या स्तंभातील याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या भाषिक वैविध्याचा आढावा घेतला. त्यांची भाषा विषयानुरूप कशी बदलते, तिचा पोत, तिचे शब्द हे सगळेच बदलण्याची तिची शक्ती विलक्षण लोभस आहे.
भाषेचा आविष्कार दोन प्रकारांनी होतो. बोलणे आणि लिहिणे. बोलताना कसे बोलावे, काय बोलावे, याविषयी रामदास विविध ठिकाणी अनेक मुद्दय़ांचे मार्गदर्शन करतात. तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. आता येथे आपण आस्वाद घेणार आहोत तो समर्थ रामदासांच्या लेखनविषयक मार्गदर्शनाचा!
आपण अनेकदा अनुभवले असेल की, बरीच माणसे बोलताना खूप गोंधळलेली असतात. तो गोंधळ त्यांच्या भाषेतून व्यक्त होत असतो. परंतु आपण म्हणतो- त्यांची भाषा खराब आहे वा गोंधळलेली आहे. परंतु वस्तुत: हा गोंधळ त्या व्यक्तीच्या डोक्यातला असतो. तो भाषेतून फक्त समोर येतो. तसेच हे लेखनाबाबतही घडते. अनेक व्यक्ती लिहिताना खूप खाडाखोड करतात, काकपद दाखवून नवीन नवीन शब्द वा वाक्ये त्यात घुसडतात, किंवा सतत आपलेच लिखाण खोडून नव्याने लिहितात. हा जसा भाषिक गोंधळ आहे, तसाच तो वैचारिकदेखील आहे. त्यातील विचारांच्या गोंधळावर समर्थ काय उपाय सुचवतात, त्याचा ऊहापोह आपण स्वतंत्रपणे करू. येथे आपण घेणार आहोत- रामदासांचे लेखन मार्गदर्शन!
संगणकामुळे लिखाणाचे- त्यातही हस्ताक्षराचे महत्त्व आता राहिलेले नाही, असे काहीजण म्हणतात. परंतु म्हणून हस्ताक्षर वाईटच असायला हवे, असे तर नव्हे! प्रत्येकावर- तो कितीही संगणक वापरीत असला तरी- कधी ना कधी कागदावर पांढऱ्यावर काळे करावयाची वेळ येणारच. अशावेळी सुवाच्य अक्षर ही जमेचीच बाजू ठरणार. म्हणून प्रत्येकाने लिहिताना आपले अक्षर चांगलेच येईल याची काळजी घ्यावी असा रामदासांचा सल्ला आहे. लिहिताना असे लिहावे की काही काळानंतर- म्हणजे वृद्धपणीदेखील- ते वाचावयाची वेळ आल्यास डोळ्यांस दिसावयास हवे.
‘बहु बारिक तरुणपणीं। कामा नये म्हातारपणीं।
मध्यस्त लिहिण्याची करणी। केली पाहिजे।।’
पण म्हणून अक्षर इतकेही मोठे नको की कागद वाया जाईल. लेखनाची सुरुवात करताना सर्वसाधारण प्रत्येकाचे अक्षर सुंदर असते. निदान वाचनीय तरी असते. परंतु लेखन जसजसे पुढे जाते तसतसा त्यात कंटाळा येऊ लागतो आणि अक्षर आपली शिस्त सोडून लिहिले जाते. हे बरे नव्हे. रामदास म्हणतात..
‘पहिलंे अक्षर जें काढिलें। ग्रंथ संपेतों पाहात गेलें।
येका टांकेंचि लिहिलें। ऐसें वाटे।।’
याचा अर्थ काही समजावून सांगण्याची गरज नाही. अक्षर असे असावे की सर्व मजकूर लिहून झाल्यावर तो एकटाकी लिहिलाय की काय असे वाटायला हवे. हे कसे साध्य होणार?
‘वाटोळें सरळें मोकळें। वोतलें मसीचें काळें।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें। मुक्तमाळा जैशा।।
अक्षरमात्र तितुकें नीट। नेमस्त पस काने नीट।
आडव्या मात्रा त्याहि नीट। आर्कुलीं वेलांडय़ा।।’
हे असे लिहिता आल्यावर. सरळ ओळीत लिहावे. अक्षरात गोलाई हवी. काळी कुळकुळीत शाई वापरावी. आणि काना-मात्रा, वेलांटय़ा, आर्कुल्या वगरे ठसठशीतपणे, पुरेसे अंतर ठेवून काढाव्यात. एकंदर अक्षर कसे असावे?
‘वाटोळें सरळें मोकळें। वोतलें मसीचें काळें।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें। मुक्तमाळा जैशा।।’
काळ्या, वाचनीय अक्षरांच्या पानांवरनं चाललेल्या मुक्तमाळाच जणू असे अक्षर असायला हवे. हे प्रयत्नपूर्वक होणारे आहे.. म्हणजेच प्रयत्नसाध्य आहे. त्यासाठी रामदासांचा-
‘ब्राह्मणे बाळबोध अक्षर। घडसून करावे सुंदर।
जे पाहताची चतुर। समाधान पावती।।’
हा सल्ला मोलाचा ठरावा. यातील ‘ब्राह्मण’ शब्दावर काहींना आक्षेप असू शकेल. रामदासांनी या स्थानी वापरलेला ‘ब्राह्मण’ हा शब्द जातवाचक नसून व्यवसायवाचक आहे. म्हणजे लेखनादी क्षेत्रात आहेत ते ब्राह्मण. मग ते कोणत्याही जातीचे असोत- अशी रामदासांची मांडणी आहे. तेव्हा या क्षेत्रात वावरणाऱ्यांचे अक्षर तर सुंदरच हवे. समजा, ते इतरांच्या तुलनेत सुंदर नसले, तरी काही नियम पाळल्यास अशा व्यक्तीने लिहिलेला मजकूर सुंदर नसला तरी आकर्षक वाटू शकतो. म्हणून रामदास म्हणतात-
‘अक्षराचें काळेपण। टांकाचें ठोसरपण।
तसेंचि वळण वांकाण। सारिखेंचि।।
वोळीस वोळी लागेना। आर्कुली मात्रा भेदीना।
खालिले वोळीस स्पर्शेना। अथवा लंबाक्षर।।’
सुंदर काळ्या शाईने लिहावे आणि ओळीस ओळ लागणार नाही अशा बेताने लिखाणाची मांडणी करावी. मधेच एखादे अक्षर वा शब्द मोठा काढून खालच्या ओळीला लागणार नाही याची काळजी घ्यावी, हे सांगण्यास रामदास विसरत नाहीत. हे सर्व काही अर्थातच लगेच जमणारे नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. म्हणून..
‘ज्याचें वय आहे नूतन। त्यानें ल्याहावें जपोन।
जनासी पडे मोहन। ऐसें करावें।।’
म्हणजे अक्षरावर हुकुमत येईपर्यंत नवख्याने जरा जपूनच लिहावे.
पूर्वी हल्लीसारखे लिहिणे आणि पुसून नव्याने लिहिणे हे सोपे नव्हते. आज सर्वच मुबलक असल्याने कागद फाडण्यात वगरे काही कोणाला कमीपणा वाटत नाही. परंतु त्याकाळची परिस्थिती लक्षात घेता रामदासांचा हा सल्ला महत्त्वाचा ठरतो. त्यावेळी कागद आजच्याइतके मुबलक नव्हते. बरेच लिहिणारे भूर्जपत्रांवर लिहीत किंवा काही बांबूंच्या लगद्यापासून लिहिण्यायोग्य असा भरडा कागद तयार करीत. ती परिस्थिती आणि तो काळ पाहता लेखन ही चन होती. सर्वानाच परवडेल अशी ती कधीच नव्हती. त्यामुळे लेखनासाठीचे कष्ट वाया जाऊ देऊ नयेत असा रामदासांचा कटाक्ष असे.
‘भोंवतें स्थळ सोडून द्यावें। मधेंचि चमचमित ल्याहावें।
कागद झडतांहि झडावें। नलगेचि अक्षर।’
यातील दुसऱ्या ओळीचा अर्थ काहींना लागणार नाही. त्या काळात आजच्यासारखी लगेच वाळणारी शाई नव्हती. म्हणून मग लिहून झाले की त्यावरून वाळू पखरली जात असे. ही वाळू ज्या भागात शाई असेल तेथेच चिकटत असे. त्यामुळे अन्यत्रची वाळू उडवून लावावी लागत असे. त्यासाठी कागद झटकण्याची पद्धत होती. त्यावर रामदास सांगतात, हे काळजीपूर्वक करावे, नाहीतर कागद झटकताना अक्षरेही खराब होण्याची भीती.
आज अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या धाटणीच्या लेखण्या आणतात. त्यावेळी पेन नव्हती. बोरू असे. या अशा अक्षरशौकिनांसाठी रामदास सांगतात..
‘नाना देसीचे बरु आणावे। घटी बारिक सरळे घ्यावे।
नाना रंगाचे आणावे। नाना जिनसी।।
नाना जिनसी टांकतोडणी। नाना प्रकारें रेखाटणी।
चित्रविचित्र करणी। सिसेंलोळ्या।’
परत या टाकांच्या जोडीला शिशाच्या गोळ्याही असाव्यात. हे सर्व अक्षरवैविध्यासाठी. त्यासाठी ग्रंथांवर प्रेम हवे. भाषेवर प्रेम हवे. आणि या दोन्हींसाठी एकंदर भाषाव्यवहारावरच प्रेम हवे. अशा प्रेमातून उत्तम ग्रंथसंग्रह करावा. हे ग्रंथ जपून ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
‘नाना गोप नाना बासनें। मेणकापडें सिंधुरवर्णे।
पेटय़ा कुलुपें जपणें। पुस्तकाकारणें।।’
आणि अशा तऱ्हेने जपलेल्या ग्रंथसाधनेचा आनंद घेत ज्ञानोपासनेत काळ व्यतित करावा.
रामदास विनवी
lokrang@expressindia.com