कलाकाराच्या प्रतिभेच्या मोजमापाची साधने कोणती? अनेक आहेत. त्यातील एक म्हणजे अर्थातच त्याने हाताळलेले घाट. म्हणजे तो ज्या कलाप्रकारात आहे त्यात त्याने कोणकोणते नवनवे प्रयोग केले? अभिनेता असेल तर किती प्रकारच्या भूमिका केल्या? गायक असेल तर किती विविध घराण्यांचे परिशीलन त्याने केले? कोणकोणत्या रागांचे सादरीकरण तो करतो? कवी असेल तर काव्याचे किती घाट त्याने हाताळले?..
या निकषांवर समर्थ रामदास यांनी हाताळलेले प्रकार थक्क करणारे आहेत. दासबोध, मनाचे श्लोक, आरत्या, अभंग हे तर आपण पाहिलेच. परंतु या काहीशा अभिजनांना भावेल अशा प्रकारच्या काव्यसाहित्याबरोबरच रामदासांनी प्रचंड प्रमाणावर लोकसाहित्य लिहिले आहे. अनेकांना त्याची कल्पना नाही. किती असाव्यात या पद्यरचना? पांगुळ, वाघ्या, वासुदेव, दिवटा, बाळसंतोष, बहुरूपी, पिंगळा, जागल्या, डवरी, जोगी, कानफाटय़ा, गोंधळ, चेंडू, टिपरी, लपंडाव.. एक ना दोन.. असे अनेक प्रकार रामदासांनी हाताळले. हे इथेच संपत नाही. रामदासांनी मोठय़ा प्रमाणावर डफगाणी लिहिली, दंडीगाणी लिहिली. रामदासांच्या वास्तव्याचा बराचसा काळ शहापूर, मसूर, चाफळ वगैरे परिसरात गेला. या वाटेवरून पाली, जेजुरीस जाणाऱ्या-येणाऱ्या शाहिरांशी त्यांची गाठभेट होत असे. त्यामुळे असावे; पण रामदासांना वाघ्यामुरळीचे कवनदेखील माहीत होते. शाहीर, वाघे, दशावतारी, बहुरूपी, गोंधळी, बाळसंतोष, पिंगळा, दिवटा, भुत्या असे देवीच्या भक्तांना प्रिय अनेक काव्यप्रकार रामदासांनी लिहिले. हे सर्व संकलन प्रसिद्ध आहे. परंतु अनेकांना ‘मनाचे श्लोक’ वा ‘दासबोध’ यापलीकडचे रामदास माहीत नाहीत.
या रामदासांनी हाताळलेला एक काव्यप्रकार निश्चितच धक्का देणारा आहे. या काव्यप्रकाराचे नाव- लावणी. होय! समर्थ रामदासांनी लावणीदेखील लिहिली. आता रामदासांनी लिहिलेली लावणी ही काही शृंगारिक लावण्यांसारखी असणार नाही, हे तर उघड आहे. तेव्हा रामदासविरचित ही लावणी आणि काही लोकगीते यांचा आज परिचय..
ऐक सजना मनमोहना। संपत्ती पाहाता कोणाची।
जाईल काया जाईल माया। उसणि आली पांचाची।।
अशी ठसकेबाज आहे या लावणीची सुरुवात. रामदासांनी ‘ऐका सजना..’ असे म्हणणे म्हणजे काय मौज आहे! रामदास एका शाहिरासारखे बसले आहेत, एका हातात डफ आहे आणि बाकी मागचे साजिंदे ‘जी जी र जी जी..’ वगैरे म्हणत आहेत, ही कल्पनाच करता येत नाही. पण ही लावणी आपल्याला वाटते तशी नाही. या लावणीत रामदास पुढे म्हणतात..
कौरव मेले पांडव गेले। वाणी वदली व्यासाची।
छपन्न कोटी यादव गेले। काया राहिली कृष्णाची।।
काय रचना आहे..
हारा होरा निघोनि गेला। वेळ आली मृत्याची।
लेक नातू अवघे गेले। वार्ता न कळे देह्यची।।
येक येती येक जाती। चौकी फीरे काळाची।
ज्याचे गाठिसी पुण्य नाही। यम हो त्याला जाची।।
हे सारे रामदासांच्या शैलीशी साजेसेच. त्यांच्या लावणीतूनही हे रामदासपण लपून राहत नाही. शेवटी ते म्हणतात..
सावध व्हावे भजन करावे। भक्ती करावी देवाची।
आता तरी गोष्टी ऐका। रामी रामदासाची।।
समर्थानी आणखीही काही लावण्या लिहिल्या होत्या. परंतु त्यांचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. कुमार गंधर्वासारख्या प्रज्ञावान कलाकाराने त्यातील काही लावण्यांना चाली लावल्या होत्या, असेही कोठेतरी वाचल्याचे स्मरते. कोणीतरी त्या ध्वनिमुद्रित केल्या असतील आणि कधी ना कधी ते ध्वनिमुद्रण तुमच्या-आमच्यासारख्या जनसामान्यांना उपलब्ध होईल अशी आशा बाळगायला हवी.
या लावणीप्रमाणे रामदासांची डफगाणीदेखील त्यांच्यातील कलात्मक कवीची ओळख करून देणारी आहेत..
गगन निश्चळ पोकळ। चहुकडे अंतराळ।
तरी मग आकाश पाताळ। का म्हणावे।।
पृथ्वीकरिता पडिले नाव। येरवी नावा नाही ठाव।
कळावयाचा उपाव। नानामते।।
या व अशा सगळ्याच डफगाण्यांत रामदास असे गंभीर वा तत्त्वचिंतक नाहीत. उदाहरणार्थ हे डफगाणे..
शिवराव देवराव द्यानतराव दलपतराव।
दिनकरराव दळबटराव धारेराव।
अभिमानराव अद्भुतराव अमृतराव।
अवघडराव अनंदराव अवधुतराव आजीराव।
हे संपूर्ण डफगाणे असे रावांचे गाणे आहे. त्यात या अशा रावांखेरीज काही नाही. असे एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ७७ राव या डफगाण्यात आहेत. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे या गाण्यातील पहिला शब्द ज्या अक्षराने सुरू होतो त्याच अक्षरात पुढील राव आहेत.
हे डफगाणे जसे रावांचे, तसे आणखी एक प्रदीर्घ डफगाणे केवळ गावांचे आहे.
काशी कांची कोल्हापूर। काश्मिर कुशावर्त काउर।
कानड कर्णाट कउर। कनकलंका।।
खडकि खडके खडकवाडी। खडसी खराडे खराडी।
खेराव खांबाळे खरपुडी। खांबगाव।।
जांब जांबी जांबुळपुरी। जवळे जवळगाव जेजुरी।
जुन्नर जाफळे जांभेरी। जांबुत जलगाव।।
हे केवळ वानगीदाखल. असे एकेका अक्षराने सुरू होणाऱ्या गावांच्या व्यवस्थित ६० ओव्या या डफगाण्यात आहेत. एका ओवीत सात ते आठ गावे. म्हणजे ६० ओव्यांतून जवळपास पाचशे गावांची नावे हे डफगाणे सादर करते. साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी इतका भूगोल माहीत असणे हे सर्वार्थाने कौतुकास्पदच म्हणावे लागेल. अर्थात त्याकाळी रामदास पंजाब प्रांतापर्यंत पर्यटन करून आले होते. त्यामुळे त्यांचे भूगोलाचे ज्ञान निर्विवाद उत्तमच असणार. पण तरीही आजच्या गुगलेश्वरी शरणाधीन होण्याच्या काळासाठी ते निश्चितच थक्क करणारे आहे.
या सगळ्यातील शब्दकळा तर वाखाणण्याजोगीच. पण तंत्रावरील हुकमतही तितकीच ताकदीची. प्रतिभा आणि तिला वाकवणारी तंत्रावरील हुकमत यांचा समसमा संयोग रामदासांच्या ठायी झालेला असल्याने शीघ्रकवित्व त्यांना साध्य झाले होते. एकदा रामदास परळीहून- म्हणजे आताच्या सज्जनगडावरून चाफळास येण्यास निघाले असता मधे पाली येथे खंडोबाची यात्रा भरलेली त्यांना दिसली. तेथे दोन शाहिरांचे सवालजबाब सुरू होते. त्यातल्या एकाला अर्थातच समोरच्याला निरुत्तर केल्याचा गर्व झाला. आपल्या बुद्धीपुढे समोरचा नमला हे पाहून हर्षोत्साहित झालेला शाहीर पाहून रामदासांनी त्याला त्याच्याच काव्यशैलीत उत्तर दिले. ते असे..
किती पृथ्वीचे वजन। किती आंगोळ्या गगन।
सांग सिंधूचे जीवन। किती टांक।।
किती आकाशीचा वारा। किती पर्जन्याच्या धारा।
तृण भूमिवरी चतुरा। संख्या सांग।।
अशा पद्धतीने प्रश्न विचारीत रामदास त्यास त्याच्या मर्यादांची जाणीव करून देतात. शेवटी नम्रतेची आस का गरजेची आहे, ते सांगताना रामदास म्हणतात..
ऐक जें जें पुशिले तुज। तें तें आता सांगे मज।
अनंत ब्रह्मांडे बेरीज। किती जाहली।।
रामदासांचा विनोद। सांडी अहंतेचे बीज।
मग स्वरूपी आनंद। सुखी राहे।।
या अशा काव्यगुणांचे अनेक दाखले देता येतील. जिज्ञासूंनी ते मुळातूनच वाचावे. एक संत काय काय पद्धतीने विचार करतो, किती रोखठोकपणे ते मांडतो, आणि तरीही ते तसे करताना आपल्यातील अलवारपणास तडा जाऊ देत नाही, हे सारेच विलक्षण आहे. पुन: पुन्हा प्रेम करावे असे!
समर्थ राधक – samarthsadhak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा