नाटक ही एक विलक्षण प्रयोगकला आहे. इथे प्रयोगकला हा शब्द जाणीवपूर्वक योजला आहे. मराठी आणि एकूणच भारतीय रंगभूमीवर नाटक हा साहित्यप्रकार मानण्याची परंपरा आहे. तरीही ‘आपल्या नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर व्हावा,’ अशी प्रत्येक नाटककाराची इच्छा असतेच. संहिता ते प्रयोग ही प्रक्रिया सामूहिक आणि बहुपदरी असते; त्यात लिखित शब्दांच्या पलीकडे अन्य अनेक दृक्श्राव्य घटक महत्त्वाचे असतात, हा विचार मराठी रंगभूमीवर येऊन आता पन्नासहून अधिक वर्षे झाली आणि तरीही काही अपवाद वगळले तर, आजच्या मराठी नाटय़समीक्षेत संहितेबद्दल अधिक आणि प्रयोगाबद्दल त्या मानाने कमी विचार केलेला बव्हंशी जाणवतो. नाटक ही एक सामूहिक प्रयोगकला आहे याची सुस्पष्ट जाणीव असणारे नाटकाचे जे अभ्यासक मराठीत आज आहेत, त्यात डॉ. राजीव नाईक यांचे स्थान निर्विवादपणे महत्त्वाचे आहे. राजीव नाईक हे स्वत: नाटककार आहेत. विविध आशयाची आणि शैलीची नाटके त्यांनी लिहिली आहेत आणि आजही लिहिताहेत. नाटकाविषयी सैद्धांतिक लेखनही त्यांनी केलेले आहे. पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’मध्ये नाटय़ या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी अभ्यागत-प्राध्यापक म्हणून ते काम करतात आणि या अभ्यासक्रमावर आधारित नऊ पाठय़पुस्तकांचा संच त्यांनी संपादित केला आहे.
अशा या अभ्यासू ‘नाटकवाल्या’चा नाटय़विषयक लेखांचा ‘‘ना’ नाटकातला’ हा संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात एकूण १४ लेख आहेत आणि त्यापैकी काही नैमित्तिक गरज म्हणून तर काही सार्वकालिक महत्त्वाचे म्हणून लिहिले आहेत. अर्थात, प्रास्ताविकात ‘हा लेखसंग्रह म्हणजे काही विषयवार नेटकेपणाने लावलेलं कपाट नव्हे,’ असं स्वत: लेखक म्हणत असला तरीही स्थूलमानाने यातल्या लेखांचे तीन विभाग पाडता येतात.
पहिल्या सात लेखांच्या विभागात नाटकाची प्रयोग प्रक्रिया, आधुनिक नाटकाचा व्युत्पत्तिशोध इथपासून ते रंगभूमीवरचे निरनिराळे प्रवाह आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नाते यांचे विवेचन केलेले आहे. ‘नाटक : कागदावरचं, मनातलं आणि मंचावरचं’ या पहिल्या लेखात नाटक वाचणाऱ्या वाचकाच्या आणि नाटकाचा प्रयोग पाहणाऱ्या प्रेक्षकाच्या अनुभवांतला फरक विशद केला आहे. वाचक वाचताना कल्पकतेने, मनोमंचावर प्रयोग बघतो, तर प्रेक्षक (प्रयोगाचा) प्रत्यक्ष ऐहिक अनुभव घेतो, ऐकतो/पाहतो. आता नाटय़संहितेलाच एक पूर्ण कलाकृती मानले (एक साहित्यप्रकार म्हणून) तर तिच्यातच आशय-अभिव्यक्ती ही दोन्ही अंग असणार.. पण पुढे प्रयोगाची रचना केली की, संहिताशय आणि प्रयोगाभिव्यक्ती अशा संकल्पना खुणावतील. प्रयोगात केवळ अभिव्यक्ती होत नाही. दिग्दर्शक म्हणजे पोस्टमन नव्हे. प्रयोगामधल्या नाटय़घटकांच्या मीलनांतून आशयाचे नवे कंगोरेही उमलतात, हे उदाहरणांसहित नाईक दाखवून देतात आणि ‘नाटकाची संहिता वाचून खूप काही मिळण्यासारखं असलं तरी पूर्ण नाटय़ानुभव मात्र प्रयोगांतूनच मिळतो,’ असे ठामपणे मांडतात. ‘प्रायोगिक नाटक आणि नाटकाची प्रायोगिकता,’ या पुढच्या लेखात प्रायोगिक रंगभूमीचे स्वरूप, उद्दिष्टे याविषयी नाईक विस्ताराने लिहितात. ‘आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हीत सतत काहीतरी नवीन करून पाहणं, शोधणं हे प्रायोगिक रंगभूमीचं ध्येय असतं. त्यामुळे साचेबद्ध रंगभूमीच्या पारंपरिक चौकटी आणि झिजट संकेतांना  नाकारून, त्यांच्या पलीकडे जाऊन नवे संकेत शोधण्याचा प्रयत्न करणारी रंगभूमी ती प्रायोगिक रंगभूमी’ असे सांगून लेखाच्या शेवटी अशा शोधामागच्या काही प्रेरणांचा ते उल्लेख करतात. उदाहरणार्थ, ‘वास्तववादाला, प्रत्यक्षाच्या अनुकरणाला दिलेला नकार; विशिष्ट जीवनदृष्टीमुळे नाटय़रचनेत, नाटय़भाषेत प्रयोग करण्याची निकड; देशीवादी प्रेरणा, मुलांचा शोध घेण्याची ऊर्मी; प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्यासाठी कमानी रंगमंच नाकारून खुल्या जागेत (बागा, मैदानं) प्रयोग करण्याची गरज; अशा या काही प्रेरणा. परंतु यापलीकडे, प्रायोगिक रंगभूमी हा एकापरीने प्रस्थापित आणि साचेबद्ध संकल्पनांच्या आणि मूल्यव्यवस्थेच्या विरोधांतला विद्रोह आहे. त्यामुळे प्रायोगिकांचे नाते (स्वाभाविकपणे) समाजातल्या इतर विद्रोही चळवळींशी असायला हवे, असे म्हणणारा एक प्रवाह आहे. ही अपेक्षा मराठी रंगभूमीवरच्या प्रायोगिकांच्या संदर्भात वाजवी आहे का? सादरीकरणाची नवीन शैली वापरणाऱ्या पण प्रतिगामी आशय मांडणाऱ्या नाटकाला प्रायोगिक म्हणता येईल का, अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा घेण्याची गरज नाईक यांच्या लेखनातून सूचित केली जाते, हे त्यांच्या लेखनाचे एक महत्त्व आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘राजकीय रंगभूमी’, ‘रस्ता-नाटक’, ‘दलित रंगभूमी’ आणि ‘ब्रेख्तची कथक रंगभूमी’ या चार विषयांवरील लेख आहेत. लेखांची शीर्षकं वेगवेगळी असली तरी त्यांच्यात प्रबोधन/प्रचार हे समान सूत्र आहे. राजकारणाबद्दलचे नाटक आणि राजकीय नाटक यांच्यातला फरक सुरुवातीलाच नाईक स्पष्ट करतात. ‘राजकीय नाटकांमध्ये दाखवण्याच्या कराराबरोबरच पटवण्याचा करारही असतो. आपल्याला जे पटलं आहे ते इतरांना पटवणं या अर्थानं राजकीय रंगभूमीमध्ये प्रचार अपरिहार्य आहे,’ असे नाईक म्हणतात, ते खरेच आहे आणि रस्ता-नाटक तर उघडउघड प्रचारासाठीच वापरले जाते. पण राजकीय नाटकाच्या एक पाऊल पुढे जाऊन रस्ता-नाटक प्रेक्षकांच्या विचारात बदल घडवू शकते आणि त्यांना प्रत्यक्ष कृती करायला उद्युक्त करू शकते, हेही लक्षात घ्यायला हवे.
१९२० ते १९३० च्या दरम्यानचा एक महत्त्वाचा नाटककार म्हणून बटरेल्ट ब्रेख्त मानला जातो. ‘कथन रंगभूमी : ब्रेख्तचं एपिक थिएटर या लेखात नाईक ब्रेख्तच्या नाटय़शैलीविषयी आणि त्यामागच्या उद्दिष्टांविषयी विस्ताराने लिहितात आणि त्या नाटय़शैलीची वैशिष्टय़ उलगडून मांडतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे (एलिअनेशन इफेक्ट-अ-परिणाम) ‘जे सहज ते आश्चर्यकारक असा प्रयत्न (कथक रंगभूमीवर) असतो. यामागचा उद्देश असा की, समोर चालले आहे ते खरंच आहे, असं मानून प्रेक्षकांनी त्यात गुरफटून पडू नये, भावविवश होऊ नये, त्याच्या विचारशक्तीलाही चालना मिळावी. यामागचा ब्रेख्तचा प्रबोधनाच्या, राजकीय विचार पोचवण्याच्या उद्देशाविषयीचं नाईक यांचं विवेचन तपशीलवार आणि अनेक उदाहरणे वापरून तर केलेलं आहेच, पण ‘राजकीय विचारांखेरीजही त्या नाटकांमध्ये खूप काही आहे आणि मुख्य म्हणजे चित्रपटात किंवा कथन साहित्यात प्रकट होणार नाही, असं अजब नाटकपण आहे; तेव्हा ब्रेख्तचा नाटय़सिद्धान्त नाही कळला तरी चालेल, पण त्याची नाटकं जरूर अनुभवावीत,’ असे ते अगदी आग्रहपूर्वक मांडतात.
‘दलित रंगभूमी कशी आणि कोणासाठी’ या लेखात नाईक ‘दलितांच्या समस्या मांडणारी रंगभूमी’ अशी या प्रवाहाची व्याख्या करतात. एकापरीने ती योग्यच आहे. परंतु दलितांचे जीवनानुभव हे केवळ आर्थिक शोषणातून आलेले नाहीत. त्यांना सामाजिक शोषणाचा आणि त्यांना दिल्या गेलेल्या घृणास्पद, मानहानीकारक वागणुकीचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे हे जीवनानुभव प्रभावीपणे दलितच मांडू शकतात. तेव्हा ‘दलित नाटककारांनी लिहिलेली आणि शक्यतो दलित दिग्दर्शकांनी प्रयोगबद्ध केलेली नाटके जिथे मंचित होतात ती दलित रंगभूमी,’ अशी एक व्याख्या माझ्या मते असू शकते. अर्थात आजच्या संदर्भात दलित नाटककार केवळ दलितांच्या समस्या मांडणारीच नव्हे तर अन्य राजकीय-सामाजिक प्रश्नांविषयी (उदा. धर्माचे राजकारण, विकास प्रक्रियेतला असमतोल इ.) नाटय़ लिहू शकतात आणि लिहिताहेत, हाही व्यापक संदर्भ लक्षात घ्यावा. दलित रंगभूमीच्या प्रवाहाकडे पाहण्याचे असे भिन्न दृष्टिकोन असू शकतात आणि त्यावर आधारलेली या प्रवाहाची भिन्न प्रारूपेदेखील असू शकतात, हे स्वाभाविकच आहे.
तिसऱ्या भागातल्या तीन लेखांत नाईक ‘शब्दांपलीकडची रंगभूमी’ ‘मराठी नाटकांपुढचे काही प्रश्न’ आणि ‘नाटकाचं नाटकपण’ याविषयी विचार मांडतात. हे तिन्ही लेख १५-१६ वर्षांपूर्वीचे आहेत. जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे परिस्थितीत आणि सांस्कृतिक विश्वात बदल झाले असले तरी या लेखातले विचार आणि मांडणी संदर्भहीन वाटत नाही, हे महत्त्वाचे!
डॉ. राजीव नाईक यांनी सर्वच लेख सोप्या आणि सरळ भाषेत लिहिले आहेत. मात्र भाषेचा रसाळपणा आणि रंजक कथनशैली ते जाणीवपूर्वक टाळतात. त्यामुळे त्यांचे विचार समजतात. पण विषयाचे अनावश्यक सुलभीकरण होत नाही. (सगळेच विषय सुलभ करून, रंजकतेने मांडण्याची पद्धत अलीकडे रूढ होत चाललीय.) नाईक यांचे लेखन शोधनिबंधाच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे ते नाटकाविषयीचे त्यांना जाणवलेले प्रश्न मांडतात, शक्य तिथे संभाव्य उत्तरांच्या शक्यतांचे सूचन करतात आणि बाकीच्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी वाचकाला उद्युक्त करतात. या संग्रहाचे हे वेगळेपण आणि वैशिष्टय़ आहे. अच्युत पालव यांनी या पद्धतीला साजेसे असे सूचक पण अर्थपूर्ण मुखपृष्ठ पुस्तकाला दिले आहे.
सरतेशेवटी, प्रास्ताविकांत म्हटल्याप्रमाणे (हा लेखसंग्रह म्हणजे) चित्रविचित्र, रंगीबेरंगी सौम्यउग्र फुलांचा झेला तेवढा आहे,’ हे खरेच. पण या झेल्यातले प्रत्येक फूल आपल्याला काही सांगू बघतेय, पटवू बघतेय आणि या सांगण्या-पटवण्यातून आपली नाटकाबद्दलची समज पुन्हा एकदा घासून-पुसून सुस्पष्ट करायला भाग पाडतेय. ज्यांना मनापासून गंभीरपणे नाटक करायचे, बघायचे आहे किंवा नाटकावर लिहाय-बोलायचे आहे अशा सर्वाकरता हे पुस्तक संग्रही ठेवून गरज असेल तेव्हा आणि नसेल तेव्हाही अधूनमधून काढून वाचण्यासाठी संदर्भपुस्तक म्हणून उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
‘ना’ नाटकातला – राजीव नाईक, पद्मगंधा प्रकाशन, पुणे पृष्ठे-१६८,  मूल्य- १५० रुपये.

Story img Loader