मानवी मन एखाद्या खोल  विहिरीसारखं असतं. त्यात उमटणारे विचारांचे तरंग तर त्याहून गहिरे. माणसाच्या मनात उठणाऱ्या विचारांचे तरंग त्याच्यावर, त्याच्या कुटुंबावर आणि एकूणच समाजावर काय काय परिणाम करतात? मुळात हे विचार येतात कुठून? त्यातले सकारात्मक अन् नकारात्मक विचार कोणते? त्यांना सुयोग्य वळण कसं लावावं? आदी प्रश्नांबद्दल मुक्त संवाद साधणारं सदर..
नुकत्याच सरलेल्या वर्षांच्या शेवटी अनेक धक्कादायक, चिंताजनक घटना घडल्या, ज्यामुळे संपूर्ण देशच हादरून गेला! दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरापासून ते डोंबिवलीतल्या गल्लीपर्यंत स्त्रिया व मुलींच्या संदर्भात िहसाचाराच्या, अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत.
डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरात (?) रात्री सिनेमा बघून परतत असताना प्रेमी युगुलातील मुलीची छेडछाड करण्याचा काही मुलांनी प्रयत्न केला, त्याला तिच्या प्रियकराने विरोध करताच त्याच्यावर या मुलांनी हल्ला करून हत्या केली. त्यामागोमाग भर रस्त्यात मुलीचा विनयभंग, रिक्षावाल्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार! मग ती बातमी आपण पचवतो न् पचवतो तोच अशा स्त्रियांवरील, मुलींवरील िहसाचार, अत्याचारांच्या घटनांची जणू ‘साथ’च यावी असा सिलसिलाच सुरू झाला.
या घटना घडल्यावर समाजातील सर्वच स्तरांतून याविषयी निषेध, चीड व्यक्त झाली, अगदी जाहीरपणे! नंतर या संदर्भात जी मतं मांडली गेली, ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्यातून पुढे असले अत्याचार पुन्हा होऊ नयेत हा मुद्दा परत एकदा प्रखरपणे समोर आलाय.
या प्रतिक्रियांवर नजर टाकली तर ज्येष्ठ नागरिकांची मतं काहीशी अशी होती, ‘बघा, आमच्या वेळी होती तीच पद्धत बरोबर होती, ‘सातच्या आत घरात!’ पण काय करणार? हल्लीचा जमानाच बदललाय. पुढे आणखी काय काय बघावे लागणार आहे कुणास ठाऊक? यापेक्षा अधिक वाईट बघण्याआधीच डोळे मिटावे!’ तर युवापिढीला वाटले की, या सर्वांचा एकत्रितपणे निषेध केलाच पाहिजे. आमच्यातीलच काहीजणांना कायम असामाजिक वर्तन करूनही पाठीशी घातले जाते, त्यांना आता पाठीशी घालता कामा नये, जबरदस्त व ताबडतोब शासन झाल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे फेसबुकवर रमणारी तरुणाई दिल्लीत रस्त्यावर शांत, संयमित आंदोलन करताना दिसली. देशभर तज्ज्ञांच्या मुलाखती, मार्गदर्शन सामाजिक स्तरांवर सुरू झाले. संपूर्ण देश जणू एका विचार मंथनात मग्न झाला. कोणाच्या तिखट प्रतिक्रिया (अगदी तथाकथित योग गुरूंच्याही!), कोणाची राजकीय प्रतिक्रिया, कोणाची शांत, संयमी नोंद, तर कोणाची एकदम अतिरेकी सनातन मतं!
आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात, त्यातल्याच काही घटनांवर लगेचच प्रतिक्रिया उमटतात, त्यात विविध भावभावनांचे प्रतििबब उमटते. कुणाला खेद होतो, तर कोणाला राग येतो. कोणी त्यात विषण्ण, सुन्न होतो, तर कोणी तावातावाने क्रोधित होऊन विरोध करतो. आनंद, दु:ख, राग, क्रोध, उन्माद अशा वेगवेगळ्या भावना उमटतात आणि त्याप्रमाणे वर्तन होते. ज्यांना राग येतो ते शांत, संयमित आंदोलनाद्वारे तो प्रकट करतात, ज्यांना क्रोध येतो ते किंवा ज्यांना स्वार्थासाठी दिशाभूल करायची आहे ते असामाजिक वर्तन करून या भावनांचे प्रकटीकरण करतात.  
समाजात जशा घटना घडतात, तशाच वैयक्तिक जीवनातही घडतच असतात. परवाच माझ्याकडे सानिकाला तिची आई घेऊन आली होती. दहावीतली अतिशय हुशार मुलगी. आजपर्यंत सानिका कायम ९० टक्के गुण मिळवत आलेली, तिचं यश हीच आईवडिलांच्या अभिमानाची गोष्ट होती. त्याच सानिकाला दहावीच्या प्रीलिममध्ये एकदम ८५ टक्केच गुण मिळाल्यावर ती एकदम सरभर झाली. तिला झोप येईनाशी झाली, भूक लागेनाशी झाली, काही अभ्यासच करावा वाटेना. नराश्याच्या इतक्या गत्रेत ती गेली की, आदल्याच दिवशी तिने स्वत:ला गळफास लावण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा तिच्या या प्रयत्नामुळेच तिला माझ्याकडे आणण्यात आलं होतं.
ही अशा प्रकारे आत्महत्या करावीशी वाटणं, तसंच इतक्या तीव्रतेचं नराश्य येणं या वर्तनात्मक व भावनात्मक प्रतिक्रिया आहेत किंवा परिणाम आहेत. पण मग अशी प्रतिक्रिया तिच्या मनात का उमटली? मुळात आपलं मन तीन स्तरांवर काम करत असतं, विचार, भावना व वर्तन किंवा वागणं. आपण सामान्यपणे विचार केला तर असं वाटतं की, त्या त्या घटनेमुळे तशी प्रतिक्रिया वा तत्सम परिणाम झाला आहे. पण मानसशास्त्रीय संशोधनाप्रमाणे यामागे विचारांचा प्रभाव असतो. कोणत्याही घटनेनंतर मनात विचारांचे तरंग उठतात वा एक प्रकारचा ‘सेल्फ टॉक’ होतो. मग त्यावर प्रतिक्रिया उमटते, ज्यात भावभावनांचं प्रतििबब असतं.
वरील नमूद केलेल्या केसमध्येही अशीच एक विचारसरणी तिला निराशेकडे नेत होती. मला कायम यशच मिळालं पाहिजे, अपयशासारखी महाभयंकर गोष्ट नाही, या अविचारांच्या प्रभावानेच तिला आत्महत्येस भाग पाडलं.
एकूणच घटनांमधून तसंच त्यावरच्या प्रतिक्रियांमधून विरूप भावनांचं प्रकटीकरण वाढत चाललेलं आपण पाहतो आहोत. तसंच विरूप वर्तनही होत आहे. मुळात जे काही समाजात घडताना दिसत आहे ते सर्व असामाजिक वर्तनच आहे. म्हणजेच ते असामाजिक अशा विरूप भावनांचं प्रकटीकरण आहे. पण अशा सर्व विरूप भावना निर्माण कुठून होतात, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामागेसुद्धा एक विचार प्रवाह आहे. तो म्हणजे अविवेकी किंवा क११ं३्रल्लं’ विचारांचा प्रवाह. ‘स्त्री ही उपभोग्य वस्तूच आहे’, ‘कितीही शिकली तरी तिचं बळ कमीच आहे’, ‘आमचा पुरुषांचाच वरचष्मा राहिला पाहिजे’, ‘स्त्रीच पुरुषाला प्रवृत्त करते आपल्या वागण्यातून’, ‘पुरुषांनी विचारले तर स्त्रीने यायलाच हवे’ वगरे. ‘पुरुषी’, ‘अविवेकी’ विचारसरणीच या सर्व विरूप भावनांच्या प्रकटीकरणामागे आहे. एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या मायाजालात, फेसबुकवरच्या मत्रीच्या काळातही ही अविचारसरणी बदललेली नाही. म्हणूनच आधी अविचार, त्यातून विरूप भावना, क्रूरतेची, क्रोधाची व त्यातून अत्याचाराचे, िहसेचे वर्तन हे चक्र चालूच राहिलं आहे. हे जर का मुळापासून बदलायचं असेल तर समाजाची ही ‘अविवेकी’ विचारसरणी बदलायला हवी. यासाठी स्त्री-पुरुष समानतेचा सुविचार ठोसपणे िबबवला गेला पाहिजे, हे निश्चित!
सामाजिक अभिसरण ही काही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. समाज हा माणसांनी बनलेला असतो. हळूहळू बहुसंख्य माणसं सुविचार करायला शिकली तर या बदलाच्या प्रक्रियेला नक्कीच गती मिळेल. त्यामुळेच वैयक्तिक पातळीवर आपण छोटय़ा छोटय़ा तणावदायी घटनांबाबत कसा सुविचार करायचा, हे समजलं पाहिजे. आधी घटना घडते, मग मनात त्याबद्दलचा विचार किंवा दृष्टिकोन तयार होतो आणि पुढे त्या विचारांनुसार भावना जन्म घेते व लगेच पुढे वर्तनाचे वळण येते. हा सर्व मनातला प्रवास कधीही न थांबणारा आहे. म्हणूनच कवी सौमित्र यांना म्हणावे लागले आहे, ‘माझिया मना, जरा थांब ना’.  मानवी मनाचा हाच चकित करणारा प्रवास आपण या लेखमालेत समजून घेणार आहोत. तो नीट समजावून घेतला तर वैयक्तिक पातळीवर आपण नक्कीच ‘सुविचार’ करू शकू, आपल्या भावना व वागणे नियंत्रित करू शकू. अशा वैयक्तिक बदलातूनच ‘थेंबे थेंबे तळे साचे’प्रमाणे सामाजिक बदलाची प्रक्रिया वेग घेते!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व माझिया मना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proper diversion of thoughts