रसिक व दर्दी बापट सर!
१६ सप्टेंबरच्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील प्रा. वसंत बापट यांचा लेख वाचला व एम.ए.च्या आमच्या वर्गाला शाहिरी वाङ्मय शिकवणारे विलक्षण रसिक व दर्दी साहित्यिक परंतु अध्यापनाचे भान राखून विषयात जखडून ठेवणारे आमचे प्रिय बापटसर आठवले.
आम्हाला साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याही वेळी व आजही कालिदासाचे आकर्षण असतेच. सरांचा तर तो लाडका- प्रिय- सुहृद जिवलग. त्यामुळे त्याच्याबद्दल किती सांगू आणि कसं सांगू, कितीही सांगितलं तरी पुरणारच नाही अशी त्यांची अवस्था झालेली इथे शब्दाशब्दांत जाणवते. कारण त्यांचा स्वभावच तसा होता. एकदा बोलायला लागले की, त्यांना त्यांचे मन आवरत नसे! भरभरून देण्याचा स्वभाव. त्यात स्वत:चे सौंदर्यस्पर्शी भावनात्मकता जपणारे तरल मन.
कालिदासाचे कूळ आणि मूळ शोधायची गरज नाही किंवा त्याची प्रतिमा चितारण्याची आवश्यकता नाही तो त्याच्या शब्दांमधूनच कल्पनाविलासातूनच अनुभवावा हे सरांचे म्हणणे अगदी खरे आहे. ‘बापट’सरांच्या शब्दांचा आस्वाद घेण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल ‘लोकसत्ता’ ला मनापासून धन्यवाद!
नीळकंठ नामजोशी,
कूस म्हणजे काय?
प्रशांत असलेकर यांचा ‘भाषा कूस बदलते आहे’ हा लेख आवडला. खरोखरच जुने शब्द (हल्लीच्या पिढीसाठी जुने) बदलत आहेत. माझ्या मैत्रिणीच्या सुनेशी गप्पा करताना मी एकदा म्हटले, ‘छे! माझा तो पिंडच नाही.’ त्यावर ती एवढय़ा मोठय़ाने हसली. मला काही कळेचना. तिचं हसणं थांबल्यावर मी विचारलं, ‘काय झालं तुला एवढं हसायला?’ तर म्हणाली, ‘अहो मावशी, ‘तो माझा पिंड नाही’ असं तुम्ही म्हणालात म्हणून मला हसायला आलं. पिंड म्हणजे महादेवाची पिंड असते ना?’ मी कपाळाला हात लावला! तिला कसं समजावून सांगावं तेच समजेना.
आणखी एक प्रसंग- भरतकाम शिकविताना मुलींना सांगितलं, ‘हे डिझाइन उशीच्या अभऱ्यावर छान दिसेल.’ तर त्यांच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह! ‘उशीच अभ्रा’ म्हणजे काय? ‘पिलो कव्हर’ सांगितल्यावर त्यांना ते कळलं.
एका सुट्टीत बहिणींची मुलं घरी आली होती. माझा दादा नित्य हवन करीत असे. त्यांनी हवन बघितलं. ती हसायला लागली. म्हणाली, ‘मामा, वाळलेल्या शेणावर तूप ओततात.’ मी ते ऐकलं. मला हसायला आलं. मी त्यांना सांगितलं, ‘त्या वाळलेल्या शेणाला गोवरी म्हणतात. dried cow dung.. कळलं? त्यांनी होकारार्थी मान हलविली. दुसऱ्या दिवशी दादा हवनाची तयारी करीत आहे हे पाहून बहिणीची मुलं म्हणाली, ‘मामा, गौरी आणू का?’
खरंच, असलेकर म्हणतात तसंच वाटतंय. भाषा कूस बदलते आहे. पण पुन्हा तेच होणार! कूस म्हणजे काय?
– सुधा जोशी, पाचोरा