प्रशांत सावंत
फेब्रुवारी महिना सुरू झाला की सकाळी सातच्या सुमारास उजाडू लागतं- तब्बल एक तास अगोदर; जेव्हा हिवाळय़ात सूर्यकिरणे दुर्मीळ होतात. पानगळीमुळे झाडं जरी ओकीबोकी दिसत असली तरी ब्लॅकथॉर्नच्या (Blackthorn) झाडांवर थोडीशी पालवी फुटू लागलेली असते. सूर्याचं दर्शन जरी रोज झालं नाही तरी नाजूक पिवळय़ा रंगाची डॅफोडिल्स लवकरच पाहायला मिळतील या आनंदाने वसंत ऋतूची प्रतीक्षा सुरू होते.
इंग्लंडच्या कंब्रिया या निसर्गसंपन्न भागात वाढलेल्या एका मनस्वी कवीला हिरव्या दुलईवर मस्तपणे झुलणाऱ्या डॅफोडिल्सने इतकं मोहित केलं की आपसूकच त्याच्या ओठांवर शब्द उमटले.. I wandered lonely as a cloud… आणि ही कविताच पुढे त्याची ओळख बनली. या कवितेने त्याला इतकी प्रसिद्धी मिळवून दिली की आजही daffodils म्हटलं की विल्यम वर्डस्वर्थ (william wordsworth) हे नाव आणि त्याची ती कविता लोकांच्या मनात तरळते. मी काही वर्षांपूर्वी अॅम्बलसाइड (Amblecide) या लेक डिस्ट्रिक्ट (Lake District) परिसरातील छोटय़ा शहरांत पर्यटनासाठी गेलो होतो. अर्थात स्मारकरूपी वर्डसवर्थला भेटण्याची खूणगाठ मनात बांधूनच! निसर्गरम्य तलाव आणि डोंगर यांचं सुंदर कोंदण लाभलेल्या या शहरापासून जवळच आहे – राइडल माऊंट (Rydal Mount)- जिथे वर्डसवर्थ राहत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचं घर त्याच्या कवितांना साजंसं असंच स्मारक बनलं आहे आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांचं जणू तीर्थक्षेत्र! त्याच्या या घराचा वारसा हक्क जरी वर्डसवर्थच्या सध्याच्या वारसांकडे असला, तरीही घरातील महत्त्वाचा भाग आणि आजूबाजूचा परिसर आणि त्याने सजवलेला बगीचा पर्यटकांसाठी खुला आहे.
ज्या निसर्गापासून प्रेरणा घेऊन वर्डस्वर्थने महान कविता लिहिल्या, त्या परिसरात असलेलं त्याचं घर जतन करण्यात आलं आहे. घर मूळचं टय़ुडर (Tudor) काळातील आहे. काळानुसार घरात जरी बदल करण्यात आले असले तरीही मूळची वास्तुरचना कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वर्डस्वर्थला झाडाफुलांची प्रचंड आवड आणि जिव्हाळा होता आणि वेळ मिळेल तेव्हा तो घरासमोरचा बगिचा फुलविण्यात रमत असे. आजही रायडल माऊंट परिसरातील त्याने तयार केलेला बगिचा काळजीपूर्वक जतन केला आहे. त्याच्या घराजवळ कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी न देता त्या परिसरातील निसर्गसंपदा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. बगिच्याच्या परिसरात काही ठिकाणी पर्यटकांसाठी बैठकीची सोय केली आहे. ज्यामुळे पर्यटकांना रम्य वातावरणात विंडरमियर तलावाचे दर्शन होईल. येथे वर्डस्वर्थच्या काही काव्यपंक्तींचे फलक लावण्यात आले आहेत. या काव्यपंक्तींतून हा कवी जागोजागी भेटल्याची अनुभूती येते. त्याच्या स्मरणार्थ या बगिच्यामध्ये काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
रायडल माऊंट जरी त्याच्या चाहत्यांचे पहिले आवडीचे स्थान असले तरी जवळच असलेल्या ग्रासमेर येथील त्याचे सुरुवातीचे निवासस्थानही निगुतीने जतन करण्यात आले आहे. डव कॉटेज येथे वर्डस्वर्थ सुरुवातीची काही वर्षे राहिला होता. वर्डस्वर्थनंतर या घराची मालकी अन्य व्यक्तींकडे गेली, परंतु १८९१मध्ये ‘वर्डस्वर्थ ट्रस्ट’ने या घराचा ताबा मिळवला आणि त्याचे संग्रहालयात रूपांतर केले गेले. त्याच्या हस्तलिखितांची बहुमोल संपदा या घराजवळच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे आणि त्याच्या प्रसिद्ध डॅफोडिल्सच्या फुलांची बाग बहरते आहे.. रायडल माऊंट आणि डव कॉटेज या ठिकाणी वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्डस्वर्थचे जगभरातील चाहते या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात. कविता वाचन, चित्रकला, बगिच्यांची प्रदर्शने आणि व्याख्याने आयोजित करून ज्येष्ठांनाच नव्हे तर युवा पिढीलाही वर्डस्वर्थच्या काव्याची महती कथन केली जाते.
आज इतक्या वर्षांनंतरही वर्डस्वर्थची आठवण कायम आहे ती त्याच्या तरल कवितांमुळे. त्या साहित्यसंपदेचे, तो वापरत असलेल्या वस्तू यांचे जतन करून ही निवासस्थाने आणि आजूबाजूच्या परिसराकडे वर्डस्वर्थप्रेमींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. आजही डॅफोडिल्स पाहिले किंवा कोकीळ पक्ष्याची साद कानी आली की वर्डस्वर्थच्या कवितांची हटकून आठवण येते. खरं तर हीच या कवीला मोठी श्रद्धांजली आहे. उंच आणि नेत्रदीपक स्मारके उभारण्यापेक्षा त्या व्यक्तीची कला साधने जपणे हेच खरे स्मारक!
wizprashant@gmail.com