गेले काही दिवस बातम्या आणि जाहिरातींतून कळत होतं की, ‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिनाचे नाना पाटेकर अतिथी संपादक असणार आहेत. त्यामुळे या अंकाबद्दल उत्सुकता होती. रविवारी अंक वाचला तेव्हा खरंच रोजच्या त्याच त्या बातम्यांऐवजी काहीतरी वेगळं वाचायला मिळालं. जिकडे तिकडे रखरखतं ऊन असताना एखादा सावली असलेला पाणवठा दिसावा आणि तिथे निवांत बसायला मिळावं असं काहीसं वाटून गेलं. कारण नानांचे शब्द थेट त्यांच्या हृदयातून कागदावर उतरले आणि या अंकात छापून आलेत की काय, असं वाटलं. हे सर्व जमवून आणल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार आणि अभिनंदन.
यानिमित्ताने पूर्वी घडलेली एक घटना आठवते. औरंगाबादला माझ्या लहानपणी एकदा आमच्या घरासमोर राहणाऱ्या एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडे अल्पोपाहाराला नाना आले होते. तिथं जाताना त्यांना दुरूनच बघितलं होतं. तेव्हा आपण एका चित्रपट अभिनेत्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद झाला होता. पण त्यापेक्षाही जास्त आनंद आज त्यांच्या लेखाद्वारे झाला. नानांचे पाय मातीत घट्ट रोवलेले असल्यामुळे त्यांच्या मनातील भावना बहुसंख्य लोकांसारख्याच आहेत. फरक एवढाच, की त्या व्यक्त होत नाहीत आणि नाना बिनदिक्कतपणे मांडतात. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर- सगळेच षंढ बनले आहेत. एकच विनंती, हे हृदयातून येणारे लिखाण नानांनी इथेच थांबवू नये..त्यांचा लेख दर रविवारी वाचायला आवडेल. त्यामुळे कदाचित काळ्याकुट्ट अंधारात एकमेकांना शोधणाऱ्या मानवी मनांमध्ये कुठेतरी एक ठिणगी पडेल आणि कधीतरी त्या ठिणगीची ज्योत होईल. मग अशा असंख्य ज्योतींच्या सुंदर माळा बनल्याशिवाय राहणार नाहीत.
एक अविस्मरणीय मैफल
पं. रविशंकर यांच्यावरील लेख वाचला आणि त्यांच्या १९७९ साली अमरावतीत झालेल्या एका अविस्मरणीय मैफलीची आठवण झाली. हृदयरोगाच्या दुखण्यातून बरे होऊन पंडितजी भारतात आले होते आणि त्यांनी पुन्हा कार्यक्रम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी संगीत कलोपासक सभेचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना अमरावतीमधील कार्यक्रमासाठी विनंतीपत्र पाठवले. त्यांच्या पी. ए.चे उत्तर आले- पंडितजी फक्त दोन तास कार्यक्रम करतील. ते स्वत:, उस्ताद अल्लारखाँसाहेब (तबला) आणि पं. कार्तिककुमार (सतार) या सर्वाची मिळून बिदागी एक लाख २५ हजार होईल.
ते वाचून आम्ही हबकूनच गेलो. एवढी बिदागी देणे आम्हाला अशक्य होते. तरीही मी प्रयत्न करायचे ठरवले. डिसेंबर १९७८ मध्ये पंडितजींचा मुंबईत रंगमंदिरला कार्यक्रम होता. तो संपल्यावर ते विश्रांतीगृहात आले. तेथे मी त्यांना भेटलो. म्हणालो, ‘पंडितजी १९५२ साली अमरावतीत झालेल्या मोठय़ा संगीत संमेलनात तुमचे सतारवादन आणि तुमची व अली अकबर खाँ यांची जुगलबंदी ऐकली होती. ते स्वर अजून माझ्या कानात आहेत. जसे आम्ही आमच्या मुलाबाळांना अभिमानाने सांगतो की, आम्ही पं. रविशंकर यांची मैफल ऐकली, तसे त्यांनी आपल्या मुलाबाळांना अभिमानाने सांगावे की, आम्ही पं. रविशंकर यांची मैफल ऐकली.’ पंडितजी म्हणाले, ‘बहोत दुरुस्त खयाल है आपका.’ त्यावर मी म्हणालो, ‘पण पंडितजी, हे शक्य नाही. तुम्ही कळवलेली बिदागी आमच्या आवाक्याबाहेरची आहे. म्हणून आमच्या मुलांनी तुमची मैफल ऐकूच नये का?’ पंडितजी मिश्कीलपणे हसले आणि त्यांनी पी.ए.ला सांगितले, ‘इनका नाम और पता लिख लो’.
जानेवारी १९७९ च्या पहिल्या आठवडय़ात आमचे ज्येष्ठ स्नेही डॉ. मदनगोपाल यांना एक तार आली- ‘३० जानेवारी १९७९ रोजी मी स्वत:, पं. कार्तिककुमार, अल्लारखाँसाहेब अमरावतीस कार्यक्रम करण्यासाठी येत आहोत. बिदागी सर्व खर्चासहित रु. २१ हजार होईल.’ ती पं. रविशंकर यांची होती.
त्यानंतर आम्ही सर्वजण उत्साहाने कार्यक्रमाच्या तयारीला लागलो. ३० जानेवारी १९७९ रोजी दुपारी पंडितजी नागपूरहून अमरावतीस पोहोचले. दुपारी दोननंतर आम्ही तिकीट विक्री सुरू केली आणि अवघ्या दोन तासांत संपूर्ण तिकिटे विकली गेली. संध्याकाळी पंडितजी म्हणाले, ‘मुझे यहाँ के अंबामंदिर ले चलो.’ मी लगेचच त्यांना घेऊन गेलो. मंदिरात गेल्यावर पाच मिनिटे डोळे बंद करून त्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परत आलो.
पंडितजींचा कार्यक्रम फक्त दोन तासच होईल, असे आम्ही अगोदरच जाहीर केले होते. बरोबर रात्री ९ला कार्यक्रमास सुरुवात झाली. पंडितजींनी राग बिहाग वाजवायला सुरुवात केली. ४० मिनिटे त्यांनी एकलवादन केले. नंतर पाच मिनिटे त्यांची उस्ताद अल्लारखाँसाहेबांबरोबर जुगलबंदी, सवाल-जबाब झाले. मध्यंतरात आम्ही हॉटेलवर गेलो. पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे रबडी आणून ठेवली होती. ती खाऊन, फ्रेश होऊन पंडितजी पुन्हा वाजवायला बसले. रात्री १०ला त्यांनी सतार वाजवण्यास सुरुवात केली ती पहाटे तीनला रागमालिका वाजवून खाली ठेवली. श्रोत्यांना नमस्कार करून ते उठले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
दुसऱ्या दिवशी ते माझ्या दुकानात आले. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही दोन तासच सतार वाजवणार होतात. मग इतका वेळ कशी वाजवलीत?’ ते उत्तरले, ‘भोळेजी, ये मैंने नहीं, अंबामाताजीने बजवा लिया.’
अशा या थोर कलावंतास माझे सहस्र प्रणाम!
– रत्नाकर भोळे, ठाणे.