पु. ल. देशपांडे यांची ‘म्हैस’ ही तशी विख्यात कथा. त्यात म्हशीचे वर्णन वगरे जे काही आहे ते बहारदारच. परंतु त्याआधी बसमधल्या प्रवाशांच्या झोपेच्या ज्या तऱ्हा त्यांनी वर्णिल्या आहेत, त्या त्यांच्या निरीक्षणशक्तीची प्रचीती देतात. चालत्या बसमधले प्रवासी डोळा लागला की बऱ्याचदा एकमेकांच्या खांद्यावर माना टाकतात. पुलंनी त्याचे वर्णन ‘स्कंदपुराण’ असे केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुलंच्या आधी साडेतीनशे वष्रे रामदासांनी असेच माणूस किती प्रकारे झोपतो याचे वर्णन करून ठेवले आहे. तेही तितकेच बहारदार आणि त्यांच्या निरीक्षणशक्तीचा प्रत्यय देणारे. दासबोधात ‘निद्रानिरूपण’ असा एक खास समासच त्यांनी अंतर्भूत केलेला आहे. वाचायला हवा तो.

‘निद्रेनें व्यापिली काया। आळस आंग मोडे जांभया।  तेणेंकरितां बसावया। धीर नाहीं॥’

झोप आली की हे असेच होते. माणसे जेथे कोठे असतात तेथे पेंगायला लागतात. काय होते त्याच्या आधी?

‘कडकडां जांभया येती। चटचटां चटक्या वाजती।

डकडकां डुकल्या देती। सावकास॥

येकांचे डोळे झांकती। येकाचे डोळे लागती।

येक ते वचकोन पाहाती। चहुंकडे॥’

जांभया देणे अनावर होते. काहीजण चुटक्या वाजवून झोपेस लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. फारच अनावर झाली तर काही बसल्या ठिकाणी पेंगायला लागतात. हा अनुभव आपणही कधीतरी घेतलेला असतो. तसे झाले की मानेला एका क्षणी झटका बसतो. आणि तसा झटका बसला की तात्पुरती जाग येऊन ती व्यक्ती ओशाळी होत आसपास पाहते. कोणी पाहिले तर नसेल आपल्याला- अशी खंत असते त्यामागे. याच्या पुढची अवस्था म्हणजे माणसे प्रत्यक्ष आडवी होतात. निद्रेस अधिक दूर ठेवणे त्यांना जमत नाही. कशी झोपतात माणसे? किंवा झोपलेली माणसे दिसतात कशी?

‘येक हात हालविती। येक पाय हालविती।

येक दांत खाती। कर्कराटें॥

येकांचीं वस्त्रें निघोनि गेलीं। ते नागवींच लोळों लागलीं।

येकांचीं मुंडासीं गडबडलीं। चहुंकडे॥

येक निजेलीं अव्यावेस्तें। येक दिसती जैसीं प्रेते।

दांत पसरुनी जैसीं भूतें। वाईट दिसती॥’

यास काही स्पष्टीकरणाची गरज नसावी. परंतु वस्त्रे निघोन गेली, येक दिसती जैसी प्रेते, दांत पसरूनी.. भुते.. हे वर्णन फारच भयंकर म्हणावे लागेल. म्हणजे झोप उडवणारेच. आपले असे तर नाही होत, असा प्रश्न प्रत्येकास हे वाचून पडेलच पडेल. आता हे पाहा..

‘येक हाका मारूं लागले। येक बोंबलित उठिले।

येक वचकोन राहिले। आपुले ठाईं॥

येक क्षणक्षणा खुरडती। येक डोई खाजविती।

येक कढों लागती। सावकास॥

येकाच्या लाळा गळाल्या। येकाच्या पिका सांडल्या।

येकीं लघुशंका केल्या। सावकास॥

येक राउत सोडिती। येक कर्पट ढेंकर देती।

येक खांकरुनी थुंकिती। भलतीकडे॥

येक हागती येक वोकिती। येक खोंकिती येक सिंकिती।

येक ते पाणी मागती। निदसुऱ्या स्वरें॥’

हे असे रोखठोक मराठी हे रामदासांचे वैशिष्टय़. अलीकडे सर्वाच्याच जाणिवा हलक्या होण्याच्या काळात तर हे असे मराठी पचनी पडणे अंमळ अवघडच. परंतु अगदी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठीने आपला हा र्कुेबाजपणा सांभाळलेला होता, हे लक्षात घ्यावयास हवे. या अशा तेजतर्रार मराठीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रामदासांचे वाङ्मय. शरीरधर्माची अपरिहार्यता विशद करताना ते एके ठिकाणी म्हणतात..

‘जरी भक्षिता मिष्ठान्न। काही विष्ठा काही वमन।

भगिरथीचे घेता जीवन। त्याची होये लघुशंका॥’

कशास हवे स्पष्टीकरण? असे अनेक दाखले देता येतील. अर्थात समर्थाचा उद्देश याआधी अनेकदा नमूद केल्याप्रमाणे आपली शब्दकळा दाखवणे हा नव्हता. या अशा रोखठोक मुद्दय़ांचा दाखला देत देत ते आपणास अलगदपणे महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे नेतात. हा झोपेचा समासच पाहा..

‘इकडे उजेडाया जालें। कोण्हीं पढणें आरंभिलें।

कोणीं प्रातस्मरामि मांडिलें। हरिकिर्तन॥

कोणीं आठविल्या ध्यानमूर्ति। कोणी येकांतीं जप करिती।

कोणी पाठांतर उजळिती। नाना प्रकारें॥

नाना विद्या नाना कळा। आपलाल्या सिकती सकळा।

तानमानें गायेनकळा। येक गाती॥

मागें निद्रा संपली। पुढें जागृति प्राप्त जाली।

वेवसाईं बुद्धि आपुली। प्रेरिते जाले॥ ’

झोपाळूंचे वर्णन करता करता रामदास योग्य वेळी जागे होण्याचे महत्त्व विशद करतात. आणि मग सुरू होतो- योग्य वेळी जागे होण्याचे महत्त्व सांगणारा समास..

‘अवघाचि काळ जरी सजे। तरी अवघेच होती राजे।

कांहीं सजे कांहीं न सजे। ऐसें आहे॥’

हे योग्य वेळी जागे का व्हायचे? कारण आपापले विहित कर्म करावयाची वेळ होते म्हणून. हे कर्म करावयाचे कारण त्यातूनच जे काही मिळवावयाचे असते ते मिळू शकते. नपेक्षा.. अवघेच होती राजे.. असे रामदास म्हणतात. म्हणजे या कर्माखेरीज फळ मिळत असते तर सर्वच राजे झाले असते. हे राजेपण काहीजणांना मिळते, काहींना नाही. रामदासांच्या मते, हे राजेपण कष्टसाध्य आहे. रामदास नियती, नशीब वगरेंना फार महत्त्व देत नाहीत. कष्ट करायला हवेत. आणि या कष्टांच्या जोडीला विवेक हवा.

‘ऐकल्याविण कळलें। सिकविल्याविण शाहाणपण आलें।

देखिलें ना ऐकिलें। भूमंडळीं॥

सकळ कांहीं ऐकतां कळे। कळतां कळतां वृत्ति निवळे।

नेमस्त मनामधें आकळे। सारासार॥’

जे काही आपण समजून घेऊ इच्छितो ते समजून घेता येते. त्याचे मार्ग रामदास सांगतात. त्यासाठी शहाण्यांचे ऐकावयास हवे.

‘श्रवणीं लोक बसले। बोलतां बोलतां येकाग्र जाले।

त्याउपरी जे नूतन आले। ते येकाग्र नव्हेती॥

मनुष्य बाहेरी हिंडोनि आलें। नाना प्रकारीचें ऐकिलें।

उदंड गलबलूं लागलें। उगें असेना॥’

एकाग्रतेने शहाण्यांचे ऐकावयास हवे. अशा ऐकणाऱ्यांत जरा कोठे काही हिंडून आलेला, पाहून आलेला असला की त्यास वाटते- आपणास फार कळते. रामदास म्हणतात, अशा व्यक्ती उगे असेना. म्हणजे गप्प बसत नाहीत. अशा हिंडणाऱ्यांना सतत वाटत असते- आपणास फार समजते. रामदास विचारतात.. ‘वणवण हिंडोन काय होते।’

म्हणजे उगाच सारखे सारखे हिंडत बसण्याने काय होते? हिंडण्याचे, नवीन स्थळे पाहण्याचे, त्यातून शिकण्याचे महत्त्व रामदासांना आहेच. पण ते म्हणतात,  ‘थोडासा लोकांत। थोडासा येकांत’ हवा. केल्याने देशाटन आहेच. पण म्हणून सारखे देशाटनच करत बसू नये. लोकांत मिसळणे जितके जरुरीचे आहे, तितकेच योग्य वेळी लोकांपासून लांब राहणेदेखील महत्त्वाचे आहे. एकांत म्हणून महत्त्वाचा.

श्रवणाचे महत्त्व सांगून झाल्यावर रामदास लेखनाचे महत्त्व मांडतात. त्यासाठी अक्षर कसे असावे, शाई कशी असावी, बोरू कसा तासावा, आदी अनेक सूचना ते करतात. हे सर्व करायचे कारण- त्यामुळे अर्थभेद करण्याची क्षमता तयार होते म्हणून. ही क्षमता फार महत्त्वाची. कारण त्यामुळे चांगले आणि वाईट असा नीरक्षीरविवेक विकसित होतो. यासंदर्भातले सगळेच श्लोक उद्धृत करावेत इतके सुंदर आहेत.

‘बाष्कळामधें बसो नये। उद्धटासीं तंडों नये।

आपणाकरितां खंडों नये। समाधान जनाचें॥

नेणतपण सोडूं नये। जाणपणें फुगों नये।

नाना जनांचें हृदय। मृद शब्दें उकलावें॥

प्रसंग जाणावा नेटका। बहुतांसी जाझु घेऊं नका।

खरें असतांचि नासका। फड होतो॥

शोध घेतां आळसों नये। भ्रष्ट लोकीं बसों नये।

बसलें तरी टाकूं नये। मिथ्या दोष॥

मज्यालसींत बसों नये। समाराधनेसी जाऊं नये।

जातां येळीलवाणे होये। जिणें आपुलें॥

उत्तम गुण प्रगटवावे। मग भलत्यासी बोलतां फावे।

भले पाहोन करावे। शोधून मित्र॥’

या सगळ्याचा उद्देश एकच..

‘अंतर आर्ताचें शोधावें। प्रसंगीं थोडेंचि वाचावें।

चटक लाउनी सोडावें। भल्या मनुष्यासी॥’

आर्ताचे अंतर.. काय सुंदर कल्पना आहे! रामदासांना समर्थ म्हणतात ते यामुळे.

समर्थ साधक – samarthsadhak@gmail.com