व्यवस्थापनशास्त्र नामक नव्या विद्याशाखेचा अलीकडे फारच गवगवा झालेला आहे. हे शास्त्र असे म्हणते, हे शास्त्र तसे सांगते, असे जो-तो उठता-बसता सांगत असतो. मोठमोठी आस्थापने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठमोठय़ा व्यवस्थापन गुरूंकडे लाखो रुपयांचे शुल्क
भरून पाठवतात. विचार हा, की नवीन व्यवस्थापनशास्त्राच्या अध्ययनाने आपले
कर्मचारी नवीन काही शिकून आले की आस्थापनास त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. पीटर ड्रकर ते शिव खेरा अशी भलीमोठी यादी या व्यवस्थापन गुरूंची असते.
यात काहीही आक्षेप घ्यावा असे नाही. पण मुद्दा इतकाच, की हे सारे या व्यवस्थापन गुरूंकडूनच शिकायला हवे असे काही नाही. यातल्या बऱ्याचशा गोष्टी इतक्या साध्या असतात, की त्या समजून घेण्यासाठी लाखो रुपये शुल्काची काहीही गरज नाही. वेळेचे महत्त्व, त्याचे व्यवस्थापन, बांधिलकी, निष्ठा, भावना आणि विचार यांचे द्वंद्व असेच तर हे सगळे विषय असतात. ज्यांना हे विचार सहज, साध्या, सोप्या भाषेत समजावून घ्यायचे असतील त्यांनी बाकी काही नाही तरी निदान रामदासांचे वाङ्मय वाचायलाच/ अभ्यासायलाच हवे.
याआधीच्या लेखांतून आपण पाहिले- रामदास हे प्रयत्नवादी आहेत. देव, दैव, नशीब, प्राक्तन अशा मानवी अशक्तपणा दर्शवणाऱ्या गोष्टींना त्यांच्या लेखी स्थान नाही. प्रयत्न, प्रयत्न आणि प्रयत्न हा व्यवस्थापनशास्त्रातला सर्वात पायाभूत धडा. रामदास म्हणतात-
‘आधी कष्ट, मग फळ
कष्टची नाही ते निर्फळ’
म्हणजे कष्टाला पर्याय नाही. रामदास विचारतात-
‘होत नाही प्रेत्ने। असे काय आहे।’
म्हणजे आपण प्रयत्न करूनही होऊ शकत नाही, असे काय आहे? उत्तर अर्थातच- काहीही नाही. एकदा का या प्रयत्नांची कास धरली, की नशीब काय म्हणते, कुंडली काय सांगते, किंवा हातावरच्या रेषा कोठे नेतात, यास किंमत शून्य. त्यावर रामदासांचे म्हणणे असे की-
‘रेखा तितकी पुसून जाते। प्रत्यक्ष प्रत्यया येते।
डोळे झांकणी करावी ते। काय निमित्ये।।’
तेव्हा प्रश्न व्यक्ती म्हणून आपण काय करतो त्याचा असतो. कारण व्यवस्थापन हे माणसांचे वा माणसांनी करावयाचे असते. ज्याला ते करावयाचे आहे, त्यास अनेकांना बरोबर घेऊन चालावे लागते. हे बरोबर चालणारे आपल्या चालीने चालणारे असतीलच असे नाही. काही मंद असतील, तर काही जलद. त्यावर रामदासांचा सल्ला असा की, मुलाच्या चालीने चालावे. म्हणजे सगळे बरोबर येतात की नाही, हे पाहत पाहत पुढे जावे. या बरोबर येणाऱ्यांशी संवाद हवा. तो हवा असेल तर भाषा तशी हवी. आपल्या भाषेने त्यांना जिंकावे. त्यासाठी मृदू, सभ्यपणे संवाद साधावा. कारण आपणच मुळात ओबडधोबड भाषेत बोललो, तर समोरचा तसाच प्रतिसाद देण्याची शक्यता अधिक. कारण बोलणे हे पेरण्यासारखे असते. जे जमिनीत रुजते, ते वर येते.
‘पेरीले ते उगवते। बोलिल्यासारखे उत्तर येते।
मग कटू बोलणे। काय निमित्ये।’
असा प्रश्न करीत रामदास बोलावे कसे, हा सल्ला देतात. तेव्हा असे बोलून अनेकांची मने जिंकावीत. आधुनिक व्यवस्थापनशास्त्र सांगते की, आपले यश आपल्याभोवती असा सकारात्मकांचा संघ आपण उभा करू शकतो की नाही, यावरही अवलंबून असते. म्हणजे आपण यशस्वी व्हावे हे जसे आपल्याला वाटायला हवे, तसेच ती आसपासच्यांचीही इच्छा हवी. म्हणूनच-
‘राखावी बहुतांची अंतरे। भाग्य येते तद्नंतरे..’
म्हणजे अनेकांची मने राखावीत.. आपल्या भाग्योदयासाठी ते उपयुक्त असते.
हा झाला एक भाग. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात महत्त्व आहे ते सातत्याला. म्हणजे धरसोड नसावी. जे काही करीत आहोत ते पूर्ण अंदाज घेऊन सुरू करावे आणि तडीस न्यावे. ज्यास या मार्गाच्या आधारे यशप्राप्ती करून घ्यावयाची असेल त्याने प्रयत्नांचे सातत्य सोडू नये. असे सातत्य राखणाऱ्याकडे नेतृत्व अपरिहार्यपणे येते. ते नसेल तर अशा व्यक्तीस गांभीर्याने घेतले जात नाही. रामदास विचारतात-
‘साहेब कामास नाही गेला।
साहेब कोण म्हणेल त्याला।।’
व्यवस्थापनातले हे मूलतत्त्व नव्हे काय? खुद्द साहेबच जेव्हा मैदानात उतरून आघाडीवर लढताना सैनिक पाहतात तेव्हा त्या सैनिकांचा उत्साह तर द्विगुणित होतोच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे साहेबाबाबतचा त्यांच्या मनातला आदरदेखील कितीतरी पटीने वाढतो.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीचा अंदाज घ्यायचा असेल तर साहेब हिंडता हवा. कार्यालयात वातानुकूल कक्षात बसून ढेरपोटय़ा साहेब नुसते ‘हे करा, ते करा’ असे आदेश देत असेल तर अशा साहेबाचे शारीरिक वजन तेवढे वाढते. त्याचे व्यावसायिक वजन मात्र उत्तरोत्तर कमीच होत जाते. त्यामुळे साहेब हिंडता हवा. कोणत्या आघाडीवर काय चालले आहे याची खडान्खडा माहिती त्यास हवी.
येके ठायी बैसोन राहिला। तरी मग व्यापचि बुडाला
सावधपणे ज्याला त्याला। भेटी द्यावी।।
कोणत्याही आधुनिक व्यवस्थापन गुरूशी स्पर्धा करेल असा हा सल्ला नव्हे काय? फरक इतकाच, की आधुनिक व्यवस्थापन गुरूंकडे आपण त्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून पाहतो, तर रामदासांकडे संत म्हणून. आणि संत म्हटले की देवधर्म आदी आन्हिके आली. तेव्हा त्यांस कशाला महत्त्व द्या, असे आपणास वाटते.
हे आपले वाटणे किती अयोग्य आहे हे तपासून घ्यावयाचे असेल तर रामदासांचे वाचन करण्यास पर्याय नाही. कुटुंबनियोजनापासून ते घरबांधणीत वीट कशी भाजावी, येथपर्यंत रामदास उत्तमपणे मार्गदर्शन करतात. ते करून घेण्यासाठी आपणही ज्ञानसाधक असावयास हवे. याचे कारण कोणत्याही काळातील व्यवस्थापनशास्त्रात प्रगतीसाठी अत्यावश्यक घटक म्हणजे ज्ञान. त्याची कास कधीही सोडून चालत नाही. त्यासाठी ज्ञानमार्गी असावे लागते. त्याची सवय लावून घ्यावी लागते. या ज्ञानाचे महत्त्व रामदास सांगतात-
‘ज्ञानेची सर्वही सिद्धी। ज्ञानेची सकळै कळा।
ज्ञानेची तीक्ष्ण बुद्धी। नित्यानित्य विवेकु हा।।’
तेव्हा सर्व सिद्धीक्षमता आहे ती ज्ञानात. आणि ते मिळवणे हे प्रयत्नसाध्य आहे. आवश्यक असते ते त्यासाठी प्रयत्न करीत राहणे. या ज्ञानाची आस लावून घेणे. ते शोधत राहावे लागते. मिळवत राहावे लागते. त्याच्या मिळण्याने अज्ञानाचा अंत होतो आणि संदेह दूर होतो.
‘ज्ञानेची ज्ञान शोधावे। ज्ञाने अज्ञान त्यागणे।
ज्ञानेची प्रत्यया येतो। ज्ञाने संदेह तुटतो।।’
रामदास व्यवस्थापनाची मूलतत्त्वे ही अशी सोपी करून सांगतात. ती समजून घ्यावयाची असतील त्यांच्याकडून रामदासांनी एकच अपेक्षा केली आहे. ती म्हणजे- उद्दिष्टांविषयी प्रामाणिक असणे. व्यवस्थापनाची तत्त्वे पाळूनही जे यशस्वी होत नाहीत, त्यांच्यात ही बाब प्रामुख्याने दिसून येते. ते उद्दिष्टांविषयी प्रामाणिक नसतात. तेव्हा आपल्या आत जे काही आहे तेच बाहेरही असावयास हवे आणि बाहेर जे काही आहे त्याचा संबंध आत जे काही सुरू आहे त्याच्याशी हवा. तो ज्यांचा नसतो त्यांच्यासंदर्भात रामदास एक रोकडे उदाहरण देतात..
‘बाहेर लंगोट बंद काये। आंत माकड छंद काये’
म्हणजे बाहेर दाखवावयास ब्रह्मचर्य आणि मनातील विचार मात्र अगदी त्याविरोधात. याच्याइतके करकरीत उदाहरण आणखी कोणते असू शकते? म्हणूनच रामदास हे आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचे आद्यगुरू ठरतात.
समर्थ साधक – samarthsadhak@gmail.com
बाहेर लंगोट बंद काये..
हे आपले वाटणे किती अयोग्य आहे हे तपासून घ्यावयाचे असेल तर रामदासांचे वाचन करण्यास पर्याय नाही.
Written by समर्थ साधक
आणखी वाचा
First published on: 19-06-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व रामदास विनवी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant ramdas and his management skill