अदिती देवधर
संपदाच्या इमारतीच्या आवारात एक मोठ्ठं झाड आहे. दरवर्षी पानगळ होते तेव्हा आठवडय़ाला दोन पोती भरतील इतकी पानं जमतात. मग त्या पानांचा ढीग करून ती जाळून टाकतात. यामुळे धूर होतो, हवा प्रदूषित होते, आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. संपदाला माहीत आहे की त्यातून कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो- जो जागतिक तापमानवाढीला कारणीभूत आहे. आग धुमसत राहिली तर कार्बन मोनॉक्साइड निर्माण होतो. जागतिक तापमानवाढीतलं कार्बन मोनॉक्साइडचं योगदान जास्त आहेच, पण तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत घातक आहे. संपदाला हे सरं माहीत असल्यानं तिनं आई-बाबांना, शेजारच्यांना पाने जाळू नका असं सांगितलं आहे. त्यावर त्यांनी ‘एवढय़ा पानांचं काय करणार?’ असा उलटा प्रश्न विचारला.
संपदाच्या आईची मैत्रीण- वीणा मावशीनं गच्चीवर सुंदर बाग केली आहे. वाळलेली पानं आणि स्वयंपाकघरातला कचरा यांपासून ती खत बनवते. प्रत्येक वाफ्यात आणि कुंडीत वाळलेली पानं मातीवर पसरली आहेत. पानांच्या थरामुळे सूर्यप्रकाश थेट मातीपर्यंत पोहोचत नाही, परिणामी मातीत ओलावा टिकून राहतो. मातीची धूप होत नाही, झाडे चांगली वाढतात. पाण्याची बचत होते. थरातील पाने कुजली की ती परत मातीत जातात, त्यांच्यातली पोषणद्रव्ये झाडाला मिळतात.
दर महिन्याला तिला चार ते पाच पोती पाने लागतात. गल्लीत रस्त्याच्या कडेला पडलेली पाने ती आणते, पण त्यात वाट्टेल तो कचरा असतो. मावशीची समस्या ऐकून संपदाला युक्ती सुचली. तिनं इमारतीच्या आवारातली पाने झाडून एकत्र केली. किराणामालाच्या दुकानातल्या काकांकडून रिकामी पोती आणून त्यात पानं भरली आणि मावशीला दिली.
मावशी पानांचे आच्छादन कसं करते, खत कसं तयार करते हे सगळं संपदानं बघितलं. वाळलेली पानं कचरा तर नाहीतच, पण अत्यंत उपयोगी आहेत हे तिला मावशीची बाग बघून कळलं. मावशीला पानं द्यायची आणि उरलेली पानं आवारात अशा तऱ्हेनं वापरायची असं तिनं ठरवलं.
एवढय़ावर ती थांबली नाही. तिच्या आणि शेजारच्या गल्लीत, गच्चीवर बागकाम करणारे बरेच लोक आहेत, कारण बऱ्याच इमारतींच्या गच्चीवरून तिला झाडं डोकावताना दिसतात. तिच्या आजूबाजूच्या इमारतींत पानं जाळणारेही बरेच आहेत. संपदानं आपली कल्पना यश, नेहा आणि यतीनला सांगितली. चौकडी कामाला लागली. पानं असणाऱ्यांना त्यांनी सांगितलं, ‘पानं जाळू नका, पोत्यांत भरून ठेवा.’ पानं हवी असणाऱ्यांना ती कोणाकडे उपलब्ध असतील हे सांगितलं. अशी पानांची देवाण-घेवाण सुरू झाली. पानं जाळणं काही प्रमाणात तरी कमी झालं आहे. ही तर सुरुवात आहे.