बापू- नमस्कार! मी एन. बापू.. सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आता सकाळचे- मला वाटतं बाळ, सात-आठ वाजत आलेले आहेत. सर्वत्र लख्ख प्रकाश पडला आहे.
बाळ- बापू, येथे हा जो प्रकाश आहे तो खास हरित आणि पर्यावरणस्नेही असा ठेवण्यात आलेला आहे.
बापू- होय बाळ. मी श्रोत्यांना सांगेन, की हा खास सौरप्रकाश आहे. तो सूर्यापासून आलेला असल्याने अत्यंत पर्यावरणस्नेही असा आहे. समोर मैदान अजूनही मोकळं. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साठलेलं आहे. हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीवर पाण्याचे थेंब छान लकाकत आहेत. या जलयुक्त शिवारावरून मंद वारा वाहत आहे. सर्व शिवार प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं आहे. सर्वाना प्रतीक्षा आहे ती सचिनची. मला वाटतं बाळ, एव्हाना सचिन यायला हवा होता.
बाळ- ओहो! आणि सचिन येथे आलेला आहे. त्याला पाहून प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह संचारला आहे. पण अहो आश्चर्यम्! त्याच्या अंगावर हिरवे कपडे आहेत. हिरवी पँट, हिरवे शर्ट. पादरक्षकही हिरव्या रंगाचे. बाळ, मला वाटतं, १९९१ च्या एक-दिवसीय मालिकेदरम्यान सचिनच्या शर्टवर हिरव्या रंगाचा एक जाहिरात बिल्ला होता. त्यानंतर त्याने प्रथमच या रंगाचा एवढय़ा सढळ हस्ते वापर केलेला आहे. हा एक नवाच जागतिक विक्रम त्याने प्रस्थापित केला आहे! होय, आत्ताच आपल्या आकडेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भारतातील जागतिक विक्रमच आहे.
बापू- या माहितीबद्दल धन्यवाद बाळ. प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह. सचिन विकेटवर आलेला. त्याच्या- समोर चारा-छावणीच्या दिशेने प्रस्ताव टाकण्यासाठी सुधीरभाऊ तय्यार.. तुम्हाला आठवतं बाळ, भाऊंनी यापूर्वी टाकलेल्या प्रस्तावाने सचिनला चांगलेच बुचकळ्यात पाडले होते.
बाळ- होय बापू. त्यांनी व्याघ्रदूत बनण्याचा प्रस्ताव टाकला होता. एकच प्रस्ताव एकाच वेळी बच्चन आणि सचिन अशा दोन खेळाडूंना टाकण्याचं त्यांचं हे कसब- मला वाटतं, शासकीय संघासाठीही नवीनच होतं.
बापू- सुधीरभाऊंनी चप्पल काढून ठेवली. प्रस्ताव फेकण्यासाठी धाव घेतली. सचिनचा सावध पवित्रा. सुधीरभाऊंनी यष्टीला वळसा घालून प्रस्ताव फेकला. प्रस्तावाला किंचित उंची दिलेली. पहिल्या टप्प्यावर प्रस्ताव उसळला.. आणि ओह! सचिनने लालित्यपूर्ण पदन्यास करीत तो नुसताच खेळून काढला. प्रस्ताव पुन्हा सुधीरभाऊंकडे.
बाळ- बापू, मी श्रोत्यांना सांगेन की, मागचा प्रस्ताव हा चट्टेरीपट्टेरी होता. आताचा हिरवा दिसतो आहे. हरितसेनेच्या प्रमुखपदाचा. खास सचिनसाठी हा प्रस्ताव आणण्यात आलेला आहे.
बापू- सुधीरभाऊ पुन्हा प्रस्ताव टाकण्यास तयार. वनरक्षक.. माफ करा- क्षेत्ररक्षक सज्ज. पंचांचा हात खाली गेलेला. सुधीरभाऊंनी धाव घेतलेली. उजवा हात हवेत.. आणि हा प्रस्ताव टाकला. योग्य टप्पा, योग्य उंची. उजव्या यष्टीच्या दिशेने.. सचिन पुढील पायावर.. आणि सुधीरभाऊंचे सचिनला जोरदार अपील. प्रेक्षकांत एकच खळबळ. सचिन आभाळाकडे पाहतोय. तुम्हाला आठवत असेल बाळ, राज्यसभा खासदारकीच्या प्रस्तावाच्या वेळीही सचिनने असेच आभाळाकडे पाहिले होते.. सुधीरभाऊ त्याच्याजवळ गेले आहेत. दोघांची चर्चा सुरू आहे. काय निर्णय होतो याबद्दल सर्वानाच उत्सुकता.. मला सांगा बाळ, याचा नेमका काय निर्णय लागू शकतो?
बाळ- हे पाहा बापू, निर्णय सचिनलाच घ्यायचा आहे. मला वाटते, एकतर तो सकारात्मक असू शकतो किंवा नकारात्मक. मात्र, सचिन हा आता राजकारणात असल्याने त्याला हरित सेनाप्रमुखपद स्वीकारण्यात काही अडचण नसावी. शिवाय सुधीरभाऊंचं अपीलही जोरदार आहे.
बापू- याचा नेमका परिणाम काय होईल?
बाळ- ते आताच सांगणे कठीण आहे. पण सचिन खासदार झाल्यानंतर राज्यसभेवर जो परिणाम झाला तसेच होईल! शिवाय..
बापू- माफ करा बाळ. आपला सचिनशी थेट संपर्क झालेला आहे. तेव्हा तो काय बोलतो, ते ऐकू या. सचिन, नमस्कार!
सचिन- हायला बापू.. तुम्ही? नमस्कार, नमस्कार!
बापू- सचिन, सुधीरभाऊंचा प्रस्ताव लाइन आणि लेंथ पाहता अत्यंत चांगला होता.
सचिन- हो. अॅक्च्युली मला त्यांचा आधीचा प्रस्ताव अधिक चांगला वाटला होता. त्यात वाघ पाहण्याची संधी होती.
बापू- पण सचिन, हरित सेनाप्रमुख ही मोठीच संधी आहे.
सचिन- आय नो! बट मला वाटतं, की सेनाप्रमुख झालं की जरा प्रॉब्लेम होतो. बॅट नुसतीच हवेत फिरत राहते आणि कॅचपण घेता येत नाही..
बापू- म्हणजे तू हा प्रस्ताव नाकारणार आहेस..
सचिन- नो- नो. अजून मी डिसाइड नाही केलेलं. यू सी- मला गार्डनिंगची पहिल्यापासून आवड आहे. लहानपणी मी आणि विनोदने एकदा ट्री प्लँटेशन केलं होतं शाळेत. तेव्हा आचरेकर सर खूप खूश झाले होते. हल्ली झाडं खूप कमी झालीत. मी हरित सेनाप्रमुख झालो तर प्रत्येक स्टेडियमवर ट्री प्लँटेशनची ड्राइव्ह घेता येईल.
बापू- ही खूपच छान कल्पना वाटते..
सचिन- हे तर काहीच नाही. आम्ही लाकडाच्या बॅट आणि स्टम्प्स वापरणंही बंद करणार आहोत. खूप झाडं तोडली जातात त्यासाठी! क्रिकेटचे काही नियमही बदलायचे आहेत. म्हणजे यापुढे भारत पराभूत झाला तर त्याला ऑफिशियली ‘भारत हरित झाला’ असं म्हणायचं! यातून केवढा तरी पॉझिटिव्ह मेसेज जाईल! वारंवार आपण असा मेसेज देणार आहोत! त्यासंदर्भात आमचं बीसीसीआयशी बोलणं झालेलं आहे.
बापू- आणि जाहिरातींचं काय?
सचिन- ओह येस! प्रमोशनल अॅड करणारच आहोत. अॅक्च्युली मला तशी एक ऑफरपण आलीये दोन सेकंदांपूर्वी..
बापू- कशाची आहे ती जाहिरात?
सचिन- ग्रीन टीची! ग्रीन टी इज द सीक्रेट ऑफ माय एनर्जी!
बापू- धन्यवाद सचिन आणि तुला खूप खूप शुभेच्छा! तर श्रोतेहो, हा होता महाराष्ट्राचा बहुधा पुढचा हरित सेनाप्रमुख. आपण आता पुन्हा बाळांकडे जाऊ या. बाळ, बाळ.. तुमच्या तोंडून आवाज का फुटेना?
प्रस्ताव
नमस्कार! मी एन. बापू.. सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आता सकाळचे- मला वाटतं ...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-08-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposal