‘दासबोध’ वा ‘मनाचे श्लोक’ इतकेच काही समर्थ रामदासांचे वाङ्मय नव्हे. या दोन कृतींसाठी समर्थ ओळखले जातात, हे खरेच. पण त्यांचे अन्य लिखाणही तितकेच उत्कट आहे. त्यातही विशेषत्वाने उल्लेख करायला हवा तो ‘करुणाष्टकां’चा!
कितीही कार्यक्षम, कर्तृत्ववान व्यक्ती असली तरी जगण्याच्या एका टप्प्यावर, कधी ना कधी तीस निराशा ग्रासते. ही निराशा बऱ्याचदा परिस्थितीजन्य असेल तर अधिक विव्हल करणारी असते. याचे कारण- व्यक्तीचे परिस्थितीवर नियंत्रण असतेच असे नाही. खरे तर बऱ्याचदा ते नसतेच. अशावेळी अशा व्यक्तीचे मन उदासीनतेने भरून जाते. जे क्रियाशील असतात ते या असहायतेवर मात करतात. बाकीचे जनसामान्य या असहायतेस शरण जातात आणि परिस्थितीस दोष देत ‘आपले प्राक्तनच!’असे म्हणून समोरचे जगणे मान्य करतात.
समर्थ रामदासांची असहायता ही क्रियाशीलाची असहायता आहे. ती उद्विग्नता नाही. याचे कारण- ती वैयक्तिक सुखदु:खाच्या प्रसंगातून आलेली नाही. त्याचमुळे त्यांची उदासीनता ही उदात्ततेच्या पातळीवर जाते. समाजासाठी, प्रदेशासाठी, देशासाठी बरेच काही करावयाचे आहे, पण ते करता येत नाही अशा प्रसंगी कर्तृत्ववानाच्या मनी दाटून येणारी उदासीनता रामदासांच्या मनात जमा होते. याचा अर्थ त्या औदासीन्यास वैयक्तिक स्पर्श नाही असे नाही. तो आहेच. परंतु त्या व्यक्तिगत पातळीवरील उदासीनतेस समष्टीचा परीघ आहे. या उदासीन, खिन्नतेच्या भावनेची अभिव्यक्ती म्हणजे नितांतसुंदर ‘करुणाष्टके’! त्याच्या प्रारंभालाच रामदास म्हणतात-
‘अनुदिन अनुतापे तापलो रामराया।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया।
अचपळ मन माझे नावरे आवरीतां।
तुजविण शिण होतो धावरे धाव आता।’
रामदासांसारख्या सर्वसंग परित्याग केलेल्यास जर या अचपळ मनाचा त्रास होत असेल तर आपल्यासारख्यांची काय कथा? हे नको इतके चपळ मन हाच तर तुमच्या-आमच्या जगण्यातील आव्हानाचा भाग आहे. हे मन ऐकत नाही. बंड करून उठते. आपल्याला करायचे काही असते, आणि हे मन भलतीकडेच कुठे घेऊन जाते. ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलं हाकलं, फिरी येते पिकावर’ असे अलीकडच्या काळात बहिणाबाईंनाही या मनाला उद्देशून म्हणावेसे वाटले. ‘बावरा मन’ ही निरागस अवस्था असेलही; पण ती काही काळापुरतीच. कारण हे बावरेपण जर का व्यक्तिमत्त्वाचा भाग झाले, की मन आणखीनच हाताबाहेर जाते. अशावेळी हातून काही कार्यभाग साधण्याऐवजी या अवखळ मनाला आवरणे हीच मोठी कामगिरी होऊन जाते.
‘विषयजनित सूखे सौख्य होणार नाही।
तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही।
रविकुळटिळका रे हीत माझे करावें।
दुरित दुरि हरावे स्वस्वरुपी भरावे।’
आपली ही ‘मन’ हातात नसल्याची भावना रामदास अशी व्यक्त करतात. यातली पहिली ओळ आपल्या सर्वसामान्य आयुष्यात लक्षात घ्यायला हवी- ‘विषयजनित सुखे सौख्य होणार नाही.’ परंतु आपले मन हे विषयजनित सुखांभोवतीच भिरभिरत राहते. फुलाभोवती माश्या घोंघावत राहाव्यात, तसे. अशा मनाला ‘तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही’ असे सांगावे लागते. पण म्हणून ते ऐकेलच असे नाही. हे असे सुनावले म्हणून त्या मनाचे चपळपण मोडेल याची काही शाश्वती नाही.
‘चपळपण मनाचें मोडिता मोडवेना।
सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना।
घडिघडि विघडे हा निश्चयो अंतरीचा।
म्हणउनि करुणा हे बोलतो दीनवाचा।’
त्यामुळे मनावर ताबा मिळवण्याचा निश्चय हा असा घडी घडी बिघडतो. आपल्यालाही असा अनुभव अनेकदा आला असेल. या अनुभवाची अडचण ही, की तो आतल्या आतला असतो. आपल्याच मनाने केलेला आपला पराभव हा आपल्याला आतून कुरतडतो. बाहेरच्यांना तो दिसतही नाही. पण आतून आपल्याला तो ठसठसत असतो. ही आतली वेदना अधिक त्रासदायी असते. एखाद्या गळवाचे तोंड आतल्या बाजूला असावे तशी. ती व्यक्त करताना रामदास म्हणतात-
‘जळत हृदय माझे जन्म कोटय़ानकोटी।
मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी।
तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधु।
षड्रिपुकुळ माझे तोडि याचा विरोधु।’
ही आर्तता जशी असहायतेची असते, तशीच ती हातातून नकळतपणे निसटत जाणाऱ्या यशस्वीतेमुळेही आलेली असते. ही यशस्वीता म्हणजे लौकिक अर्थाने ज्याला यश म्हणतात तीच असते असं नाही. बऱ्याचदा ती नसतेही. कधी ती यशस्वीता एखाद्या प्रतिभासंपन्नावर रुसलेली त्याची कविताही असू शकते. मग आत्माराम रावजी देशपांडे यांच्यासारखा अनिल कवी ‘अजुनी रुसुनी आहे, खुलता कळी खुलेना’ अशा आर्त ओळी लिहून जातो. समर्थ रामदासांत असा कवी दडलेला आहे. एरवी ‘लवथवती विक्राळा’सारखं रौद्र लिहिणारे रामदास करुणाष्टकांत इतके हळवे होतात, की हेच का ते, असा प्रश्न पडावा.
‘भजनरहित रामा सर्वही जन्म गेला।
स्वजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला।
रघुपति मति माझी आपुलीशी करावी।
सकळ त्यजुनि भावे कास तूझी धरावी।’
या भावावस्थेत असताना आपला जन्मच वाया गेला, फारसे काही नाही लागले आपल्या हाताला- असेही मनाला वाटून जाते.
‘असंख्यात रे भक्त होऊनि गेले।
तिहीं साधनांचे बहू कष्ट केले।
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालो।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो।’
करुणाष्टकातल्या या भागातल्या सर्व रचनांचा शेवट ‘तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो’ या ओळीने होतो. उदाहरणार्थ-
‘सदा प्रेमरासी तयां भेटलासी।
तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्यराशी।
अहंतामनी शब्दज्ञाने बुडालो।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो॥३॥’
किंवा-
‘कितेकी देहे त्यागिले तूजलागी।
पुढे जाहले संगतीचे विभागी।
देहे दु:ख होतांचि वेगी पळालो।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो॥
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती।
किती धर्मसंस्थापना अन्नशांती।
पस्तावलो कावलो तप्त जालो।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो।’
यावरून रामदासांची तंत्रावरदेखील किती हुकुमत आहे, ते कळून यावे. करुणाष्टकांची गंमत त्याच्या वृत्तबद्ध रचनेत आहे. त्यामुळे ते म्हणताना आपोआपच एक लय सापडून जाते.
‘उपरति मज रामी जाहली पूर्णकामी।
सकळभ्रमविरामी राम विश्रामधामी।
घडिघडि मन आतां रामरुपी भरावे।
रविकुळटिळका रे आपुलेसें करावे।’
यातली सकळभ्रमविरामी किंवा रविकुळटिळका ही शब्दरचना बघा. वास्तविक यात तीन स्वतंत्र शब्द आहेत. पण वृत्तात बसवण्यासाठी रामदासांनी ते असे काही बेमालुमपणे एकत्र केले आहेत, की ते आपले वेगळे अस्तित्व अलगदपणे हरवून जातात.
परंतु लक्षात घ्यायची बाब म्हणजे- अशी तंत्रावर हुकुमत असलेल्यांच्या कवितेत बऱ्याचदा प्राण नसतो. अशांची कविता ही तंत्रात अडकते आणि प्राण हरवते. रामदासांच्या कोणत्याही कवितेचे असे होत नाही. याचे कारण म्हणजे ती कमालीची प्रामाणिक आहे. ती प्रामाणिक आहे, कारण कवी होणे, साहित्य प्रसवणे हे काही त्यांचं ध्येय नव्हतं. साहित्य हे त्यांचे साधन होते; साध्य नव्हे.
हे असे जेव्हा होते तेव्हा साहित्याला काही अर्थ येतो. ते साहित्य कालातीत होते. कारण त्यातली आर्तता प्रामाणिक असते. (पूर्वार्ध)
समर्थ साधक samarthsadhak@gmail.com