देव म्हणजे काय, तो कोठे असतो, आणि त्याच्या प्राप्तीसाठी काय करावे लागते, यावर रामदास आपल्या वाङ्मयात विविध ठिकाणी ऊहापोह करतात. याआधीच्या स्तंभात आपण रामदासांचा ‘देवळे म्हणजे नाना शरीरे..’ हा विचार पाहिला. त्याचा मथितार्थ इतकाच, की देवाच्या शोधासाठी देवळात जावयास हवे असे नाही. ही बाब अर्थातच जनसामान्यांना लक्षात येणे महाकठीण.
कारण समाजातील मोठा वर्ग नवविधा भक्तीच्या पहिल्या फेऱ्यातच अडकलेला असतो. त्यास पुजण्यासाठी सगुण मूर्ती लागते. एखाद्या देहाप्रमाणे तो त्या निर्जीव मूर्तीचे सगुण कौतुक करवतो. तिचे चोचले पुरवतो. त्यास फुले आदी वाहून, नवेद्य दाखवून जणू काही ही मूर्ती समाधान व्यक्त करणार आहे असे त्यास वाटत असते. भक्तीचा हा सर्वार्थाने प्राथमिक आविष्कार. या वर्गातील व्यक्ती साकार आणि सगुणावरच प्रेम करू शकतात. त्यांची भक्ती करू शकतात. निर्गुण आणि निराकारावर त्यांचा विश्वास नसतो. विचारांची पूजादेखील बांधता येऊ शकते, ही बाब समजणे त्यांच्यासाठी मोठे कठीण काम असते.
हे रामदास ओळखून होते. म्हणूनच सर्व पातळ्यांवर भक्तांसाठी त्यांनी भक्तीचे विविध मार्ग सुचवले. मारुतीची उपासना हा त्यातलाच एक मार्ग. जनसामान्यांना शक्तीची उपासना करण्यास सांगावे तर शक्ती म्हणजे काय, हे त्यांस सांगणे आले. म्हटल्यास ही फक्त कल्पनाच. परंतु सामान्य केवळ कल्पनेचे पूजन करू शकत नाहीत. तेव्हा त्यांना पूजनासाठी एखादा आकार हवा, डोके टेकवण्यासाठी एखादी मूर्ती हवी, असा विचार रामदासांनी केला. त्याच विचारांतून त्यांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे उभारली. तेवढेच करून ते थांबले नाहीत. हा मारुती कसा आहे, हेदेखील त्यांनी जनतेस बजावले. शरीराने तो तगडा आहेच; आणि तरीही तो बुद्धीनेही चपळ आहे, असे रामदासांचे सांगणे. असो. त्याविषयी पुन्हा कधीतरी. येथे मुद्दा आहे तो पूजेसाठी, भक्तीसाठी मंदिरांची गरज खरोखरच आहे असे रामदासांस वाटत होते काय? त्याचे उत्तर निश्चितच नकारार्थी असावे. याचे कारण त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्याकडेचा म्हसोबा वगरे पुजणाऱ्यांची यथेच्छ रेवडी उडवली आहे. उगाच कोणत्याही शेंदूर फासलेल्या दगडास देव मानून माणसे कशी काय पुजू शकतात, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्यांना यासंदर्भात पडलेले प्रश्न किती व्यापक आहेत, पाहा.
‘मातीचे देव धोंडय़ाचे देव। सोन्याचे देव रुप्याचे देव।
काशाचे देव पितळेचे देव। तांब्याचे देव चित्रलेपे।।
रुविच्या लांकडाचे देव पोंवळ्यांचे देव। बाण तांदळे नर्मदे देव।
शालिग्राम काश्मिरी देव। सूर्यकांत सोमकांत।।’
रामदासांचे म्हणणे असे की, प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे देव शोधू पाहतो. आश्चर्य हे, की एकाचा देव दुसऱ्यास देव वाटतोच असे नाही.
‘पावावया भगवंतातें। नाना पंथ नाना मतें।
तया देवाचें स्वरूप तें। कैसे आहें।।
बहुत देव सृष्टीवरी। त्यांची गणना कोण करी ।
येक देव कोणेपरी। ठाईं पडेना।।
बहुविध उपासना। ज्याची जेथें पुरे कामना।
तो तेथेंचि राहिला मना। सदृढ करूनि।।
बहु देव बहु भक्त। इछ्या जाले आसक्त ।
बहु ऋषी बहु मत। वेगळालें।।’
असे म्हणत रामदास कोण कशाकशास देव म्हणून पाहतात त्याचे वर्णन करतात. जितके देव, तितक्या उपासना पद्धती. ‘उदंड उपासनेचे भेद। किती करावे विशद।’ असा प्रश्न ते विचारतात.
‘अत्र गंध पत्र पुष्प। फल तांबोल धूप दीप।
नाना भजनाचा साक्षेप। कोठें करावा।।
देवाचें तीर्थ कैसें घ्यावें। देवासी गंध कोठें लावावें।
मंत्रपुष्प तरी वावें। कोणें ठाई।।’
हे वा असले प्रश्न आपल्यापकी अनेकांना पडले असतील. रामदास त्यांचा उल्लेख करतात तो काही त्या प्रश्नांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नव्हे. ते म्हणतात, या सगळ्याचे महत्त्व खरोखरच आहे काय? या असल्या उपचारांतून देव सापडतो अशी भावना बाळगणे योग्य आहे काय? देव ही जर चिरंतन कल्पना मानली तर देवाचे रूप ज्यात आपण पाहतो त्याचे विसर्जन होते, ते कसे? रामदासांनी विचारलेले हे प्रश्न खरेच गंभीर.
‘मृतिकापूजन करावें। आणी सवेंचि विसर्जावें।
हें मानेना स्वभावें। अंत:कर्णासी।।
देव पूजावा आणी टाकावा। हें प्रशस्त न वाटे जीवा।
याचा विचार पाहावा। अंतर्यामीं।।’
असा विचार करतो का आपण? याचे उत्तर नकारार्थीच असणार, यात काय शंका? तेव्हा देव म्हणजे काय, याचे उत्तर देताना रामदास पुन्हा सांगतात-
‘देव नाना शरीरें धरितो। धरुनी मागुती सोडितो।
तरी तो देव कैसा आहे तो। विवेकें वोळखावा।।
नाना साधनें निरूपणें। देव शोधायाकारणें।
सकळ आपुले अंत:कर्णे। समजलें पाहिजे।।’
तात्पर्य, देव हा माणसांतच पाहावा असा त्यांचा सल्ला आहे. परंतु तसे करावयाचे तर विवेक हवा. विचारांमागे बुद्धीचे अधिष्ठान हवे. परंतु त्याचाच तर खरा अभाव असल्याने मनुष्य सोप्या मार्गाने देव शोधू पाहतो. हे मनुष्यस्वभावानुसारच होते. अवघड काही करण्यापेक्षा, तसे काही करण्याच्या विचारात बुद्धी शिणवण्यापेक्षा सोपी उत्तरे शोधणे केव्हाही सोपेच. ही सोपी उत्तरे मग अंगाऱ्याधुपाऱ्यांना घेऊन येतात, कधी नवसाला पावणाऱ्या देवाचे आश्वासन घेऊन येतात, तर कधी कोणत्या तरी दगडास शनी मानत येतात. आपला दैवदुर्वलिास हा, की ज्या महाराष्ट्रात असे तेज:पुंज विचारी संतजन होऊन गेले तोच महाराष्ट्र आज काहीजणांना कथित दर्शनाधिकार मिळावा की न मिळावा, यासाठी डोके फोडताना आढळतो. हे असे होते याचे कारण समाजमनातून एकंदरच विचार नावाच्या गुणाची होत असलेली हकालपट्टी. तो विचारच कोणास नको असल्यामुळे भावनेच्या भरात जे काही केले जाते त्यात जनसामान्य आनंद शोधतात आणि कर्तव्यपूर्तीचे समाधान पाहतात. अशावेळी रामदासांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. जे काही सुरू आहे, त्याचा मुळात विचार करावा. तो कसा करायचा? रामदास म्हणतात-
‘सूत गुंतलें तें उकलावें। तसे मन उगवावें।
मानत मानत घालावें। मुळाकडे।।’
सुताचा गुंता झाला तर तो आपण ज्या हलक्या हाताने सोडवतो तद्वत हलक्या हाताने मनाचा गुंता सोडवावा. ते एकदा जमले की मग मुळाकडे जावे आणि मूलभूत विचाराला हात घालावा. ते एकदा जमले की मायेस.. म्हणजे मिथ्या काय आहे, हे ओळखणे सोपे जाते.
‘माया उलंघायाकारणें। देवासी नाना उपाय करणें।
अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणें। प्रत्ययानें ।।
ऐसें न करितां लोकिकीं। अवघीच होते चुकामुकी।
स्थिति खरी आणि लटकी। ऐसी वोळखावी।।’
सांप्रत महाराष्ट्रात शनििशगणापूर, त्र्यंबकेश्वर वगरे ठिकाणी जो काही वेडाचार सुरू आहे, तो पाहता याची निश्चितच गरज भासते.
समर्थ साधक- samarthsadhak@gmail.com
देव पूजावा आणी टाकावा..
रामदास त्यांचा उल्लेख करतात तो काही त्या प्रश्नांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नव्हे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 24-04-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व रामदास विनवी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas philosophy