भाषा ही धर्माची निदर्शक असते काय? मुळात भाषेला असे धर्माच्या कप्प्यात अडकवावे काय? म्हणजे उर्दू बोलणारे सर्व मुसलमानच असायला हवेत काय? इंग्रजी आता जगाची भाषा झाली असली तरी इतिहासकाळात ती बोलणारे सर्वच ख्रिस्ती होते काय?
अलीकडच्या काळातील वातावरणात या व अशा प्रश्नांचे उत्तर काही मूढमती होकारार्थी देतीलही; पण आदर्श अवस्थेत ते नकारार्थी असावयास हवे. भाषेस कशासाठी धर्माचा अंगरखा चढवायचा? ज्या भाषेत व्यक्त व्हायला हवे असे वाटते त्या भाषेचे कौशल्य जर प्राप्त झालेले असेल, तर कोणालाही हव्या त्या भाषेत व्यक्त होता यायला हवे. एखाद्याची अभिव्यक्ती उर्दूत झाली तर लगेच आपण त्यास मुसलमान म्हणणार की काय? तेव्हा प्रश्न असा की, अलीकडच्या या अशा वातावरणात आपल्या संतांचे आपण काय करणार?
उदाहरणार्थ समर्थ रामदास!
समर्थानी मोठय़ा प्रमाणावर अमराठी साहित्य प्रसवलेले आहे. त्यात मोठा वाटा आहे तो दख्खनी उर्दू या भाषेचा. उर्दूच ती; पण दख्खनी शैलीने, लिपीत लिहिलेली.
आपणास हे विदित आहेच, की समर्थानी त्या काळात देशभ्रमण केले. भूगोलाची, वाहनाची कोणतीही आयुधे आणि साधने नसतानाही रामदासांनी श्रीलंका ते अफगाणिस्तान इतक्या विशाल पट्टय़ात प्रवास केल्याच्या नोंदी आहेत. १६३२ ते १६४४ असा १२ वर्षांचा त्यांचा देशाटनाचा काळ. त्यातही लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे रामदासांचे त्यावेळचे वय. ही इतकी भटकंती ज्या काळात त्यांनी केली तेव्हा रामदास हे २५ ते ३७ या वयात होते. या वयातल्या तरुणांची आज काय परिस्थिती असते त्यावर न बोललेलेच बरे!
या सर्व भटकंतीचे पुरावे आजही आहेत. धुळे येथील श्री समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेत समर्थ रामदासांच्या स्वरचित आणि त्यांच्यावर त्या काळातील अन्यांनी लिहिलेल्या वाङ्मयाची, हस्तलिखिताची बाडेच्या बाडे आहेत. यातील काहींचा अद्याप अभ्यासही झालेला नाही. ज्यांचा झालेला आहे, त्यातून समर्थाच्या या प्रवासाचा तपशील उपलब्ध होतो. त्यानुसार दिसते ते असे, की १६३५ च्या आसपास समर्थ अयोध्येत होते. नंतर चार ते पाच वर्षांनी ते काशी येथे सक्रिय होते. त्यावेळी स्थानिक महंतांना हाताशी धरून त्यांनी धर्मसंस्था उभारणीचे काम सुरू केल्याचे आढळते. त्याची गरज त्यांना वाटली. कारण एव्हाना औरंगजेबाकडून मोठय़ा प्रमाणावर धर्मच्छल सुरू झाला होता. गागाभट्ट यांच्यासारख्या पंडितांशी रामदासांचा संपर्क होता. अशा स्थानिक धर्मपंडितांना बरोबर घेऊन काशी येथे रामदासांनी मठाची स्थापना केल्याचेदेखील आढळते. पुढे रामदास पंजाबातील आनंदपूर येथेही गेल्याची नोंद आहे. त्याचमुळे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ‘गुरूबानी’त रामदासांच्याही ओव्या आहेत. अजमेर आदी ठिकाणांनाही समर्थानी भेट दिली.
दक्षिणेकडे गोकर्ण-महाबळेश्वर, श्रवणबेळगोळ, बेंगळुरू, चेन्नई, तंजावर, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी रामदास गेले होते. इतकेच काय, दक्षिणेकडे त्यांचा शिष्यपरिवारही तयार झाला होता. विख्यात इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी या विषयावर विस्तृत लेखन केले आहे. समर्थ-जिज्ञासूंनी ते जरूर वाचावे. त्यांच्या संशोधनानुसार, रामदासांनी रामेश्वर येथेही मारुतीची स्थापना केली अािण स्थानिक अनुयायांकडे त्याच्या पूजनाची व्यवस्था लावून दिली. या मंदिराचे आजचे पुजारी हे रामदासांनी नेमलेल्यांचे वंशज, असे पगडी म्हणतात.
या अशा प्रवास करण्याच्या, प्रदेश समजून घेण्याच्या इच्छेचे परिवर्तन पुढे बद्रिकेदार, प्रयाग, ग्वाल्हेर, उज्जन, सुरत, द्वारका, सोमनाथ, वडोदरा, पूर्वेकडे प. बंगालातील कृष्णनगर अशा अनेक ठिकाणी मठ स्थापन करण्यात झाले. स्थानिक पातळीवर धर्म टिकवून ठेवण्यात या मठांचा मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. या सर्व प्रवासात मजल-दरमजल करताना मठ स्थापन करण्याची कल्पना रामदासांच्या मनात निश्चितच बळावत गेली असणार. त्याचप्रमाणे रामदासदेखील अनेकांच्या मनात रुजले असणार.
तेव्हा या आपल्या चाहत्यांसाठी रामदासांनी उर्दू हिंदीत मोठय़ा प्रमाणावर विविध रचना केल्या. मराठी युवकांसाठी स्फूर्तिकाव्ये, ओजस्वी रचना करताना अन्य भाषिकांसाठीही हे सारे देणे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून रामदासांनी दख्खनी उर्दू या भाषेत बऱ्याच रचना केल्या. मनीषा बाठे या रामदासप्रेमी लेखिकेने बरेच संशोधन करून त्या उजेडात आणल्या आहेत. रामदासांचे अनेक वाङ्मयप्रकार अद्यापही प्रसिद्धीच्या, प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु निदान त्यांची ही काव्ये उजेडात आणण्याच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी आपण मनीषा बाठे यांचे आभार मानावयास हवेत. बाठे यांच्या संकलनातील अशा सुमारे ३०० दख्खनी उर्दू पदावल्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. परंतु दख्खनी उर्दू या एकाच मराठीतर भाषेत रामदासांनी साहित्यरचना केली असे नाही, तर गुजराती, मारवाडी, अरबी, फारसी, कन्नड, संस्कृत अािण तेलुगु अशा विविध भाषांत रामदासांनी लिहिले. या अशा लिखाणाची किमान दोन हजारभर बाडे धुळ्याच्या वाग्देवता मंदिरात आज अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहेत. मनीषा बाठे यांनी याच कागदपत्रांच्या आधारे रामदासांच्या दख्खनी उर्दू भाषेतील रचनांचा संग्रह सिद्ध केला. महाराष्ट्र संस्कृतीत मुळात दस्तावेजीकरणाचे महत्त्व कमीच. गुरूने मरताना शिष्याच्या कानात सांगितले आणि पुढे शिष्याने मरताना त्याच्या शिष्याच्या कानात सांगितले.. अशाच पद्धतीने मोठी ज्ञानपरंपरा क्षीण होत गेली. अशात रामदासांसारख्याने लिहिलेले शाबूत राहणे, हेच मुळात आश्चर्य. परंतु त्याचा अभ्यास आदी न होणे हे आपले कपाळकरंटेपण. हे संतांच्या बाबतच होते असे नाही. याच धुळ्यात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन केंद्रातदेखील इतिहासाचार्याची अनेक हस्तलिखिते प्रकाशनाअभावी पडून आहेत. हे विषयांतर झाले. तेव्हा मुद्दा इतकाच, की बाठेबाईंचे आभार मानून रामदासांच्या दख्खनी उर्दू साहित्याचा आस्वाद घ्यावयास हवा.
तो घेताना जाणवते ती रामदासांची शैली. मराठीचे सर्व सौष्ठव रामदासांच्या शैलीतून आणि शब्दकळेतून सातत्याने डोकावत असते. मग ती ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही किंवा ‘लवथवती विक्राळा’सारखी आरती असो, ‘गिरीचे मस्तकी गंगा..’सारखा श्लोक असो, मनाचे श्लोक असोत; रामदासांच्या भाषेचे समर्थपण या सगळ्यातून ठसठशीतपणे समोर येत राहते.
त्यांच्या दख्खनी उर्दू रचनांतही ते लपत नाही. म्हणजे रामदास आपली मराठी भाषाशैली घेऊनच उर्दूच्या महालात शिरतात, ही बाब जरूर शिकण्यासारखी. याचे कारण अलीकडच्या काळात आपल्याकडचे सुशिक्षित आपले इंग्रजी कसे साहेबी धाटणीचे आहे हे सर्वाना कळावे म्हणून जिवाचे रान करीत असतात. वास्तविक भाषा ही त्या- त्या भूप्रदेशातील जीवनशैलीच्या अंगरख्यातच यायला हवी. म्हणजे नागपूरकराने ‘चालले जाऊ’ वगैरेच भाषेत बोलावयास हवे. नागपूरकर जर पुणेकरांसारखे बोलायला लागले तर मजाच संपेल. तेव्हा रामदास मराठीची पगडी घालून हिंदी उर्दूच्या व्यासपीठावर गेले त्यात काही वावगे नाही. तेव्हा त्या रचनांचा आस्वाद घ्यायला हवा. उदाहरणार्थ-
तू दीवाना तू दीवाना तू दीवाना मेरा
मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा
दो लंगोटी येक रोटी
दरबार तेरा पडा।
काम क्रोध लोभ भय त्यजे
रामनाम गाउ रामदास प्यारा..
अधिक पुढील भागात..
(पूर्वार्ध)
समर्थ साधक – samarthsadhak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा