समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचे लक्षात घ्यावे असे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातील निसर्ग. जिच्या आधारे आणि जिच्यावर आपण जगतो ती वसुंधरा, वातावरण, वृक्षवल्ली, त्यांना डोलायला लावणारा वारा, येथील जीवितांस ताजेतवाने ठेवणारे पाणी.. या सगळ्याविषयी रामदासांस कमालीचे ममत्व दिसते. तसे पाहू जाता सर्वच संतांना निसर्गाचा कळवळा असतोच. किंबहुना, या भारावून टाकणाऱ्या पृथ्वीवैभवाच्या प्रेमात आकंठ बुडणे हे संतपणाचे पहिले लक्षण. पृथ्वीविषयीच, निसर्गाविषयीच ममत्व नसेल तर तो संत कसला? तेव्हा रामदासांना या सगळ्याविषयी अपार प्रेम आहे यात काही आश्चर्य नाही. परंतु रामदास आपल्या निसर्गावरील प्रेमास व्यावहारिक, भौतिक महत्त्वाच्या पातळीवर आणून ठेवतात. त्यामुळे ते अधिक मोठे ठरतात. म्हणजे त्यांचे निसर्गप्रेम हे नुसतेच संन्याशाने आसमंतावर केलेले प्रेम नाही. रामदासांचे प्रेम हे त्यापलीकडे जाऊन निसर्गावरील प्रेमाची व्यावहारिक उपयुक्तता दाखवून देते. अलीकडच्या काळात फॅशन झालेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकोसिस्टीम, पर्यावरणरक्षण वगैरे काहीही परिभाषा ज्या काळात जन्मालाही आलेली नव्हती त्या काळात उत्तम भौतिक जगण्यासाठी उत्तम, निरोगी निसर्ग कसा आवश्यक आहे, हे ते सांगतात. म्हणूनच त्यांच्यासाठी केवळ शिवाजीमहाराज छत्रपती झाले, त्यांचा राज्याभिषेक झाला, हेच कारण आनंदवनभुवनासाठी पुरेसे ठरत नाही. ‘उदंड जाहले पाणी..’ ही अवस्था जेव्हा येते तेव्हा आपल्या स्वप्नातील आनंदवन साकार झाल्याचा आनंद रामदासांना मिळतो, हे इथे लक्षात घ्यायला हवे. हे नदीवरचे, पाण्यावरचे प्रेम रामदासांच्या वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येते..
‘वळणें वांकाणें भोवरे। उकळ्या तरंग झरे।
लादा लाटा कातरे। ठाईं ठाईं।।
शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ ।
चिपळ्या चळक्या भळाळ। चपळ पाणी।।
फेण फुगे हेलावे। सैरावैरा उदक धावे।
थेंब फुई मोजावे। अणुरेणु किती।।’
काय बहारदार शब्दकळा आहे पाहा! नदी वाहते कशी? ते उदक धावते कसे? याचे इतके उत्तम वर्णन करण्यासाठी निसर्गावर प्रेम तर हवेच; आणि त्याच्या जोडीला त्या प्रेमास तोलून धरणारी प्रतिभाही हवी. या पाण्यावर त्यांचे प्रेम आहे. या वाहत्या पाण्यासारखे दुसरे काहीही निरागस, सुंदर नाही असे त्यांना वाटते. रामदास लिहितात-
‘त्या जळाऐसें नाही निर्मळ। त्या जळाऐसें नाहीं चंचळ।
आपोनारायेण केवळ। बोलिजे त्यासी।’
ही पाण्यातली सुंदरता विलोभनीय खरीच; पण त्याच्या जोडीला पाण्याचा कोणातही सहज मिसळून जाण्याचा गुणधर्मही महत्त्वाचा. त्याचे वर्णन करताना रामदास समस्त मानवजातीला नकळत सल्लाही देऊन जातात..
‘येक्यासंगे तें कडवट।
येक्यासंगें तें गुळचट।
येक्यासंगे ते तिखट। तुरट क्षार।।
ज्या ज्या पदार्थास मिळे।
तेथें तद्रूपचि मिसळे।
सखोल भूमीस तुंबळे। सखोलपणें।।
विषामधें विषचि होतें।
अमृतामधें मिळोन जाते।
सुगंधीं सुगंध तें। दरुगधीं दरुगध।।
गुणीं अवगुणीं मिळे।
ज्याचें त्यापरी निवळे।
त्या उदकाचा महिमा न कळे। उदकेंविण।।’
यातला लक्षात घ्यावा असा भाग म्हणजे रामदासांना निसर्गत: वाहते पाणी- म्हणजे नदी ही मायेसमान भासते. वाहत्या पाण्याचे रूप जसे कोणास कळत नाही, तसेच मायेचेही आहे. मायादेखील पाण्याप्रमाणे चंचल आहे. हा झाला एक विचार! पण या अशा विचाराशिवायदेखील रामदास नदीचे कोडकौतुक संधी मिळेल तेथे मोठय़ा प्रेमाने करतात. या नदीवर, वाहत्या पाण्यावर त्यांचे इतके प्रेम, की ‘दासबोध’ लिहिण्यासाठी त्यांनी जागा निवडली तीदेखील वाहत्या पाण्याचे सतत दर्शन देणारी.
‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे
धबाबा लोटल्या धारा। धबाबा तोय आदळे।।’
हे त्यांचे वर्णन त्या शिवथर घळीचेच. तेव्हा त्यांना वाहते पाणी नेहमी खुणावत राहिले असे मानण्यास निश्चितच जागा आहे. या वाहत्या पाण्याभोवती उत्तम शेती फुलली, देवधर्म झाला आणि विविध संस्कृती उदयाला आल्या, याचे भान त्यांना असल्याचे दिसून येते. पाण्याची उपयुक्तता हा एक भाग. ती पाहताना रामदासांनी त्यामागील सौंदर्यगुणांकडे दुर्लक्ष केले असे झाले नाही.
‘नाना नद्या नाना देसीं। वाहात मिळाल्या सागरासी।
लाहानथोर पुण्यरासी। अगाध महिमे।
नद्या पर्वतींहून कोंसळल्या। नाना सांकडिमधें रिचवल्या।
धबाबां खळाळां चालिल्या। असंभाव्य।’
नदीचे वर्णन करताना ते असे हरखून जातात. ही वाहती नदी त्यांना केवळ पाहायलाच आवडते असे नाही. ती त्यांना सर्वागसुंदर भासते. त्या पाण्याचा खळखळ आवाज, त्या वाहण्यातून आसपास तयार होणारी आद्र्रता अशा सगळ्याचेच आकर्षण रामदासांच्या वाङ्मयातून ध्वनित होते.
‘भूमंडळीं धांवे नीर। नाना ध्वनी त्या सुंदर।
धबाबां धबाबां थोर। रिचवती धारा।।
ठाईं ठाईं डोहो तुंबती। विशाळ तळीं डबाबिती।
चबाबिती थबाबिती। कालवे पाट।।’
वाहते पाणी सुंदर असते, सुंदर भासते म्हणून ते केवळ वाहतच राहावे आणि समुद्राला जाऊन मिळावे असे त्यांना वाटत नाही. त्यांचे म्हणणे, हे पाणी पृथ्वीच्या गर्भापर्यंत जायला हवे. ‘वॉटर टेबल’ हा शब्दप्रयोग त्याकाळी जन्मास यावयाचा होता आणि कोणी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अशी मोहीमही हाती घेतली नव्हती. पण तरीही रामदासांना पाणी जमिनीत मुरवण्याचे महत्त्व माहीत होते. पाणी जमिनीत मुरले तरच ते साठून राहू शकते, असे रामदास सांगतात.
‘पृथ्वीतळीं पाणी भरलें। पृथ्वीमधें पाणी खेळे।
पृथ्वीवरी प्रगटलें। उदंड पाणी।।’
पृथ्वीच्या पोटात हे असे पाणी भरले की मगच ते लागेल तेव्हा वाहू शकते. त्याचे कालवे, पाट काढता येऊ शकतात. हे सर्व रामदासांना सांगावयाचे आहे. वरवर पाहता हा संदेश तसाच दिला गेला असता तर कोरडा ठरला असता. परंतु रामदास किती काव्यात्मतेने तो देतात, ते पाहा :
‘भूमीगर्भी डोहो भरलें। कोण्ही देखिले ना ऐकिले।
ठाईं ठाईं झोवीरे जाले। विदुल्यतांचे।।
ऐसें उदक विस्तारलें। मुळापासून सेवटा आलें।
मधेहि ठाईं ठाईं उमटलें। ठाईं ठाईं गुप्त।।’
झोवीरे म्हणजे झरे. खळाळत वाहणाऱ्या झऱ्यांना रामदास आकाशातल्या विजेची उपमा देतात. पाण्याला आपण ‘जीवन’ म्हणतोच. रामदास पुढे जाऊन सांगतात- झाडेझुडपे, वृक्षवेली आदींना जे काही गुणधर्म प्राप्त झाले आहेत, तेदेखील पाण्यामुळे.
‘नाना वल्लीमधें जीवन। नाना फळीं फुलीं जीवन।
नाना कंदीं मुळीं जीवन। गुणकारकें।।
नाना यक्षुदंडाचे रस। नाना फळांचे नाना रस।
नाना प्रकारीचे गोरस। मद पारा गुळत्र।।’
तात्पर्य ‘उसात गोडवा निर्माण झाला आहे तोदेखील पाण्यामुळे!’ हे रामदास नमूद करून जातात.महाराष्ट्राने या गोडव्याच्या लोभाने पाण्याचा किती भ्रष्टाचार केला, हे तर विदित आहेच. सांप्रति महाराष्ट्रात जी दुष्काळी स्थिती आहे तीदेखील या जलव्यवस्थापनाच्या अभावानेच. जवळपास ४०० वर्षांपूर्वी समर्थ रामदास हा नि:संग कवी पाण्याचे महत्त्व सांगतो; आणि आजच्या सुशिक्षित महाराष्ट्राला ते जाणवू नये, हीच या राज्याची शोकांतिका नव्हे काय? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रामदासांचा हा श्लोक-
‘उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायक।
पाहातां उदकाचा विवेक। अलोलीक आहे।।’
हा उदकाचा विवेक महाराष्ट्रात पुन्हा दिसणार काय?
समर्थ साधक
samarthsadhak@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा