कोणा तुंदीलतनूने आपुल्याच लेहंग्यात पाय अडकून रप्पकन पडावे,
अगदी तद्वत आज आमुचे हे काळे तोंड पडले आहे.
दोन्ही चर्मचक्षूंत पश्चात्तापाने दग्ध ऐसे अश्रू उतूउतू आले आहेत.
वाटते, ऐसे उठावे. लोकशाहीचे पवित्र मंदिर जी संसद, तिच्या दारी जावे. नको तेथे खुपसण्याचे हत्यार म्हणून आजवर ज्याचा यथेच्छ वापर केला ते आमुचे लांब नाक तेथे रगड रगड रगडावे.
आणि म्हणावे, की बये लोकशाही, माफ कर! आम्ही चुकलो. तुज समजण्यात, उमजण्यात, पारखण्यात, जोखण्यात आमुची महाचूक झाली.
आम्ही करंटे. मुलखाचे बावळट.
(आमच्या हीस पुसाल तर ती म्हणेल, ठार वेडे. तरी बरे, डॉ. शरद पवारांनी अद्याप आम्हांस मेडिकल सर्टििफकेट दिलेले नाही. परंतु आता एकंदर लक्षणांवरून आम्हांसही वाटू लागले आहे, की आमुचे डोके किमान तीनशे साठच्या कोनात फिरलेले असणार.)
त्याशिवाय का आम्ही तुला नावे ठेवली?
कधी ठोकशाही म्हणून संबोधले, कधी दळभद्री म्हणून हिणविले,
कधी झुंडशाही म्हणून नाक मुरडले, तर कधी घराणेशाही म्हणून तोंड फिरविले.
एकंदर काय, मेंदूत दसरा मेळावा आणि मुखी विचारांचे सोनेच असे केले.
पण आत्ता या क्षणी, दाही दिशा व पाची महाभूतांना स्मरून (त्यातून ‘आप’ तेवढे कटाप हं! उगाच आचारसंहितेचा भंग नको!) सांगतो की, मी, अप्पा वल्द बळवंत, रा. पुनवडी, पूर्ण होशोहवासमध्ये कोणतीही निशापाणी न करता, येथे ते सर्व शब्द मागे घेत आहे.
असे समजा, की आम्ही जे बोललो वा बकलो वा पचकलो ते तद्दन खुसखुशीत विनोदाने. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करीत आहोत. आपण परमदयाळू निवडणूक आयोगाप्रमाणे आम्हांस ताकीद देऊन दिलासावे.
आता तुम्ही पुसाल, की आम्हांस काहून बरे ही उपरती होऊन राहिली?
तर त्यास कारण आमुची तरुण तडफदार व लाडकी उमेदवार सुश्री राखीताई सावंत.
कु. राखीताई सावंत. साक्षात् समधुरभाषिणी. बोलू लागली की वाटते तिने फक्त बोलतच राहावे. नाचू नये.
आयटमी नृत्यमालिनी. नाचू लागली की वाटते, तिने फक्त नाचावेच. बोलू नये.
तिस कोण बरे ओळखत नाही? परंतु त्या दिशी या चर्मचक्षूंनी आम्हांस ऐसा धोका दिला म्हणून सांगू.
त्याचे असे झाले – त्या दिशी रूढिपरंपरेनुसार आम्ही आमुची लाडकी वाहिनी इंड्या टीव्ही सुरू केली. तर त्यात चक्क बालोद्यानसम काय्रेक्रम सुरू. ते पाहून चक्रावलोच. हीस म्हटले, ‘आज जागतिक वनदिन आहे की काय?’ काय आहे, हल्ली कोणत्याही दिवशी कोणताही दिन असतो!
तर तिने फक्त भुवया उंचावून आमुच्याकडे पाहिले.
आम्ही ओशाळून म्हणालो, ‘नाही म्हणजे तिथं कोणीतरी झाड बनून उभं आहे, म्हणून म्हटलं..’
ती म्हणाली, ‘चष्मा घेतलाय चांगला पाचशेचा. तो लावा आणि डोळे फाडून पाहा. राखी सावंत आहे ती.’
खरेतर यात एवढे काही खेकसायचे कारण नव्हते. हिरवे हिरवे कपडे, तेही नखशिखांत, म्हटल्यावर कोण ओळखील राखीताईंना?
ही आमुची शिकवणी घेत म्हणाली, ‘तो मिर्ची ड्रेस आहे. तिच्या राष्ट्रीय आम पार्टीची निवडणूक निशानी आहे ना मिर्ची, म्हणून तसा ड्रेस घातलाय.’
मनी म्हटले, नशीब. राखीताई आम आदमी पार्टीत नाहीत. त्यांची निशाणी झाडू आहे.
ही सांगत होती, ‘ती निवडणूक लढवतेय.’
‘काय तरी काय? तिचं क्वालिफिकेशन काय आहे?’
‘तिचं प्रतिज्ञापत्र वाचलं नाही काय? एक गुन्हा आहे तिच्या नावावर.’
‘हां, मग बरोबर आहे. पण ती निवडून येऊन करणार तरी काय?’
‘ती म्हणते, राजकारण्यांच्या झोपा उडविणार.’
‘मग त्यासाठी निवडणूकच कशाला पाहिजे?’
‘म्हणजे?’ हिने अशा आवाजात हे विचारले की वाटले, ही आता तरातरा जाऊन फेसबुकवर आमच्या निषेधाचे बोर्ड लावते की काय!
‘अगं, आपण भाजपची बेटी आहोत, असं तिने नुस्तं म्हटलं, तर तिकडं राजनाथ सिंगांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. चिंता लागलीय त्यांना, की उद्या हिचं कन्यादान करायची वेळ आली, तर काय करायचं?’
‘ज्योक मारू नका पांचट. निवडून आल्यावर ती काय करील ते पाहा.’
‘काय करील?’
‘ती म्हणते जनतेसाठी प्राण देईल. कारण या जनतेनेच तिला उभं राहायचा आग्रह केलाय.’
‘काय म्हणतेस? म्हणजे हा शो लोकाग्रहास्तव आहे?’
(हा असा आग्रह करणारे लोक नेमके कुठे असतात हो? आम्हांस एकदा त्यांना भेटून त्यांची खणानारळाने ओटी भरायची आहे.)
वाचक हो, ज्योक सोडा. पण ज्या देशात लोक घराणेशाही टाळून एखाद्या नवख्या निरक्षराला (हे राखीताईंचे दुसरे क्वालिफिकेशन!) निवडणुकीस आग्रहाने उभे करतात, त्या देशाची लोकशाही किती प्रगल्भ म्हणायची!
ज्या देशात वरून टाकलेल्या नटाला, नटीला वा सोमाजी वा गोमाजीला लोक आपला उमेदवार मानतात, त्या देशाची लोकशाही किती समृद्ध म्हणायची!
सुश्री राखीताईंमुळे आमुची लोकशाहीबद्दलची समजच बदलली.
आणि म्हणूनच आज आमुचा कंठ गदगदला आहे. मनी व्याकूळशी अपराध भावना दाटून आली आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा