जनसेवेचा संस्कार

सदर लेख वाचल्यावर मन भरून येणं म्हणजे काय असतं, ते अनुभवलं. देवस्थळी यांचं आयुष्यात येणं हा देवानं दिलेला आशीर्वादच होता असं मी म्हणेन. २००० सालापासून ‘क्रीएटिव्ह ग्रुप’ या संस्थेतर्फे टिटवाळा येथे हॉस्पिटल उभारणीचे आमचे प्रयत्न सुरू होते. मी स्वत: हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना सीईओ प्रमोद लेले यांनी आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं. २००८ साली ‘लोकसत्ता’मध्ये आमच्या या प्रयत्नांवर एक लेख प्रसिद्ध झाला. या लेखामुळे एल अॅण्ड टी कंपनीच्या डॉ. कामत यांच्याशी ओळख झाली. त्यांनी आमचा हा प्रोजेक्ट ‘एल अॅण्ड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या विश्वस्तांकडे पाठवला. काही दिवसांनी विश्वस्तांनी आम्हाला (क्रीएटिव्ह ग्रुपचे सदस्य) भेटायला बोलावलं तेव्हा पहिल्यांदा देवस्थळींशी भेटलो. त्यांनी अतिशय प्रेमानं चौकशी केली आणि आमच्या कार्याचं कौतुकही केलं. प्रोजेक्ट रिपोर्ट पुन्हा एकदा नीट बघतो आणि कळवतो, असं सांगितलं. नंतर काही दिवसांनी त्यांनी घरी बोलावलं आणि आमच्या उपक्रमाला भरघोस मदत केली. तेव्हा काही क्षण माझा स्वत:वर विश्वास बसला नाही की, आपल्या गावात पहिलं हॉस्पिटल होण्याचं स्वप्न पूर्ण होतंय. नंतर त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या. एका देणगीदारापेक्षाही एक व्यक्ती म्हणून ते किती मोठे आहेत याची प्रचीती येत गेली. एकतर साधंसरळ व्यक्तिमत्त्व, बोलणं प्रेमळ, पण कामाप्रति असणारा कठोरपणा आणि चुकीचं काही होऊ द्यायचं नाही याकडे लक्ष… या सर्व गोष्टी बघत होतो. आम्ही जे कार्य करत आहोत ते देशकार्यच असल्याच्या भावनेनं अत्यंत प्रामाणिकपणे काम करतोय हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते खूप ठामपणे आम्हा मित्रांच्या पाठीशी उभे राहिले. शेवटपर्यंत त्यांच्या भेटीगाठी होत राहिल्या. प्रत्येक भेटीत किंवा बोलण्यातून आपण काहीतरी शिकतोय याचीसुद्धा जाणीव व्हायची. आमचं टिटवाळा येथील ‘श्री महागणपती हॉस्पिटल’ २०१२ साली सुरू झालं. ते कौतुक करत म्हणाले, ‘‘विक्रांत, हॉस्पिटल खूप छान उभारलं आहे.’’ मला वाटलं, ते सहज कौतुक करायचं म्हणून बोलतायत, परंतु हॉस्पिटलचा प्रमुख म्हणून दोन वर्षं काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, त्यांचं ते कौतुक म्हणज्रे ऋल्लंल्ल्रूं’ २३ं३ीेील्ल३ होतं. कारण किती पैशांची गुंतवणूक केल्यावर त्यातून काय मिळायला हवं याचा जबरदस्त अंदाज त्यांना असणार हे मला प्रत्यक्ष काम करताना जाणवलं. हॉस्पिटलच्या सुरुवातीच्या दिवसांत ते ठामपणे मागे उभे राहिले, एल अॅण्ड टी पब्लिक चॅरिटेबलतर्फे त्यांनी डायलिसिस विभाग सुरू करायला मदत केली. २०१५ साली सुरू झालेला हा विभाग आजही यशस्वीरीत्या सुरू आहे. आम्हा सर्वांच्या लवकरच लक्षात आलं की, ग्रामीण भागात एखादं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणं काही सोपं नाही. परंतु प्रमोद लेले, डॉ. राजेंद्र पाटणकर (सीईओ, ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे) आणि स्वत: देवस्थळी सर असे आरोग्य आणि अर्थ क्षेत्रातले दिग्गज आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे आम्हाला सर्व संकटांतून मार्ग काढता आला. देवस्थळी सरांचं श्री महागणपती हॉस्पिटलवर नितांत प्रेम होतं, टिटवाळ्यात आले तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘हे हॉस्पिटल म्हणजेच माझ्यासाठी मंदिर आहे.’’ हे वाक्य आम्ही अगदी कोरून ठेवलंय. निवृत्तीनंतरही सामाजिक संस्थांकरिता काम करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्याकरिता मला घेऊन ते जॉन्सन अँड जॉन्सनच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे घेऊन गेले होते. आमच्या कार्याबद्दल ज्या कौतुकाने ते सांगत होते, ते ऐकताना आयुष्याचं सार्थक होणं म्हणजे काय ते जाणवलं. त्यांचं जाणं हे आमच्यासारख्या संस्थांचं मोठं नुकसान होतं. आयुष्यभर त्यांनी चांगली कामं केलीच, पण ते जाऊनसुद्धा त्यांनी केलेले जनसेवेचे संस्कार आम्ही कधीच विसरणार नाही; आणि शेवटच्या श्वासापर्यंत ग्रामीण भागात आरोग्यसेवा करत राहू.

– विक्रांत बापट

असा पुण्यात्मा होणे नाही

यशवंत देवस्थळी यांच्याविषयी वाचताना मन गहिवरलं, गलबललं आणि क्षणार्धात दहा वर्षं मागे गेलं. २०१५ साली ‘चतुरंग’ पुरवणीत मी ‘सत्पात्री दान’ हे सदर लिहित होते, तेव्हाची गोष्ट. लेख प्रसिद्ध झाल्यावर वाचकांचे जे प्रतिसाद ईमेलवर येत, त्यात बरेचदा यशवंत देवस्थळी हे नाव असे. पण सहीखाली स्वत:च्या पोस्टचा (त्यावेळी ते एल अॅण्ड टी फायनान्समध्ये अध्यक्ष होते) उल्लेख नसल्यामुळे आणि मी याबाबतीत पूर्ण अज्ञानी असल्यामुळे, त्यांना सर्वसामान्य वाचक समजूनच उत्तर देत राहिले. त्यांनी उघड न केलेलं हे गुपित मला एका कार्यक्रमाच्या वेळी अनपेक्षितपणे कळलं. एका हॉस्पिटलला ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचा सत्कार सोहळा होता तो. अशा कार्यक्रमांपासून लांब राहणारे देवस्थळी त्या दिवशीही अनुपस्थित होते. पण त्या दिवशी मला यशवंत देवस्थळी नावामागचं वलय, तसंच त्यांनी सढळ हस्ते केलेलं भरघोस दान याविषयी समजलं आणि मी हबकलेच. एवढा मोठा माणूस माझ्या लेखांची दखल घेतोय हे समजल्यावर मला काय वाटलं, ते मला शब्दात नाही सांगता येणार. मग मी धीर करून त्यांच्याशी पत्रमैत्री वाढवली आणि एकदा मी पाहिलेल्या एका संस्थेची माहिती त्यांना सांगितली. तर म्हणाले, ‘‘चला बघून येऊ.’’ नंतर चार-पाच दिवसांतच मी आणि माझी एक मैत्रीण व देवस्थळी दाम्पत्य, आम्ही सर्व त्यांच्या गाडीतून अहमदनगरला गेलो. आपल्या हलक्याफुलक्या बोलण्यातून त्यांनी आम्हाला आलेलं टेन्शन पूर्ण घालवून टाकलं. त्या पाच- सहा तासांच्या प्रवासात आमचं जणू एक कुटुंबच झालं. ती संस्था त्यांनी काळजीपूर्वक बघितली, नंतर पुन्हा एकदा आपला सीए घेऊन ते गेले आणि सर्व व्यवहार पडताळून आले. त्यानंतर आठवडाभरातच तिथल्या तेव्हाच्या चालू बांधकामासाठी जेवढी गरज होती, तितक्या रकमेचा चेक त्यांनी लिहून दिला.

नंतरही मी तीन-चार वेळा त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी गेले आणि जेवून खाऊन, पोटभर गप्पा मारून आले. त्यांच्या पत्नी लीनाताईंशी माझे आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पतीचा दानाचा वारसा त्या पुढे चालवत आहेत. ‘लोकसत्ता’तील लेखाने त्या देवमाणसाच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण जिवंत होऊन समोर उभे राहिले आणि मनाने ग्वाही दिली.

– संपदा वागळे

अडचणीच्या काळात त्यांची साथ

या लेखाच्या सुरुवातीलाच लेखकाने मराठी माणसाच्या नास्तिक्यवादावर केलेली टिप्पणी योग्य आहे. मराठी माणूस महतांधळा किंवा दुसऱ्याचा मोठेपणा नाकारणारा असा नसतो. तो दुसऱ्याच्या प्रगतीवर असूया वाटणारा किंवा जळणाराही नसतो; पण त्याच्या बरोबरचीच एक व्यक्ती जर मोठी झाली असेल तर तिने आपली ओळख विसरता कामा नये अशा आग्रही भूमिकेत सतत असतो. परिणामी अशा मोठ्या व्यक्तीने आपणहून त्याला ओळख दिली तर तो प्रचंड सुखावतो आणि त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत असे म्हणत त्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करतो. ‘एल अॅण्ड टी’मधील यशवंत मोरेश्वर देवस्थळी तथा वायएम यांचा माझा परिचय सिमेंटच्या गरजेतून झाला. ते दिवस महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याने उभ्या केलेल्या सिमेंटच्या कृत्रिम तुटवड्याचे होते. आमचे एक काम त्यामुळे रखडले होते आणि आमचे बजेटही कोलमडले होते. त्यात वायएम यांची काहीच मदत होणे शक्य नव्हते, कारण संपूर्ण वितरणच मंत्रालयातून होत होते. पण त्यांनी आम्हाला वितरण साखळीबाबत स्वच्छ आणि स्पष्ट मार्गदर्शन केले आणि योग्य व्यक्ती व नेमका मार्ग दाखवला- ज्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. एवढी उच्चपदस्थ मराठी व्यक्ती इतक्या मोकळेपणाने बोलू शकते हाच आमच्यासाठी सुखद धक्का होता. या लेखाने जुनी आठवण ताजी झाली.

– अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी, मुंबई</p>

दिव्यत्वाची जेथे प्रचीती…

हा लेख वाचला आणि भारावूनच गेलो. यशवंत मोरेश्वर देवस्थळी ऊर्फ वायएमसारखे उत्तुंग विचारांचे व दीपस्तंभासाखे स्थितप्रज्ञ राहून आपली सामाजिक कर्तव्ये पार पाडणारे, तसेच प्रसिद्धीपासून दूर राहणारे अनेक मराठी लोक आहेत. वायएमसारखी माणसं वैचारिक उंचीबरोबर आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेनं त्याची पूर्तता करताना संस्थांना सढळहस्ते मदत करतात. येनकेनप्रकारेण प्रसिद्धीसाठी हपापलेले महाभाग आपल्याला सर्वच स्थरावर दिसतात, पण स्वत:ला प्रसिद्धीपासून दूर ठेवणे हे वायएमसारख्या व्यक्तींना जमते ही मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यासारख्या उतुंग व्यक्तिमत्त्वाला जेव्हा एखादी संस्था पुरस्कार जाहीर करते तेव्हा ती संस्था व आयोजक यांनी स्वत:ची सामाजिक उंची वाढवण्यासाठी केलेला अट्टहास असतो, असं म्हटले तर चुकीचे होणार नाही. वायएमसारख्या व्यक्तिमत्त्वाची ओळख समाजाला करून दिल्याबद्दल लेखकाचे आभार. वायएम यांच्या बाबतीत ‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती’ असेच म्हणावे लागेल.

– यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर.

‘दोन प्रश्न साहेब’…

सदर लेख आणि त्याबरोबरीने देवस्थळींसारखे हुबेहूब वाटावे असे चित्र पाहून प्रथम लेख वाचला. एल अॅण्ड टी कुटुंब परंपरेत त्यांना आम्ही सर्व जण वायएमडी म्हणूनच ओळखतो. मी स्वत: एल अॅण्ड टीच्या बांधकाम प्रकल्पांत १९७२ पासून कार्यरत असल्याने त्यादृष्टीने (केवळ कालमापनाच्या दृष्टीने) मी त्यांना सीनिअरच! त्यामुळे कामाच्या निमित्ताने आमचा वरचेवर खूपच संबंध आला. बहुतेकांच्या दृष्टीने तशा रूक्ष विषयातील म्हणजे अर्थशास्त्रातील ते तज्ज्ञ, पण ते स्वत: अजिबात रूक्ष नव्हते. त्यांचे व्यक्तिमत्त्व एखाद्या इंद्रधनुष्याप्रमाणे रंगबीरंगी. नुसते रंगांच्या छटांमुळे नाही तर प्रत्येक रंगवैशिष्ट्याप्रमाणे! ‘वायएमडी’आमच्या कार्यपरिवारात ‘दोन प्रश्न साहेब’ म्हणून ओळखले जात. प्रत्येक कामाच्या चर्चेत प्रश्न-उत्तराच्या वेळी साहेब नेहमीच ‘मला दोन प्रश्न आहेत’ असे म्हणत उभे राहत. आम्हालाही साहेबांचे प्रश्न दोनच का? असे वाटे. विनोदाचा भाग सोडा, पण त्या दोन प्रश्नांत सबंध चर्चेचे सार असे.

हैदराबाद मेट्रो प्रकल्पाच्या वेळी ते अध्यक्ष व मी व्यवस्थापकीय संचालक म्हणून माझा त्यांच्याशी खूप जवळून संबंध आला. प्रकल्प तसा सर्वच बाबतीत अद्वितीय. एल अॅण्ड टीचा सर्वात मोठा प्रकल्प, एल अॅण्ड टीची एकाच प्रकल्पातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक, सामाजिक व राजकीय गुंतागुंत आणि सर्व प्रकारची सर्व आव्हाने होती. त्यावेळी एखाद्या कुशल कप्तानाप्रमाणे वायएमडी साहेबांनी सहनशीलता न सोडता मला मार्गदर्शन केलं. कोणत्याही प्रकारे कंपनीचं नाव खराब होऊ द्यायचं नाही याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असे. तसेही त्यांच्या कारकीर्दीत अनेक वादळी प्रसंग ओढवल्याचे मला माहीत आहे. तरीदेखील एखाद्या स्थितप्रज्ञासारखेच त्यांनी त्या प्रसंगाला तोंड दिले. अगदी शेवटच्या दुर्धर आजारातदेखील. त्यांनी त्यांच्या गिरगावातील प्राथमिक शाळेच्या संस्थेच्या पालघर येथील शाळेसाठी देणगी दिली होती. वायएमडी साहेबांचे संगीतप्रेम तर जगजाहीर होते. कधीही, कोठेही व कोणतेही आढेवेढे न घेता सुंदर गाणं म्हणत व दुसऱ्यांना म्हणायला प्रवृत्त करीत. लीनाताईंच्या पुढाकाराने जांभुळपाडा येथे चालू केलेल्या वृद्धाश्रमातील त्यांचा सहभाग बघण्यासारखा होता. तेथील वृद्धांना घेऊन नाटक सिनेमाला जाणं व नंतर बटाटवडे, उसाचा रस वगैरेंचा स्वाद घेणं हा त्यांचा आवडीचा छंद होता. कोणत्याही बाबतीत चिकित्सकाच्या नजरेनं बघणं व त्यातील मर्म जाणून घेणं हे तर त्यांचं आवडीचं काम होतं. शेवटच्या आजाराच्या वेळीही त्यांनी संगीत शिकवणी लावली होती. कठीण प्रसंगात डगमगून न जाता मार्ग काढायला हे संगीत प्रेमच त्यांना साथ देत असावं. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे जरी खरं असलं तरी वायएमडी साहेबांनी एवढ्या लवकर रंगमंच सोडायला नको होता असं मला फार वाटतं.

– विवेक गाडगीळ

त्यांच्या स्नेहाचे आम्हीही लाभार्थी

आम्ही उभयता गेली १२ वर्षं वायएमडी व लीनाताई देवस्थळी यांनी स्थापन केलेल्या ‘चैतन्य’ या वृद्धाश्रमात अतिशय आनंदात राहत आहोत. त्यामुळे साहजिकच या लेखात लिहिल्याप्रमाणे आर्थिक नाही, पण त्यांच्या सामाजिक व वैयक्तिक गोष्टींचा, स्नेहाचा गेली ७-८ वर्षे अनुभव घेतला आहे. या लेखात लेखकानं देवस्थळी यांचं वाचकांसमोर अतिशय सुंदर व्याक्तिचित्र उभं केलं आहे. हा लेख वाचून आमच्याही स्मृती उजळल्या. एक रेखीव, वास्तववादी व्यक्तिचित्र वाचायला मिळालं.

– अनिल बाळ, जांभुळपाडा.

शांत… संयत…

एका निगर्वी, निरलसपणे लोकांना भरभरून मदत करणाऱ्या देवस्थळींवरील लेख वाचून मन भरून आलं. ‘वायएम’ना पहिल्यांदा भेटलो एल अॅण्ड टीचे अध्यक्ष सुधाकर कुळकर्णीच्या केबिनमध्ये. त्या वेळी माझ्यासोबत डॉ. प्रभा अत्रे होत्या. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांच्या सांताक्रूजमधील कार्यालयात भेटलो. एका संगीताच्या कार्यक्रमांसाठी प्रायोजक शोधताना उच्चपदस्थ मराठी आणि तोही संगीतप्रेमी माणूस भेटणं हे खरं तर खूप दुर्मीळ होतं. पण ‘वायएम’ना भेटल्यावर ज्या आपुलकीनं व प्रेमानं त्यांनी सगळी माहिती करून घेऊन मदत केली हे सारं खूपच आनंददायी होतं. नंतर हक्कानं त्यांना भेटायचं आणि प्रायोजकत्व घेऊन यायचं हा नित्यक्रमच झाला. केबिनमध्ये भेटल्यावर प्रपोजलवर त्यांच्या सहीचा औपचारिक भाग उरकला की मग चहा आणि त्यांच्या गप्पा ठरलेल्या. १-२ गाणी ते ऐकवायचे. फार प्रेमानं कार्यक्रमाला यायचे. माझ्या उपस्थितीचा उल्लेख नको असं सांगायचे. आम्ही अर्थातच पुष्पगुच्छ घ्यायला त्यांना स्टेजवर बोलवायचो तेव्हा ते खूप संकोचत असत. ज्येष्ठ कलाकारांना वाकून नमस्कार करून मगच ते जायचे. अलीकडच्या काळातील अत्यंत बटबटीत व्यक्तिमत्त्वं पाहिली की देवस्थळींसारख्या माणसाचं महत्त्व कळतं. अलीकडे समाजातल्या सर्वच क्षेत्रातली उन्मादावस्था पाहिली की अतिशय शांत, संयतपणे कार्यरत राहणाऱ्या देवस्थळींसारखी माणसं मनाला उभारी देतात.

– अविनाश प्रभावळकर, विलेपार्ले, मुंबई.

आदर्श व्यक्ती प्रकाशात…

वाय. एम. देवस्थळी व माझा कौटुंबिक परिचय होता. ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ म्हणजे नेमके काय असतं, ते मी स्वत: अनुभवलं आहे. एकदा माझे सहकारी एका संस्थेसाठी देणगी मागण्यासाठी त्यांना भेटले. त्यांनी तात्काळ एक लाख रुपयांचा धनादेश तर दिलाच; पण संस्थेच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलावले असता, माझ्या देणगीचा उल्लेख कुठेही होता कामा नये व मी व्यासपीठावर न बसता प्रेक्षकातच बसणार, या दोन अटी घातल्या.

एका घरगुती समारंभात इतक्या मोठ्या पदावरील प्रभूती हातात जिलब्यांचे ताट घेऊन सर्वांना आग्रहानं वाढताना मी स्वत: अनुभवलं आहे. या अप्रतिम लेखामुळे माझ्या सर्व सोनेरी आठवणी जागृत झाल्या; परंतु ज्यांना देवस्थळी हे व्यक्तिमत्त्व माहीत नाही त्यांनाही त्यांचा परिचय झाला. या लेखामुळे असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर इतक्या मोठ्या हुद्द्यावर असूनही अहंकाराचा लवलेशही नसलेली आदर्श व्यक्ती प्रकाशात आली.

– प्रदीप करमरकर, नौपाडा, ठाणे.