|| अनिकेत साठे

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांविरोधात देशात प्रचंड चीड व्यक्त होत आहे. या घटनेचा सूड घेण्याची भाषा केली जात आहे.  आरपारची लढाई करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, अशा तऱ्हेने अविवेकीपणे दहशतवाद थांबवता येईल का, याचा थंड डोक्याने विचार केला पाहिजे. युद्ध हा त्यावरचा अंतिम उपाय नाही. त्याव्यतिरिक्तही काही वेगळे मार्ग चोखाळता येऊ शकतात. ते काय, याचा ऊहापोह करणारा लेख..

प्रश्न अनेक आहेत. पण त्यांची उत्तरे सहज-सोपी नाहीत. तशी ती असती तर प्रश्नच उरले नसते आणि त्यावर विचारही करावा लागला नसता. उलट, आता प्रश्न अधिकच जटिल बनले आहेत. हे एकदा आपण प्रामाणिकपणे मान्य करून त्याकडे पाहायला हवे. त्यावरची उत्तरे शोधायला हवीत. नुकतेच पुलवामात दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याने जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्करी यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना स्थानिकांची माथी भडकवणार, त्यांना हाताशी धरून अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न करत राहणार. अशा वेळी आपली युद्धनीती काय असायला हवी? समोर उभ्या ठाकलेल्या शत्रूशी लढणे सोपे असते. परंतु ‘जन्नत’मध्ये जाण्यास आसुसलेल्यांना, लष्करावर दगडफेक करणाऱ्या स्थानिकांना आवरणे कठीण. संबंधितांना पुन्हा असा हल्ला करण्याची संधी कदापि मिळणार नाही, यासाठी प्रथम उपाय योजावे लागतील. शत्रूचे डावपेच लक्षात घेऊन नव्याने व्यूहरचना करावी लागेल. आत्मघातकी हल्ल्याची मानसिकता कशी तयार होते, इथपासून ते असे हल्ले रोखण्याच्या उपायांपर्यंतचा अंतर्भाव त्यात करावा लागेल. हे न करता दहशतवाद्यांच्या तळांवर लक्ष्यभेदी हल्ला किंवा पाकविरोधात थेट युद्ध पुकारूनसुद्धा ही लढाई पूर्णत: जिंकता येणार नाही. त्यातून विजयाची झूल पांघरल्याचा क्षणिक आनंद मिळेल; साध्य मात्र दूरच राहील.

‘प्रस्थापित व्यवस्थेत समाजात निर्माण होणारा असंतोष, तणाव दूर करण्याची सोय नसेल तर अशा परिस्थितीत बंड होण्याची जास्त शक्यता असते..’ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मांडलेले हे तर्कशास्त्र काश्मीरच्या सद्य:स्थितीस अनुरूप ठरते. राष्ट्राचे अस्तित्व, त्याची संरक्षण- सिद्धता आणि प्रभाव सैन्यशक्तीवर अवलंबून असतो. परंतु केवळ लष्करी ताकदीवर एखाद्या समस्येचे पूर्णत: निराकरण करता येत नाही. जागतिक राजकारणात नस्ती उठाठेव करणाऱ्या अमेरिकेला हे चांगलेच ज्ञात आहे. पाकिस्तानला प्रत्येक युद्धात धूळ चारूनही मूळ दुखणे कायम राहिल्याने हे शहाणपण आपणासही यायला हवे. परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून युद्धाकडे पाहिले जाते. परराष्ट्र धोरणाच्या उद्देशपूर्ततेसाठी राजनय, संधिपालन तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा उपयोग केला जातो. त्यातलाच लष्करी बळ हा एक मार्ग आहे. राष्ट्राचे संरक्षण आणि प्रभुत्व राखण्याकरता वेळप्रसंगी वापरायला ही ताकद महत्त्वाची ठरते. गरज भासेल तेव्हा आपण तिचा वापर करतोही. तो करायलाच हवा. त्याचवेळी पाकपुरस्कृत दहशतवादाची काश्मीर खोऱ्यात रुजलेली पाळेमुळे उखडण्याचे तितक्याच शर्थीचे प्रयत्न समांतरपणे करायला हवेत. अन्यथा सीमेवर पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये स्थानिकांशी लढण्यात सुरक्षा दलांची शक्ती खर्च होत राहील. त्यात दुहेरी नुकसान आहे.

दहशतवाद्यांना स्थानिकांकडून मिळणारे पाठबळ चिंताजनक आहे. त्यात आत्मघातकी हल्ल्यांची भर पडल्याने धोका वाढला आहे. छुप्या युद्धाची दहशत पसरवणे, घातपात, अपप्रचार, भौगोलिक परिस्थिती, कालमर्यादा, संघटना, नेतृत्व आदी आधारभूत तत्त्वे मानली जातात. हिंसात्मक संघर्षांने सर्वच क्षेत्रांत अंदाधुंदी, गोंधळ, अनिश्चितता निर्माण केली जाते. त्यात विविध पातळ्यांवर वेगवेगळे घटक नेतृत्व करतात. नेतृत्वाच्या उच्चाटनाने समर्थकांना दिशाहीन करता येते. संघटना, नेतृत्व आणि समर्थक यांची साखळी मोडून काढणे हे आपले मुख्य ध्येय असावे. दहशतवाद्यांचा रसद पुरवठा तोडण्यावर लक्ष केंद्रित करता येईल. छुप्या युद्धाला शह देण्याकरता आपल्या युद्धनीतीत बदल करण्याची वेळ आता आली आहे.

दहशतवादी संघटना काश्मीरमधील शाळा, महाविद्यालये पेटवून युवकांना शिक्षणापासून दूर नेत आहेत. तरुणांचे शिक्षण व रोजगारहीन जथ्थे हे त्यांचे शस्त्र बनले आहे. दक्षिण काश्मीरमधील युवकांची बदलती मानसिकता हीच गोष्ट अधोरेखित करते. यास्तव दहशतवादी विचारांपासून त्यांना परावृत्त करण्याचे प्रयत्न अधिक जोमाने आपल्याला करावे लागतील. त्याशिवाय गत्यंतर नाही. बंदूक हाती घेणाऱ्यांच्या पालकांनी त्यांचे मनपरिवर्तन करावे, त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडावे असे आवाहन लष्कराने केले आहे. काश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल, शरणागती पत्करणार नाही, त्यांचा खात्मा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिवावर उदार झालेल्या आत्मघातकी हल्लेखोरांना रोखण्याचे आव्हान सुरक्षा दलांसमोर आहे. आजवर जगात हजारो आत्मघातकी हल्ले झाले आहेत. त्यामागील प्रेरणा, कारणे, हल्लेखोरांची मानसिकता, हे हल्ले रोखण्याचे उपाय यावर अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. आत्मघाती हल्ला होण्यापूर्वीच हल्लेखोराला कसे रोखता येईल, यावर अमेरिकेची पेंटागॉनदेखील विचार करीत आहे. परिषदांमधून इतरांचे दृष्टिकोन लक्षात घेत आहे. पोलीस प्रमुखांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने अभ्यासांती या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये याआधीदेखील आत्मघाती हल्ले झाले आहेत. ते हल्ले आणि पुलवामातील हल्ला यांत फरक आहे. दहशतवाद्यांनी सीरिया, पाकिस्तान व अफगाणिस्तानप्रमाणे हल्ल्याची नवी पद्धती सुरू केली आहे. त्यात हा हल्लेखोर स्थानिक होता. हल्ल्याकरता स्फोटकांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला गेला. स्थानिकांच्या सहकार्याशिवाय अशा हल्ल्यास मूर्त स्वरूप देणे अशक्य आहे. स्फोटके विनासायास पोहोचली. नंतर ती वाहनात ठेवून हल्लेखोराने हा स्फोट घडवला.  सुरक्षाव्यवस्थेला स्फोटकांची वाहतूक आणि साठवणूक जोखता आली नाही. हे शक्य झाले तर वाहनात स्फोटके घेऊन येणाऱ्या आत्मघातकी हल्लेखोराला रोखता येईल. यासंबंधीच्या संकल्पना पडताळायला हव्यात. तपासणी नाक्यावर प्रत्येक वाहनावर ‘किरणोत्सर्ग रेषा’ (रेडिएशन बीम) सोडायची. ज्या वाहनांमध्ये स्फोटके नसतील, ती सुरक्षितपणे मार्गस्थ होतील. ज्या वाहनात स्फोटके असतील, त्यांचा रेषेशी संपर्क झाल्याक्षणी स्फोट होईल, असा उपाय तज्ज्ञ सुचवितात. महत्त्वाच्या मार्गावर आत्मघातकी हल्लेखोरांना व स्फोटकांची वाहतूक रोखण्यात असे उपाय महत्त्वाचे ठरतील. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब किंवा स्फोटके घेऊन वावरणाऱ्याला शोधण्यासाठी विलक्षण उपाय सुचवले गेले. त्यातील एक म्हणजे बॉम्ब व स्फोटकांचा छडा लावण्यासाठी प्रशिक्षित उंदरांचा वापर. ‘ग्लोबल पोझिशिनिंग सिस्टिम चीप’ बसवून उंदीर गर्दीत सोडून द्यायचे. विशिष्ट संकेताने ते संशयास्पद व्यक्तीची माहिती देतील. पेंटागॉनमधील आत्मघातकी हल्ले रोखण्याच्या विषयावरील परिषदेत हा उपाय मांडला गेला. गर्दीत आत्मघाती हल्लेखोराची खात्री पटल्यास सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने हवेत गोळीबार करावा, असे जागतिक पोलीस प्रमुखांची संघटना सुचवते. ज्यामुळे त्यापासून भोवतालचे नागरिक दूर पळतील. पण यात चेंगराचेंगरीचा धोका राहील. हल्लेखोर गर्दीचा भाग बनल्यास अधिक प्राणहानीची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी हल्लेखोराच्या डोक्यात गोळी मारून हल्ला रोखता येईल, असे संघटना सांगते. पण गर्दीत हल्लेखोराच्या डोक्यावर निशाणा साधणे सोपे नाही. आणखी एक मार्ग म्हणजे मार्शल आर्टच्या साहाय्याने हल्लेखोराचे हात जखडून त्याला निष्प्रभ करणे.

जम्मूला श्रीनगरशी जोडणारा एकमेव महत्त्वाचा मार्ग म्हणजे जम्मू-श्रीनगर महामार्ग. सुरक्षा दलांच्या रसद पुरवठय़ासाठी तो महत्त्वाचा आहे. काश्मीरमध्ये रस्त्यांच्या सुरक्षेची तीन दलांत विभागणी झाली आहे. स्थानिक पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि लष्कराच्या अखत्यारीत जे रस्ते येतात त्यांची सुरक्षा ती यंत्रणा सांभाळते. जम्मू-श्रीनगर मार्गाची जबाबदारी टप्प्याटप्प्यात तिन्ही दलांकडे आहे. त्यांच्याकडे स्वत:ची रस्ता मोकळा करणारी (आरओपी) तुकडी आहे. ही तुकडी मार्गावर एलईडी, भूसुरुंग किंवा तत्सम संशयास्पद वस्तू आहे काय, याची प्रथम छाननी करते. विशिष्ट अंतरावर जवान तैनात करून ताफ्याला सुरक्षा कवच दिले जाते. ताफ्यातील काही वाहनांवर ‘जॅमर’ बसवून रिमोट कंट्रोल किंवा तत्सम लहरींनी कोणती आगळीक होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. महामार्गावर काही अंतरावर तपासणी नाके आहेत. जवान २४ तास नजर ठेवतात. सुरक्षा दलाची वाहने आणि स्थानिक वाहने एकाच वेळी मार्गक्रमण करतात.

वर्दळीच्या मार्गावर प्रत्येक वाहनाची तपासणी व संशयास्पद वाहन ओळखणे अवघड असते. पुलवामाच्या घटनेत हल्लेखोर आसपासच्या गावातून महामार्गावर आल्याचे सुरक्षा दलाचे म्हणणे आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची वाहने मार्गस्थ होताना महामार्ग खासगी वाहनांसाठी बंद ठेवण्याचा विचार होत आहे. काही वर्षांपूर्वी ताफा मार्गस्थ होताना असे केले जात होते. खासगी वाहने अडवून ठेवल्याने खोळंबा होतो, अशी ओरड झाल्यावर तो खुला करण्यात आला. मात्र, लष्करी वाहन ताफ्याच्या सुरक्षिततेसाठी जे काही करणे आवश्यक आहे, ते करावेच लागेल. या क्षेत्रात वापरली जाणारी लष्कराची वाहने आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांमध्ये फरक आहे. लष्करी वाहने तुलनेत मजबूत असतात. संभाव्य बॉम्बस्फोट, गोळीबाराला तोंड देण्याच्या दृष्टीने त्यांची बांधणी होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाची वाहने तशा प्रकारची नाहीत. याकरता सुरक्षा दलांच्या वाहनांतील दुजाभाव संपुष्टात आणावा लागेल.

अडीच वर्षांपूर्वी बुरहान वाणी या स्थानिक अतिरेक्याला मारल्यानंतर खोऱ्यात आगडोंब उसळला होता. कित्येकांना त्याची भुरळ पडली. अनेक तरुण घरातून परागंदा होऊन दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले. जे प्रत्यक्ष गेले नाहीत, ते अशा वेळी दहशतवाद्यांच्या बचावासाठी पुढे येतात. सुरक्षा दलांवर दगडफेक करतात. अशा वातावरणात आपले जवान संयमाने परिस्थिती हाताळून अतिरेक्यांना कंठस्नान घालत आहेत. या काळात खोऱ्यातील अशांततेमुळे देशात इतरत्र शिक्षण, रोजगारासाठी वास्तव्य करणारे काश्मिरी पुलवामाच्या घटनेनंतर भयग्रस्त झाले आहेत. देशवासीयांच्या रोषाला तोंड द्यावे लागण्याची भीती त्यांना वाटते. खोऱ्यातील काही विद्यार्थिनींनी तर हल्ल्याचे समर्थनही केले. त्यांच्याविरुद्ध रीतसर कायदेशीर कारवाई झाली. देशातील सर्व काश्मिरींना सरसकट दहशतवादी समर्थक मानून वागणूक देणे, हे दहशतवादी गटांचे ईप्सित साध्य करणारे आहे. त्यांच्यामार्फत भारताविषयी जो अपप्रचार केला जातो, त्याला आपल्या वर्तनाने नकळत दुजोरा मिळतो. जे काश्मिरी युवक चुकीच्या मार्गावर जाऊ इच्छित नाहीत, अशांनाही मग तो मार्ग योग्य वाटू शकतो. यासाठी दहशतवाद्यांप्रति कोणीही सहानुभूती बाळगणार नाही असे वातावरण निर्माण करण्यावर भर द्यायला हवा. याकरता सामूहिक प्रयत्नांची गरज खुद्द भारतीय लष्करानेच अधोरेखित केली आहे. जम्मू-काश्मीरमधील ६३ टक्के युवक हे ३० वर्षांच्या आतील आहेत. बेरोजगार युवकांची टक्केवारी ४१ टक्क्यांच्या आसपास आहे. दहशतवादी शैक्षणिक संस्थांची जाळपोळ करत नवयुवकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नांत आहेत. फुटीरतावादी गट व दहशतवादी संघटना त्यांच्या अस्वस्थतेस खतपाणी घालून त्याचा लाभ उठवत आहेत. त्यांना ही संधी मिळणार नाही याची सर्वच पातळीवर खबरदारी घ्यावी लागेल.

देशभर पुलवामातील भ्याड हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची भावना तीव्रतेने उमटत आहे. या हल्ल्याची किंमत दहशतवादी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला चुकवावीच लागेल; किंबहुना त्या दिशेने सरकार पावले उचलत आहे. पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याचे नियोजन केले जात आहे. भारतीय लष्कर पाकिस्तानला धडा शिकवण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही. मर्यादित किंवा र्सवकष युद्धाचे काहीएक परिणाम असतात. त्यास राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक किनार असते. युद्धामुळे अन्याय- अत्याचारांबाबत त्वरित निर्णय मिळतो; परंतु त्यापायी महागाईत वाढ होते. मोठय़ा प्रमाणात प्राण व वित्तहानी होते. राष्ट्रीय कर्ज वाढून प्रगती मंदावते. चलन फुगवटय़ामुळे करवाढ अपरिहार्य ठरते. तेव्हा देशाच्या अंतर्गत आणि बहिर्गत सुरक्षेसाठी या परिणामांची किमान झळ बसेल अशा विशाल युद्धनीतीची आज निकड आहे.

aniket.sathe@expressindia.com

Story img Loader