अभय कुलकर्णी
पुण्याचे जोडशहर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये साधारण सात-आठ वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण सुरू होते. संतांची भूमी, औद्याोगिक नगरी, गावपण जपलेले शहर, कॉस्मोपॉलिटन सिटी अशी ओळख असलेले पिंपरी-चिंचवड गेल्या पंचवीस वर्षांत मोठ्या प्रमाणात विकसित झाले. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर्स, उद्याने पंचतारांकित औद्याोगिक वसाहती, नवी रहिवासी उपनगरे, मेट्रो यांमुळे अनेकांनी वास्तव्यासाठी पिंपरी-चिंचवडची निवड केली. तथापि, सर्वेक्षणामध्ये ‘वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम शहर असे तुम्ही म्हणाल का?’ या प्रश्नावर येणारा प्रतिसाद मात्र चक्रावून टाकणारा होता. जीवन समृद्ध बनविणाऱ्या सांस्कृतिक पर्यावरणाचा अभाव येथे तीव्रतेने जाणवतो आहे, असे मत बहुतांश नागरिकांनी नोंदविले. पायाभूत सुविधांच्या विस्तारात सांस्कृतिक पर्यावरणाचा मुद्दा निसटून जातो आहे, असे त्या वेळी प्रकर्षाने जाणवले होते. असे का, याचा विचार केल्यावर साहजिकच लक्षात येत होते, की जगण्याचा वेग वाढला, की त्याचे कंगालीकरण अत्यंत वेगाने होते. कोणत्याही कृतीसाठी लागणाऱ्या स्वस्थतेच्या अभावी त्या कृती करणेही निरस वाटू लागते. याचा साहजिक परिणाम म्हणजे, भौतिक सुखे हात जोडून उभी असतानाही जगण्यातील रस लुप्त होतो. अशा अवस्थेत नाट्य, संगीत, साहित्य, कलांचा आस्वाद घेण्याऐवजी त्यांचा उपभोग घेतला जातो. यापोटी जन्म घेणारी संस्कृती केविलवाणी असते. जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो खरा, परंतु ही उन्नतावस्था प्राप्त होण्यासाठी त्याला अनुकूल आणि पोषक परिस्थिती निर्माण करावी लागते. त्यासाठी लागणारा अवकाश उपलब्ध करून द्यावा लागतो आणि नव्या पिढीला हवा असणारा उत्सवही त्यात ठासून भरलेला असावा लागतो. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने १४ ते २२ डिसेंबरदरम्यान संपन्न होत असलेल्या दुसऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सव’चे वैशिष्ट्य हे त्यात असलेले उत्सवी वातावरण हेच आहे. परीटघडीच्या विद्वानांनी गांभीर्याने चर्चेचे घडे भरावेत आणि त्याच्या वाटेला आपण जायलाच नको, अशी मानसिकता इतरांची होणार नाही, याची पुरेपूर काळजी ‘पुणे पुस्तक महोत्सव’ने घेतलेली आहे.

जगभरातील विविध शहरांमध्ये सांस्कृतिक वातावरण जिवंत ठेवण्यासाठी होणारे प्रयत्न का होतात, त्याला राजाश्रय का दिला जातो याचे उत्तर शहरांमध्ये केवळ यंत्रवत धावणारी नव्हे, तर समरसून जीवन जगणारी माणसेही असावीत यात आहे. बर्लिन, फ्रँकफर्ट, ऑक्सफर्ड, टोरांटो, सिडनी येथे होणाऱ्या ‘लिटफेस्ट’बद्दल तेथील रहिवाशांनाच नव्हे, तर त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनाही उत्सुकता असते. राजस्थान तेथील राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहेच; परंतु याचबरोबर गेल्या काही वर्षांत ‘जयपूर लिटरेचर फेस्टिवल’ची चर्चा तेथील राजवाड्यांपेक्षाही अधिक झाली. कारण ‘जयपूर लिटरेचर फेस्टिवल’ने जयपूरला नवी ओळख दिली. जयपूरच्या वारशाला रसरशीत सांस्कृतिक, वैचारिक झळाळी प्राप्त करून देण्यामध्ये या लिटरेचर फेस्टिवलने मोलाची भर घातलेली आहे.

Government initiatives like PMAY aim to address housing issues by offering financial aid for self-built homes or group housing.
IE THINC, आपली शहरे: ‘दिल्लीला कमी उंचीच्या, उच्च घनतेच्या घरांची गरज आहे’
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
Loksatta book batmi John Baxter Paris
बुकबातमी: जॉन बॅक्स्टरचे पॅरिस…
Slower shahane  Middle class awareness Daily
लोक-लोलक: ‘स्लोअर शहाणे’च्या जाणिवांच्या प्रदेशात…
Vaikunth Crematorium
वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  निर्मितीच्या तीन तऱ्हा

या महोत्सवाने पहिल्याच प्रयत्नात आश्वासकता का निर्माण केली, याचे अवलोकन व्हायला हवे. जनसहभाग नसलेला उपक्रम, उत्साहाचा अभाव असलेला कार्यक्रम, नावीन्याचा गंध नसलेला मेळा आणि नियोजन व संघटनकौशल्याचा स्पर्श नसलेले समारंभ हे संपताक्षणीच विसर्जित होतात. ‘पुणे पुस्तक महोत्सव’ याला अपवाद ठरला. दणदणीत प्रतिसाद हा शब्द स्वत:ची पाठ थोपटून घेण्यापुरता नाही. नऊ दिवसांचा महोत्सव, साडेचार लाख साहित्यरसिकांनी दिलेली भेट, पुस्तके आता कोण वाचते असे म्हटले जात असताना तब्बल ११ कोटी रुपये किमतीच्या साडेआठ लाख पुस्तकांची विक्री, वाचनसंस्कृतीला चालना देईल अशा चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची नोंद, दोनशे विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, दोनशेहून अधिक पुस्तकांची प्रकाशने, १५ भाषांतील पुस्तकांचे स्टॉल्स आणि २५०हून अधिक प्रकाशन संस्थांचा सहभाग यातून हा पुस्तक महोत्सव नवी दिल्लीत प्रगती मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड बुक फेअरनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी महोत्सव ठरला.

मराठी माणूस हा मराठीवर प्रेम करणारा आहेच; पण त्याचबरोबर गेल्या पन्नास वर्षांत तो जागतिक भराऱ्याही मारतो आहे. त्याची साहित्यातील रुची मातृभाषेच्या पलीकडेही सहजपणे पोहोचलेली आहे. जागतिकीकरणामुळे त्याचा परीघ विस्तारलेला आहे आणि त्याचा प्रवास अमर्याद झालेला आहे. विविध प्रांतातील, विदेशांतील खाद्यापदार्थांच्या चवी तो आवडीने घेतो, त्यातूनच त्याच्या अभिरुचीच्या मिती विस्तारलेल्या नसत्या तरच नवल! डिजिटल तंत्रज्ञानामुळे तर त्याचा अवकाश सहस्रापटींनी वाढलेला आहे. माध्यमसंकर त्याने लीलया आत्मसात केलेला आहे. मात्र हे नोंदवायला पाहिजे की, आपल्या एकूण साहित्य उपक्रमांत या बदलांचे प्रतिबिंब काही पडत नव्हते. साहित्य व्यवहारासाठी सुपीक असलेल्या पुण्यात याबाबतचे एक मांद्या आलेले होते. पुणे पुस्तक महोत्सवाचे यश याच्यात आहे की त्याने हे मांद्या घालविले. पुण्यात देशभरातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विविध केंद्रीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असल्याने विविध प्रांतीय वास्तव्यासाठी येथे येतात. यातील प्रत्येक जण आपली संस्कृती घेऊन येतोच, परंतु त्याचबरोबर पुण्यातील एकूण सांस्कृतिक विश्वाविषयीही त्याला आकर्षण असते. या संस्कृतींचा संकर साधणाऱ्या कार्यक्रमांची मात्र ‘सवाई गंधर्व’ वगळता पुण्यात वानवा होती. अनेक परप्रांतीय पुण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमांविषयी खूप भरभरून बोलतात. दीपावलीच्या पहाटे संगीत मैफलींनी पुणे गजबजलेले असते, ही सर्व मंडळी नकळत त्याचा भाग बनतात; परंतु हा बदललेला अवकाश ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने’ काबीज करू शकली नाहीत, हे खरे ठरत आहे. लक्षावधी मंडळी परप्रांतांतून आल्यानंतर त्यांच्या साहित्यविश्वाचे प्रतिबिंब पडेल अशा उपक्रमांचा अभाव आणि या सर्वांचा सहभाग करून कसा घेता येईल, या विषयीही उणीव मोठी पोकळी जाणवत होती. एकाच वेळी लहानग्यांना, तरुणांना, प्रौढांना आणि ज्येष्ठांनाही सामावून घेत, स्त्री-पुरुष असे अंतर पडणार नाही असा उपक्रम, भाषा आणि प्रांतांचे उंबरे ओलांडता येतील असे कार्यक्रम करण्याची गरज किती मोठी होती, ती या पुस्तक महोत्सवाने दाखवून दिली.

हेही वाचा : बालमैफल: चांदोबाचं दप्तर

पुस्तक विक्रीचे स्टॉल्स आहेत, तेथे खरेदी करायची आणि निघून जायचे, या मर्यादित विचाराला या महोत्सवाने भेदले. या पुस्तकांच्या विश्वात चार-दोन तास माणसं रमायची असतील तर असे रमण्यासाठी आवश्यक अन्य नेपथ्य या महोत्सवात पुरेपूर होते. सांस्कृतिक कार्यक्रम, देशभरातील मान्यवर लेखक आणि विचारवंतांबरोबर संवाद साधण्याची संधी, लहान मुलांसाठी अनेक उपक्रम, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे हस्ताक्षर असलेली कागदपत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेली संविधानाची प्रत, शहीद भगत सिंग यांची डायरी, यामुळे तर लहान मुले, तरुण-तरुणी यांची झुंबड उडाली. विविध प्रांतांतील खाद्यापदार्थांच्या स्टॉल्समुळे गर्दीसाठी आणखी एक अनुभव उपलब्ध होता. या सगळ्याचा परिणाम म्हणून हा महोत्सव जंगी यशस्वी झाला आणि या वर्षी त्याची व्याप्ती आणखी वाढलेली आहे.

एखाद्या उपक्रमाला लोकाश्रय आणि राजाश्रय दोन्हीही लागतोच. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’चे अध्यक्षपद ठाण्यातील मिलिंद मराठे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पुस्तक महोत्सवासाठी सकारात्मक भूमिका घेतली. अशा महोत्सवासाठी पुणे हे अत्यंत योग्य ठिकाण आहे असे फक्त वाटले नाही, तर त्यासाठी सक्रिय पावले उचलली. उत्तम नियोजन झाले. पुण्यातील विविध शिक्षणसंस्थांतील शेकडो युवा उत्साहाने स्वयंसेवक म्हणून सरसावले. यातून ‘पुणे पुस्तक महोत्सव’ युवारंगात न्हाऊन निघाला. पुस्तकांच्या स्टॉल्सवर महाविद्यालयीन तरुणांची झुंबड उडाली. जेथे तरुण असतात त्या उपक्रमाला भवितव्य असते याचा प्रत्यय आला.

‘जो समाज सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक यशासाठी पुस्तकवाचनाची क्षमता आणि सराव ही अनिवार्य गरज मानतो, तो ‘वाचन-संस्कृती’ असलेला समाज म्हणून ओळखला जातो,’ अशी एक व्याख्या अमेरिकन समाजशास्त्रज्ञ प्रा. वेंडी ग्रिसवोल्ड यांनी केली आहे. वाचन-संस्कृती निर्माण होण्यासाठी काही व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न हा एक भाग आहे; परंतु समाजात संस्थात्मक पातळीवर या संदर्भातील घडामोडी जितक्या अधिक घडतील, तेवढी वाचनसंस्कृतीला चालना मिळेल.

हेही वाचा : चित्रास कारण की: विविधतेत एकटा

लेखाच्या प्रारंभी मी सुविधांनी परिपूर्ण शहराला सांस्कृतिक आत्मा नसेल तर त्याची अवस्था काय होते याचा उल्लेख केलेला आहे. भौतिक प्रगतीबरोबरच सांस्कृतिक पोषण करण्यासाठी ‘पुणे पुस्तक महोत्सव’ दमदार वाटचाल करतो आहे हे ठामपणे म्हणता येईल.

(लेखक ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे संयोजन समितीचे सदस्य आहेत. तसेच पुणेस्थित ‘मेनका प्रकाशन’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
abhay@medianext.in

Story img Loader