एव्हाना आपणास समर्थ रामदासांच्या प्रयत्नवादाचा परिचय झाला असेल. नीती, नशीब, प्रारब्ध, पूर्वजन्मीचे पाप आदी केवळ निष्क्रियांच्या मुखी शोभणारे शब्दभांडार समर्थ वाङ्मयात आढळत नाही. याचे कारण स्वत:चे प्रारब्ध स्वत: घडवावयाचे असते यावर समर्थाचा असलेला विश्वास. माणसाने आपले जीवितकार्य वा जीवनोद्देश ओळखून त्या दिशेने अविरत कार्य करीत राहावे असे रामदास आवर्जून सांगतात. म्हणजे आपल्याकडून प्रयत्न चोख असायला हवेत. त्यात कसूर करणे म्हणजे स्वत:ची फसवणूक.
हे प्रयत्न म्हणजे आपले कर्तव्य करीत राहणे. हे कर्तव्य करणे हीच परमेश्वरसेवा. म्हणजे या प्रयत्नांसाठी घरदार सोडून जपजाप्य करीत बसण्याची गरज नाही. याचाच अर्थ प्रपंच सोडून जाण्याची काहीही गरज नाही. रामदासांचे एक वैशिष्टय़ म्हणजे ते प्रापंचिकाला कोणत्याही टप्प्यावर कमी लेखीत नाहीत. म्हणजे संसार करणारा जो कोणी असेल तो कमअस्सल आणि सर्वसंगपरित्याग करून ‘देव.. देव’ करीत राहणारा मात्र थोर- असली मांडणी रामदास करीत नाहीत. म्हणूनच ते विचारतात..
प्रपंची खाती जेविती। परमार्थी काये उपवास करिती।
म्हणजे प्रपंचातले जीवांना खाण्यास अन्न लागते. पण परमार्थी काय सतत उपाशी असतात की काय, असा बिनतोड प्रश्न रामदास विचारतात.
आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थविवेका।
असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
प्रपंच सोडून परमार्थ कराल। तेणे तुम्ही कष्टी व्हाल। ।
प्रपंच परमार्थ चालवाल। तर तुम्ही विवेकी॥
म्हणजे हे दोन्ही जमावयास हवे. आणि मुख्य म्हणजे हे दोन्ही एकमेकांपासून वेगळे आहे हे रामदासांना मान्य नाही.
प्रपंच सोडून परमार्थ केला। तरी अन्न मिळेना खायाला।
मग तया करंटय़ाला। परमार्थ कैचा॥
त्यांचा दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्येकाने आपले जे काही जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे, त्याशी प्रामाणिक रहावयास हवे. हे किती महत्त्वाचे? कारण व्यसनमुक्ती संघटनेचाच पदाधिकारी कोणत्यातरी व्यसनात अडकलेला सापडावा असे आपण पाहतो.
बोलणें येक चालणें येक । त्याचें नांव हीन विवेक।
येणें करितां सकळ लोक। हांसों लागती।
म्हणजे बोले तसा चाले असे नसेल तर अशा व्यक्तींना लोक हसतात. त्यामुळे बोलणे आणि चालणे यांत अंतर असता नये असा रामदासांचा आग्रह असतो. असे अंतर बुजवण्यात जो कोणी यशस्वी होतो, तो महंत म्हणवून घेण्यास पात्र ठरतो. महंत म्हणजे कोणी साधुबरागी नव्हे; तर ज्याच्याविषयी आदर बाळगावा अशी अधिकारी व्यक्ती.
जैसे बोलणे बोलावे। तसेचि चालणे चालावे।
मग महंतलीळा स्वभावे। आंगी बाणे॥
या महंतपणाचीसुद्धा सवय लावावी लागते. म्हणजे मोठेपण कसे मिळवायचे ते समजून घ्यावे लागते. आणि समजून घेतल्यावर त्यासाठी सतत प्रयत्न करीत राहावे लागतात. या प्रयत्नांत कसूर होऊ नये यासाठी अंगी विवेक हवा. कारण हा विवेकच चांगले आणि वाईट यांतील सीमारेषा समजू शकतो. प्रसंगी धोक्याची जाणीव देऊ शकतो. समर्थ रामदासांच्या समग्र वाङ्मयात विवेक या गुणास मोठे महत्त्व आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर रामदास या विवेकाची आराधना कशी करावी, ते सांगतात. आणि जे कोणी विवेकहीन असतात त्यांचा रामदास धिक्कार करतात. अशा विवेकहीनांची िनदा करताना ते किती कठोर असतात पहा-
विवेकहीन जे जन। ते जाणावे पशुसमान।
त्यांचे ऐकता भाषण। परलोक कैचा॥
म्हणजे अशा व्यक्तींच्या सहवासात असणे हे परलोकसमान- आणि अशा व्यक्ती थेट पशुसमान.
तेव्हा विवेकगुणाच्या आधारे प्रत्येकाने स्वविकास करावा. तसा तो साधावयाचा म्हणजे प्रयत्न करायचे. या प्रयत्नांत कमी झाल्यास मग नशिबास बोल लावावयाची वेळ येते; ते रामदासांना मंजूर नाही. ते ठामपणे सांगतात- आपण जे काही करतो त्याचेच फळ आपणास मिळते.
बरे आमचे काय गेले। जे केले ते फळास आले।
पेरिले ते उगवले। भोगिता आता॥
तेव्हा प्रयत्न करा. जे काही स्वप्न पहात आहात ते कष्टसाध्य आहे. ते साध्य होईपर्यंत आरामाचा विचार करू नका. जी काही कीर्ती आपणास मिळणार आहे ती प्रयत्नांमुळेच. या कीर्तीचा ध्यास असावयास हवा. तो असेल तर त्या कीर्तीसाठी अथक प्रयत्न करीत रहावयालाच हवे. कारण समर्थाच्या मते..
कीíत करून नाही मेले। ते उगाच आले आणि गेले।
असे काही न मिळवता जन्माला आले काय आणि गेले काय, दोन्ही सारखेच- असे रामदासांना वाटते. तेव्हा प्रयत्न करावयाच्या वयात प्रत्येकाने प्रयत्न करावेत. जगताना प्रयत्न न करण्याचे बहाणे अनेक असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करावे. आज करतो, उद्या करतो असे न करता जे काही करावयाचे
त्याच्या साधनेस लागावे. हा सल्ला किती महत्त्वाचा ते हल्ली कानावर येणाऱ्या एका शब्दप्रयोगाने लक्षात येईल. ‘कधी काय होईल ते सांगता येत नाही!’ हे वाक्य हल्ली वारंवार ऐकायला येते. समर्थ रामदास
तेच म्हणतात-
राजा असता मृत्यु आला। लक्ष कोटी कबुल झाला।
तरी सोडिना तयाला। मृत्यु काही॥
तेव्हा कष्ट करावयाच्या वेळी त्याकडे पाठ फिरवू नये. कारण..
ऐसे हे पराधेन जिणे। यामध्ये दुखणे बहाणे।
हे सर्व सोडून जो काही काळ हाती राहतो तो सार्थकी लावणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे, असे रामदास सांगतात. अशा प्रयत्नांत कोणतीही कमी राहू देणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही.
लहानथोर काम काही। केल्यावेगळे होत नाही।
यावरून त्यांचा भर कष्टावर किती आहे ते कळून येते.
म्हणोन आळस सोडावा। यत्न साक्षेपे जोडावा।
दुश्चितपणाचा मोडावा। थारा बळे॥
म्हणजे हे सर्व प्रयत्नसाध्य आहे. शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांच्या संदर्भात नेहमी एक तक्रार पालकांकडून कानी येते, ती म्हणजे- पोरगा अभ्यास करीत नाही. हे अभ्यास न करणे रामदासांना मंजूर नाही.
प्रात:काळी उठत जावे। प्रात:स्मरामि करावे।
नित्य नेमे स्मरावे। पाठांतर॥
कष्ट.. ते शरीराचे असोत वा बुद्धीचे- करायलाच हवेत, ही रामदासांची मसलत. या दोन्हींच्या कष्टांवर त्यांचा भर आहे. नुसतेच दंड-बेटकुळ्या कमावल्या आणि शहाणपण नाही, हे त्यांना जसे मंजूर नाही, तसेच नुसते शहाणपण आहे आणि देह मात्र पाप्याचे पितर हेदेखील त्यांना मान्य नाही. स्वस्थ शरीरातले मनही स्वस्थ असते यावर त्यांचा गाढा विश्वास आहे.
मागील उजळणी पुढे पाठ। नेम धरावा निकट।
बाष्कळपणाची वटवट। करू नये॥
किती रोखठोकीचा सल्ला! उगाच बाष्कळ बडबडण्यात आपला वेळ दवडू नये, हे रामदास सांगतात.
सावधानता असावी। नीतिमर्यादा राखावी।
जनास माने ऐसे करावी। क्रियासिद्धी॥
अशा तऱ्हेने कष्ट करीत रहात जनास मान्य होईल अशा पद्धतीने आपले क्रियावर्तन करावे. ते करताना आणखी कोणत्या धोक्यांकडे लक्ष द्यायला हवे, ते पुढील भागांत..
समर्थ साधक lokrang@expressindia.com