मदर तेरेसा ख्रिस्ती धर्मातील. त्यांच्या चमत्कारक्षमतेमुळे त्यांना आता संतपद दिले जाणार असल्याचे गेल्या सप्ताहात निश्चित झाले. त्यासंबंधीच्या अधिकृत घोषणेचे वृत्त नुकतेच आले. त्यांच्या कथित चमत्कारांच्या कथाही यानिमित्ताने पुन्हा चर्चिल्या गेल्या. या अशा चमत्कारांचे आकर्षण सर्वच धर्मातील मूढजनांना असते. परिणामी एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या वा तिच्या चमत्कारांचीच चर्चा अधिक होते. म्हणजे ज्ञानेश्वरीतील काव्यकर्तृत्वापेक्षा, डोळे दिपवणाऱ्या या तरुणाच्या प्रतिभेपेक्षा त्याने रेडय़ाच्या तोंडून वेद वदवले वा भिंत चालवली याचे समाजास कौतुक अधिक.
अलीकडे तर अशा चमत्कार करून दाखवणाऱ्या व्यक्तींची दुकाने अधिकच जोमात चालतात. कोणी आजार बरा करून दाखवतो, कोणी निराशा दूर करतो, कोणाच्या लत्ताप्रहाराने उत्कर्षांचे सर्व दरवाजे उघडतात, तर कोणाच्या केवळ मिठीने भाग्योदय होतो. कोणी हवेतून उदी काढतो, तर कोणाच्या करंगळीतून स्त्रवणाऱ्या तीर्थात अमृताचे गुण असतात.
वास्तवात या सगळ्यामागे जास्तीत जास्त हातचलाखी असते असे म्हणता येईल. जादूगार तेच करीत असतात. वास्तवात ते अधिक प्रामाणिक. कारण ते रंगमंचावरून चमत्कार करतात आणि आपला आकर्षक पेहेराव उतरवून नंतर सामान्य माणसासारखे वागू लागतात. परंतु चमत्कारांच्या जीवावर ते स्वत:स स्वघोषित गुरू म्हणवून घेत नाहीत आणि अध्यात्माचे नवीन दुकान काढीत नाहीत. कोणाही बुद्धिवाद्यास या चमत्कारांतील फोलपणा सांगायचीही गरज नाही. अशा बुद्धिवानांतील शिरोमणी समर्थ रामदास यांना तर नाहीच नाही. रामदासांनी आपल्या वाङ्मयातून, उपदेशांतून या चमत्कारींवर चांगलेच कोरडे ओढले आहेत..
‘जे करामती दाखविती। तेहि गुरु म्हणिजेती।
परंतु सद्गुरु नव्हेती। मोक्षदाते।’
इतक्या स्वच्छपणे रामदासांनी करामतखोर गुरूंना बडतर्फ करून टाकले आहे. हे गुरू वागा-बोलायला मोठे आकर्षक असतात. त्यांची वाणी मिठ्ठास असते. ते दिसतात लोभस. प्रेमळही वाटतात. व्याधी असेल तर काही औषध वगैरे देतात. त्यांच्या डोळ्यांत मोठी करुणा असते. आणि या सगळ्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा सहज विश्वास जडतो.
‘अद्वैतनिरूपणें अगाध वक्ता। परी विषई लोलंगता।
ऐसिया गुरुचेनि सार्थकता। होणार नाहीं।’
म्हणजे या गुरूंचे वक्तृत्व मोठे आकर्षक असेल. परंतु केवळ त्याच्या प्रेमात पडून अशा व्यक्तीस गुरूपदी बसवणे योग्य नाही. त्यांच्यामुळे काही साध्य होणार नाही. परंतु हे कोणी लक्षातच घेत नाही. आणि या अशा गुरूंच्या मायाजालात त्यामुळे भक्त अलगद पडतात. परंतु हे गुरू म्हणजे..
‘सभामोहन भुररीं चेटकें। साबर मंत्रकौटालें अनेकें।
नाना चमत्कार कौतुकें। असंभाव्य सांगती।।
सांगती औषधीप्रयोग। कां सुवर्णधातूचा मार्ग।
दृष्टिबंधनें लागवेग। अभिळाषाचा।।’
असे रामदासांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, गुरू कोण, हे समजून घ्यायला अगदी सोपे आहे. जगण्याची विद्या शिकवतो तो रामदासांच्या मते गुरू असू शकतो. पण तो सद्गुरू नव्हे. तसे तर हिंदू संस्कृती आई-वडिलांनाही गुरू मानते. ते असतातही. अलीकडे तर अनेक गुरू गुरुपौर्णिमा वगैरे उत्सवांच्या निमित्ताने आपल्या भक्तांचा गोतावळा जमा करतात आणि स्वत:चा उत्सव करून घेतात. वास्तविक भक्ताला आपले नियत कर्तव्य सोडून यायला भाग पाडतो तो गुरू कसा, असा प्रश्नही सामान्यांना पडत नाही. त्यामुळे ही माणसे मग रजा वगैरे घेऊन गुरूचे पाय चेपायला जातात आणि धन्य धन्य झाल्याचा आनंद मानतात. परंतु हे गुरू नव्हेत. या जगण्याच्या, जगण्यातील क्षुद्र संघर्षांच्या वर घेऊन जाणारा तो खरा गुरू.
‘वासनानदीमाहापुरीं। प्राणी बुडतां ग्लांती करी।
तेथें उडी घालून तारी। तो सद्गुरु जाणावा।।
गर्भवास अति सांकडी। इछाबंधनाची बेडी।
ज्ञान देऊनि सीघ्र सोडी। तो सद्गुरु स्वामी।।
फोडूनि शब्दाचें अंतर। वस्तु दाखवी निजसार।
तोचि गुरु माहेर। अनाथांचें।।’
रामदासांनी किती सोपी व्याख्या केली आहे गुरूची! ती महत्त्वाची अशासाठी, की हे असे जगण्यापलीकडचे शिकवता येणे, त्याची ओढ लावणे अत्यंत महत्त्वाचे. ती लागली, की आनंदाच्या डोहाची एक कायमस्वरूपी शाखा त्याच्या अंगणाचे शिंपण करते. आहार, निद्रा, भय आणि मैथुनाच्या गुळगुळीत झालेल्या चक्रात जगून जगून दमलेल्यांस असा गुरू मिळणे हे फारच भाग्याचे.
तेव्हा ज्याने कोणी एखाद्याला गुरू मानलेले असेल त्याने या पाश्र्वभूमीवर आपल्या गुरूची तपासणी करायला हवी.
आता गुरू या व्यवस्थेकडे पारंपरिक नजरेने पाहणारे या सल्ल्यावर आश्चर्य व्यक्त करतील. गुरूची परीक्षा पाहणारे आपण कोण? आपण कसे काय गुरूस जोखणार? तो कोठे, आपण कोठे? अशा पारंपरिक भावना दाटून हे आपण कसे काय करणार, असा प्रश्न त्यांना पडू शकेल. पण ते चुकीचे आहे. कारण एखाद्यास जशी सद्गुरूची गरज असते, तशीच सद्गुरूलाही सद्शिष्याची गरज असतेच. शिष्यच नसेल तर तो गुरूपदास कसा पोहोचणार?
‘सद्गुरुविण सच्छिष्य। तो वायां जाय नि:शेष।
कां सच्छिष्येंविण विशेष। सद्गुरु सिणे।।’
म्हणजे जसे सद्गुरूअभावी शिष्य वाया जातो, तसाच सद्शिष्याअभावी गुरूदेखील निकामी होतो. तेव्हा रामदासांनी सांगितल्याप्रमाणे गुरूदेखील पारखून घ्यावा. एखाद्याच्या चमत्कार वगैरे करण्याने डोळे दिपतीलही, परंतु त्यास गुरू मानू नये. रामदास सांगतात..
‘शिष्यास न लविती साधन। न करविती इंद्रियेंदमन।
ऐसे गुरु अडक्याचे तीन। मिळाले तरी त्यजावे।।’
हे असे गुरूलाही तपासून घेणे फारच आवश्यक. कारण एखाद्याने अयोग्य व्यक्तीस गुरू केले तर त्याचे अनुकरण अन्यांकडूनही होण्याची शक्यता असते. वैद्य ज्याप्रमाणे दुराचारी असून चालत नाही-
‘जैसा वैद्य दुराचारी। केली सर्वस्वें बोहरी।
आणी सेखीं भीड करी। घातघेणा।।’
गुरूने शिष्याच्या मनातील अज्ञान दूर करून त्यास ज्ञानमार्गावर नेणे आवश्यक असते. शिष्याच्या कलाने घेत घेत, त्याला जे आवडते तेच करत आपले दुकान चालवणारे गुरू हे गुरूच नव्हेत.
‘जें जें रुचे शिष्या मनीं। तैसीच करी मनधरणी।
ऐसी कामना पापिणी। पडली गळां।।
जो गुरु भीडसारु। तो अद्धमाहून अद्धम थोरु।
चोरटा मैंद पामरु। द्रव्यभोंदु।।’
रामदास सांगतात त्याप्रमाणे पाहू गेल्यास किती गुरू या कसोटीवर उतरतील? या कसोटीवर अनुत्तीर्ण होणाऱ्या गुरूंची संभावना रामदास अधम, द्रव्यभोंदू, मैंद, चोरटा अशा शेलक्या शब्दांत करतात. ही बाब लक्षात घ्यावी अशी. कारण सध्याच्या काळात अशाच गुरूंचा मोठा सुळसुळाट झालेला आहे. ‘चमत्कार जेवढा मोठा, तेवढा गुरू मोठा!’ असे मानण्याकडे सामान्यांचा कल झाला आहे. पण ते खरे नव्हे. भौतिक ताकदीखेरीज या जगात काही होऊ शकत नाही. जे काही होते त्यामागे कार्यकारणभाव असतोच असतो. तो समजून घेता येत नसेल तर ती आपल्या बुद्धीची मर्यादा असते. तो चमत्कार नसतो. म्हणूनच ही असली चमत्कारक्षमता दाखवणारे गुरू हे थोतांड असतात. ते फुकट मिळाले तरी नाकारावेत.
समर्थ साधक  samarthsadhak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा