मकरंद देशपांडे
अकरा महिन्यांनी भाडेकरू बेघर होतात. बारा महिन्यांनी सदर लेखक (मी) बेखबर होणार, लोकरंगच्या वाचकांसाठी! आजचा शेवटचा लेख. वाचकहो तुम्ही मला जवळजवळ प्रत्येक लेखाला प्रतिक्रिया पाठवून नाटकाबरोबर ‘सदर लेखक’ही बनवलंत. यापुढे जर मी कधी कुठे नाटकाव्यतिरिक्त (प्रिंट मीडियासाठी) लिखाण केलं तर त्याचं कारण फक्त तुम्ही आहात. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि सदर संपादक रवींद्र पाथरे यांना माझे आभार.
‘नाटकवाला’ सदराची सांगता मला मराठी नाटक करून करावीशी वाटली आणि मी ‘सर प्रेमाचं काय करायचं?’ हे नाटक करायचं ठरवलं आणि मनात कुठेतरी बरं वाटलं. हिंदी नाटकांच्या यात्रेवर लिहिलेलं ‘नाटकवाला’ हे सदर मराठी नाटकाला कारणीभूत ठरलं. ऑक्टोबर महिन्यात मी हा निर्णय घेतला आणि माझ्याबरोबर ‘एपिक गडबड’मध्ये काम केलेल्या आकांक्षा गाडे, निनाद लिमये, अजय कांबळे यांना घेऊन तालीम सुरू केली. अनिकेत भोईर या पडद्यामागे काम करणाऱ्या म्हणजे म्युझिक ऑपरेटरलाही (ध्वनी संकेतक) एक भूमिका दिली. तालमीला जोरात सुरुवात झाली, पण त्यात जरा अडथळा आला तो पृथ्वी फेस्टिव्हलने. मला अगदी २५ दिवस असताना सांगितलं ‘तू आमच्यासाठी नाटक करायचं आहे, तेसुद्धा नवीन!’
मी ‘राम’ या एकपात्री प्रयोगावर काम सुरू केलं. मला असं वाटलं की मराठी नाटकात आपण नट म्हणून नसल्यानं हे आता शक्य होईल, पण ‘राम’चं लिखाण जसजसं पुढे जायला लागलं तेव्हा ते एकपात्री उरलं नाही. त्यात अनेक पात्रं यायला लागली. मी, नागेश भोसले, ‘एपिक गडबड’ची अख्खी टीम आणि त्यात पूर्वा, अजिंक्य हेही सामील झाले. यश हा लाइव्ह रिदमवाला कुठून कसा आला हे रामालाच ठाऊक. तो व्यावसायिक वादक आहे, पण त्याला आपल्या राम या प्रयोगाबरोबर राहायचंच होतं. प्रभू रामाची इच्छा असेल ते सगळेच आपल्या बरोबर असणार आहेत, अशा भोळ्या विचारधारेनी लिहायला सुरुवात केली आणि नाटक लिहिलं गेलं ते, मला उमगलेला.. कळलेला, भावलेला राम ते मला आज सांगितला गेलेला राम आणि मला समजलेला रामधर्म व ते थोपला जाणारा रामधर्म याचं. ‘राम राम राम राम’ म्हणताना राम ऐकूच येतो पण उलटं ‘मरा मरा मरा मरा’ म्हणतानाही राम ऐकू यायला लागतो. असं हे मनस्वी नाटक लिहिलं गेलं.
कथानक अतिशय साधं. एका वेडय़ासदृश (दाढी वाढलेला, कपडे फाटलेला, घाण वाटेल असा) अशा व्यक्तीला राम मंदिराच्या पायऱ्यांवरून हाकलण्यात येतं आणि तो वेडा त्या रामभक्तांना सांगतो की ‘राम माझाही आहे. जर तुम्ही मला इथून हाकललंत तर मी रामालाच पळवून नेईन!’ पण ते त्या वेडय़ाला हाकलतात आणि तो गाभाऱ्यातल्या रामाला बाहेर यायला खुणावतो. राम त्याच्यासाठी बाहेर येतो. वेडा, रामाशी त्याच्या प्रेमाबद्दल बोलायला लागतो. रामभक्त त्याच्या वेडेपणावर रागवतात आणि ‘राम आणि त्याच्या वेडय़ा भक्ताचा प्रसंग’ थांबवायला गस्तीच्या हवालदाराला बोलावतात आणि मग एक नवीन नाटय़ सुरू होतं. रामभक्तांना वाटतं की हवालदार चार दांडके मारेल आणि वेडा पळून जाईल, पण हवालदार त्या वेडय़ाच्या खऱ्या रामप्रेमात अडकतो आणि त्याला वेडय़ाच्या वेडेपणाबद्दल ईर्षां वाटायला लागते, कारण वेडा आपल्या स्वत:च्या रामासाठी स्वत:च रामायणही लिहायला तयार असतो आणि हवालदार हा स्वत:चं जीवन आणि नोकरी यामधला अपमान, अधीनता दुसऱ्याच्या गैरवर्तनामुळे सहन करत असतो.
वेडय़ाचं म्हणणं एखाद्या संतासारखं वाटणारं, पण काळजालाच हात घालणारं! रामाला भेटायचं असेल तर रामाच्या प्रेमात वेडं होणं हा मार्ग आहे आणि त्यासाठी मंदिरात नाही तर माणसांत राम शोधणंही तेवढंच गरजेचं आहे.
हवालदार वेडय़ाला म्हणतो की त्यानं एका रामलीला करणाऱ्या नटाला पाहिलं. तो रामासारखाच दिसणारा होता. त्यावर वेडा एवढंच म्हणतो की ‘‘तुझे लगा की वो राम है पर तुने माना क्या?’’ रामाच्या या अंतर्बा दर्शन आणि मुक्तिसंग्रामात भाग घेणारे रामभक्त रामाच्या प्रेमात वेडे आहेत की वेड दाखवण्याच्या मोहात!
नाटकाच्या दुसऱ्या अंकात हवालदारात परिवर्तन व्हायला लागतं आणि तो वेडय़ाच्या वेडात विलीन होतो आणि तेव्हा वेडा म्हणतो ‘‘हे राम! एकाला मी वेडं करू शकलोय आता बाकीचे शून्य हळू हळू एक होतील आणि शून्याआधी एक आला तरच त्या शून्याला किंमत!’’ नाटकाच्या शेवटाला मात्र लोक या दोन वेडय़ांना शहरात भर चौकात जाहीरपणे फाशी देतात, पण फाशी वेडय़ांना दिली की खऱ्या रामप्रेमाला!
या प्रयोगानंतर प्रेक्षक सुन्न झाले. महेश भट ज्यांनी ‘सारांश’, ‘अर्थ’, ‘ज़्ाख़्म’सारखे अर्थपूर्ण आणि वास्तव दाखवणारे चित्रपट बनवले, त्यांचं म्हणणं पडलं की नाटक हे माध्यम सत्य सांगण्यासाठी आहे आणि ‘राम’ या नाटकाचे प्रयोग जोपर्यंत होत राहतील तोपर्यंत देश जिवंत राहील. शक्यतो सगळ्याच प्रेक्षकांचं म्हणणं पडलं की ‘राम’ हे आजच्या काळातलं नाटक आहे. ज्यामध्ये कुठलीही बाजू न घेता, निष्पक्षपणे, तटस्थपणे सांगितलेलं सत्य अंगावर येतं. विचार करायला लावतं. आत्मनिरीक्षण हे टी.वी.च्या थेट प्रक्षेपणापेक्षा निश्चितच उपयोगी. धर्माचं, धर्मासंबंधी केलेलं भाष्य हे केवळ धर्मासंबंधी-धर्मविरोधी समाजाचं नाटक बनू शकतं, पण रामाचं, रामाच्या प्रेमाचं, रामाच्या भक्तासाठी वैयक्तिक स्वगत बनणं अधिक महत्त्वाचं!
समीर गोडबोले या सुजाण प्रेक्षकानं मेल पाठवला. ‘नाटय़शास्त्र’मध्ये भरतमुनींनी नाटक या कलेबद्दल लिहिताना म्हटलं आहे की, ‘मनोरंजन’ हा जरी नाटकाने साधण्याचा एक परिणाम असला तरी या कलेचं ते मूळ उद्दिष्ट नव्हे. त्यांच्या दृष्टीने या कलेचं मुख्य ध्येय म्हणजे नाटक बघणाऱ्या श्रोत्याला एका समांतर वास्तवात नेऊन आत्मनिरीक्षणास उद्युक्त करत, नैतिक व तात्त्विक पलूंवर विचार करण्यास प्रवृत्त करणं.. आणि रामाने ते केलं आहे. राम ‘अनबायस्ड’ आहे. तरीही सामाजिक परिस्थितीशी घट्ट संबंध राखून आहे.
नागेश भोसलेनं हवालदार साकारताना त्याचा बेदरकारपणा, त्याच्यातलाच हतबल नवरा-बाप, अपराधबोधाने गोंधळात पडलेला, जीवनात हरवलेला तरीही सत्याच्या शोधात वेडं व्हायला तयार असणारा असा विविध अंगांनी दर्शवला. त्याचं रंगमंचावर खूप प्रेम असल्यानं त्याच्यातलं वेडेपण खरं होऊन गेलं. रामभक्त, रामायण आणि महाभारतातल्या काही व्यक्तिरेखा आणि समाज दर्शवणाऱ्या भूमिकेत दहा तरुण नट-नटय़ांनी रामाला आवश्यक ऊर्जा दिली. भरत, आकांक्षा, अजय, अंकिता, माधुरी, अन्वय, पूर्वा, अजिंक्य, अनिकेत, अंकित या सर्वाशिवाय ते शक्यच नव्हतं. तेजश्री आक्रे ही वेशभूषाकार कोणाच्या आग्रहाने आली माहीत नाही, पण तिनं सगळ्या पात्रांना जिवंत केलं. असं वाटतंय की आता मला पुढच्या नाटकांसाठी एक गुणी-कल्पक वेशभूषाकार मिळाली.
‘राम’ या प्रयोगाची एक महत्त्वाची भूमिका, प्रकाशयोजनाकार अमोघ फडकेनं आशयपूरक लाइट डिझाइन आणि ऑपरेशन करून पार पाडली. ‘राम’ नाटकात प्राण फुंकले असतील तर ते शैलेंद्र बर्वेनं. नाटक सुरू होतं ते तिसऱ्या बेलनंतर अंधार होण्याआधी प्रेक्षकांमधून एक वेडा (मी) चालत येतो तेव्हा. आपापसांत हळू बोलणारे प्रेक्षक गप्प व्हायला लागतात आणि माझा पाय रंगमंचावर पडतो आणि शैलेंद्र बर्वे ‘राम’ या नामाचं थीम म्युझिक सुरू करतो आणि प्रेक्षक रामाच्या विश्वात ओढले जातात. ते शेवटपर्यंत खिळून राहतात. मला त्याला या संगीतासाठी अवॉर्ड द्यायला आवडेलच.
‘राम’ रंगमंचावर आणल्यानंतर मी पुन्हा ‘सर, प्रेमाचं काय करायचं?’ या नाटकाच्या तालमीकडे वळलो. असं वाटलं की ‘राम’ या नाटकाच्या मंचनात आपल्या आत, अंतर्मनाच्या रंगमंचावर प्रयोग करून आलोय त्यामुळे आता या नाटकाच्या तालमीचा सूर बदलला. असं वाटलं की नाटक हे फक्त अर्थपूर्ण, प्रगल्भ किंवा मनोरंजक असून चालणार नाही. त्यात आंतरिक जादू करायला हवी. त्यासाठी लेखनाबरोबर अभिनयसुद्धा सक्षम आणि ओलावा आणणारा असावा. कवी आणि ऋषी दोघंही काव्य करतात. कविकल्पनेनं आणि ऋषी अनुभवानं! तर आपल्याला – प्रेक्षकांना अनुभवानं आलेली अनुभूती द्यायची आहे.
एकोणीस डिसेंबर, शुभारंभाच्या प्रयोगाची जाहिरात ‘लोकसत्ता’त आली आणि पहिला फोन प्रशांत दामले या मराठी रंगभूमीच्या सुपरस्टारचा आला. तो म्हणाला, ‘‘मॅक, तुझं मराठी रंगभूमीवर स्वागत, तुला खूप शुभेच्छा!!’’ मला त्याचं फोन करणं खूप भावलं. प्रयोगाच्या दिवशी कमलाकर सोनटक्क्यांनी शुभेच्छा पाठवल्या. माझी बहीण सुहासिनी ठाण्याला राहते. तिचा नवरा प्रदीप जो कमर्शिअल आर्टिस्ट आहे (डिझाइनर), तो म्हणाला, ‘मी गडकरी रंगायतनला गेलो होतो. बुकिंग चांगलं आहे की गुरुवारी ४ वाजताच्या प्रयोगाचं!’ तर शीतल तळपदे या मराठी रंगभूमीच्या सर्वात यशस्वी प्रकाशयोजनाकाराने मला सांगितलं होतं की, ‘तू मराठीत नाटक कर, बघ तुझं स्वागत होईल.’
प्रयोगाच्या आधी मी नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून एक मिनिटाचं मौन बाळगून राष्ट्रगीतानंतर नाटकाला सुरुवात केली. अगदी पाचव्या मिनिटापासून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या आणि पहिला अंक संपेपर्यंत नाटक प्रेक्षकांचं झालं असं वाटलं. मध्यंतरात गोटय़ा सावंत – ज्यांचा जवळपास शंभर नाटकांशी व्यावसायिक संबंध राहिलाय, त्यांचं बॅनर ‘व्ही.आर.प्रोडक्शन’ हे त्यांनी मला निर्मितीसाठी दिलंय, जे नाटकाचे सूत्रधारही आहेत, ते म्हणाले ‘मला आनंद झालाय की मी या नाटकाशी जोडला गेलोय.’
दुसरा अंक खूपच रंगला. नाटक संपलं आणि प्रेक्षकांना धन्यवाद म्हणावं म्हणून पडदा न पाडता पुन्हा लाइट्स ऑन केले तेव्हा एक प्रेक्षक म्हणाला ‘तुम्ही खूप उशीर केलात मराठी नाटक करायला.’दुसरा म्हणाला,‘आम्ही किती वाट पाहिली.’ तिसरा म्हणाला, ‘आता लवकर दुसरं नाटकही आणा.’ चौथा म्हणाला, ‘या नाटकासाठी आम्ही लांबून आलो कारण आम्हाला तुमचं पदार्पण मिस करायचं नव्हतं.’ पाचवा म्हणाला, ‘या प्रयोगाबद्दल पुढच्या ‘नाटकवाला’ लेखात लिहा!’
मागे बॅकस्टेजवर छान युवा नट मंडळी होती. काही ओळखीची. आशुतोष गोखले, अनघा, स्नेहल भरभरून कौतुक करायला लागले. प्राजक्त देशमुख जो माझ्यामते सध्या प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर खूपच महत्वाचा लेखक दिग्दर्शक आहे, तो बहुतेक विराट कोहली आहे.. रंगमंचावरचा! त्याने मला संपूर्ण मिठी मारली, त्यात न बोलता सगळंच आलं. नाशिकहून खास प्रयोग पाहण्यासाठी आला होता. हेच त्याचं प्रेम! आता त्याला नाटकही खूप आवडलं हा भाग ‘चेरी ऑन द केक’च! मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या आकांक्षा गाडेनं प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. तिनं भूमिकेतली समज, ऊर्जा आणि भावनिक तीव्रता सहज दाखवली. अजय कांबळेचा फणिधर सगळ्यांनी उचलून धरला. असं वाटलं की प्रेक्षकांत खूप फणिधर आहेत. अजयने आपलं अस्तित्व कमी होऊ दिलं, असा एकही क्षण नव्हता. निनाद लिमयेनं साकारलेला हतबल नवरा हा जणू काही आजच्या बऱ्याच नवऱ्यांच्या मनातलं प्रेम आणि हतबलता दाखवणारा ठरला. माधुरी गवळीनं प्रधान मॅडमच्या भूमिकेत प्रेक्षकांना हसवलं आणि मग स्वत: रडत एक्झिट घेतली.
मला असं वाटतंय की जसजसे प्रयोग होत जातील तसतसे प्रेक्षक ‘सर प्रेमाचं काय करायचं’ या नाटकाच्या प्रेमात पडतील. काही प्रेक्षकांनी तर सांगितलंही की आम्ही पुढचा प्रयोग पाहणार, तर काहींनी सांगितलं की मला सात-आठ वेळा तरी पाहायचं आहे; हे प्रेमाचं नाटक. गोटय़ा सावंत मला म्हणाले, ‘प्रेमाची जगावेगळी व्याख्या या नाटकात आहे. हे नाटक मराठी रंगभूमीला नवीन वळण देणार!’
शैलेंद्र बर्वेचं थीम म्युझिक प्रेक्षकांच्या मनात नाटकाचा अनुभव रेंगाळत ठेवणार आणि टेडी मौर्याचा सेट आणि अमोघची प्रकाशयोजना सुंदर, मोहक दृश्यरूपी घर करणार!
कुठेतरी, कधीतरी किंवा लगेच २०१९ संपणार.. म्हणजे मलाही थांबावं लागणार!
जय मराठी रंगभूमी! जय नाटकवाला!
जय प्रेक्षक! जय वाचक!
(समाप्त)
mvd248@gmail.com