‘वरदा’ आणि ‘सरिता’ या दोन प्रकाशनसंस्थांचे प्रकाशक ह. अ. भावे हे एक ग्रंथलुब्ध आणि ज्ञानयज्ञ चालवणारे प्रकाशक होते. पुस्तकांवर निरतिशय प्रेम हा त्यांच्या जगण्याचा स्थायीभाव होता. त्यातून त्यांनी अनेक दुर्मीळ पुस्तकांचे पुनर्मुद्रण केले. साने गुरुजी यांचे समग्र साहित्य त्यांनी उतारवयात खूप कष्ट घेऊन प्रकाशित केले. दुर्गा भागवत यांची ६९ पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. स्वत:ही स्वेट मार्डेन यांच्या पुस्तकांच्या अनुवादापासून ते अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या चरित्रापर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन, संपादन, अनुवाद आणि प्रकाशन केले. मराठी ग्रंथव्यवहारातील हा ज्ञानयज्ञ नुकताच अनंतात विलीन झाला. त्यांच्या कारकीर्दीला दुसऱ्या एका प्रकाशकाने दिलेली ही मन:पूर्वक दाद..
का ही माणसं अशी पाणनिवळीसारखी असतात. आपल्याच नादात, तालात, मस्तीत, स्वत:शीच गुणगुणत काम करत राहतात. ह. अ. तथा हनुमंत अनंत भावे हे असंच पाणनिवळीसारखं आयुष्य जगले.
१९९३ मध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथे जन्मलेल्या भावे यांच्यावर संस्कृत आणि संस्कृतीचा प्रभाव असणं साहजिक आहे. हा प्रभाव अखेपर्यंत त्यांची जीवनशैली आणि कार्यपद्धतीवर राहिला.
भावे आणि माझे संबंध गेल्या सतरा वर्षांचे. भावेकाकांना मी गमतीनं ‘खडू-फळा योजनेतले प्रकाशक’ म्हणत असे तेव्हा ते खळखळून हसत. अनेकांना हे माहीत असेल की, एकेकाळी शासनाची खडू-फळा योजना खूप गाजली, ती त्यातील भ्रष्ट व्यवहारामुळे! या योजनेमुळे काही अधिकारी खूप अडचणीत आले. अनेक प्रकाशकांनी या योजनेत हात धुऊन घेतला आणि बदनामही झाले. भावे अशा प्रकाशकांपैकी नव्हते. भावे सभ्य, सुसंस्कृत आणि नैतिकतेची बूज राखणारे प्रकाशक होते. त्यामुळे ‘खडू-फळा योजनेतले प्रकाशक’ असा भाव्यांचा उल्लेख मी वेगळ्या कारणासाठी करतो, याला ते दाद द्यायचे. ते कारण म्हणजे भावे हाडाचे शिक्षक होते. खडू आणि फळा ही त्यांची खूणच होती. भावेंचे वडील शिक्षक होते. ते स्वत: इरिगेशन खात्यातील नोकरी सोडून धुळे येथील टेक्निकल हायस्कूलमध्ये शिक्षक झाले. आणि ही नोकरी सोडल्यानंतर धुळ्यात त्यांनी इंजिनीअिरगच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस काढले. धुळ्यात असताना त्यांनी पाझर तलाव, लिफ्ट इरिगेशनसारखी कामे करून चार पैसे मिळवले आणि वयाच्या चाळिसाव्या वर्षी निर्णय घेतला की, आता पुढील आयुष्य केवळ आपल्या ‘आनंदासाठी’ जगत राहायचे. त्यासाठी त्यांनी धुळ्याला रामराम केला आणि पुण्याला जवळ केले. येथे आल्यावरही त्यांनी पॉलिटेक्निकलच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस काढले. त्यासाठी पुन्हा फळा-खडू आलाच. पुढे अध्यापनाचा हा नाद सोडल्यानंतरही ते फळा विसरले नाहीत. आपल्या प्रकाशन कचेरीत आपल्या खुर्चीच्या डाव्या भिंतीवर कायमस्वरूपी मोठा फळा त्यांनी करून घेतला होता. तो आजही आहे.
आपल्या ‘आनंदासाठी’ म्हणजे कोणत्या आनंदासाठी? तो आनंद म्हणजे पुस्तकं, ग्रंथ आणि लेखन. स्थापत्यशास्त्रावरची दोन पुस्तके त्यांनी अगोदरच लिहिली होती. त्याची दखल घेऊन दिल्लीतील भाषा सल्लागार मंडळावर इंजिनीअिरग विषयाचे तज्ज्ञ म्हणून त्यांची निवड झाली होती. वाईच्या विश्वकोश मंडळातही या विषयाचे अभ्यागत संपादक म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. भावे पुण्यात १९७३ मध्ये कायमचे राहण्यासाठी आले आणि त्यांनी प्रथम ‘सरिता’ आणि नंतर ‘वरदा’ या दोन नावाने प्रकाशनसंस्था सुरू केल्या.
आपल्या कारकीर्दीत प्रत्येक प्रकाशकाच्या वाटय़ाला अस्सल प्रतिभावंत फार अभावाने मिळतात. ते मिळतात तेव्हा त्यांचा अहंकार, आत्मसन्मान आणि मूड सांभाळणे ही त्या प्रकाशकासाठी कसोटीच असते. भावेकाका त्या कसोटीत एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर ६९ वेळा उत्तीर्ण झाले. दुर्गा भागवतांची त्यांनी काढलेली ६९ पुस्तके आणि अखेपर्यंत त्या दोघांनी जपलेला स्नेह ही त्याची साक्ष आहे. प्रकाशकाच्या आयुष्यातील दुसरी कसोटी असते ती एखादा नियोजित प्रकल्प समर्थ, प्रतिभावंत लेखकाच्या हातून करून घेणे. बाणभट्टाच्या कादंबरीचे अनुवाद गेली शंभर वर्षे उपलब्ध नव्हते, ते मराठीत यावेत आणि ते दुर्गा भागवतांनीच करावेत, ही भावेकाकांची इच्छा. पण दुर्गाबाई इतर कामांत व्यस्त असल्यामुळे आणि इतरही काही कारणास्तव त्या बाणभट्ट मराठीत करण्यासाठी तयार नव्हत्या. पण भावे डगमगले नाहीत. त्यांनी स्वत:च एका प्रकरणाचा अनुवाद केला आणि दुर्गाबाईंना दाखवला. तेव्हा बाई म्हणाल्या, ‘‘भावे, यात बाणभट्टाच्या लालित्याचे दर्शन होत नाही, तेव्हा तुम्ही हे काम करू नका.’’ भावे म्हणाले, ‘‘हे काम मी सोडेन; परंतु मराठी वाचकांसाठी तुम्ही हे काम करावे असे मला तीव्रतेने वाटते.’’ ही मात्रा लागू पडली आणि या विषयावरील भावे यांचे आत्यंतिक प्रेम पाहून दुर्गाबाईंनी हे काम स्वीकारले. बाणभट्टाच्या कादंबरीचे अनुवाद झाल्यावर त्याला एक रसग्रहणात्मक अशी पंचवीसेक पानांची प्रस्तावना दुर्गाबाईंनी लिहायला घेतली. पण लिहिताना त्या इतक्या रमल्या, की तो लेख न राहता ग्रंथच झाला. ‘रसमयी’ नावाने तो प्रसिद्ध झाला. दुगाबाईंनी श्री. पु. भागवतांना भावे यांची ओळख करून देताना ‘हे माझे प्रकाशक आहेत,’ हे त्यांच्या खणखणीत शब्दांत सांगितले. यावरून आपल्या प्रकाशकाविषयी त्यांच्या मनातला अभिमान व्यक्त होतो.
दुर्गाबाईंचा स्नेह व विश्वास भावे कुटुंबाने जपला. एवढेच नव्हे, तर भावेंनी दुर्गाबाईंबरोबर काही पुस्तकांचे सहलेखनही केले. एकदा मात्र दुर्गाबाई भावेंवर नाराज (दुर्गाबाईंची नाराजी म्हणजे संतापच!) झाल्या. ‘रसमयी’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आणि बाई संतप्त झाल्या. दुर्गाबाईंची अट असे की, माझे पुस्तक कोणत्याही पुरस्कारासाठी, शासकीय खरेदीसाठी किंवा शासनाकडे कोणत्याही अपेक्षेतून पाठवायचे नाही. हा आपला नियम भावेंनी मोडला. यातून दुर्गाबाईंचा गैरसमज झाला. परंतु पुढे बाईंना कळले की, हे पुस्तक पुरस्कारासाठी इतरच कोणीतरी पाठवले होते. भावेंनी ते पाठवले नव्हते. ही खात्री झाली आणि ताण निवळला गेला.
राजारामशास्त्री भागवतांचे सहा खंड साहित्य अकादमी प्रसिद्ध करणार होती. पण शासनाने हे काम नाकारले. कदाचित दुर्गा भागवतांची आणीबाणीसंबंधीची भूमिकाही त्याला कारणीभूत असू शकेल. भावेंनी ते सहा खंड प्रकाशित केले तेव्हा रा. ज. देशमुख त्यांना म्हणाले, ‘‘आता पुढे काही काम केले नाही तरी तुम्ही अजरामर राहाल.’’
संस्कृत आणि इंग्रजीचा प्रभाव आणि आपल्या अगोदरच्या पिढीतील विद्वानांच्या कार्याचे त्यांनी जाणलेले मोल यातून त्यांनी अनेक अभिजात व दुर्मीळ ग्रंथ प्रकाशित करून वाचकांना उपलब्ध करून दिले. श्री. व्यं. केतकर, शि. म. परांजपे, न. चिं. केळकर, चिं. वि. कर्वे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, वि. का. राजवाडे अशी अनेक महान नावे सांगता येतील. शं. ब. दीक्षित यांचा ‘भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन अर्वाचीन इतिहास’ हा ग्रंथ खगोलशास्त्राच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा आहे, की तो ग्रंथ जाणून घेण्यासाठी एका पाश्चात्त्य प्राध्यापकाला मराठी शिकावी लागली. भावे यांचे हे योगदान विसरता येणार नाही.
एरव्ही अलिप्त वाटणारे भावे कुशल संघटक होते. मराठी प्रकाशक परिषदेची स्थापना करणाऱ्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. मराठी प्रकाशक परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रकाशकांच्या डोंबिवली येथे झालेल्या सातव्या संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शासन सर्व गोष्टींचे खाजगीकरण करत आहे. रस्ते, पूल खाजगी लोकांकडून करून घेत आहे. परंतु पाठय़पुस्तके मात्र खाजगी प्रकाशकांकडून काढून स्वत: प्रकाशित करत आहेत, या गोष्टीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला होता. आज पाठय़पुस्तकांबद्दल जी चर्चा चालू आहे, ती पाहता भावे यांचे म्हणणे किती सार्थ होते, ते लक्षात येते.
भावे व्यवसायाने प्रकाशक आणि वृत्तीने शिक्षक व लेखक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होईल अशी अनेक पुस्तके भावेकाकांनी लिहिली व इतरांकडून लिहून घेतली व प्रकाशित केली. अनेक प्रकाशकांच्या बाबतीत असे होते की त्यांची प्रकाशक ही बाजू इतकी ठळक होते, की त्यामुळे त्यांची लेखक म्हणून नोंद फार दुय्यम पातळीवर घेतली जाते. प्रकाशकांचे संपादनकौशल्यही अलक्षित राहते. भावेंच्या प्रकाशनसंस्थेची वेळ बारा ते सात अशी होती. इतक्या उशिरा उघडणारे हे एकमेव प्रकाशन कार्यालय असेल. त्याचे मुख्य कारण असे होते की, भावे रोज सकाळी ऑफिसमध्ये येऊन कमीत कमी एक तास तरी लिहीत असत. सकाळचा वेळ लेखनासाठी. नंतर आपली स्नानादिक कार्ये उरकून बारानंतर ते प्रकाशनसंस्थेसाठी वेळ देत. दररोज लिहिण्याच्या या ध्यासातून त्यांच्या हातून दोनशेपेक्षा अधिक पुस्तके लिहून झाली. गेली ३६ वर्षे त्यांच्याकडे जक्का नावाचे गृहस्थ लेखनिक म्हणून काम करत आहेत. अनेक लेखकांकडे लेखनिक होते हे आपणास माहीत आहे. परंतु ते सतत बदलत राहिले. लेखक भावेंचे जक्का हे लेखनिक ३६ वर्षे न चुकता त्यांच्याबरोबर कार्यरत राहिले, हा एक वेगळा विक्रमच ठरेल.
भाव्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्यांच्या कार्यपद्धतीतही प्रतिबिंबित झाले आहे. उदा. त्यांची सूची! सूचीच्या पहिल्या पानावर पुस्तकांची यादी, तिचा महिना लिहिलेला असतो. त्या मुख्य नावाखाली- ‘यापूर्वीच्या सर्व याद्या रद्द समजाव्यात,’ असे वाक्य आवर्जून असते. शिवाय आतही ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सूचना असतात. उदा. ‘वरील दोन पुस्तकांचा कागद पन्नास वर्षांपूर्वीचा आहे’ किंवा ‘या दोन खंडांच्या सवलतीसाठी फोन करावा..’ अशा अनेक सूचना भावे अस्सल पुणेकर झाल्याची प्रचीती देतात.
लेखकांमुळे प्रकाशकाचेही व्यक्तिमत्त्व विकसित होते. दुर्गाबाईंच्या संबंधांमुळे भावे यांना मानववंशशास्त्रात गती निर्माण झाली व त्यातून त्यांनी काही पुस्तकेही लिहिली. स्वेट मार्डेनचे अनुवाद त्यांनी पूर्वीच प्रसिद्ध केले- जेव्हा आजच्यासारखी व्यक्तिमत्त्व किंवा आत्मविकासाच्या पुस्तकांची लाट नव्हती.
भावेंचे नाते शब्दांशी होते. त्यामुळे त्यांनी अनेक शब्दकोश स्वत: सिद्ध केले व इतर लेखकांचेही प्रकाशित केले. शब्दाशी या असलेल्या नात्यातूनच त्यांनी प्रारंभी आठवडय़ातून एकदा व पुढे रोज अशी सलग २० वर्षे शब्दकोडी लिहिली. शब्दकोडय़ांसाठी प्रसिद्ध असलेले भावे दुर्मीळ, पण अभिजात आणि ज्याला आज ग्राहक नाहीत अशा पुस्तकांच्या कधी कधी केवळ तीनशे प्रती काढून प्रकाशनसंस्था कसे चालवीत होते, हे त्यांचे कोडे मात्र कोणालाच सुटणार नाही.
आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भावे कार्यरत राहिले. ‘निवृत्ती’ हा शब्द त्यांना माहीत नव्हता. शेवटच्या काळात गेल्या महिन्यात त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणले. त्यांना आता कार्यालयात बसणे शक्य नव्हते. विश्रांतीसाठी त्यांची बेड वरच्या मजल्यावरच्या खोलीत होती. भावेंनी ती बेड तेथून हलवण्यास सांगितले आणि ‘ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीजवळ ठेवा,’ असा मनोदय व्यक्त केला. ‘आजूबाजूला पुस्तकं असल्याशिवाय मी जगू शकत नाही..’ भावेकाका म्हणाले. शेवटी तशी व्यवस्था करावी लागली. शेवटपर्यंत पुस्तकं हाच त्यांचा ध्यास होता. पुस्तकांचा वास आणि सहवास हाच त्यांचा प्राणवायू होता.
ह. अ. भावे हे केवळ प्रकाशक नव्हते व ‘वरदा’ हीसुद्धा केवळ प्रकाशनसंस्था नव्हती. त्यांचे एकूण ग्रंथव्यवहारातील कार्य म्हणजे एक ‘ज्ञानयज्ञ’ होता. तो आता शांत झाला आहे.
‘उद्धारपर्व’ हे पाक्षिक सदर काही अपरिहार्य कारणामुळे यावेळी प्रकाशित होऊ शकले नाही.