायकली वापरणाऱ्यांची महानगरातली संख्या रोडावली. आता तर मोटरसायकली बोकाळल्यात. मुलं सायकलनं शाळेत जातात. दारात मोठी मोटर असली तरी आवारात एका कोपऱ्यात सायकल असते. ती नोकराला कामासाठी पिटाळायला कामाला येते. सायकलीचा खरा उपयोग पोस्टमन, दूधवाले, वर्तमानपत्र टाकणाऱ्यांना चांगला होतो. दुसरं कोणतंही वाहन त्यांच्या सोयीचं नसतं.
अॅम्स्टरडॅममध्ये सायकलींचं राज्य आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्ग आहे. लहान मुलामुलींपासून वृद्ध माणसंही नि:शंकपणे सायकली चालवतात. विश्वास हा आमच्या मित्राचा मुलगा. तो अॅम्स्टरडॅमला राहतो. त्यानं सांगितलं, इथे सगळे सायकलनं फिरतात. चौकशी केल्यावर कळलं की साडेसात लाख वस्तीच्या अॅम्स्टरडॅममध्ये सहा लाख सायकली आहेत. तिथे सायकलचोरीचं प्रमाण फार मोठं आहे. त्यामुळे ती चोरता येऊ नये म्हणून वेगळ्या प्रकारची कुलपं मिळतात आणि ती हट्टी हत्तीच्या पायात साखळदंड घालतात तशा साखळदंडाने बांधून ठेवतात. पॅरिसमध्येही सायकल चोरीचं मोठं प्रमाण आहे. आमच्या येथे आम्ही कुठेही टू व्हीलर ठेवतो. कोणीही चोरत नाही, पण स्त्रियांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच बंद घरात चोरी होते.
दुसरं असं लक्षात आलं की, त्या गावात ढेरपोटी माणसं दिसत नाही. आपल्याकडे मोटरसायकल चालवणाऱ्यांचं पोट पाच वर्षांत सुटतं. दुसरा कोणता व्यायाम नसल्याने आपल्याकडे मोठय़ा पोटाच्या माणसांचे प्रमाण जास्त आहे.
पुढे पॅरिस, लिऑन्, बझासॉ वगैरे ठिकाणी तोच प्रकार दिसला. नंतर तपास करता कळलं की, पॅरिसच्या म्युनिसिपालिटीनं नगरवासीयांच्या सोयीसाठी २००७ साली सायकली भाडय़ानं देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे एकूण १८ हजार सायकली असून १२०० ठिकाणी त्या भाडय़ानं मिळतात. दर हजार फुटांवर एक एक केंद्र आहे. ही सोय स्वयंचलित आणि स्वसेवेने चालते. मशिनला क्रेडिट अथवा डेबिट कार्ड स्वाइप केलं की, पुढचं सगळं काम होतं. बरं सायकल कुठेही घ्यावी आणि १२०० पैकी कोणत्याही ठिकाणी सुप्रत करावी हीसुद्धा सोय आहे. त्याचं भाडं घेतलं जातं. हे सगळं करायला कुठेही माणूस नसतो. पॅरिसमध्ये सायकलीला व्हेलिब म्हणतात, तर लिऑमध्ये व्हेलोव्ह म्हणतात. तिथे ती योजना दोन वर्षे आधी झाली होती. पॅरिसमध्ये पहिल्याच वर्षी ३ हजार सायकली चोरीला गेल्या. त्या दुसऱ्या देशात सापडल्या. सीन नदीमार्गे त्या गेल्या होत्या. सायकल चोरीला जातील याची कल्पना पॅरिस पालिकेला होतीच. युरोपातील अनेक देशांत चोऱ्यांचे प्रमाण फार मोठे आहे. युरोपात सायकल चालवणे अप्रतिष्ठितपणाचे लक्षण मानले जात नाही. एकेकाळी मुंबई-पुणे सायकल शर्यत फार प्रतिष्ठा बाळगून होती. तशा सायकल स्पर्धाना युरोपात मोठा मान आहे. सायकल हे पेट्रोल न वापरणारे आणि प्रदूषण न करणारे सगळ्यात स्वस्त वाहन आहे.
खूप वर्षांपूर्वी चंदिगडला गेलो होतो. तिथे बसची सोय चांगली नव्हती. कार्यालयं सुरू होण्याआधी शेकडो सायकलस्वार सचिवालयाच्या रस्त्याला जाताना दिसायचे. मनात विचार आला या गावात इतक्या सायकली आहेत तर भाडय़ाने मिळतीलच. सायकल भाडय़ाने घ्यायला गेलो तर तो देईना. तेव्हा कॉलेजचं आयकार्ड दिलं. त्यानं ते घेऊन सायकल दिली. मग काय तीन दिवसांत सगळं चंदिगड आडवं उभं पाहून झालं, जे अन्यथा अशक्य होतं. आपल्या खान्देश -वऱ्हाड आणि उत्तर प्रदेशात सायकल रिक्षा हे महत्त्वाचं वाहन आहे. ती चालवायला श्रम पडतात, पण इंधनाचा खर्च नसतो. ते वाहन चालवताना पायाला घट्टे पडणार नाहीत अशी रचना होऊ शकली तर चालकांचे श्रम वाचतील. आपणही युरोपसारखी सायकलीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, कारण पेट्रोल महाग होतच राहणार.
lokrang@expressindia.com
सायकलीला हवी प्रतिष्ठा!
काही वर्षांपूर्वी पुण्याला जा की नागपूरला, जिकडे तिकडे सायकलीच सायकली दिसायच्या. नंतर पाहता पाहता सायकली वापरणाऱ्यांची महानगरातली संख्या रोडावली. युरोपात सायकल चालवणे आजही अप्रतिष्ठितपणाचे लक्षण मानले जात नाही. आपणही सायकलीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी, कारण पेट्रोल महाग होतच राहणार..
आणखी वाचा
First published on: 14-10-2012 at 08:55 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash pethe bicycle bicycle revolutions mumbai pune cycle racecycle in pune