विद्युत भागवत – lokrang@expressindia.com
समाजविज्ञानाचा अभ्यास केवळ पुस्तकांत न ठेवता तो जगणारे आणि पुरोगामित्वाची वैचारिक परंपरा पुढे नेणारे प्रा. राम बापट यांचा २ जुलै हा स्मृतिदिन. गेल्या आठ वर्षांत प्रा. बापट यांच्याबद्दल अनेक लेख लिहिले गेले; परंतु त्याहीनंतर काही व्यक्तिगत नोंदी करताना समाजाबद्दल पडलेले दुखरे प्रश्न उभे करणारे हे टिपण..
त्याला दुरून येताना पाहिले तर तो चक्क कलाकार भासला.. नाटकात काम करणारा कलाकार किंवा जणू सिनेमाचा दिग्दर्शक! जवळून डोळे निरखून पाहिले तर त्याचा एक डोळा घारा आणि दुसरा तपकिरी! जॉन केनेडीछाप केस.. चालण्या-बोलण्यात सळसळणारा उत्साह. त्याची एक खासियत भेटल्यावर समजायला फारसा वेळ लागलाच नाही. आवडलेल्या माणसाचं तोंडभरून कौतुक करण्याची त्याची तऱ्हा खासच. म्हणे काय, तर अशी कविता मागच्या दहा हजार वर्षांत झाली नाही आणि पुढच्या दहा हजार वर्षांत होणार नाही! पण त्याच माणसाचं काही खटकलं तर ढगात चढवलेला माणूस क्षणार्धात जमिनीवर आदळलाच म्हणून समजा. तिखट उपहास.. ‘काय तो रिसर्च पेपर? जणू शनिवारवाडय़ावरचं भाषण!’ पण ही सगळी त्याची भक्ताला शिष्य आणि शिष्याला भक्त करण्याची स्ट्रॅटेजी!
एखादी बाजू धरून रेटून बोलायचं म्हणजे स्वत:च्या धारणेबद्दल अंगी अंधश्रद्धा हवीच. म्हणजे असे की, आपण जो विचार करतो तो बरोबरच असला पाहिजे, याची! आता हे मात्र बापट सरांसाठी अवघड होते. नाण्याला दोन बाजू; परंतु सत्याला अनेक! मग हेही खरे आणि तेही खरे, किंवा हेही चूक आणि तेही चूक अशी गोलमटोल भूमिका घेणारे- असा शिक्का त्यांच्यावर पडणे स्वाभाविकच होते.
झाले असे की, युवक क्रांती दलाची भूमिका त्यांनी लिहिली आणि आणीबाणीच्या काळात इंदिराबाईंना आणीबाणी का लादावी लागली याचाही विचार केला पाहिजे, अशीसुद्धा भूमिका घेतली. झाले! बापट समस्त पुरोगाम्यांच्या संशयाचे लक्ष्य झाले. चक्क आणीबाणीचे समर्थन? हा कसला पुरोगामी? विचारवंत की तेल लावलेला मल्ल? वगैरे वगैरे..
तर बापट तसे खूप खूप हुश्शार. मानेवर अक्षरश: खडा ठेवून वाचणारे. तर झाले असे की दिल्लीमध्ये ते पीएच.डी. करत होते. पण दिल्लीतल्या वातावरणाने त्यांचे इंग्रजी कच्चे ठरवले. मग अपमान सहन करत पीएच.डी. करण्याऐवजी फेलोशिपच्या भरवशावर डोळे फाटेस्तोवर वाचत बसले. इतर मित्र-मैत्रिणींचे पीएच. डी. पूर्ण करत बसले. नंतर मग दिल्ली सोडून व्हाया नाशिक पुणे गाठले. पुढे पुणे विद्यापीठात प्राध्यापकी करताना पीएच. डी.ची उणीव भासत राहिली. पीएच. डी. नाही म्हणून प्रमोशन नाकारले गेले. इतका मोठा विद्वान माणूस आणि ‘प्रोफेसर’ नाही? बापट पुन्हा नाराज झाले. मग त्यांनी विद्यापीठाच्या चौकटीच धुडकावल्या. ‘नाही केलं मी आयुष्यात काही. नाही लिहिलेली पुस्तके. नाही केला रिसर्च वगैरे.. काय करायचे ते करा!’
मनात आले तर लेक्चर घेतलीच नाहीत. आणि मनात आले तर हिरवळीवरच विद्यार्थ्यांना जमवून भरभरून ज्ञान दिले. विद्यार्थ्यांसोबत कधी गड-किल्ले, तर कधी डोंगरमाथा. कधी अजिंठा वेरुळच्या लेण्या, तर कधी सह्य़ाद्रीच्या कडेकपाऱ्या. शिल्पे, चित्रे, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र वाचलेलं सारं धो-धो पावसासारखं वाटत राहिले बापट. चालते बोलते विद्यापीठच जणू!
गांधीहत्येनंतर ठिकठिकाणी दंगली उसळल्या. त्यात एक पोस्ट ऑफिस जाळले गेले. आणि त्या धक्क्य़ाने बापट सरांच्या वडिलांचाही बळी गेला. मग वडिलांच्या जागी कारकुनाची नोकरी आणि थोरल्या भावाचे लग्न.. अशा आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना घडल्या. थोरल्या भावाच्या बायकोने त्यांच्या भावाला खूप छळले. त्यामुळे मग लग्नच नको म्हणून बापट आयुष्यभर एकटे राहिले. लग्न न करता.. सडाफटिंग.
तर स्वत:चे कुटुंब नसलेला हा माणूस मग इतरांच्या कुटुंबाचा भाग बनत गेला. कोणाचा वाढदिवस असो की कोणा जोडप्याचे लग्न- हा माणूस घरचे कार्य असल्यासारखा पुढे. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, ताटे वाढणे- उचलणे, किंवा कोणा जोडप्याची भांडणे मिटवणे, कुठे चळवळीतले कार्यकर्ते अडचणीत आले की त्यांना सावरायला पुढे धावणे.. हे सगळे करण्याचा भलताच उत्साह या माणसात दिसायचा. अंगी जणू अनेकांना संरक्षण कवच पुरवण्याची पुरुषी हौसच म्हणा ना!
तर अशातच एकदा भांडारकर इन्स्टिटय़ूटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. बाजू घ्यावी की निषेध करावा अशा दुविधेत अनेक पुरोगामी असताना बापट मात्र हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भांडारकर इन्स्टिटय़ूटवर दाखल झाले. मदत म्हणून दानपेटीत एक रुपया टाकला आणि जमलेल्या मंडळींना हे कसे चूक आहे हे सांगत बसले. थोडक्यात- वाटले ते केले. मग आरोप, मस्करी, हिणवणे ओघाने आलेच. पुरोगामी असली म्हणून काय झाले, शेवटी माणसे ती माणसेच! ज्याने नेत्याची री ओढली नाही, त्याच्या सुरात सूर मिसळला नाही, किंवा अमक्या तमक्या संघटनेचा सामुदायिक अहंकार बाळगला नाही तर त्याचा बापट नाही होणार तर काय होणार?
कोणी म्हणायचे, ‘अरे, ते शर्टाच्या खिशात गणपतीचो फोटो ठेवतले अन् जेवाक बसण्याआधी त्येचो दर्शन घेतले. ह्य़ो कसलो पुरोगामी?’ खी-खी-खी..!
पुढे बापट आजारी पडले. नागीण.. मग अल्झायमर.. नुसताच टाय लावलेले बापट एकदा म्हणू लागले, ‘मी कोण आहे? माझा पॅरिसला बियर बार आहे..’ असे काहीतरी. पुढे हा आजार वाढतच गेला आणि बापट गेले. २ जुलै २०१२ ला बापट.. मग २०१३ ला शर्मिला रेगे.. आणि त्याच काळात गो. पु. देशपांडेही गेले. तसे हे सगळे ब्राह्मण. आणि जातिप्रश्नावर स्फोटक लिहिले गेल्याचा तो काळ. नावात समतेचा, करुणेचा आशय स्वीकारला तरी पुरोगामी मंडळींच्या व्यवहारात तो नेहमी असेलच असे नाही. आणि त्यात स्वत:च्या आणि इतरांच्या विसंगती पकडण्याची कसोटी म्हणजे पुरोगामी बीइंग.. तर आता इथपर्यंत आपण आलो असू तर टीकेकडे कसे पाहायला हवे या आकलनापाशी आपण थांबायला हरकत नाही.
मरण्याआधी बापट न विसरता अनेकांच्या घरी गेले आणि चक्क ‘आयुष्यभर तुम्हाला खूप त्रास दिला, त्याबद्दल मला माफ करा..’ अशी माफी मागत फिरले. मरणाच्या दारात अगदी छोटय़ाशा घरात राहणारा हा एकटा माणूस.. त्याला काय वाटत असेल? सुरक्षिततेची सामुदायिक ऊब त्याने कुठे शोधायची होती? विशेषत: पुरोगाम्यांचे पर्यायी वगैरे कल्पनेतही नसताना! मग ते हात-पाय आखडून रामरक्षा वगैरे म्हणू लागले.. आणि झाले! तो पुन्हा एकदा टीकेचा विषय झाला. अर्थात ती चर्चा पुढे माणसांची गुंतागुंत समजून घेत, त्यांना काळे-पांढरे रंग न देता, ती आहेत तशी किंवा होती तशी समग्रतेत समजून घेणे कसे गरजेचे आहे.. इथपर्यंत विस्तारली गेली. निमित्त काहीही असले तरी राम बापट यांना या साऱ्याला गांभीर्याने भिडणे मनापापासून आवडले असते; आणि अर्थात ते स्वसंरक्षकही झाले असते.
थोडक्यात, त्यांच्या वतीने आज आपण जरी खात्रीने काही म्हणू शकलो नाही तरी तेच त्यांचे बळ म्हणून निश्चितपणे पाहता येऊ शकते. कुणालाही फार डोक्यावर बसवणे किंवा कुणाला अगदीच मोडीत काढणे याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न गरजेचा.. या समाधानकारक पूर्णविरामापाशी थांबायला हरकत नसावी.