अवधूत डोंगरे
पुरुषोत्तम बोरकरांची ‘मेड इन इंडिया’ ही दीडशे पानांची कादंबरी आदलं-आत्ताचं, आतलं-बाहेरचं, शहरी-ग्रामीण, अशा अनेक खऱ्या-खोटय़ा द्वंद्वांचा बहुप्रवाही पट उलगडत जाते. बोलीभाषा केवळ विनोदासाठी किंवा दैनंदिन व्यवहारापुरती किंवा ग्रामीण आशय मांडण्यापुरती असते, असा गैरसमज अनेक माध्यमांमधून रूढ होत आलेला दिसतो. त्यामुळे ‘मेड इन इंडिया’ कादंबरीचं वर्णनही अनेक ठिकाणी ‘विनोदी’, ‘ग्रामीण’ अशा विशेषणांपुरतं मर्यादित राहिल्याचं दिसतं; पण हे बोरकरांच्या लेखकीय कामगिरीवर अन्याय करणारं आहे..
‘आदल्या’ बऱ्या-वाईट गोष्टींचं प्रमाण कायमच जास्त असतं. त्याला वारसा म्हणा किंवा भूतकाळाचं ओझं म्हणा. ते वर्तमानापेक्षा- म्हणजे ‘आत्ता’पेक्षा कायमच जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आधीच्यातलं एखादंच पुस्तक निवडणं जिकिरीचं होतं. तरी आत्तापुरता हा प्रयत्न.
पुरुषोत्तम बोरकरांची ‘मेड इन इंडिया’ ही कादंबरी आदलं-आत्ताचं, आतलं-बाहेरचं, शहरी-ग्रामीण, अशा अनेक खऱ्या-खोटय़ा द्वंद्वांचा बहुप्रवाही पट उलगडत जाते. ही सुमारे दीडशे पानांची कादंबरी १९८७ साली पुस्तकरूपात प्रकाशित झाली, पण त्याआधी १९८१ साली एका स्पर्धेत ती लघुरूपात सहभागी झाली होती, म्हणजे साधारण चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेली ही गोष्ट.
कादंबरीचं पहिलं वाक्य असं आहे : ‘पुढे बसलो त धुरजळ, मांगे बसलो त उलाय अन् मंधात बसलो त बैलबुजाळ; असा हा माहोल. अख्खी जिंदगी अथूनतथून मीजमाशी पळ्ल्यावानी! माही अन् या गावाचीही.’ पुस्तकाला जोडलेल्या शब्दसूचीनुसार, ‘धुरजळ’ म्हणजे बैलगाडीचा पुढील भाग जड होऊन जूवर दाब येणं, ‘उलाय’ म्हणजे बैलगाडीच्या मागच्या भागात ओझं जास्त झाल्यामुळे समोरचा भाग वर येणं आणि ‘बैलबुजाळ’ म्हणजे बैलांना बुजवणारा. तर गाडीत नक्की कुठे बसायचं म्हणजे प्रवास बरा होईल आणि बैलांनाही बुजायला होणार नाही, याचा अंदाज घेताना जाणवणारं हे द्वंद्व आहे. या गोष्टीचं निवेदन करणारा ‘पंजाबराव साहेबराव गरसोळीकर पाटील, बी. ए.’, त्याचं ‘गरसोळी खुर्द’ हे गाव. किंवा ‘इंडिया’ हा देश, यांच्यासमोरची अनेक बिकट द्वंद्वं बोरकरांनी टिपली आहेत.
पिढीजात पाटीलकी असलेल्या घरात पंजाबचा जन्म होतो. शिक्षणासाठी तो साताठ वर्ष शहरात राहून पुन्हा गावी आलेला आहे आणि वडिलांच्या दबावापोटी तो सरपंच व्हायचं मान्य करतो. नंतर असंच वातावरणाच्या दाबातून लग्नही करतो. म्हणजे तो काही सारखा ‘नायक’ नाही, अनेकदा नमतं घेणारा माणूस आहे. त्याचं गाव विदर्भात, अकोला जिल्ह्यातलं. या भागातली वऱ्हाडी भाषा ही पंजाबची आतली भाषा; शिवाय, हिंदी, इंग्रजी, उर्दू, प्रमाण मानली गेलेली मराठी या सगळय़ा भवतालातून नि पुस्तकांतून झिरपणाऱ्या भाषांनाही तो स्वीकारत गेलेला आहे. हा या कादंबरीचा पहिला बहुप्रवाहीपणा. या सगळय़ा बहुप्रवाही भाषेत तो गावातल्या, देशातल्या, जगातल्या घडामोडींबद्दल टिप्पण्या करतो, काही व्यक्तींविषयीच्या आठवणी सांगतो, काही स्वत:च्या आयुष्यातल्या आठवणी नोंदवतो. असं कादंबरीचं साधारण सूत्र सांगता येईल.
बोलीभाषा केवळ विनोदासाठी किंवा दैनंदिन व्यवहारापुरती किंवा ग्रामीण आशय मांडण्यापुरती असते, असा गैरसमज अनेक माध्यमांमधून रूढ होत आलेला दिसतो. त्यामुळे ‘मेड इन इंडिया’ कादंबरीचं वर्णनही अनेक ठिकाणी ‘विनोदी’, ‘ग्रामीण’ अशा विशेषणांपुरतं मर्यादित राहिल्याचं दिसतं. पण हे बोरकरांच्या लेखकीय कामगिरीवर अन्याय करणारं आहे. या कादंबरीत विनोद आहे, उपरोध आहे, ग्रामीण भागाचं सखोल चित्रण आहे, पण त्याच वेळी त्यात कारुण्य आहे, तात्त्विक म्हणता येतील असे पेच आहेत, शहरी भागाविषयीही मार्मिक टिप्पणी आहे. ‘मी कॉलेजात असतानाही हप्त्यातून दोन-तीन चकरा गावाले होतंच. म्हणजे मी ना धळ अर्बन ना धळ रुरल असा घळलो. मले काही गोष्टी गावातल्या आवळत त काही शहरातल्या प्यार होत्या. संपुर्न शहर किंवा संपुर्न गाव मले कधीच आवळलं नाही,’ असं पंजाब म्हणतो. त्यामुळे तो दोन्ही अवकाशांमध्ये गुंतलेलाही आहे आणि धड या गुंत्यातून सुटका नसल्याने बेचैनही झालेला आहे. पण या बेचैनीमुळे त्याला एकंदर भारतीय अवकाशाची प्रातिनिधिक आणि भविष्यवेधी ठरावी अशी गोष्ट सांगणं शक्य झालं असावं.
शेतीविषयी पंजाब काय म्हणतो पाहा : ‘शेकळा सत्तर टक्के कास्तकार सुतईले सुतई, थुटकाले थुटूक जोळत दिवस सजोतात. कृषीमूल्य आयोगाच्या इशाऱ्यावर वर्शभर पळतझळत नाचतात. भोकंभाकं पळेल जिनगानीले रफ्फू करत करत दिवस काढतात. मांगं काही पळत नाही, कर्ज काही उतरत नाही. टाइम आला त येखांद्यावक्ती झळीगिळीत घरच्याघर कटकट उपाशी असते. सगळे कामधंदे चिळीचिप बंद असतात. फक्त येक सोळून. ते ना थांबे. मंग असे घरातले चिलेपिले वाढतच राह्यतात अन् निर्माते थंडेग्गार होऊन त्याईले चाऱ्यापान्याची तरतूद कर्ताकर्ताच आपल्या आयुष्याचा धीयेंड कर्तात.’
हे चाळीस वर्षांपूर्वी बोरकरांनी लिहिलंय. यवतमाळचे शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली, ही कागदोपत्री ‘पहिली शेतकरी आत्महत्या’ ठरली. त्यानंतर गेल्या ३५ वर्षांत अशा घटनांचं सातत्य वाढलं! बोरकरांच्या कादंबरीचं मूळ बाड १९८०-८१च्या दरम्यान लिहिलं गेलं, १९८७ मध्ये पुस्तकरूपात ते प्रकाशित झालं, हे लक्षात घेतलं तर हा लेखक कोणत्या गर्तेकडे बोट दाखवत होता त्याचा अंदाज येतो. पंजाबला एकदा स्वप्नात एक पाटी दिसते, त्यावर धान्याचा शासकीय हमीभाव अधिक महागाई भत्ता आणि त्यांच्या बेरजेतून निघालेली खरेदी किंमत असते. उदाहरणार्थ, एक क्विंटल गव्हाचा शासकीय हमीभाव १३० रुपये, त्यात ५०० रुपये महागाई भत्त्याची भर पडून खरेदी किंमत ६३० रुपये, इत्यादी. या उपरोधिक पाटीतला तपशील वास्तवात कधी आला नाही. दरम्यान, सरकारी वेतन आयोगांमधले महागाई भत्ते वाढत गेले, सरकारी वेतनश्रेण्या आणि निवृत्तिवेतनं वाढत गेली, खासगी क्षेत्रातल्या काही पदांसाठीचा पगार तर या सगळय़ाची फिकीरही वाटू नये इतका वाढला. मग कधी शेतकरी मुंबईत मोर्चा घेऊन येत असले की त्यांच्या पायांचं, तुटलेल्या चपलांचं नि विरलेल्या कपडय़ांचं करुण संगीताच्या पार्श्वभूमीवर दृश्य प्रदर्शन मांडणाऱ्या बातम्या दिसू लागल्या. मूळ दु:ख या तात्कालिक दृश्यात्मकतेपलीकडे जाणारं असतं. अशा काही ‘डोहखोल’ दु:खांचं जाळं बोरकरांच्या कादंबरीत आहे.
‘नामदेवआबा कोन्त्यातरी गोष्टीहून मले सांगत, सुखाचा मुखळा त कोनीही चाटते बाबू.. कोनीही. पन खरी मर्दाची कमाल त तकलिबीसंग झोपन्यात असते,’ असं पंजाब आपल्याला सांगतो आणि त्यामुळेच त्याला तकलीफ देणाऱ्या अनेक गोष्टी दिसतात. त्याचा जन्मजात अवकाश सरंजामी आहे, पण या पाटलांची पिढीजात गढी ढासळलेली आहे, त्या ढासळलेल्या गढीची माती गावकऱ्यांनी काही वर्ष बांधकामासाठी वापरली. सरंजामी व्यवस्थेने गावातल्या लोकांना गैरवागणूक दिली, हे तो विविध निरीक्षणांमधून नोंदवतो. पण ‘दोन कोसांवरच्या थर्मल पॉवर स्टेशनच्या केमिकलयुक्त सांडपान्यानं’ या गरसोळीकर पाटलांच्या ‘शेकळो यक्कर जमिनीले धीरे धीरे चोपन, नापीक बनवलं. त्यानं आमची जवळपास सगळी जमीन बाटली. सोनं पेरलं तर पितय ये. म्हन्जे घाटय़ाचंच काम.’ या घाटय़ात बुडून आणि पाटीलकीचा रुबाब न पेलल्यामुळे माजी सरपंच असलेला ‘बुढा’ बाप आत्महत्या करतो.
पण ही कादंबरी फक्त शेतीची समस्या मांडणारी आहे, असा ढोबळ निष्कर्ष काढूनही थांबू नये. पंजाब शेतकरी घरातला आहे त्यामुळे त्याच्या गोष्टीत हा एक प्रवाह आहे. पण पंजाबची संवेदना इतरही अनेक प्रवाहांना स्पर्श करत जाते. कधी आकाशातल्या चांदण्या बघून त्याला या ‘अगळबंब पसाऱ्यात आपला पल्ला किती? पाय कसे? चाल कशी? सगळं सगळं जन्मापासूनचं बळ येकवटून पऊपऊ त कितीक पऊ आपन?’ असे अस्तित्ववादी प्रश्नही पडतात. त्यामुळे, ‘किळेमुंग्याही सरस आपल्यापरीस! मुंग्याईलेतरी लाईन गवशेल असते. पण अथी त आपला चकवाच सायाचा भानामतीच्या अरसट्टय़ात येयेल,’ असं त्याला मुंग्यांचं मोठेपण जाणवतं.
शिवाय, ‘इक अजनबी झोकेने पुछा गमका सबब, साहिल की भीगी रेतपर मैने लिखा आवारगी असा गानारा गुलामअली अन सायंतिरी आठवणींच्या वाळूत मारल्या रेघा म्हननारा कुमार गंधर्व म्हन्जे येकाच नान्याच्या दोन बाजू’, असंही त्याला वाटतं. किंवा ‘आमच्या गावात अमृता शेरगिलच्या इंडियन पेंटिंग्जवानी दिसनारे लोकंही राह्यतात,’ अशी टिप्पणी तो करतो. कधी पंजाबने पेपरात वाचलेली एखादी बातमी सविस्तरपणे कादंबरीत येते- ‘लोकशाहीचा हा लाखमोलाचा ठेवा प्राणपणाने जतन करा -मुख्यमंत्री चव्हाण’, ‘लोकशाही मूल्यांचे काटेकोर पालन करणे हा छत्रपतींचाच धर्म होय – ना. अंतुले.’ असे भोंदू आदर्शवादी मथळे त्यात आहेत; दुसरीकडे, पंजाबच्या वडिलांना पंतप्रधानपदाची आवाक्याबाहेरची स्वप्नं पडत असल्याचं सांगत त्याबद्दलची काल्पनिक बातमीही कादंबरीत येते- ‘भारतावरील सूर्य झाकोळला, पंतप्रधानांचे विश्वरत्न साहेबराव पाटील कालवश’ असा तिचा मथळा असतो. कधी, रेडिओवर लागलेली एखादी सुंदर कविताही या कादंबरीची तीन पानं भरून टाकते- ‘काळ जोवर डोळेझाक करतोय् तोवर जडवून घेऊन एकदुसऱ्याला भरभरून निखळपणे. आपण गृहीत धरलाय् तेव्हढा तो निष्ठुर नाहीय्. कारण त्याला ठाऊक आहे माझ्या आयुष्याची वाटणी- तुझ्याही.’ ‘आपण एकमेकास न दिसू एवढं अपार अंतर अथवा दिसूनही न दिसायला लावणारी माणसांची अदृश्य भिंत. यालाच वाटणी म्हणायची का? आणि हे खरं आहे असं गृहीत धरलं तर हे किती खोटं? आतही तू कित्येक कोसांवरून अलगत येऊन माझ्यात विसावतेस नि तळहातावर जमू लागतात दविबदू, पापण्यांत ओल.. त्याचं काय?’ अशा या कवितेतल्या ओळी. शिवाय, अधूनमधून हिंदी-मराठी चित्रपटगीतांच्या ओळी, जाहिरातींमधल्या जिंगल, शेर, इत्यादींचा सहजपणे केलेला वापरही त्यात आहे. यामुळे होतं काय, तर आपण पंजाबच्या तोंडून गोष्ट ऐकत असलो तरी ती एकप्रवाही होत नाही; अनेकदा पंजाबचं पात्र मागे जातं, आणि इतर सूर ठळकपणे पुढे येतात. हे या कादंबरीचं आणखी एक बहुप्रवाहीपण.
गांधीजींना ‘स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी’ ग्रामप्रजासत्ताकांची ओढ होती, तर ‘गाव म्हणजे अडाणीपणा, संकुचितता आणि सांप्रदायिकता यांचा अड्डा आहे’, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं. मोठय़ा राष्ट्रीय रचनेत कोणी तरी दुरून आपल्यावर सत्ता गाजवण्यापेक्षा ग्रामस्वराज्यातील सत्तेत प्रत्येक व्यक्तीचाही वाटा राहील, असं गांधींचं म्हणणं. तर ग्रामव्यवस्था जन्मजात सामुदायिक ओळखीमध्ये अडकवून ठेवणारी असल्यामुळे व्यक्तीला तिथं स्वातंत्र्य नसतं, असं आंबेडकरांचं म्हणणं. हेही एक आपल्याकडचं द्वंद्व राहिलंय. बोरकरांची कादंबरी या दोन विचारवंतांच्या टोकांदरम्यान वाहणारे प्रवाह दाखवणारी आहे. त्यातल्या मध्यवर्ती पात्राला पाटीलकीतला पोकळपणा तर आधीच जाणवलेला आहे, त्यामुळेच पदवीधर झालेल्या पाटलापुरती ही गोष्ट उरत नाही, तर तमाशात नाच्या म्हणून गेलेल्या नत्थूचंही व्यक्तिचित्र त्यात येतं, पंजाबच्या आईच्या सखीशेजारणींसोबतच्या गप्पा सातेक पानं भरतात, न्यू ड्रीमलँड हिंदू हॉटेलात गर्दी करणाऱ्या मुसलमानांचे संवाद येतात.. असं बरंच काही. पंजाबच म्हणतो त्याप्रमाणे, ‘नाद त नानापरीचे भरून राह्येल कानात. मोहरमचे ढोल, देवळातल्या आरत्या, निरा झाकटीतल्या काकळआरत्या, सप्ते, ठावे, भंजनं, आजीआईच्या वळय़ा, भूलाबाईची गानी, बिनाकातला अमिन सयानी, बहुरूपे, भाट, भारूळं, नाच्ये या साऱ्याईचे खास ठेवनीतले आवाज. लय..’
एकंदर या कादंबरीतल्या गोष्टीचा आशय, गोष्ट सांगण्याची तऱ्हा; आणि गोष्ट सांगण्यासाठी वापरलेल्या भाषा, या सगळय़ांत बहुप्रवाहीपणा दिसतो. त्यामुळे अनेक अंगांनी बोरकरांच्या या कादंबरीचं वाचन करता येऊ शकतं. भारताचं रूपक ठरावं अशा रीतीने गावाच्या पार्श्वभूमीचा केलेला वापर, त्यात काळं-पांढरं न करता राखाडी छटांची रेखाटनं, वैयक्तिक व्याकूळता आणि सामूहिक कोलाहल यांची सहजभावी सांगड घालण्याचा प्रयत्न, अशीही वैशिष्टय़ं नोंदवता येतील.
पंजाब म्हणतो, ‘या गावात, या मान्साईत राहूनच आपल्याले पूरी उमर कटवाची आहे. जिंदगीशी भानामती खेयाची आहे. आपल्या या शरीराचा डमरू अथी याच गावात वाजवायचा आहे आपल्याले. गरसोळी हेच आपले विश्व. बहुतेक. आता पुढे जे कॅलेंडरं छापून येतीन त्याईचं काही सांगता येत नाही. मातर आपलाही आपल्याले येक अंदाज असतेच असते. आपली कॅपॅसिटी, आपन सिलेक्ट करेली आपल्या जगन्याची मेथळ हेही या संदर्भात महत्त्वाची असते. काऊन त अशा सिलेक्शनलेच अखेर येक अतक्र्य, खतरनाक किंमत असते, असाले पाह्यजे.’ आपल्या जगण्याची मेथड आपण निवडू, आणि ही निवड रूढ वाटेने जात नसेल तर खतरनाक किंमत मोजावी लागेल, हे एका व्यक्तीचं विधान आहे. शिवाय, स्वत:च्या कॅपॅसिटीविषयीही तो प्रांजळ आहे (इथेही पुन्हा तो ‘नायक’ नसल्यासारखं बोलतो). गरसोळी हेच आपलं विश्व, असंही त्याला वाटतं. पण विश्वाच्या इतर भागातल्या घडामोडी, विविध कलांमधली अभिव्यक्ती यांची जाण तर या गोष्टीत प्रतििबबित झालेली आहे. मग? मग याचा एक अर्थ असा लावता येतो की गरसोळी हे या कादंबरीतल्या विश्वाचं केंद्र आहे, पण त्या केंद्रावरून ती अनेक लहरी पकडू पाहते.
रत्नागिरीत बालपण घालविलेल्या अवधूत डोंगरे याची जडणघडण वेगवेगळय़ा भागांत झाली. अल्पकाळासाठी पत्रकारिता. त्यातील कटू अनुभवांवर लिहिलेल्या ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ (२०१२) या कादंबरीला २०१४ चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. गडचिरोलीमधील नक्षलवादी चळवळीचा भेट देऊन अभ्यास. मार्क्सवादाच्या उदय-अस्तावर वाचन आणि चिंतन. ईशान्येतील राज्यांची भटकंती. तिथल्या राष्ट्रवादाच्या चळवळीचा अभ्यास. या सर्व अनुभवद्रव्यांवर त्यांनी पुढल्या कादंबऱ्या रचल्या. सध्या अनुवाद आणि कथात्म लेखनात सक्रिय.