नाटककार मकरंद साठे यांनी ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या त्रिखंडी ग्रंथाच्या माध्यमातून संवादरूपाने मराठी रंगभूमीचा इतिहास लिहिला आहे. पहिल्या खंडात १८४० ते १९५० या स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा, दुसऱ्या खंडात १९५० ते १९७५ या स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा, तर तिसऱ्या खंडात १९७५ ते २०१० या कालखंडातील मराठी रंगभूमीच्या प्रवाहांचा वेध घेतला आहे. या तिन्ही खंडांविषयी नाटय़दिग्दर्शक अतुल पेठे यांनी रूढ समीक्षेच्या फुटपट्टय़ा न लावता रंगकर्मी या नात्याने तीन लेखांद्वारे क्रमश: घेतलेला वेध..
‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ हा मकरंद साठे लिखित तीन खंडी ग्रंथ डिसेंबर २०११ मध्ये प्रकाशित झाला आहे. या तीनही खंडांची एकूण पृष्ठसंख्या १,७८० आहे. हे तीन खंड म्हणजे मराठी रंगभूमीचा १८४३ पासूनचा सामाजिक-राजकीय इतिहास आहे. मराठी रंगभूमीच्या संदर्भात यापूर्वी आठवणी, आत्मचरित्र आणि काहीसा इतिहास लिहिला गेलेला आहे. पण ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ हा ऐतिहासिक, विशेषत: सामाजिक-राजकीय अंगाने लिहिलेला इतिहास प्रथमच आलेला आहे. साठेंसारख्या नाटककाराने आणि कादंबरीकाराने लिहिलेला हा मराठी रंगभूमीचा इतिहास लालित्यपूर्ण झालेला आहे. आजच्या काळातल्या म्हणजे आधुनिकोत्तर कालखंडातील या नाटककाराने आपल्या पूर्वसुरींचा घेतलेला हा वेधक शोध आहे. या ग्रंथाचा गाभा आहे, ‘मी कोण?’ हा मूलभूत आणि अनेक आयाम असलेला प्रश्न.
आपण कुठल्या नाटय़परंपरेचे पाईक आहोत आणि या परंपरांना आपण नेमके कुठले वळण देऊ पाहत आहोत, याचा विचार साठे यानिमित्ताने करत आहेत. ग्रंथाच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे त्यांनी हे लेखन इतिहासकार, राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ किंवा विचारवंत म्हणून केलेले नसून तो ललित लेखकाने आंतरिक ओढीतून घेतलेला वैचारिक आढावा आहे.
लेखकाचीच भाषा वापरायची झाली तर मीही समीक्षक, प्राध्यापक, अभ्यासक या भूमिकेतून हे लेख लिहीत नसून दिग्दर्शक आणि प्रयोगशील रंगकर्मी या नात्याने लिहीत आहे. त्यातून या लेखकाच्या बहुतांश नाटकांशी माझा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून संबंध आलेला आहे. सामाजिकदृष्टय़ा कमालीच्या उलथापालथीच्या कालखंडातला आपला हा रंगप्रवासी नेमके काय म्हणू पाहतोय, याचा शोध या निमित्ताने घेणार आहे.
हे तीनही खंड म्हणजे मराठी रंगभूमीवर जे जे सामाजिक, राजकीय प्रवाह जसजसे उलगडत गेले वा लुप्त झाले त्या प्रवाहांचा अभ्यास आहे. इथे नेहमीच्या सवयीचे नुसते वर्णन नाही किंवा बरे-वाईट असे दर्शन नाही, तर वळण देणाऱ्या निवडक मराठी नाटकांद्वारे त्या त्या कालखंडातील विशिष्ट सामाजिक व राजकीय वास्तव तपासण्याचा हा प्रयत्न आहे. नाटकात लिखित संहिता म्हणजे ‘टेक्स्ट’ असते. त्या संहितेमध्ये (टेक्स्टमध्ये) न लिहिले गेलेले ‘सब टेक्स्ट’ असते. हे ‘सब टेक्स्ट’ म्हणजे प्रत्येक लिखित वाक्यामागील आणि वाक्यामधील अनेक अलिखित दडलेली वाक्ये असतात. ही लपलेली वाक्ये म्हणजेच अनेक अर्थाची आणि सत्याची दर्शनेही असतात. ती जितकी होतील तेवढी कलाकृती अधिक सघन होत जाते. माझ्या मते, हा ग्रंथ म्हणजे मराठी रंगभूमीचे समग्र ‘सब टेक्स्ट’ आहे. मराठी रंगभूमी नावाच्या झाडाचा, जमिनीखाली खोलवर पसरलेल्या मुळांचा हा शोध आहे.
मराठी रंगभूमीच्या या पसाऱ्याची काही व्यवस्था लावणे आणि तिचे विच्छेदन करून विश्लेषण करणे हे या लेखनामागचे मुख्य सूत्र आहे. कुठल्याही क्षेत्रात अनेक वर्षांत बहुविध चांगल्या-बऱ्या-वाईट गोष्टींची भर पडत असते. त्यातून वेगवेगळे विचारप्रवाह तयार होतात. समाजाच्या प्रवासाच्या साऱ्या खुणा कमी-अधिक प्रमाणात कलाकृतींवर पडतात. त्यातून नाटकासारख्या जिवंत माध्यमावर तर त्या त्या काळाची चिन्हे उमटलेली दिसतातच दिसतात. तत्कालीन समाजाचे अग्रक्रमाचे सामाजिक-राजकीय-मानसिक आणि बौद्धिक प्रश्न कोणते होते याचा शोध लागू शकतो. मराठी नाटकातून अभिव्यक्त होणारा, त्या त्या काळचा भाषाविषयक मोठा ऐवज, त्यातून आपल्याला मिळू शकतो. तेव्हा मराठी नाटक हा फक्त रिकामटेकडय़ांचा खेळ नसून, ते एक कळत वा नकळत होणारे राजकारण आहे, हे लक्षात येऊ शकते. कलेतून झालेल्या राजकारणाची आणि समाजकारणाची मांडणी करणे हाच या ग्रंथलेखनामागचा उद्देश आहे.
मराठी रंगभूमीच्या संदर्भात अनेकदा तिची रूंदी लक्षात येते, पण खरोखर तिची उंची आणि खोली काय, हे मात्र कळत नाही. दंतकथा तयार करून एखाद्या काळाविषयी, त्यातल्या नाटकांविषयी आणि त्या नाटकाशी संबंधित लेखक-दिग्दर्शक-अभिनेत्यांविषयीच्या रम्य सुरस कहाण्यांवर आपली गुजराण होते. त्यातून नाटकासारख्या तत्क्षणी लोप पावणाऱ्या कलाप्रकाराचे दस्तऐवजीकरण झालेले नाही. ते दृक-श्राव्य माध्यमातून होऊ शकते, तसेच लेखनातूनही होऊ शकते. पण नाटकांच्या सर्व बाजूंच्या समग्र समीक्षणाची शास्त्रीय पद्धत आपण तयार केलेली नाही. त्यामुळे आपल्या रंगसर्जनामध्ये जाण, जाणीव आणि जागरूकता याचा अभाव अनुभवाला येतो. यासोबत खोटी भावुकता, नाटकाविषयी गैरसमजुती आणि समाजातील इतर क्षेत्रांचा असलेला दुरावास आपली वैचारिक ताकद पांगळी करतो. त्यामुळे मकरंद साठे म्हणतात, त्याप्रमाणे ‘परंपरा उलगडल्याशिवाय आधुनिकतेला अर्थच उरत नाही आणि समाज कळल्याशिवाय व्यक्ती कळत नाही.’ तेव्हा वर्तमान कळायला हा मराठी रंगभूमीचा इतिहास महत्त्वाचा आहे.
आता इतिहास म्हणजे रूक्ष सनावळ्या आणि घटनांची जंत्री नसते, हे आपल्या सर्वाच्या पक्के लक्षात येऊ लागले आहे. याबाबत मला डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेला ‘लोकमान्य ते महात्मा’ हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा वाटतो. इतिहासाची पुनर्माडणी करून नवा दृष्टिकोन देणाऱ्या या ग्रंथाची जवळीक ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’शी जाणवते. अर्थातच दोन्ही ग्रंथांचे विषय आणि मांडणी वेगवेगळी आहे. इतिहासलेखन करणे आजच्या काळात किती संवेदनशील झालेले आहे, हे आपण जाणतोच, पण त्याला भिडण्याचे धारिष्टय़ आपापल्या पद्धतीने काही लोक आज प्रत्येक क्षेत्रात करत आहेत, हे महत्त्वाचे. मकरंद साठेंचा ग्रंथातील नायक म्हणतो, त्याप्रमाणे ‘इतिहासपण नाटकासारखा पूर्णपणे वस्तुनिष्ठ, अपोलिटिकल असूच शकत नाही. त्यात राजकारण असतंच ना! इतिहास आला की कुठली घटना ऐतिहासिक ते ठरवणं आलं, तिचा अर्थ लावणं आलं. या प्रक्रियेत इतिहासकाराच्या जीवनदृष्टीचं प्रतिबिंब पडणारच ना. त्याला मान्य असणाऱ्या विचारधारा, मूल्यव्यवस्था या चौकटीमधूनच तो विचार करणार, मग तो कितीका प्रयत्न करेना ऑब्जेक्टिव्ह राहण्याचा. हा सनातन तणाव आहे व्यक्तिनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता यांच्यामधला. त्यातून राजकारण उद्भवतंच. कधी ते जाणीवपूर्वक असेल तर कधी नेणिवेच्या पातळीवर.’ तर या ग्रंथ लेखनातून मराठी रंगभूमीचे राजकारण जसे मुखर होते, तसेच ते साठेंचेही राजकीय भान कळू लागते. ते राजकारण अर्थातच प्रस्थापित गोष्टींना धक्का देणारे आणि बंडखोर आहे.
पहिल्या खंडात स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा म्हणजे १८४० ते १९५०, दुसऱ्या खंडात स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा म्हणजे १९५० ते १९७५ तर तिसऱ्या खंडात १९७५ ते २०१० या कालखंडातल्या मराठी रंगभूमीच्या प्रवाहांचा वेध आहे.
हा पहिला खंड ६७७ पानांचा आहे. पहिल्या खंडात एकूण १५ रात्री आहेत. वेताळ टेकडीवर एक विदूषक एका प्रायोगिक नाटककाराला तीस रात्री मराठी रंगभूमीविषयक गोष्टी सांगतो. त्यात प्रश्नोत्तरे आहेत. नाटकांचे तुकडे आहेत आणि इतरही अनुषंगिक उदाहरणे आहेत. विदूषक आपले मत नोंदवत या इतिहासाची मांडणी करतो. तो महात्मा फुल्यांच्या परंपरेतला आहे. त्यामुळेच राजकीयही आहे.
पहिली रात्र ही विदूषक आणि एकटय़ा पडलेल्या प्रायोगिक लेखकाच्या भेटीची आहे. अस्वस्थ आणि निराश असलेल्या लेखकाला विदूषक इतिहासात डोकवायला लावतो. सध्याच्या काळासारखे ‘काळे कालखंड’ इतिहासातही पदोपदी दिसतात, तेव्हा त्या काळच्या सृजन आणि सर्जनशील व्यक्तित्वांनी जो झगडा दिलेला असतो, त्याची आठवण अशा वेळी केली तर आपल्याच वाटा अधिक स्पष्ट व्हायला मदत होते, हा या सुरुवातीच्या रात्रीचा मथितार्थ विदूषक लेखकाला सांगतो. पहिले मराठी नाटक कोणते या प्रश्नापासून सहज सुरुवात होते. विष्णुदास भावेंचे ‘सीता स्वयंवर’, महात्मा जोतीबा फुलेंचे ‘तृतीयरत्न’, किलरेस्करांचे ‘शाकुंतल’ की ज्यांच्या बाजूने दावा करण्यातून कोणाला काही फायदा नसल्यामुळे त्यांचा दावा केला जात नाही अशी काही नाटके? महात्मा फुलेंचे १८५५ साली लिहिलेले नाटक थेट १९७९ला म्हणजे तब्बल १२४ वर्षांनी प्रकाशित झाले. ही गोष्ट मग अशा वेळी ‘नसेल गेले छापले’ इतक्यापुरती मर्यादित राहत नाही, तर दक्षिणा प्राइज कमिटीने (म्हणजे ब्राह्मणांनी आणि इंग्रजांनीसुद्धा एकत्रितपणे) नाकारणे येथपासून ते सत्यशोधक समाजाचे नंतरच्या काळात बदललेले रूप आणि मराठी रंगभूमीच्या मध्यमवर्गीय ब्राह्मणी स्वरूपापर्यंत येऊन भिडते. या दुर्लक्षिलेल्या नाटकाचे ‘सब टेक्स्ट’ साठे यानिमित्ताने अधोरेखित करतात. पहिल्या मराठी नाटकाचा दावा करणाऱ्या अनेकांची मग छाननी होते. त्यामागचे राजकारण पुढे येते. यातून मग चांगले नाटक कोणते, त्याचे निकष काय, याबाबतही चर्चा होते. ‘जे नाटक लेखकाचा स्वत:चा परीघ मोडून पलीकडे जाते, तेच नाटक मोठे असते. मग त्याची मांडणी, कथा एका व्यक्तीची का असेना. स्वत: बाहेरच्या समाजाशी जे सह-अनुभूत होऊ शकते, तेच नाटक मोठे असते,’ अशी चांगल्या नाटकाची व्याख्या करताना साठे सहजपणे गोपाळराव आगरकर, नोबेल विजेते तुर्की लेखक ओरहान पामुक, कॉम्रेड डांगे यांचे (अर्थातच) वेगवेगळ्या काळातल्या नाटकांबाबतचे म्हणणे उद्धृत करतात.
एकाच गोष्टीकडे पाहण्याचे हे तीन पुरोगामी विचारशील दृष्टिकोन आपली दृष्टी विस्तारतात. या तीनही विचारवंतांना एकत्र आणण्याने काळाचे अंतर साठे पुसून टाकतात आणि वाचकांच्या विचारांची खोली वाढवतात. अशा वेळी पृथ्वीच्या बाहेरून जमिनीवर उडी मारणाऱ्या फेलिक्स बाउमगार्टनरचे विधान साठेंच्या या मांडणीशी समांतर वाटते. फेलिक्स म्हणतो Sometimes we have to get really high to see how small we are (काही वेळा आपल्याला खरोखर उंच जावे लागते, म्हणजे आपण किती खुजे आहोत हे कळते.)
या विधानाप्रमाणेच साठे या साऱ्या ग्रंथाला तौलनिक आणि मूल्यात्मक मिती प्राप्त करून देतात. भावे-किलरेस्कर-खाडीलकर आणि महात्मा फुले या दोन बिंदूंमध्ये मराठी नाटकाची व्यवस्था ते लावू पाहतात. ही व्यवस्था लावताना साठे समकालातील आजूबाजूंच्या गोष्टींची दखल घेतात. उदाहरणार्थ- ‘सीता स्वयंवर’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला ५ नोव्हेंबर १८४३ साली. म्हणजे मुंबईत पहिली मिल निघाली त्याच्या आठ वर्षे आधी, ‘ब्रिटिश भारता’त रेल्वे आली त्याच्या दहा वर्षे आधी, लोकमान्य टिळकांच्या जन्माच्या १३ वर्षे आधी आणि १८५७ च्या स्वातंत्र्यासाठीच्या बंडाच्या १३ वर्षे आधी किंवा ‘तृतीयरत्न’ हे नाटक लिहिले १८५५ मध्ये. म्हणजे भाव्यांच्या ‘सीता स्वयंवर’ नंतर १३ वर्षांनी, तर १८५७ च्या बंडाआधी दोन वर्षे. टिळकांच्या जन्माआधी एक वर्ष आणि मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’च्या पहिल्या खंडाच्या प्रकाशानाआधी ११ वर्ष!
अशा प्रकारे काळाचा पट उलगडताना त्या विशिष्ट नाटकाची पाश्र्वभूमी आणि त्याच्या जन्माची कारणेही आपल्याला लक्षात येतात. एकाच घटनेचे विविध अर्थ लावण्याचा इथे जसा प्रयत्न आहे, तसाच त्या त्या काळातील त्या त्या सालातील समाजात एकाच वेळी घडणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टीही समांतरपणे दाखवायचा प्रयत्न आहे. यातून त्या त्या घटनेची व्यवस्था (प्लेसमेंट या अर्थी) लावता येते. कुठलीही घटना कधीही सुटी नसते, तर ती अनेक गोष्टींना चिकटलेली असते, हा इथे तौलनिक दृष्टीने पाहण्याचा भाग आहे.
अशा अभ्यासामुळे आपली इतिहासाबाबतची दृष्टी व्यापक व्हायला मदत होते. शिवाय समकालाचे सहप्रवासी कोण होते आणि ते त्याच वेळी जगाच्या विविध भागांत कोणते मूल्य जपत होते, हे लक्षात येते. या साऱ्या खंडांतून स्थानिक ते जागतिक अनेक संदर्भ आलेले आहेत. ते वाचताना आपण थक्क तर होतोच पण अंतर्मुखही होतो. समाजजीवनाच्या अनेक स्तरांवर नाटक नावाची कला आणि त्या कलेचा व्यवहार हा किती गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे याचे भान येते. इतिहास हा मग फक्त जेत्यांचा राहत नाही, तर तो वंचित, शोषित आणि पीडितांचा इतिहास बनतो, आमच्या आजच्या पिढीचे ‘स्टेटमेंट’ – एक विधान – बनते. मराठी रंगभूमीचे फक्तउमाळे काढणाऱ्या साऱ्यांसाठी ही नव्या युगाची नांदी ठरावी.
या पहिल्या खंडात १८४३ ते १८८०, १८८० ते १९३० आणि १९३० ते १९५५ असे काळाचे तीन तुकडे आहेत. लेखक-विदूषकाच्या पहिल्या तीन रात्रीच्या भेटीमध्ये मराठी नाटकाची सुरुवात, ‘सीता स्वयंवर’ आणि ‘तृतीयरत्न’ नाटकांवरील विस्तृत विवेचन, बुकिश/ ऐतिहासिक नाटके, वि. ज. कीर्तनेंचे थोरले माधवराव पेशवे, पहिली सामाजिक नाटके, रघुनाथ अभ्यंकरांचे ‘स्वैरसकेशा’ आणि म. बा. चितळेंचे ‘मनोरमा’, पहिले (भाषांतरित) राजकीय नाटक. विठ्ठल मोरो वाळवेकरांचे ‘नीलदर्पण’, फार्स प्रस्तावना, ना. ह. भागवतांचे ‘मोर एल.एल.बी. प्रहसन’ आणि या पहिल्या तुकडय़ाचा उपसंहार आहे. यातील ‘स्वैरसकेशा’ आणि ‘मनोरमा’ या परस्परविरोधी नाटकातील विधवांच्या आणि स्त्रियांच्या दु:स्थितीबाबत वाचताना अंगावर अक्षरश: काटा येतो. उत्तर पेशवाईनंतरच्या या सामाजिक परिस्थितीचे आणि अवनतीचे दाखले देऊन साठे अचूक वेध घेतात. पान ७३ वरील आगरकरांचा लेख हा तर नमुना आहे. तसेच ‘मनोरमा’तले गाणे वाचण्यासारखे आहे. याच प्रकरणात भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतही मुद्दे येतात. तेव्हा शंभर वर्षांनंतर येणाऱ्या तेंडुलकर आणि कानेटकर आदी नाटककारांची कुळेही साठे जाता जाता दाखवतात.
१८८० ते १९३० या काळाचा वेध घेताना संगीत रंगभूमीची सुरुवात, ‘सं. शाकुंतल’, ‘सं. सौभद्र’, सनातनी आणि सांस्कृतिक गद्य नाटके (तरुणी शिक्षण नाटिका, संमतीवयाचा कायदा), सुधारकी सामाजिक नाटके (‘सं. शारदा’), राजकीय नाटके (‘अधिकारदान विवेचना’, ‘कीचकवध’, ‘भाऊबंदकी’, ‘दंडधारी’ इ.) खाडीलकरांची दुसऱ्या टप्प्यातील नाटके (‘सं. मानापमान’, ‘सं. द्रौपदी’ इ.) ‘तोतयाचे बंड’, मेळे, सत्यशोधकी जलसे, गडकऱ्यांची नाटके, नाटय़छटाकार दिवाकर, वेगळा सामाजिक आणि राजकीय प्रवाह निर्माण करणारे नाटककार मामा वरेरकर, सशस्त्र क्रांतिवादी आणि वेगळ्या वाटेवरची सामाजिक मांडणी करणारे वि. दा. सावरकर, धर्मपरिवर्तन, हिंदू-मुसलमान प्रश्न यांची सामाजिक मांडणी करणारे श्रीशंकराचार्य यांचे गंगासंमती अथवा हिंदूकरण, साम्यवादी आणि कामगारांच्या वास्तवाची मांडणी करणारी वरेरकर लिखित ‘सोन्याचा कळस’, माधवराव जोशी लिखित ‘सं. गिरणीवाला’ आणि गणेशशास्त्री फाटकांचे ‘माझी जमीन’ ही नाटके, १९२५ नंतरच्या बदललेल्या राजकीय समीकरणांचे चित्रण करणारी नाटके, गांधीवादाची चर्चा करणारी नाटके (य. ना. टिपणीस यांचे ‘राजरंजन’), वेगवेगळे राजकीय प्रवाह उलगडवून दाखवणारी नाटके (‘रणदुंदुभी’ इ.) यांचा समग्र वेध साठे यांनी घेतला आहे. त्या त्या नाटकांचा त्यांना उलगडलेला अर्थ सांगितला आहे.
१९३० ते १९५५ या काळाच्या तुकडय़ात तत्कालीन बदलता समाज आणि नाटके यांची छाननी आहे. आधुनिक युगाच्या टप्प्यावरचे ‘आंधळ्यांची शाळा’, स्वातंत्र्याचा वेगळा हुंकार असणारे आंबेडकरी जलसे, ना. सी. फडके लिखित मध्यमवर्गीय मनोरंजनपर कृतक नाटके, जातीयताविषयक वेगळा प्रवाह निर्माण करणारे प्रबोधनकार ठाकरेंची नाटके, ‘नवा पाईक’सारखे गांधीवादी नाटक, स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी करणारी नाटके (‘बायकांचे बंड’, ‘घराबाहेर’, ‘कुलवधू’, ‘भूमिकन्या सीता’ इ.) असा मोठा घेर इथे आहे. याचबरोबर स्त्रिया, स्त्रीपार्टी नट आणि नाटके हाही अत्यंत वाचनीय भाग त्यात आहे.
ही यादी मुद्दाम अशासाठी दिली, की त्यातून या पहिल्या खंडाचा आवाका लक्षात येऊ शकेल. आपल्या रंगभूमीवरचे आणि समाजकारण-राजकारणावरचे तौलनिक विचार मकरंद साठे आपल्यासमोर ठेवतात. त्यावर कठोर भाष्यही करतात. आपल्या रंगभूमीची नेमकी बौद्धिक कुवत आणि सामाजिक-राजकीय समज ते स्पष्ट करतात. आपल्या समाजाचे वैचारिक खुजेपण कशात आहे, याचा हा एका अर्थाने शोध आहे. ‘वर्ल्ड व्ह्य़ू’ (विश्वभान) बाबतीतले आपले कच्चेपण आणि बहुतांश समाज ‘अॅन्टी इंटेलेक्चुअल’ (ज्ञानविरोधी) असणे ही दोन मुख्य कारणे ते परत परत दाखवून देतात. नाटक नावाच्या माध्यमाकडे आपल्या समाजाचा असलेला मध्यमवर्गीय बोटचेपा आणि कोमट दृष्टिकोन ते उघडा करतात. याच बाबत कॉम्रेड डांगे, वि. स. खांडेकर आणि प्र. के. अत्रे यांची व्यक्तव्येही देतात. हा सारा पट वाचताना आपण अस्वस्थ होतो आणि नव्यानेच आपला इतिहास आणि वर्तमानही पाहू लागतो, हे या पहिल्या खंडाच्या वाचनाचे वैशिष्टय़ आहे.
‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ : (खंड एक ते तीन) – मकरंद साठे
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, एकत्रित पृष्ठे – १७८०, मूल्य – २५०० रु पये .
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा