|| विशाल समुद्रे
आदिमानव ते आधुनिक मानव हा स्थलांतराचा इतिहास वाचला आणि वर्तमानातील स्थलांतर प्रक्रियेचे आकलन केले तर अवघे जगच उपरे असल्याची जाणीव होते. पण या उपऱ्या विश्वातही अगदी अलीकडे अस्तित्वासाठी स्थलांतर केलेले वा करणारे अधिक उपरे ठरतात, तेव्हा त्यांचे उपरेपण राजकीय आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणे आवश्यक ठरते. शेखर देशमुख यांनी ‘उपरे विश्व : वेध मानवी स्थलांतराचा’ या पुस्तकात असा प्रयत्न केला आहे.
साधारण २० लाख वर्षांपूर्वी आदिमानवाने अस्तित्वासाठी स्थलांतर सुरू केले तेव्हापासून आजपर्यंत ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. आणि त्यामागे फक्त जगणे, अस्तित्व टिकवणे ही आदिम प्रेरणा आहे. ती तेव्हाही होती आणि आजही आहे, हे त्रिकालाबाधित सत्य या पुस्तकात वारंवार ठळक होत राहते. अन्नाचा शोध, युद्धे, दहशतवाद, राजकीय अस्थिरता, विषमता, धार्मिक तंटे, दंगली, सीमातंटे, कोरडे आणि ओले दुष्काळ, महापूर, रोगांच्या साथी इत्यादी कारणांमुळे माणूस स्थलांतरित होत असतो. या स्थलांतरामुळे त्याला आलेले उपरेपण आणि त्यातून वाटय़ाला आलेल्या माणसाच्या जगण्याचे आकलन लेखकाने केले आहे.
एचआयव्ही-एड्सच्या फैलावाचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने लेखकाने अनेक ठिकाणी भटकंती केली. त्या भटकंतीतील अनुभवजन्य निरीक्षणे म्हणजे हे पुस्तक. पण निरीक्षणे म्हणजे निव्वळ जे दिसते ते जसेच्या तसे टिपणे नव्हे; तर जे दिसते किंवा आढळते त्याची भूतकालीन वा समकालीन संदर्भाशी सांगड घालत त्यावर भाष्य करणे, टिप्पणी करणे, भाकीत वर्तवणे म्हणजे निरीक्षण! संघर्षांतून होणारे स्थलांतर आणि स्थलांतरातून उद्भवणारा संघर्ष, स्थलांतरितांचे हेलावून टाकणारे वर्तमान, स्थलांतरितांची होरपळ, त्यांची न संपणारी फरपट, प्रांतवाद, वर्तमान वास्तव इत्यादीवर भाष्य करताना लेखकाने भविष्यातील अटळ संघर्षांचीही जाणीव करून दिली आहे.
‘काटेरी वाटा आणि मानवी चेहरे’ या प्रकरणात ‘मानवी रंगांचा ग्लोबल मेळा’ या शीर्षकाखालील रिपोर्ताजमध्ये लेखकाने ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर असलेल्या पुष्करची सैर घडवली आहे. तेथे होणारा मेळा म्हणजे स्थलांतरितांचा वैश्विक उत्सवच. या उत्सवाने शहराच्या मूळ आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वात अंतर्मुख करणारा बदल घडवला आहे. या वैश्विक आध्यात्मिक जत्रेत लेखकाला भेटलेल्या व्यक्तिरेखाही अविस्मरणीय आहेत. ‘जगात संन्याशाइतका श्रीमंत आणि भिकारीही कुणी नाही.. बगलेत झोळी नि रोज दिवाळी’ असे सांगणारे मूळ नाशिकचे, पण दहा दिवसांसाठी स्थलांतरित झालेले नामदेव गणपत कांगणे ऊर्फ साधू गणेशनाथ असोत, की ‘आजकल टीचर नहीं, चीटर मिलते हैं. इक तरफ सायन्स हर दिन तरक्की कर रहा हैं, मगर इन्सान चार कदम पीछे जा रहा है!’ असा उद्वेग व्यक्त करणारा शिवानंदबाबा असो..
उपऱ्या विश्वाचे वास्तव मांडताना लेखकाने थेट लिहिले आहे. सरकार, राज्यकर्ते यांना सुनावताना चीनसारख्या देशातील माहितीचे संदर्भ दिले आहेत. आपण भारतीय लोक महासत्तेचे स्वप्न पाहत आहोत. ते पाहणे योग्यच; पण सगळ्यात मोठा ग्राहकराजा बनलेला आणि अनेक बाबतीत ‘कॅज्युअल अॅप्रोच’ असलेला आपला समाज महासत्तापद मिळवणार का, या प्रश्नावर लेखक चर्चा करतो आणि स्थलांतरित लोकांचा देश असलेला अमेरिका हा देश महासत्तापदी का आहे, त्याचा वेध घेताना विद्यापीठे, ग्रंथालये आणि कलासंग्रहालये ही त्याची खरी ताकद आहे अशी मांडणी करतो.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत नगर नियोजन तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी, ‘नैसर्गिक विश्वालाच उपरे समजणारी सजीवांची एक प्रबळ जात महाकाय प्राण्यांप्रमाणे नष्ट होण्याचा आणि पृथ्वीवर अनावश्यक ठरण्याचा धोका आहे,’ असा इशारा दिला आहे. तो या पुस्तकाच्या अनुषंगाने गांभीर्याने घेतला पाहिजे.
स्थलांतर प्रक्रियेमुळे नकळतपणे आज भारतात जाती आणि धर्मभेदाच्या भिंती हळूहळू का होईना, कोसळू लागल्या आहेत हे लेखकाचे निरीक्षण तपासून घेण्याची गरज आहे. अन्यायग्रस्तांच्या स्थलांतरामुळे जाती आणि धर्मभेद कसे काय नष्ट होतील? शोषितांनी शोषकापासून पळ काढल्यामुळे शोषण संपणार नाही, तर शोषकात बदल घडल्यानंतरच ते संपेल. कारण ती शोषकाच्या मानसिक पातळीवर घडणारी एक प्रक्रिया आहे. शिवाय शहरांमध्येही जातीवर्चस्ववादाच्या गढय़ा आहेतच.
उपऱ्या विश्वाचे अस्वस्थ करणारे अंतरंग उलगडून दाखवता दाखवता लेखक आपल्याला अवघे विश्वच उपरे असल्याच्या निष्कर्षांपर्यंत आणून सोडतो. ललित शैलीतील हे लेखन स्थलांतर आणि स्थलांतरितांच्या विश्वाशी आपला परिचय करून देते, त्याबद्दल जिज्ञासा निर्माण करते. लेखक म्हणतो त्याप्रमाणे या विषयाचा परीघ मोठा आहे.. म्हणजे त्याची व्याप्ती अमर्याद आणि खोली अथांग आहे. त्या अथांगतेकडे जाणारी वाट हे पुस्तक दाखवते.
‘उपरे विश्व : वेध मानवी स्थलांतराचा’- शेखर देशमुख, मनोविकास प्रकाशन,
पृष्ठे- २६५, मूल्य- २९९ रुपये.