ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव गतसप्ताहात निवर्तले. मराठी दैनिकांनी दखल घेतली; पण बातमीपुरती. प्रस्तुत दैनिकाने मात्र त्यांच्यावर सविस्तर मृत्युलेख लिहिला. एखाद्या समीक्षकावर मृत्युलेख लिहिणारी दैनिके आता मराठीत तरी फारशी नाहीत. तेव्हा या अग्रलेखाबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन.
परंतु या अग्रलेखातील एक उल्लेख मात्र अयोग्य. या अग्रलेखात रा. ग. जाधव यांच्या साहित्यिक कामगिरीविषयी लिहिताना प्रस्तुत दैनिकाच्या संपादकांनी ‘सैराट’ हा शब्द जाधव यांनी पहिल्यांदा वापरला, अशा प्रकारचे विधान केले, ते बरोबर नाही. या संपादकांना बहुधा माहीत नसावे की समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकात ‘सैराट’ हा शब्द आढळतो.
क्रियेवीण नानापरी बोलिजेते।
परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते॥
मना कल्पना धीट सैराट धावे।
तया मानवा देव कैसेनि पावे॥
हा मनाच्या श्लोकातील १०४ क्रमांकाचा श्लोक.
सध्या ‘सैराट’ हा चित्रपट सगळीकडे चर्चेचा विषय आहे. त्यामुळे अर्थातच तो शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी. अनेकांचा तर समज असा की, या चित्रपटानेच या ‘सैराट’ या शब्दाला जन्म दिला. तर तसे नाही. अगदी मनाच्या श्लोकातदेखील हा शब्द वापरला गेला आहे.
आपल्या संतपरंपरेचे हेच तर मोठे वैशिष्टय़! अत्यंत सोप्या, लोभसवाण्या भाषेत ते इतका मोठा संदेश देऊन जातात, की त्याने थक्कव्हावे. हे असे थक्क होणे दोन कारणांचे. एक म्हणजे त्यांनी दिलेला सल्ला आणि दुसरे म्हणजे तो देताना वापरलेली भाषा. प्रसंगानुरूप भाषेचा वापर हे संतांचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. समर्थ रामदासही यास अपवाद नाहीत. आता हेच पाहा-
जनाचे अनुभव पुसतां।
कळहो उठिला अवचिता।
हा कथाकल्लोळ श्रोतां।
कौतुकें ऐकावा॥
किती सुंदर शब्द आहे हा ‘कथाकल्लोळ’! आपण जे काही सांगणार आहोत, ते कथाकल्लोळ आहे, असे रामदास एका समासाच्या सुरुवातीलाच म्हणतात. दुसऱ्या एका ठिकाणी रामदास ‘ज्ञानघन’ हा शब्द वापरतात.
परमात्मा परमेश्वरु।
परेश ज्ञानघन ईश्वरु।
जगदीश जगदात्मा जगदेश्वरु ।
पुरुषनामें॥
‘परेश ज्ञानघन ईश्वरु’ ..काय रचना आहे! अलीकडे एखाद्याविषयी बोलताना आजची तरुण मंडळी ‘ही व्यक्ती जरा हटकेच आहे’ अशा स्वरूपाचा शब्दप्रयोग करीत असतात. त्यांच्या म्हणण्याचा मथितार्थ इतकाच, की सदरहू व्यक्ती ही सर्वसामान्यांसारखी नसून इतरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. यातील ‘हटके’ हा शब्दप्रयोग त्यामुळे अनेकांना आजच्या पिढीचा वाटू शकतो. परंतु रामदासांनी तो करून ठेवला आहे. इतकेच काय, त्यांच्या काव्यातला ‘हटके’ हा नुसता ‘हटके’ नसून थेट ‘हटकेश्वर’ आहे. उदाहरणार्थ-
आवर्णोदकीं हटकेश्वर।
त्यास घडे नमस्कार।
महिमा अत्यंतचि थोर।
तया पाताळलिंगाचा॥
आता हटकेश्वर म्हटल्यास त्याचा महिमा थोर असणार हे सांगावयास नकोच.
आपल्या बोलण्यात अनेकदा- अमुकला कोणाचे काही कौतुकच नाही, असे उद्गार कधी ना कधी निघालेले असतात. गुणग्राहकतेचा अभाव असलेले वाढत गेले की त्यांचा एक समुदायच तयार होतो. रामदासांच्या मते, हा ‘टोणपा समुदाव.’ ते म्हणतात-
जेथें परीक्षेचा अभाव। तो टोणपा समुदाव।
गुणचि नाहीं गौरव। येईल कैंचें॥
या अशा टोणप्या समाजापुढे काही सादर करावे लागणे म्हणजे शिक्षाच. अरसिकेषु कवित्वम्.. असा श्लोक आहेच की! हे झाले श्रोत्यांचे. पण रामदास याप्रमाणे कवी आणि काव्य कसे असावे हेदेखील सांगतात.
कवित्व असावें निर्मळ। कवित्व असावें सरळ।
कवित्व असावें प्रांजळ। अन्वयाचें॥
कवित्व असावें कीर्तीवाड। कवित्व असावें रम्यगोड।
कवित्व असावें जाड। प्रतापविषीं॥
कवित्व असावें सोपें। कवित्व असावें अल्परूपें।
कवित्व असावें सुल्लपें। चरणबंद॥
‘सुल्लपे’ हा यातील आणखी एक असा नवा शब्द. काव्य कसे असावे, हे सांगितल्यानंतर रामदास स्वत: त्याप्रमाणे आपले काव्यगुण तोलून दाखवतात. त्याचप्रमाणे कवित्व कसे नसावे, हेदेखील ते आवर्जून सांगतात.
कवित्व नसावें धीटपाठ। कवित्व नसावें खटपट।
कवित्व नसावें उद्धट। पाषांडमत॥
कवित्व नसावें वादांग। कवित्व नसावें रसभंग।
कवित्व नसावें रंगभंग। दृष्टांतहीन॥
कवित्व नसावें पाल्हाळ। कवित्व नसावें बाष्कळ।
कवित्व नसावें कुटीळ। लक्षुनियां॥
हीन कवित्व नसावें। बोलिलेंचि न बोलावें।
छंदभंग न करावें। मुद्राहीन॥
हे त्यांनी स्वत:च स्वत:ला लावून घेतलेले निकष पाहिले की रामदासांचे लेखन हे रसाळ का आहे, हे समजून घेता येते. उदाहरणार्थ- या त्यांच्या ओळी वाहत्या पाण्याविषयी..
वळणें वांकाणें भोवरे। उकळ्या तरंग झरे।
लादा लाटा कातरे। ठाई ठाई॥
शुष्क जळाचे चळाळ। धारा धबाबे खळाळ।
चिपळ्या चळक्या भळाळ। चपळ पाणी॥
फेण फुगे हेलावे। सैरावैरा उदक धावे।
थेंब फुई मोजावे। अणुरेणु किती॥
वोसाणे वाहती उदंड। झोतावे दर्कुटे दगड।
खडकें बेटें आड। वळसा उठे॥
या ओळी वाचून तो वाहत्या पाण्याचा प्रवाहच जणू डोळ्यासमोर येतो. यातील शब्दकळा अनुभवावी अशीच. चळाळ, चळक्या, थेंबफुई, दुर्कुटे.. किती म्हणून शब्द सांगावेत.
भाषा ही दुहेरी अनुभवायची असते. ती मनातल्या मनात वाचताही येते आणि तिचे सादरीकरणही होते. सादरीकरण करताना रामदास जे शब्दांशी खेळले आहेत, ते आजच्या खटपटय़ा कवींनाही जमणार नाही. एकेक अक्षरावरून रामदासांनी शब्दमाला सादर केल्यात.
खटखट खुंटून टाकावी। खळखळ खळांसीं न करावी।
खरें खोटें खवळों नेदावी। वृत्ति आपुली॥
गर्वगाणें गाऊं नयें। गातां गातां गळों नये।
गोप्य गुज गर्जो नये। गुण गावे॥
घष्टणी घिसणी घस्मरपणें। घसर घसरूं घसा खाणें।
घुमघुमोंचि घुमणें। योग्य नव्हे॥
नाना नामे भगवंताचीं। नाना ध्यानें सगुणाचीं।
नाना कीर्तनें कीर्तीचीं। अद्भुत करावीं॥
चकचक चुकावेना। चाट चावट चाळवेना।
चरचर चुरचुर लागेना। ऐसें करावें॥
छळछळ छळणा करूं नये। छळितां छळितां छळों नयें।
छळणें छळणा करूं नये। कोणीयेकाची॥
जि जि जि जि म्हणावेना। जो जो जागे तो तो पावना।
जपजपों जनींजनार्दना। संतुष्ट करावें॥
झिरपे झरे पाझरे जळ। झळके दुरुनी झळाळ।
झडझडां झळकती सकळ। प्राणी तेथें॥
या या या या म्हणावें नलगे। याया याया उपाव नलगे।
या या या या कांहींच नलगे। सुबुद्धासी॥
टक टक टक करूं नये। टाळाटाळी टिकों नये।
टम टम टम टम लाऊं नये। कंटाळवाणी॥
ठस ठोंबस ठाकावेना। ठक ठक ठक करावेना।
ठाकें ठमकें ठसावेना। मूर्तीध्यान॥
डळमळ डळमळ डकों नये। डगमग डगमग कामा नये।
डंडळ डंडळ चुकों नये। हेंकाडपणें॥
ढिसाळ ढाला ढळती कुंचे। ढोबळा ढसकण डुले नाचे।
ढळेचिना ढिगढिगांचे। कंटाळवाणे॥
तेव्हा अशा तऱ्हेने हे साहित्यवाचन हा एक ‘सैराट’ अनुभव ठरावा.
समर्थ रामदास
samarthsadhak@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा