गल्लीच्या कोपऱ्यावर ऐटीत सूटबूट घालून तोंडातला चिरूट ओढत उभ्या राहणाऱ्या त्या उंचापुऱ्या माणसाला जेव्हा घराच्या गॅलरीतून पाहायला मिळायचं, तेव्हा हा नक्की कोणीतरी आहे याची खात्री वाटे. त्याच गल्लीत संध्याकाळ झाली की शुभ्र पांढरं धोतर आणि त्यावर तेवढय़ाच शुभ्रतेचा झब्बा घालून ते वृद्ध गृहस्थ चालायला लागले की चंदनाचा सुगंध दरवळत असे. वडिलांनी सांगितलं की, ‘आधी बीज एकले’ हा ‘संत तुकाराम’ चित्रपटातला अभंग कुणी लिहिलाय, यासाठी सोनोपंत दांडेकरांपासून सगळ्यांनी समग्र तुकाराम धुंडाळला. शेवटी चित्रपटाचे दिग्दर्शक शांतारामबापूंनी सांगितलं की, ‘हा अभंग या चंदनसुगंधी असलेल्या शांताराम आठवले यांचा आहे.’ ते चिरूट ओढणारं देखणं व्यक्तिमत्त्व त्याच्या चेहऱ्यातील ठसठशीत अशा मोठ्ठय़ा नाकामुळे सहज लक्षात राहायचं. विजय टॉकीजमध्ये त्यांना ‘लार्जर दॅन लाइफ साइज’ पाहिलं आणि क्षणभर विश्वासच बसेना. राजा परांजपे होते ते. घरात गाण्याच्या चर्चा चालत, तशा चित्रपटांविषयीही चालत. पण त्या प्रामुख्याने मराठीबद्दल! राजा परांजपे, शरद तळवलकर, राजा गोसावी, ग. दि. माडगूळकर, चंद्रकांत गोखले यांच्यासारखी अस्सल पुणेकर मंडळींची नावं या चर्चेत सतत असायची. ‘प्रभात’ नावाची एक चित्रपट तयार करणारी कंपनी या पुण्यातलीच आहे असं कळलं, आणि तोपर्यंत त्यांचे ‘कुंकू’, ‘संत तुकाराम’, ‘शेजारी’ यासारखे चित्रपट पाहून झाल्यामुळे ही प्रभात कंपनी आहे तरी कुठे, म्हणून सायकलवरून तेव्हाच्या पुण्याबाहेर असलेल्या त्या जागेवर गेल्यावर एखाद्या तीर्थक्षेत्री आल्यासारखं वाटलं. शांतारामबापूंचा बंगला पाहून आपण काहीतरी खूप पाहिल्याचं समाधान घेऊन सायकलवरची पायपीट विसरायलाही झाली. तेव्हा चित्रपट कुठले लागत होते, तर ‘धन्य ते संताजी- धनाजी’, ‘पाठलाग’, ‘राजकुमार’, ‘श्री ४२०’, ‘बूटपॉलिश’ असे. ‘भानुविलास’मध्ये ‘सोंगाडय़ा’ लागला आणि एका नव्या अनुभवाला सामोरं जायला मिळालं. त्याआधीच्या राजा गोसावी आणि शरद तळवलकरांच्या विनोदाच्या जातकुळीपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीचा; आणि तरीही शहरी प्रेक्षकांना पकडून ठेवणारा! तेव्हा ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटय़ामुळे प्रेक्षकांना माहीत असलेल्या दादा कोंडक्यांचा हा नवा अवतार पुणेकरांनी डोक्यावर घेतला.
हे सगळं पुण्यात घडत होतं तेव्हा मध्यमवर्गातलाच प्रेक्षक आणि त्यांच्यातलेच निर्माते-दिग्दर्शक असत. चित्रपटांच्या रंगीत दुनियेआधी इथला सगळा प्रेक्षकवर्ग बालगंधर्वाच्या गायनानं आणि अभिनयानं पुरता चिंब झालेला होता. मंडईजवळचं पुण्यातलं पहिलं चित्रगृह असलेलं ‘आर्यन’, शेजारचं ‘मिनव्र्हा’, लक्ष्मी रस्त्यावरच्या व्यापारी गजबजाटात अजूनही टिकून राहिलेलं आणि मराठी चित्रपटांचं हक्काचं घर राहिलेलं ‘प्रभात’, ‘भानुविलास’, ‘विजय’ (लिमये नाटय़-चित्र मंदिर), नदीपलीकडचं ‘हिंदूविजय’, नदीला लागून असलेलं ‘अलका’.. अशी सगळी ठिकाणं अगदी जवळजवळ असलेली. (अनेकांनी आता नावं बदललीत. आणि बहुतेकांनी मानच टाकलीय!) ब्रिटिशांनी त्यांच्या करमणुकीसाठी कॅम्प भागात थाटलेलं साहेबी ‘वेस्टएंड’, त्याशेजारचं ‘एम्पायर’, ईस्ट स्ट्रीटवरचं ‘व्हिक्टरी’ (पूर्वीचं कॅपिटॉल.. गोऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी तिथं बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. तो खटलाही खूप गाजला.) या प्रत्येक चित्रगृहाचं खास वैशिष्टय़. तिथं लागणारे चित्रपटही तिथल्या परिसरातल्या संस्कृतीची जाणीव करून देणारे. म्हणजे ‘निशात’, ‘अल्पना’, पूर्वीचं ‘ग्लोब’ (आताचं ‘श्रीनाथ’), ‘श्रीकृष्ण’, ‘रतन’ अशा अनेक नावांनी वृत्तपत्रातल्या जाहिरातींची पानं भरायची. पण या चित्रगृहांत अस्सल सदाशिवपेठी पुणेकर क्वचित जायचे. नाही म्हणायला शेजारच्यांची नजर चुकवून ऐटबाज ब्रिटिशांच्या सगळ्या खाणाखुणा साहेबी शैलीत जपलेल्या कॅम्पातल्या ‘वेस्टएन्ड’मधला प्रौढांसाठीचा इंग्रजी चित्रपट पाहणाराही एक वर्ग होता. आणि मधल्या सुटीतल्या खाऱ्या दाण्यांची खात्री देत सहकुटुंब, सहपरिवार आर्यन किंवा प्रभातमध्ये जाणाराही एक हुकमी वर्ग होता. ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाचा बोर्ड आर्यन थिएटरवरून वर्षभर तरी निघाला नव्हता आणि रंगीत चित्रपटांच्या दुनियेतल्या ‘आराधना’चा फलक उन्हापावसात फिकट झाल्यानंतरही ‘प्रभात’वरून कित्येक महिने निघाला नव्हता.
आता जसं सहज थिएटरवरून जाताना वाटलं म्हणून आत घुसतात, तसं तेव्हा नव्हतं. चित्रपट पाहणं हा विरंगुळाच होता. काही प्रमाणात चैनही. पोराबाळांना मे महिन्याच्या सुटीत एखादा सिनेमा दाखवायची तयारी काही महिने आधीपासून करावी लागे. तिकीट फार नसलं तरी पगारही बेताचाच होता. मध्यंतरात चिल्ल्यापिल्यांना आइस्क्रीमसारखी चैन करता यायची नाही. ‘देशी काजू’ म्हणून ओरडणाऱ्या त्या क्षीण माणसाकडून खारे दाणे घेऊन, ‘काय मज्जा आली, नाही!,’ असं स्वत:शीच पुटपुटणारा पुणेकर करमणूक करून घेत होता. नाटकं पाहायची की सिनेमा, असा प्रश्न त्याला कायम पडलेला असायचा. नाटक महाग असतं, म्हणूनही अनेकदा त्याची पावलं थिएटरकडे वळायची. मित्रांबरोबर पाहायचे सिनेमे दूर कॅम्प भागात असत. सिनेमा आणि नंतर कॅफे नाझमधले मटण सामोसे ही त्यावेळच्या सुखाची परिसीमा असायची. घरी परतताना लक्ष्मी रस्त्याने यायचं झालंच, तर श्रीकृष्ण किंवा अल्पना थिएटरमध्ये लागलेल्या तमीळ किंवा मल्याळी चित्रपटातील उत्तान प्रसंगांची भडक रंगातली मोठी पोस्टर पाहतानाही, आपल्याला कुणी पाहत नाहीये ना, याची खात्री करून घ्यावी लागे. शेजारच्या शाळांमधली कितीतरी मुलं ‘रतन’ किंवा ‘श्रीकृष्ण’मध्ये असायची. तिथं आपल्या घरातलं कुणी येणार नाही याबद्दल कमालीचा विश्वास होता त्यांना. गणेशखिंड रस्त्यावर नव्याने उभारलेल्या ‘राहुल’ने तरुणांमध्ये एकदम जान आणली. इकडे सदाशिव पेठेत नवं ‘नीलायम’ आलं. डेक्कनवरच्या हिंदूविजयचं ‘नटराज’ झालं, तरी समोरचं ‘डेक्कन’ मात्र कात टाकायला तयार नव्हतं. सकाळी नऊच्या खेळाची कल्पना अगदी सुरुवातीला कॉलेजच्या मुलांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. तो शो स्वस्त असे आणि कॉलेजच्या नावाखाली जाणं सहज शक्य असे.
मोठय़ा थिएटरमध्ये सिनेमा पाहायचा तर आठ-आठ दिवस बुकिंग आधी सुरू व्हायचं. तासन् तास रांगेत उभं राहून फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकिटं मिळणं म्हणजे आयपीएलची मॅचजिंकल्यासारखं असायचं. आवडत्या नटाच्या सिनेमाची दिवसभराच्या चारही खेळांची तिकिटे काढून तोच सिनेमा पाहण्याचा उद्योग पुण्यातील अनेक तरुण मंडळी करत असत. देवानंदचा पडका दात हेच त्याचं सौंदर्यस्थळ आहे असं मानून ऐन तारुण्यात आपलाही दात पाडून घेणारेही हेच युवक होते. चित्रपट पाहिला की त्यातली आवडती गाणी ऐकण्याची खास सोय टिळक रस्त्यावरच्या फ्रेंड्स म्युझिक सेंटरमध्ये होती. बाळासाहेब केतकर यांची ही भन्नाट कल्पना होती. तीन-चारजण बसतील अशा छोटय़ा काचेच्या खोल्या. त्यामध्ये स्पीकर्स. आत जाताना गाण्यांची यादी द्यायची आणि आठ-बारा आण्यांना एक गाणं याप्रमाणे तासभर फक्त गाणी ऐकायची आणि सिनेमा आठवायचा. एकच गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्याची ही सोय इतक्यांनी उपभोगली, की काही रेकॉर्डस्चे पार तुकडे झाले. पण हे असलं फक्त पुण्यातच घडू शकतं. मल्टिप्लेक्स येण्यापूर्वीच्या काळात पुण्यातल्या काही चित्रपटगृहांत ‘बॉक्स’ असत. त्याचं तिकीटही महाग असे. फक्त दोघांनाच बसण्याची खास सोय असणारे हे बॉक्स म्हणजे श्रीमंती चाळ्यांची सोय होती. डोअरकीपरलाही त्यामुळे त्या बॉक्सवर लक्ष ठेवण्याचं काम करावं लागे. हा डोअरकीपर मित्र असणे, ही त्या काळातील युवकांची मोठी गरज असे. सणकीत सिनेमा पाहायचा तर अगदी ऐनवेळीही मदतीला धावून येणारा हा माणूस असे. आयुष्याशी लढता लढता समोरच्या पडद्यावर रंगणाऱ्या स्वप्नाचा खरा अर्थ कळलेला फक्त हाच डोअरकीपर! त्याच्याकडे करुणेनं तिकिटांची याचना करणारा आणि थिएटरबाहेर पोलिसांसमोर तिकिटांचा बेदरकारपणे काळाबाजार करणारा यांच्यातला फरक कुणालाही सहजपणे लक्षात येत असे. मात्र, आज इतक्या वर्षांनंतरही या दोघांमधला फरक तोच आणि तेवढाच राहिलेला आहे.
आता घरात बसून तिकिटं काढता येतात. थिएटरवर जाऊन मोबाइलमधला एसेमेस दाखवला की तिकीट हातात! मध्यांतरातल्या चहा-दाण्यांची जागा बर्गर आणि पॉपकॉर्ननं घेतलेली. आणि एकाच इमारतीतल्या चार-पाच थिएटरमध्ये एकाच वेळी तेवढे सिनेमे पाहण्याची सोय झालेली. पूर्वीसारखे वर्षभर एकाच थिएटरमध्ये सिनेमानं थांबून राहण्याची व्यवस्था या मल्टिप्लेक्सनं पार पुसून टाकली. आता पहिल्या तीन-चार दिवसांत चित्रपटाचं भविष्य ठरतं. त्याचं जिवंत राहणं तेवढय़ाच काळापुरतं असतं. नंतर तो सहजपणे पाहायचा म्हटलं तरी पायरेटेड डीव्हीडीपासून ते यू-टय़ूबपर्यंत अनेक साधनं सहज उपलब्ध झालीयत. पुण्यातली मल्टिप्लेक्स म्हणजे चंगळवादाचं मूर्तिमंत उदाहरण. सकाळी आठ ते रात्री अकरा अशा दिवसातल्या कोणत्याही वेळांमध्ये तिथं गर्दी असते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी चित्रपटगृहं कशी एकाच भागात एकवटलेली होती. आता त्यांचा पसारा उपनगरांतही वाढलाय. कोथरूड, मुंढवा, हडपसर अशा प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लेक्स उभारले गेलेत. मात्र, तरीही ‘प्रभात’, ‘मंगला’ यासारखी एकपडदा चित्रगृहे अद्यापि तग धरून कशीबशी उभी आहेत. चित्रपट पाहताना पायाखालून उंदीर, घुशी फिरत असल्यानं चक्क मांडी घालून बसण्याची गरज आता कुठेच पडत नाही. ‘आर डेक्कन’सारख्या ख्याली चित्रगृहातील गुबगुबीत खुच्र्यावर १८० अंशात झोपून सिनेमा पाहण्याची सोय झाल्यानं चित्रपट ही आज भोगण्याचीही गोष्ट झाली आहे.
मराठी संगीत नाटकांमुळे पुण्यात सहज रुजलेली चित्रपटनिर्मितीची संस्कृती हळूहळू नष्ट झाली. इथले स्टुडिओज् मॉलमध्ये परावर्तित झाले. दादासाहेब तोरण्यांचा ‘सरस्वती सिनेटोन’ हा स्टुडिओ कुठे होता, याचा मागमूसही आता कुणाला सापडणार नाही. नाही म्हणायला प्रभातच्या जागी फिल्म इन्स्टिटय़ूट तरी उभी राहिली. तिच्या समोरच असलेलं ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ ही भारतातील चित्रपटांचा सर्वात मोठा खजिना असलेली संस्था. पूर्वी तिथंही पुण्यातल्या चित्ररसिकांसाठी जगातली ‘क्लासिक्स’ दाखविण्याची सोय होती. आता तीही बंद झालीय. तथापि ‘आशय’सारखी चित्रपटांची चळवळ विविध प्रयोग करत पंचवीसहून अधिक वर्षे पुण्यात टिकून आहे. सुधीर फडक्यांनी पुण्यातून मुंबईला बस्तान बसवलं, तरीही ग. दि. माडगूळकरांनी आपला ‘पंचवटी’ हा बंगला शेवटपर्यंत सोडला नाही. पुण्यातली चित्रसंस्कृतीही आपला पुणेरीपणा न सोडता टिकवून धरण्यात इथल्या प्रेक्षकांचा वाटा मोठा आहे यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा