सध्या ‘लोकपाल’ हा शब्द परवलीचा झाला आहे. तथापि नाटककार राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या ‘गर्वनिर्वाण’ या पहिल्याच नाटकात या नावाचे एक पात्र योजिले होते. आणि आज ‘लोकपाल’कडून जी कर्तव्ये अपेक्षिली जात आहेत, तशीच कर्तव्ये ‘लोकपाल’ हे पात्र या नाटकात बजावताना दिसते. त्याबद्दल..
१९६८ साली न्यायमूर्ती सिंघवी यांनी ‘लोकपाल’ हा शब्द प्रथम वापरला आणि त्या नावाचे बिल बनले, नंतर हे ‘लोकपाल बिल’ संसदेत कधी कधी मांडण्यात आले, इत्यादी तपशील अलीकडेच वाचनात आला.
आज अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासारखाच ‘लोकपाल’ हा शब्दही लोकपाल बिलाच्या निमित्ताने आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनाने सामान्य माणसांच्या तितकाच परिचयाचा झाला आहे. लोकपाल बिलाच्या श्रेयासाठी जशी आज सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे; तशीच ‘लोकपाल’ हा शब्द नक्की कधी अस्तित्वात आला, याबद्दलही आहे. मात्र, काही शब्द कुठे सापडतील, याचा काही भरवसा देता येत नाही; तसेच ‘लोकपाल’ या शब्दाचेही आहे. एकूणच या लोकपालाने आज प्रत्येकाला वेठीस धरले आहे, हे मात्र खरे.
नाटककार राम गणेश गडकरी यांनी १९०८ साली ‘प्रल्हादचरित्र’ नावाचे नाटक लिहिले होते. ज्याचे नामांतर नंतर गडकऱ्यांचे गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या सांगण्यावरून ‘गर्वनिर्वाण’ असे करण्यात आले. राम गणेश गडकऱ्यांनी लिहिलेले हे पहिले नाटक.
या नाटकाची कथावस्तू आपल्याला माहीत असलेल्या पौराणिक भक्त प्रल्हादाच्या चरित्राची आहे. हिरण्यकश्यपू हा शिवभक्त होता. पण त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र शिवाची भक्ती न करता विष्णूची भक्ती करू लागला. हिरण्यकश्यपूचा लाडका भाऊ हिरण्याक्ष याचा विष्णूने वराहावतारात वध केल्याने हिरण्यकश्यपू विष्णूचा तिरस्कार करू लागला आणि त्याला पराजित करण्याची हिरण्यकश्यपूने प्रतिज्ञा केली. परंतु आपला मुलगाच शत्रूच्या नादी लागल्याचे सहन न होऊन हिरण्यकश्यपू प्रल्हादाला देहदंड सुनावतो; हरतऱ्हेनं संपवण्याचे प्रयत्न करतो. पण वारंवार विष्णू प्रकट होऊन प्रल्हादाला वाचवतो आणि शेवटी हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढतो.
दोन पिढय़ांच्या संघर्षांचे हे नाटक. या नाटकात हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, कयाधू यांच्या बरोबरीनेच इतर पात्रांमध्ये अतिशय लक्ष वेधून घेणारे आणखी एक महत्त्वाचे पात्र गडकऱ्यांनी लिहिले आहे; ते म्हणजे लोकपालाचे! ‘अमात्य लोकपाल’ हा हिरण्यकश्यपूच्या राज्याचा मुख्य प्रशासक आहे.
आज लोकपाल बिलामध्ये लोकपालाची जी म्हणून काही ‘आदर्श कर्तव्ये’ अभिप्रेत आहेत, ती सर्व कर्तव्ये पार पाडणारा; किंबहुना त्याहीपेक्षा सचोटीचा, आत्मभान असलेला लोकपाल या ‘गर्वनिर्वाण’ नाटकात गडकऱ्यांनी रंगवला आहे. सुरुवातीला अत्यंत जबाबदारीने हिरण्यकश्यपूचा कारभार सांभाळणारा हा लोकपाल, दुराभिमानी, अतिमहत्त्वाकांक्षी आणि अहंमन्य हिरण्यकश्यपूच्या हातून अनाचार घडतोय हे पाहून त्याला सारासार विचार करण्यास सांगतो. नतिकतेची, सत्याची आणि परिस्थितीची त्याला जाणीव करून देतो. एका महत्त्वाच्या प्रसंगात या लोकपालाच्या तोंडी वाक्य आहे- ‘‘महाराज, लोकपालाचा नेत्र हाच राजाचा नेत्र. लोकपालाने पाहिले, ते राजानेही पाहिले.’’ राज्यात प्रजेची मानसिकता काय आहे, राजाने आत्ता कसे वागणे अपेक्षित आहे, हे लोकपाल राजाला सुचवतो, प्रसंगी समजावतो, वादही होतो. आणि शेवटी हिरण्यकश्यपू लोकपालाला राज्यातून हाकलून देतो.
आज लोकपाल बिलासंदर्भात जे जे म्हणून काही चालले आहे, त्याचे अनेक संदर्भ ‘गर्वनिर्वाण’ नाटकात दिसतात.
आज लोकपाल बिल पास झालंय. पहिला लोकपाल कोण होणार, याची उत्कंठा लोकांना लागली आहे. राज्या-राज्यांत नेमके कोण कोण लोकपालासाठीचे उमेदवार असणार, याचे राजकारण आपण पुढील काही वर्षांत पाहूच. यावरून पुढे एकमेकांची डोकीही फुटतील. पण गमतीचा भाग म्हणजे १९१० साली या ‘गर्वनिर्वाणा’त ज्याला लोकपाल बनवले होते, त्याला मात्र या आदर्श व्यक्तिमत्त्वाची, लोकपालाची भूमिका अजिबात मान्य नव्हती. त्या नटाला तथाकथित ‘खलनायक’ असलेल्या हिरण्यकश्यपूचीच भूमिका हवी होती. कारण नट म्हणून लोकपालाच्या भूमिकेत फारसे आव्हान नसून, कर्दनकाळ ठरलेल्या जबरदस्त खलनायक हिरण्यकश्यपूचीच त्याला भुरळ पडली होती आणि त्यायोगेच त्याला नट म्हणून आपली छाप पाडायची होती. आणि ज्याला हिरण्यकश्यपूची भूमिका दिली होती, तोही ही खलनायकी भूमिका सोडायला तयार नव्हता.
त्यावेळी ‘गर्वनिर्वाण’ नाटक किर्लोस्कर नाटक मंडळी मंचावर आणणार होती. १९०८ साली लिहायला घेतलेले हे नाटक १९१० साली लिहून पूर्ण झाले. हे नाटक गडकऱ्यांनी किर्लोस्करचे मॅनेजर शंकरराव मुझुमदारांना १९१० साली विदर्भात दिले होते. परंतु त्यांनी हे नाटकाचे हस्तलिखित मुंबईला परत येताना रेल्वेप्रवासात हरवले. तसे त्यांनी गडकऱ्यांना कळवले. गडकऱ्यांनी ते परत एकटाकी जसेच्या तसे लिहून काढले आणि नाटकाच्या तालमी सुरू झाल्या.
पण त्याचवेळी ‘कीचकवध’ या नाटकाने महाराष्ट्रात आणि नंतर भारतभर राजकीय आणि सामाजिक मन हादरवून टाकले. ‘कीचकवधा’वर बंदी आली. तशीच बंदी ‘गर्वनिर्वाण’वरही येईल की काय, या भीतीने गडकऱ्यांनी नाटकातले आक्षेपार्ह वाटतील अशा काही प्रसंगांचे हस्तलिखित जाळून टाकले. इंग्रजांच्या बंदीच्या भीतीच्या नावाखाली तसेच इतरही अनेक मानापमानाच्या अंतर्गत कारणांमुळे ‘गर्वनिर्वाण’ १९१० साली रंगमंचावर येऊ शकले नाही.
पुढे चार वर्षांनी १९१४ साली हे नाटक किर्लोस्कर नाटक कंपनीने रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न केला. गडकऱ्यांनी जाळलेल्या प्रवेशांचे परत नव्याने लिखाण त्यांच्याकडून कलाकारांनी करवून घेतले. गणपतराव बोडस- हिरण्यकश्यपू, बालगंधर्व- कयाधू, नानासाहेब जोगळेकर- लोकपाल अशी पात्रयोजना त्यात होती. या नाटकाच्या तालमीही झाल्या. वध्र्याला ६०-७० लोकांसमोर रंगीत तालीमही झाली.
ज्यांना ही लोकपालाची भूमिका दिली होती ते नानासाहेब जोगळेकर हे देखणे, उंचेपुरे गायक नट संस्थानिक होते. त्यामुळे त्यांनी तोपर्यंत किर्लोस्कर कंपनी विकत घेतली होती. जोगळेकरांना लोकपालाची भूमिका पसंत नव्हती. कारण ही भूमिका नाटकात त्या अर्थी दुय्यम भूमिका होती. स्वत: कंपनीचा मालक असताना नाटकात दुय्यम भूमिका करणे त्यांना खुपले होते. आधीच कलाकारांत अंतर्गत सुंदोपसुंदी, कलह, हेवेदावे निर्माण झाले होते. त्यातच ‘गर्वनिर्वाण’ नाटकात राजद्रोह आहे म्हणून त्यावेळच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’त कुणीतरी (म्हणजे नटांपकीच!) निनावी पत्र छापून आणले होते.
वध्र्यात रंगीत तालमीनंतर रात्री नवख्या नटाकडून गडकऱ्यांचा अपमान झाल्याच्या निमित्ताने कलाकारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि गडकऱ्यांच्या नाटय़रूपी पहिल्या अपत्याचा- म्हणजे ‘गर्वनिर्वाण’चा जो बळी पडला, तो कायमचा! त्यानंतर या नाटकाला रंगमंचाचा मखमली पडदा दिसला नाही, तो अगदी आजपर्यंत. आणि हे नाटक न होण्यामागे.. अर्थात न करण्यामागे कारण ठरला तो त्यावेळचा ‘लोकपाल’!
गडकऱ्यांनी जेव्हा ‘गर्वनिर्वाण’ लिहिले त्यावेळी ते २३ वर्षांचे होते. ज्या अर्थी हा ‘लोकपाल’ शब्द या नाटकात त्यांनी वापरला आहे, त्या अर्थी हा शब्दप्रयोग त्यांच्याआधी होत किंवा झालेला असला पाहिजे. ‘लोकपाल’ हा नुसता शब्दच नाही, तर ज्या अर्थी त्याची कर्तव्ये या नाटकात दिसतात, त्या अर्थी ‘लोकपाल’ ही ‘सिस्टीम’ त्यांना माहीत असली पाहिजे. तत्कालीन साहित्यात, राजकीय दस्तावेजांत, व्यवस्थेत ‘लोकपाल’ आधीपासूनच अस्तित्वात असला पाहिजे. आणि तसं नसेल तर ‘लोकपाल’ या शब्दाचे आणि या ‘व्यवस्थे’चे श्रेय राम गणेश गडकऱ्यांना तरी दिले पाहिजे.
एकुणात, हा ‘लोकपाल’ आपल्या आयुष्यात नक्की कधीपासून मुरला आहे हे तपासणे, हेही एक नवे आव्हानच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा