मोबाइल टॉवर्समधून बाहेर पडणारी प्रारणे सर्वानाच घातक
‘लोकरंग’ (११ नोव्हेंबर)मधील ‘मधुघट रिकामे पडण्यामागचे वास्तव’ या डॉ. अजय बह्मनाळकर यांच्या लेखास अनुसरून काही मते मांडू इच्छितो. रेडिएशनचे (किरणांचे उत्सर्जन) आयोनायझिंग व नॉन आयोनायझिंग हे दोन प्रकार आहेत. एक्स रे व गॅमा किरणांपासून होणारे किरणोत्सर्जन ‘आयोनायझिंग रेडिएशन’ या प्रकारात मोडते. हे सव्‍‌र्हे मीटरने मोजले जाते. त्याचे एकक आहे राँजन अथवा कुलोम प्रति किलोग्रॅम. २०व्या शतकात यावर खूप संशोधन झालेले आहे.
एफ. एम. रेडिओ, टीव्ही, मोबाइल टॉवर अँटेना यापासून होणारे रेडिएशन नॉन आयोनायझिंग (किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन) या प्रकारात मोडते. त्याचे एकक मायक्रोवॉट प्रति चौ. मी. आहे. आयोनायझिंग व नॉन आयोनायझिंग रेडिएशनची तरंग लांबी, आकारमान व कंप्रता पूर्णपणे भिन्न आहेत. सबब त्यांची तुलना होऊ शकत नाही.
मोबाइल टॉवरच्या १०० ते १५० मीटर परिसरात राहणाऱ्या लोकांना त्रास का होतो ही बाब विचारात घेण्यासारखी आहे. आपल्या शरीरात मेलाटोनिन हे महत्त्वाचे हार्मोन (वैद्यकीय शाखेतील एंडोक्रायनॉलॉजी या विषयामध्ये याबद्दल सतत संशोधन चालू असते.) आहे. दिवसा शरीरात त्याचे प्रमाण साधारणत: ३० pg/ ml (पायकोग्रॅम / मिली) व रात्री त्याचे प्रमाण १५० pg/ml पेक्षा जास्त असते. (मुंबईत हिंदुजा रुग्णालयासारख्या मोठय़ा रुग्णालयात रक्तातील मेलाटोनिन पातळीची तपासणी केली जाते. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा व इतर गावामध्ये ही सोय नाही. त्याचा खर्च आहे २५०० रुपये.) रात्री जेव्हा आपण झोपतो, तेव्हा मेलाटोनिनची पातळी वाढते. ते आपल्या रक्तात मिसळते व घातक अशा फ्री रॅडिकल्सचा नायनाट करते. त्यावर नियंत्रण मिळवते व आपल्या पेशींना शुद्ध करते. जर फ्री रॅडिकल्स रक्तात तसेच राहिले तर गुणसूत्रे व पेशींना इजा होते. त्यामुळे पेशी कॅन्सरग्रस्त बनू शकतात, आपली रोगप्रतिबंधक शक्ती कमी व्हायला लागते.
साधारणत: १९ पेक्षा अधिक शास्त्रीय संशोधनामध्ये असे आढळून आलेले आहे, की (मोबाइल टेलिफोनी लुनासी-व्हिक्टीम रिपोर्ट-कार्ल ट्रीशबर्गर) उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारा, मोबाइल टॉवर्स, टीव्ही टॉवर्स, रेडिओ टॉवर्स इ. मधून निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे (रेडिएशन अथवा इ-स्मॉग) मेलाटोनिनची पातळी गंभीरपणे खालावते. त्यामुळे झोप न येणे, विस्मरण होणे, ब्रेन टय़ुमरची शक्यता वाढते, कर्णदोष निर्माण होणे, तसेच रक्तदाब कमी होणे, रक्तातील कोलेस्टरॉल पातळीविषयक समस्या निर्माण होतात. जनुकांना इजा होत असल्यामुळे गर्भवती महिलांच्या गर्भावरही त्याचे दुष्परिणाम आढळून येतात. म्हणून, मे २००६ साली डॉ. एन. के. गांगुली (महासंचालक, भारतीय वैद्यक संशोधन परिषद, नवी दिल्ली) यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे, की सरकारने मोबाइल टॉवर्सच्या उभारणी व रेडिएशनच्या संदर्भात आय.सी.एन.आय.आर.पी. (इंटरनॅशनल कमिशन ऑन नॉन आयनायझिंग रेडिएशन प्रोटेक्शन, जागतिक आरोग्य संघटनेची उपशाखा, जिनेव्हा)च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व सावधानता तत्त्व अंगीकारावे.
सावधानता तत्त्व याचा अर्थ, एखाद्या कृतीमुळे अथवा निर्णयामुळे जर अपरिवर्तनीय अशी हानी होण्याची शक्यता असेल तर शास्त्रीय पुराव्यांच्या अभावाच्या पाश्र्वभूमीवर पुरावे देण्याची जबाबदारी ती कृती अथवा निर्णय घेणाऱ्यावर असेल. कृती करणाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत आणि जो प्रदूषण करतो (रेडिएशन, इ-स्मॉग, रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन) त्यांनी नुकसान भरपाई द्यायला हवी. जगातील विविध देशांतील न्यायालये पर्यावरणविषयक खटल्यासंदर्भात याच सावधानता तत्त्वाचा अवलंब करताना दिसून येतात. न्यायालये व वैज्ञानिक संशोधक दोन्ही सातत्याने सत्यशोधन करीत असतात. फरक एवढाच आहे, की वैज्ञानिक निष्कर्षांमध्ये सातत्याने बदल होऊ शकतात. निष्कर्षांचे स्वरूप अनिश्चित असू शकते, कारण उपलब्ध माहिती अपुरी असू शकते. अजाणतेपणी त्याचे विश्लेषण व्यवस्थित करणे शक्य होत नाही अथवा त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, तर न्यायालयांना मात्र व्यापक सार्वजनिक जनहिताचा विचार करून तातडीने निर्णय देऊन वाद मिटवावे लागतात.
दूरसंचार खात्याने १ सप्टेंबरपासून मोबाइल टॉवरच्या रेडिएशनसंदर्भात नवी नियमावली जाहीर केलेली आहे. तसेच, अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन कमिशनच्या धर्तीवर उपविभागाची स्थापना केलेली आहे. ते नागरिकांच्या रेडिएशनविषयीच्या तक्रारी नोंदवून घेतात व रेडिऐशनचे मोजमाप करतात. जर रेडिऐशन ठराविक मापदंडापेक्षा अधिक असेल तर ५ लाख रुपये दंड मोबाइल टॉवर कंपनीस करण्याचा अधिकार त्यांना आहे. तसेच दूरसंचार खात्याने मोबाइल टॉवर्स उभे करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे (ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका) नियम पूर्णपणे पाळण्याचे बंधन टॉवर कंपन्यांना घातलेले आहे.
३० ऑगस्ट १० रोजी स्थापन झालेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय पर्यावरण व जंगल विभागाच्या मंत्रालयास सादर केला. हा अहवाल मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे वन्य प्राणी, पक्षी व मधमाशा यांच्यावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद के ले आहे, की दोन मोबाइल टॉवर्समधील अंतर एक किलोमीटरपेक्षा कमी असू नये. टॉवर्सची उभारणी अशा पद्धतीने करावी, की ज्यामुळे पक्षी, मधमाशा यांच्या उडण्याच्या मार्गामध्ये रेडिएशनचा दुष्परिणाम होऊ नये. तसेच, या टॉवरमधून होणाऱ्या रेडिएशनबद्दल ऑनलाइन माहिती जिल्ह्य़ाच्या ठिकाणी उपलब्ध व्हावी. प्रत्येक टॉवरवर रेडिएशनसंबंधी धोक्याच्या सूचना लावण्यात याव्यात. मोबाईल टॉवर्स उभारणीसाठी वनविभागाची पूर्वपरवानगीही अत्यावश्यक आहे.
१४ ऑक्टोबरच्या लेखामध्ये राजेंद्र येवलेकर यांनी कोठेही निराशावादी सूर काढला नाही. उलट आधुनिक तंत्रज्ञानाची धोकादायक बाजू त्यांनी मांडलेली आहे. ही बाब डॉ. अजय बह्मनाळकर यांना अप्रिय, अवास्तव, विसंवादी का वाटावी हे समजण्यास मार्ग नाही. त्यांना भारतीय राज्यघटनेतील विविध कलमे, सर्वोच्च न्यायालयांचे विविध निर्णय, केंद्र शासनाचे दूरसंचार खाते, पर्यावरण व जंगल खाते यांनी व्यापक जनहितासाठी स्वीकारलेले विविध तज्ज्ञ समितीचे अहवाल हेही मान्य नाहीत असे दिसते.
– मिलिंद बेंबळकर, पुणे

Story img Loader