स्वाभिमान.. अभिमान.. गर्व आणि ताठरता हे एकाच रेषेवरचे चार िबदू आहेत. कोणाची व्याप्ती कुठे संपते आणि पुढचा गाव कुठे सुरू होतो, हे कधी कधी लक्षात येत नाही आणि गफलत होते. स्वाभिमान जरूर lok05असावा; त्याच्याशिवाय कणा ताठ राहणार नाही, हे जसे सत्य आहे, तद्वतच लवचीकता आणि नम्रता अंगी असणे हेही आवश्यक आहे. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ हे आपण शाळेत शिकतो.. संस्कारित होतो; पण पुढे शिक्षण, काम, पद, अधिकार यांची पुटे चढू लागतात आणि नम्रता झाकोळली जाते. अभिमानाचा अतिरेक झाला की गर्व निर्माण होतो. अडचण अशी आहे की- व्यक्तीला कळतच नाही, की आपण सीमारेषा कधी पार केली. भारत-श्रीलंकेच्या सागरी सीमा कळत-नकळत ओलांडून घुसखोरीचा शिक्का बसणाऱ्या सागरी, अशिक्षित कोळी मंडळींसारखी ही अवस्था असते.
स्वत:चे पद, प्रतिष्ठा, पसा, मानमरातब आणि आब याविषयी अवास्तवी भूमिका म्हणजे गर्व. आपण कोणीतरी आहोत, इतरांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ आहोत, याचे जोखड मानेवर चढले, की गेलीच डोक्यात हवा म्हणून समजावे. मनातल्या या भावनांचे प्रतििबब मग वर्तणुकीत पडू लागते.
गर्वाला ऐसपस हात-पाय पसरायची वाईट खोड. तो मनातल्या इतर भावनांवर कुरघोडी करू लागतो. बोलण्यातले मार्दव लोपते. र्तुेबाजपणा येतो. जिव्हाळा आटतो. आपुलकीने तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांच्यासाठी तुमचा दुराग्रह आणि स्वाभिमान सोडणे कौतुकास्पदच. पण अभिमानाची झूल अंगावर ओढूनताणून पांघरून तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांना दूर लोटणे दुर्दैवी ठरते. माणसे तुम्हाला टाळू लागतात आणि तुम्ही एकाकी, एकटे पडू लागता.
हे जर टाळायचे असेल तर अभिमानाचा कडू घोट योग्य वेळी घशाखाली गिळायला शिका. काही चुकलं असेल तर ते मान्य करून क्षमायाचना करणे यात खरे मोठेपण दडले आहे. अभिमान गिळल्यामुळे श्वास कोंडल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही.
अभिमान कृतज्ञतेचीही गळचेपी करतो. वृथा अभिमानाचा अतिरेक झाला की माणसाला कायमच आपल्या योग्यतेपेक्षा आपल्याला कमी मिळते आहे असे वाटू लागते. मग तो दुर्मुखतो आणि त्याच्या ठायी असलेल्या आभार व्यक्त करण्याच्या भावनेला मारक ठरतो. आभाराचा भार होऊ लागतो. नम्रता कौतुक आणि सदिच्छांची धनी होते, तर अभिमान दूषणांना आमंत्रण देतो. गर्वाचे ओझे वाढले की माणूस इतरांना कमी लेखू लागतो. तो त्यांच्याकडे आपल्यापेक्षा उणे म्हणून खाली पाहू लागतो. आणि एकदा का खालीच पाहायची सवय लागली, की मग माणूस आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या वरच्यांकडे पाहायला विसरतो. अभिमान त्याच्या डोळ्यांना झापडे बांधतो. अभिमानाच्या अतिरेकामुळे त्याचा प्रत्यक्ष परमेश्वराशी असलेला संबंध दुरावतो आणि सतानाशी त्याची जवळीक होऊ लागते. सरतेशेवटी सतान त्याचा पूर्ण ताबा घेतो आणि इथेच त्याचा नाश होतो.
..गोष्ट आहे एका नामवंत शिल्पकाराची. त्याला म्हणे त्याच्या मृत्यूची चाहूल लागली. अमर होण्याच्या लालसेने त्याला झपाटले. त्याने हुबेहूब त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या नऊ प्रतिमा तयार केल्या. दुसऱ्या दिवशी यमराज आला तेव्हा शिल्पकार आपल्या प्रतिमांमध्येच बेमालूम मिसळून उभा राहिला. यमराजही बुचकळ्यात पडला. पण देवच तो! त्याने युक्ती केली आणि तो म्हणाला, ‘‘काम बरं केलंय, पण एक गोष्ट मात्र जरा चुकलीच आहे.’’ शिल्पकाराला त्याच्या कलाकृतीतील खोट सहन झाली नाही. ‘‘माझ्या हातून चूक? ते शक्यच नाही. कोणती चूक? दाखव बरं!’’ असे मोठय़ाने उद्गारत तो मूर्तीमधून बाहेर आला. यमराजाने हसत हसत फास टाकला आणि तो म्हणाला, ‘‘चूक तुझ्या कलाकृतीत नाही, तुझ्या वृत्तीत आहे. चल, निघू या आता.’’