हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com
‘पुरोगामित्व’ हा आजच्या राजकीय- सांस्कृतिक अवकाशात अतिशय वादग्रस्त आणि संवेदनशील ठरत असलेला शब्द आहे. या शब्दाला ‘फुरोगामी’ वगैरे शेलक्या शब्दप्रयोगांतून हिणवण्याचे प्रकारदेखील आपण समाजमाध्यमांवर सातत्याने पाहत असतो. हा शब्द सांस्कृतिक- ऐतिहासिक धारणांतून आकाराला येणाऱ्या राजकारणाशी संबंधित असल्याने इतिहासाचे चष्मे डोळ्यावर चढवताना ‘पुरोगामित्व’ हा विषय चर्चेला घेणे आज अगत्याचे आहे. अतिशय संवेदनशील झालेल्या या शब्दाचा विचार आजच्या सामाजिक- सांस्कृतिक आणि राजकीय धारणांच्या परिघात विचार करताना तो अंमळ विस्ताराने व्हायला हवा, या हेतूने हा विषय आपण दोन लेखांतून मांडणार आहोत. यापैकी पहिल्या लेखात ‘पुरोगामित्व’ या शब्दाला संदर्भचौकटीत बसवण्याचा (contextualize करायचा) प्रयत्न आपल्याला करायचा आहे व दुसऱ्या लेखात हाच विषय आपण ठरवलेल्या २५ विषयांपैकी ‘वसाहतवाद’ या विषयाच्या अनुषंगाने चर्चेला घेणार आहोत.
आर्य हा भारतीय सामाजिक संदर्भात आणि जागतिक वंशवादाच्या संदर्भात अतिशय वादग्रस्त ठरलेला असा शब्द. साधारणत: आर्य म्हणजे शुद्ध किंवा श्रेष्ठ गुणवैशिष्टय़ांनी युक्त असलेला/ असलेल्या जैववंशातील पुरुष अशी एक सर्वसाधारण धारणा या शब्दातून व्यक्त केली जाते. ईश्वर-मानव यांचे ऐक्य कल्पिणारी उपनिषद-गंगा, सबंध विश्वाला भारावून टाकणारे तत्त्वज्ञान उभे करणाऱ्या भगवान बुद्धांनी सांगितलेली शाश्वत आर्यसत्ये, महावीर भगवानांचे अहिंसक तत्त्वज्ञान ते शोषक अशी जातिसंस्था, हिटलरप्रणीत शुद्ध वंशवादातून निर्माण झालेला महाभयंकर रक्तलांच्छित असा जागतिक सत्तासंघर्ष असा अतिशय विरोधाभासांनी भारलेला विस्तीर्ण जागतिक पट या शब्दाशी घट्ट नाते जपून आहे. आर्य या शब्दाचे मूळ *h,erós या प्रोटोइंडोयुरोपीय धातूत दडले आहे. या धातूचा अर्थ आहे- ‘आपल्या समूहाशी संबंधित असा किंवा लक्षणीय असा मनुष्य’! या दोन शब्दांतून दोन स्वतंत्र अशा धारणा प्रतीत होतात. पहिली म्हणजे समूहनिबद्धतेशी निगडित आहे, तर दुसरी रूप/ गुणवैशिष्टय़ातून निर्माण झालेल्या प्रभावाशी संबद्ध आहे. मानवी समूह किंवा मनुष्यजातीचे उपलब्ध असलेले सर्व इतिहास ग्रंथ पाहिले असता त्यातून जी सामायिक तत्त्वे दृग्गोचर होतात, त्यात या दोन धारणांचे स्थान सर्वोच्च स्तरावर आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. म्हटल्यास या धारणा एकमेकांशी संबद्धदेखील आहेत. लिंग, वर्ण, भाषा, आचार, आहार, पेहराव, श्रद्धा इत्यादी घटकांवर बेतलेल्या सामायिक हितसंबंधांतून आणि व्यावहारिक गरजांतून मनुष्य एकत्र येत आपापले समूह, कंपू करून एकत्र येतो आणि त्यातून मानवी वसाहत निर्माण होते, हे प्राथमिक तत्त्व आपण सारेच जाणतो. यातून निर्माण होणारी कुटुंबव्यवस्था (kinship) हा या समूहाचा एक महत्त्वाचा घटक.. ज्यात स्त्री-पुरुष साहचर्य आणि प्रजावृद्धी या गोष्टींना अतिशय महत्त्व असते. कुटुंबव्यवस्थेसाठी आवश्यक असलेली विवाहसंस्था ही या समूहविषयक संवेदनांच्या चौकटीतच आकाराला येते आणि त्यातून वर उल्लेखिलेल्या लिंग-वर्णादी घटकांच्या चौकटींत होणाऱ्या व्यवहारांना साचेबद्धता आणि काटेकोरता प्राप्त होते. थोडक्यात, भिन्नलिंगी- सजातीय- सवर्ण अशा समान भाषाव्यवहार करणाऱ्या, समान आचार-आहार पद्धती असलेल्या, समसमान श्रद्धा असलेल्या समूहातील आर्थिकदृष्टय़ा समतुल्य अशा व्यक्तीसोबत विवाह करणे ही गोष्ट समूहनिष्ठतेच्या, शुद्धतेच्या प्रामाण्याग्रहांना पावित्र्य आणि अधिमान्यता बहाल करतात. यातूनच समूहविषयक संकुचितता आणि साचलेपण अधिक घट्ट होत जाते. अशा व्यवस्थांमधून सनातनी, कर्मठ हट्टाग्रह आणि त्या आग्रहांच्या पूर्तीसाठी प्रसंगी शोषण आणि हिंसा हे उपाय योजिले जातात. एका बाजूने होणारा द्वेष दुसऱ्या बाजूच्या असुरक्षिततेला आणि परिणामी द्वेषाला खतपाणी घालतो- या न्यायाने ही प्रक्रिया चक्रवाढ दराने वाढत जाते आणि त्यातून समावेशक समाजनिर्मितीच्या प्रक्रियेला खीळ बसते. ‘पुरोगामित्व किंवा पुरोगामी विचार हा अशा साचलेपणाला आणि संकुचित वृत्तीला वाहते करून समाजाच्या प्रवाहितेला गतिमान करणारा विचार’ अशी ढोबळ, सर्वमान्य व्याख्या आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकते.
स्थूलमानाने ‘पुरोगामित्व ही कल्पना नेमकी काय आहे’ याचा असा परामर्श घेतल्यावर आपण या शब्दाशी संबंधित असलेल्या काही महत्त्वाच्या शब्दांचा विचार करू या. पुरोगामित्व ही कल्पना किंवा पुरोगामी असलेला माणूस हा परंपराविरोधी असल्याची ठाम भावना बहुसंख्याक मध्यमवर्गीय धारणा- तक्रार जपणाऱ्या बहुसंख्याक समाजातून व्यक्त होताना नेहमी दिसते.. त्याकडे आपण येऊ. या तक्रारीचा विचार करताना परंपरा हा शब्द आपण विचारात घेऊ. ‘परंपरा’ हा शब्द एकाच शब्दाच्या दुहेरी उपयोजनातून बनलेला आहे. ‘एकानंतर दुसरा’ (उत्तराधिकारी/ अनुयायी) अशा अर्थाभोवती हा शब्द विणलेला आहे. थोडक्यात- विशिष्ट प्रथा- ज्ञानप्रणाली- तत्त्वविचार एक माणूस (गुरू, ऋषी, संत किंवा तत्त्वज्ञ) आपल्या शिष्याला, पुत्राला, अनुयायाला बहाल करतो आणि ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्यास उद्युक्त करतो अशी सर्वसाधारण या शब्दातून व्यक्त होणारी कल्पना आहे. या प्राथमिक संकल्पनेभोवती फिरणारी प्रत्येक व्यवस्था- म्हणजेच परंपरा कुठल्याही प्रकारच्या साचलेपणाशी कळत-नकळत फारकत घेताना दिसते. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकोबा इत्यादी आपल्या मराठी भावविश्वाला जवळच्या असलेल्या ‘परंपरे’चा आपण विचार करू. ज्ञानेश्वर हे खरे तर काश्मीर-शैव परंपरेशी नाते सांगणाऱ्या नाथ संप्रदायाचे दीक्षित. त्यांनी नाथ परंपरा आहे तशीच न चालवता शैव नाथविचाराला तत्कालीन मराठीभाषक समुदायात लोकप्रिय असलेल्या शैव-स्वरूपातून वैष्णवत्व पावलेल्या विठोबाच्या भक्तीशी जोडून संस्कृतकेंद्री कर्मठ मोक्षविद्येचा व्यवहार सामान्य लोकांच्या मराठी बोलीत आणला. वारकरी संप्रदायाच्या निर्मिती-संरचनेची, वर्तमानाची आणि त्याच्या सामाजिक-राजकीय औचित्याची चिकित्सा (रा. चिं. ढेरे, मोकाशी, नोव्हेत्झ्के यांसारख्या विद्वान) अभ्यासक मंडळांनी यथार्थपणे केली असली तरीही आपल्या गुरुपरंपरेला तत्कालीन देश-काळ-परिस्थितीनुसार वेगळे वळण देऊन त्यातून अभिनव समाजनिर्मिती करण्याचा प्रयोग करण्याचा मोकळेपणा ज्ञानेश्वरांसारख्या संताने दाखवून दिला. आणि त्यातून परंपरा साचल्या राहू नयेत अशी सूचक दृष्टी समाजाला देऊ केली असे म्हणायला हरकत नाही. मध्ययुगीन संत-परंपरेच्याही पार मागे जाऊन आपण थेट कर्मठ आणि सनातनी अशा वेद-परंपरेकडे जाऊ. वेदांची व्याख्या कालानुरूप बदलत गेल्याचे परंपरा सांगत असल्याचं अनेकदा दिसून येतं. सुरुवातीला त्रयी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशीच वेदांची मर्यादित चौकट असल्याची धारणा ‘अथर्ववेदा’च्या समावेशाने अतिव्याप्त होताना दिसते.
‘मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्’- अर्थात केवळ मंत्रभाग (संहिता) आणि यज्ञयागादींभोवती केंद्रित असलेले ब्राह्मण ग्रंथ यांना वेद म्हणावे अशी व्याख्या वेदाची दिसते. यातील ब्राह्मण ग्रंथांत पुरस्कृत केलेल्या यज्ञांना ‘आरण्यक’ या ग्रंथामध्ये आणि उपनिषदांतून गौण मानण्यात आलं आहे. ‘यज्ञ म्हणजे बुडत्या नौकाच’ असल्याचे सांगून शाश्वतसौख्य यज्ञविधींतून आणि त्याच्या खर्चीक, कर्कश बजबजपुरीतून मिळणार नसल्याची काहीशी बंडखोर उद्घोषणा हे ग्रंथ करतात. पुढे ‘इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत’- इतिहास आणि पुराणे यांना एकत्रितपणे वेद म्हणावे अशी व्याख्या परंपरेत केल्याचं दिसून येतं. यापैकी मूळ वेदांचा अधिकार द्विज समजल्या जाणाऱ्या जातींशिवाय अन्य समुदायांना न देणाऱ्या आढय़ताखोर वर्गाने द्विजेतर लोकांना अनुमत केलेल्या पुराणग्रंथांना वेदाचा दर्जा दिला. या सगळ्यातून दिसतं असं की, जिला परंपरा असे म्हणण्यात येते तीदेखील तथाकथित शुद्धतेच्या, प्रामाण्यतेच्या एकसाचीपणापासून (सोयीसाठी का होईना!) फारकत घेताना दिसते. आज तर हीच परंपरा भारतीय समाजात मिसळून जाऊ पाहणाऱ्या भटक्या इराणीय शक या राज्यकर्त्यां टोळीच्या चष्टन या राजाने सुरू केलेले कॅलेंडर गुढीपाडवा या हिंदू अस्मितेचे प्रतीक बनलेल्या सणाला महत्त्वाचा सणदेखील मानते व त्या जमातीच्या नावात असलेल्या ‘शक’ शब्दाला कालमापनाचा आदर्श मानते.
यावरून असे दिसून येते की, वेगवेगळ्या काळांत असलेल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीनुसार अगदी कर्मठ समजल्या जाणाऱ्या परंपरांनादेखील साचेबद्धता मानवली न गेल्याने त्यांनी आपला स्कोप वाढता ठेवल्याचे दिसून येते. आता असा स्कोप वाढता ठेवतानादेखील वेदविश्वाची सूत्रे हातात ठेवणाऱ्या प्रवर्गाचे राजकीय-सांस्कृतिक हितसंबंध राखले जाण्याची काळजी या परंपरेत घेतली गेल्याचे आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येते. थोडक्यात जन्मजात जात-वर्णव्यवस्थेच्या शीर्षस्थानी असलेल्या वर्गाने आपले शोषणाधिकार आणि सत्ताकेंद्र पुरेपूर ज्या अर्थी जपले, त्या अर्थी बदल, मर्यादित समावेशकता किंवा प्रवाहितता ही केवळ राजकीय- आर्थिक- सांस्कृतिक अपरिहार्यता असून, ती र्सवकष सामाजिक हित साधणारी असते असे निश्चितच नाही. त्यामुळे अशा परंपरेला विस्तारत तिचा ‘स्कोप वाढवण्याच्या’ तथाकथित समावेशक प्रक्रियेमागे असलेले राजकारण लक्षात घेणे गरजेचे असते. त्या अर्थी आज विस्तारत चाललेल्या हिंदू-हिंदुत्व या राजकीय विचाराला अभिप्रेत असलेल्या जातपातविरहित एकसाची हिंदू समाजाच्या निर्मितीची जाणीव तपासणे आपल्याला गरजेचे ठरते. आणि म्हणूनच अर्थात पुरोगामित्व या कल्पनेची व्याप्ती ग्रंथचौकटींच्या (textuality) पुढे जाऊन व्यावहारिक जगातल्या आर्थिक स्तरांच्या आणि जातीय वास्तवांच्या वर्गीय संघर्षांच्या अनुषंगाने तपासणे अधिक सयुक्तिक असल्याचे आपल्याला विसरून चालणारे नाही.
पुरोगामी चळवळी आणि त्यांचे शिल्पकार असलेल्या महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, कर्वे, लोकहितवादी इत्यादी क्रियावान चिंतक महापुरुषांचे कार्य आणि त्याचे औचित्य यावर विपुल चर्चा आपण वाचली आहे, वाचत आहोत. ‘लोकसत्ता’च्या ‘समाजबोध’ या वर्तमान सदरात ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. उमेश बगाडे त्या काळातील तपशील आणि त्यातील फटी, विरोधाभास यांचा व्यासंगी परामर्श घेत आहेत. त्यामुळे त्यावर इथे अधिक लिहिण्यापेक्षा पुरोगामित्व चौकटीचे वर्तमान आयाम पाहत पुढच्या भागात आपण हा विषय वेगळ्या वळणावर नेऊन ठेवणार आहोत. त्या वळणावर नेताना आपण त्यासाठीचे व्यासपीठ मात्र याच लेखात तयार करवून ठेवणार आहोत.
साधारणत: २००४ सालापर्यंत १९९२ नंतरच्या आर्थिक उदारीकरणाचे फायदे घेणाऱ्या, आपल्या कोषात मश्गूल असलेल्या मध्यमवर्गीय समाजाची व्याप्ती एक-दोन जातींच्या मर्यादा सोडून सर्वजातीय प्रतलात वाढू लागली. उध्र्वगामी आर्थिक-सामाजिक उन्नयन करून घेणाऱ्या या वर्गाला बूस्ट दिली ती आयटी उद्योग व उदारीकरणामुळे खेळू लागलेल्या पैशातून उभारी घेतलेल्या रिअल इस्टेट इंडस्ट्री, यंत्रे-तंत्रज्ञान क्षेत्रात अभियंत्यांना मिळू लागलेल्या गलेलठ्ठ पगारांनी. हातात खेळू लागलेल्या पैशाचा उपभोग कसा घ्यायचा याचा अदमास हा मध्यमवर्ग घेऊ लागला असताना, इंटरनेट सुविधा सामान्यांच्या हातात येऊ लागली असताना दोन महत्त्वाच्या घटना मध्यमवर्गात घडलेल्या मी व माझ्या पिढीतील मराठी समाजाने अनुभवल्या. ‘ऑर्कुट’ या समाजमाध्यमाचे व्यासपीठ या पिढीच्या- वर्गाच्या हाती लागले (पुढे अल्पावधीतच ऑर्कुटची जागा ‘फेसबुक’ने घेतली, हा भाग अलाहिदा.) व त्यावर स्वत:ला व्यक्त करण्याचे, स्वत:च्या फोटोंचे कोडकौतुक करून घेत, स्वत:च्याच मित्रांनी आपल्याविषयी लिहिलेली गोड शब्दांतली टेस्टिमोनियल्स वाचायची, आपल्या आचार-विचार, सवयी, श्रद्धा, जात-उपजात याबाबतीत साधम्र्य असलेल्या समवयस्क मंडळींना ही चावडी मिळाली होती.
याच २००४ सालाच्या प्रारंभी पुण्यातील एका सुप्रसिद्ध संशोधन संस्थेवर साठ-सत्तर माणसांच्या समूहाने हल्ला केला आणि त्या संस्थेत तोडफोड करून तिथली पुस्तके, कपाटे फोडली होती. तिथे वर्षांनुवर्षे संशोधन साहाय्य करणाऱ्या कर्मचारीवर्गाला मारहाण व दुखापतदेखील झाली. या प्रसंगाच्या मागे हल्ला करणाऱ्या समूहाने दिलेली कारणे, महापुरुषांचा अपमान, जातीय-वर्गीय संघर्ष इत्यादी गोष्टींवर जागतिक आणि देशी अभ्यासकीय विश्वात विपुल प्रमाणात अकादमिक, वृत्तपत्रीय लिखाण झालं. त्यावरून वेगवेगळ्या स्तरांवर, समाजमाध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवर भरपूर लिहिलं/ बोललं गेलं. मात्र, या घटनेनंतर चित्पावन या ऐतिहासिक-राजकीय महत्त्व असलेल्या ब्राह्मण जातीतील उपजातीचे जागतिक संमेलन पुण्यात भरले. त्यानंतर त्याला प्रतिक्रिया म्हणून मराठा जातीचे जागतिक संमेलन पुण्यातच भरवण्यात आले. पुढील काही वर्षांत बहुभाषिक ब्राह्मण संमेलन, सर्व उपजातीय वर्गाना घेऊन भरवलेली वेगवेगळी ब्राह्मण संमेलने, ब्राह्मण-मराठा जातींतील जात्यभिमानी लोकांनी एकमेकांवर केलेल्या हीन स्तरावरील टीकांनी युक्त असलेल्या पुस्तिका आणि पत्रके यांची बजबजपुरी पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात माजली. याच काळात आकाराला आलेल्या ऑर्कुटवर वेगवेगळ्या जाती-उपजातींचे समूह, त्यावरून भरणारी ऑनलाइन संमेलने, कट्टे, त्यातून प्रसृत होणारे जातीय अजेंडे आणि द्वेषमूलक मजकूर वाढीला लागला आणि याचा फायदा व्यापक हिंदूहित, मुस्लीमहित, ब्राह्मणहित वगैरे वेगवेगळ्या जातीय अजेंडय़ाची दुकाने चालवणाऱ्या संस्था-संघटनांनी घेतला. पुढील लेखात आजच्या पुरोगामित्वविषयक धारणा आपल्याला या घटनांच्या पृष्ठभूमीवर चर्चेस घ्यायच्या आहेत.
अलीकडच्या काळातील मराठी सामाजिक व्यवस्था, परंपरा आणि पुरोगामित्वाची संभाषिते यांचा इतिहास पाहता भांडारकर-हल्ला आणि सोशल मीडियाचा उदय हे प्रसंग या इतिहासात मैलाचे दगड ठरले. या दोन घटनांनंतर मराठी समाजमाध्यमांवर भल्याबुऱ्या शब्दांत एकमेकांना जातीय शिव्या, तुरळक किरकोळ धमक्या वगैरे देण्याचे प्रकार झपाटय़ाने वाढीला लागले. यातून धर्म-परंपरेचे किंवा पुरोगामित्वाचे पाईक म्हणवून घेणाऱ्या स्वघोषित अभ्यासक-विचारवंत यांचे पेव मराठी सार्वजनिक आयुष्यात फुटले. त्यातून वैयक्तिक आणि जातसमूहाचे ईगो आणि स्वार्थ साधायचे राजकारण फोफावत गेले व प्रादेशिक, राष्ट्रीय राजकारणाला विषाक्त वळणे मिळत गेली. वसाहतकाळात नव्याने व्याख्यापित झालेल्या जात-धर्मजाणिवा, या साऱ्या तपशिलाची वासाहतिक पृष्ठभूमी आणि त्याचे पृथक्करण पुढील लेखात करणे औचित्यपूर्ण ठरेल.
(लेखक ‘ऑब्झव्र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)