‘करुणा’ या भावनेचासुद्धा एक गुंता आहे. म्हणजे ती नक्की कोणाविषयी असावी? रक्षकाच्या मनात शर्विलकाविषयी असावी का? गुन्हेगाराविषयी शासनाच्या मनात ती असावी का? अत्याचारांत होरपळणाऱ्या अश्रापांविषयी ती असावीच. पण अत्याचार करणाऱ्यास शासन होत असताना त्याच्याविषयीही ती असावी का?
याचे उत्तर अर्थातच ‘नाही’ असे असेल. मग करुणाष्टकांचा अर्थ काय? आणि त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची गरजच काय?
तेव्हा यासंदर्भात आवर्जून लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे रामदासांकडून व्यक्त होणारी करुणा ही एका क्रियाशील कर्तृत्ववानाची करुणा आहे. या अशा कर्तृत्ववानांच्या करुणेस काहीएक अर्थ असतो. म्हणजेच या करुणेमागे काही कर्तृत्व नसेल तर अशांच्या ठायी असणाऱ्या करुणेस कींव किंवा कणव म्हणतात. महाभारतात ऐन युद्धक्षणी रुतलेले रथाचे चाक राधेयाविषयी करुणा उत्पन्न करते. ‘रथचक्र उद्धरू दे..’ असे म्हणणारा कर्ण म्हणूनच केविलवाणा वाटत नाही. आपला पोटचा मुलगा शत्रुपक्षाला मिळालेला पाहणे नशिबी आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीदेखील म्हणूनच आपल्या मनात करुणा उत्पन्न होते. कींव येते ती संभाजीची.
करुणा आणि कणव यांत हा फरक आहे. रामदासांची करुणाष्टके त्याचमुळे आपल्या मनात नकळतपणे एक उदात्ततेची भावना दाटून आणतात. सोळाव्या शतकात आनंदवनभुवनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणाऱ्या, शक्तीची उपासना करा असे सांगणाऱ्या, कोणत्याही इहवादी सौख्यास कमी न लेखणाऱ्या समर्थ रामदासांची करुणाष्टके म्हणूनच अतीव आनंददायी ठरतात. एरवी कोणीतरी कोणाविषयी व्यक्त केलेली करुणा ही अन्यांना दखलपात्र का वाटावी?
इंद्रिय दमन झालेले, बरेच काही साध्य करून झालेले समर्थ या करुणाष्टकांतून स्वत:साठी काही मागतात. कसली असते ही मागणी?
‘उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी।
अति आदरे सर्व सेवा करावी।
सदा प्रीति लागो तुझे गुण गातां।
रघुनायका मागणे हेंचि आतां॥’
ही अशी उदासीनतेची आस लागणे केव्हाही महत्त्वाचे. ती महत्त्वाची अशासाठी, की आपल्या कर्तृत्वाने काही साध्य झाल्यावर त्या यशाबाबत मनात मालकी हक्क उत्पन्न होऊ नये, म्हणून.
‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे/ उदास विचारे वेच करी’ या तुकारामांच्या सल्ल्यामध्येही हीच उदासी आहे. ती नसेल तर माणसाच्या मनात ‘मी’ जागा होतो. एकदा का तो जागा झाला, की तो मनात सतत नागासारखा फणा काढूनच असतो. ही ‘मी’पणाची भावना विसरून जाता येणे हे म्हणूनच महत्त्वाचे. अशावेळी ही संत मंडळी परमेश्वराला मधे घेतात. म्हणजे ‘मी काही केले’ असे म्हणण्याऐवजी ‘माझ्याकडून त्याने ते घडवले’ असे त्यांचे म्हणणे. त्यासाठी रामदास म्हणतात-
‘सदासर्वदा योग तुझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा।
नुपेक्षी कदा गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणें हेंचि आतां।।’
सर्व इच्छा आहे चांगल्या कारणासाठी आपला देह पडावा, याची. आणि त्याचबरोबर त्यातल्या आणखी एका इच्छेची.. ती म्हणजे- गुणवंताची उपेक्षा कधी होऊ नये, याची. किती महत्त्वाची आणि अमलात यायला किती अवघड अशी इच्छा आहे ही. सर्वसाधारण आपला अनुभव असा की गुणवंताची उपेक्षा ही नित्यनियमाचीच. साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी व्यक्त केलेली गुणवंतांची उपेक्षा होऊ नये, ही चिंता आजही किती सार्थ आहे आणि आजही रघुनायकाकडे हेच मागणे मागावे लागत आहे, हे वास्तव किती कटू आहे.
करुणाष्टकातली खरी काव्यात्म आर्तता आहे ती त्याच्या शेवटच्या भागात. तो सुरू होतो..
‘युक्ति नाही बुद्धि नाही।
विद्या नाही विवेकिता।
नेणता भक्त मी तुझा।
बुद्धि दे रघुनायका॥’
या श्लोकाने. यातल्या तपशिलाविषयी, त्याच्या अर्थाविषयी सर्वजण सहमत होतील- न होतील; परंतु त्याच्या काव्यगुणाविषयी मात्र कोणतेही दुमत असणार नाही.
‘मन हे आवरेना की।
वासना वावडे सदा।
कल्पना धावते सैरा।
बुद्धि दे रघुनायका॥’
ही सैरा धावणारी कल्पना आपल्याला कधी ना कधी डसलेली असते. नियंत्रण नसलेल्या या कल्पनेवर स्वार होणे आणि आपल्याला हव्या त्याच ठिकाणी तिला नेणे हे बुद्धीचे कौशल्य असते. रामदास नेमकी तीच बुद्धी त्यांच्या देवाकडे.. रघुनायकाकडे मागतात. यातला लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे प्रत्येकाला तो रघुनायक रामदासांना भासला तसा भासेल असे नाही. प्रत्येकाचा रघुनायक तोच असेल असे नाही. पण प्रत्येकाला एक तरी रघुनायक असायला हवा, हे मात्र खरे. या रघुनायकाची आळवणी ही प्रत्येकाचे जीवनध्येय असते.. असायला हवे. तो मूर्तच असायला हवा असे नाही. हा रघुनायक कोणासाठी एखादा ग्रंथ असेल, एखादी ज्ञानशाखा असेल, एखादा राग असेल, एखादे पद असू शकेल, किंवा एखाद्यासाठी स्वत:चे मन हेच रघुनायक असेल. पण त्या रघुनायकाच्या साक्षीने आयुष्याचा प्रवास आनंददायी होत असतो. या रघुनाथाची आस लागावी लागते. प्रसंगी त्या रघुनायकापुढे मान्य करावे लागते, की..
‘बोलतां चालतां येना।
कार्यभाग कळेचिना।
बहू मी पीडलो लोकीं।
बुद्धि दे रघुनायका।।’
‘मला काहीही जमत नाही, बहू मी पीडलो लोकी ’ असे ज्यास सांगता येईल असा रघुनाथ आयुष्यात असणे हीच किती लोभस बाब आहे. या रघुनायकासमोर रामदास काय काय सांगतात..
‘नेटकें लिहितां येना।
वाचितां चुकतो सदा।
अर्थ तो सांगता येना।
बुद्धि दे रघुनायका॥
प्रसंग वेळ तर्केना।
सुचेना दीर्घ सूचना।
मैत्रिकी राखितां येना।
बुद्धि दे रघुनायका।।’
आणि हे सगळे कधी? आणि का? तर काया-वाचा-मनोभावे मी स्वत:ला तुझा समजत असल्याने माझ्या अशा अवस्थेने तुझीच लाज निघेल म्हणून. तेव्हा तसे होऊ नये म्हणून तरी मला बुद्धी दे, असे रामदास म्हणतात.
‘काया वाचा मनोभावे।
तुझा मी म्हणवीतसे।
हे लाज तुजला माझी।
बुद्धि दे रघुनायका।।’
ही एक अवस्था असते. प्रत्येकास त्यातून जावे लागते. जे बुद्धीचे प्रामाणिक आणि खमके असतात ते या परिस्थितीवर मात करतात आणि त्यातून बाहेर येतात. ती वेळ, तो काळ असा असतो, की त्यात स्वार्थ काय अािण परमार्थ काय, याचे भानच सुटते.
‘कळेना स्फूर्ति होईना।
आपदा लागली बहू।
प्रत्यही पोट सोडीना।
बुद्धि दे रघुनायका॥
संसार नेटका नाहीं।
उद्वेगो वाटतो जीवीं।
परमार्थू कळेना की।
बुद्धि दे रघुनायका॥’
हे सगळेच काव्य मोठे आर्त आहे. त्यातला एक श्लोक माझा सर्वात आवडता. प्रत्येकाला कधी ना कधी अनुभवायला लागलेला.
‘उदास वाटते जीवी।
आता जावे कुणीकडे।
तू भक्तवत्सला रामा।
बुद्धि दे रघुनायका॥’
ही अशी कलात्मक आर्तता प्रत्येकास लाभो!
(उत्तरार्ध)
सर्मथ साधक – samarthsadhak@gmail.com
उदास वाटते जीवी..
‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे/ उदास विचारे वेच करी’ या तुकारामांच्या सल्ल्यामध्येही हीच उदासी आहे.
Written by सर्मथ साधक
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-07-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व रामदास विनवी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Philosophy of saint samarth ramdas