‘ललित’च्या सध्याच्या स्वरूपाबद्दल आणि वाचकांकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांविषयी विद्यमान संपादक अशोक कोठावळे यांच्याशी केलेली बातचीत..
* वाचनसंस्कृतीशी संबंधित असणाऱ्या महाराष्ट्रातल्या कुणालाही ‘ललित’चं नाव ऐकून माहीत असतं. वाचनसंस्कृतीच्या संदर्भात ‘ललित’चं नेमकं काय योगदान आहे असं तुम्हाला वाटतं?
– वाचन संस्कृती वाढावी हे तर ‘ललित’चं ध्येयच आहे. त्यात ग्रंथलेखक, ग्रंथलेखन आणि ग्रंथजगतातील घडामोडी यांविषयीची माहिती आम्ही देतो. अशा प्रकारचं केवळ ग्रंथव्यवहाराला वाहिलेलं दुसरं मासिक मराठीत नाही. या अर्थाने मराठी साहित्य क्षेत्रातलं वर्तमान जाणून घेण्याकरता वाचकाला ‘ललित’शिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. ‘ललित’मध्ये नेहमी आणि क्वचितसुद्धा लिहिणाऱ्या लेखकांना चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणजेच ‘ललित’चा वाचक फक्त वाचून पुढे जाणारा नाही, तर तो वाचनाविषयी काहीएक विचार करणारा आहे. एकंदर लेखनप्रक्रियेविषयी विचार करणारा आहे. तो मुळातच वाचनाशी निगडित आहे. म्हणून तर आम्ही ‘लेखकाचं घर’, ‘निर्मितीरंग’, ‘बीज अंकुरे अंकुरे’, ‘दशकातील साहित्यिक’ यासारखी सदरं सुरू केली. पूर्वी ‘ठणठणपाळ’ने वाचकांना ललितकडे आकृष्ट केले. मात्र, आज कोणत्याही विनोदी सदराशिवाय ‘ललित’ चांगल्या प्रकारे सुरू आहे.
* ‘ललित’सारख्या मासिकांचे आर्थिक गणित वर्गणीदारांपेक्षा जाहिरातींवर अवलंबून असते. त्यातही ‘ललित’मध्ये पुस्तकांच्याच जाहिराती असतात. शिवाय त्यांचे दरही इतर मासिकं आणि नियतकालिकांच्या तुलनेत अतिशय कमी आहेत. हे तुम्ही जाणीवपूर्वक केले की कसे? त्यामागे काय विचार आहे?
– निश्चितपणे. ‘ललित’मधल्या जाहिरातींचे दर हे प्रकाशकांना सोयीचे असले पाहिजेत असा आमचा कटाक्ष होता आणि आहे. पूर्ण पान जाहिरातीसाठी दोन हजार रुपये हा तसा खूपच कमी दर आहे. त्यामुळे तो प्रकाशकांना परवडतो. आणि तो तसा ठेवायचा, हेच आमचं धोरण आहे. आम्हाला काही ‘ललित’मधून लाखो रुपयांचा नफा कमवायचा नाही. मी नेहमीच म्हणतो की, मला ‘ललित’च्या जाहिरातीसाठी माणूस फिरवावा लागत नाही. ‘ललित’ टिकलं ते दोन कारणांमुळे.. एक- दर आणि दुसरं- जाहिरात आल्यावर त्याचा त्या- त्या प्रकाशकांना मिळणारा फायदा! आणखी एक असं की, ‘ललित’ आम्ही चालवतो खरं; पण त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा ‘मॅजेस्टिक प्रकाशन’ची वापरतो. ‘ललित’चं वेगळं कार्यालय, संपादक, प्यून, संगणक अशी स्वतंत्र यंत्रणा उभी केली तर आम्ही नक्कीच तोटय़ात जाऊ. मला अनेक वाचक सांगतात की, आम्ही ‘ललित’ त्यातल्या जाहिरातींसह वाचतो.
* ‘ललित’ मॅजेस्टिक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत असलं तरी सुरुवातीपासून त्याचं स्वरूप हाऊस जर्नलपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही; जे हल्ली वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांनी सुरू केलेल्या नियतकालिकांच्या बाबतीत आढळतं. असं मासिक चालवताना प्रकाशन संस्थेला काय अडचणी येतात?
– ‘ललित’कडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन वेगळा आहे. ‘ललित’च्या गुडविलचा फायदा ‘मॅजेस्टिक’ला मिळतोच ना! ‘ललित’ आणि मॅजेस्टिकचं गुडविल एकमेकांशी जोडलेलं आहे. बाबांच्या (केशवराव कोठावळे) अवतीभवती त्यावेळची तरुण साहित्यिक मंडळी होती. जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, चित्रकार वसंत सरवटे.. ही मंडळी काहीतरी नवं करण्याचा उत्साह असलेली होती. त्यामुळे बाबाही ‘ललित’साठी भरपूर वेळ देत.
*‘ललित’ च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्ताने तुम्ही वर्षभर वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढणार आहात. पण अलीकडच्या काळात अशा प्रयोगशील संकल्पना राबविण्यात ‘ललित’ कमी पडतो आहे असं दिसतं..
– खरं तर ‘ललित’ आम्ही पूर्वीसारखंच चालू ठेवलंय. उलट, माझ्या कारकीर्दीत अधिक विशेषांक काढले गेले आहेत. पाने आणि मजकुराच्या व्याप्तीमध्येही वाढ झाली आहे. आम्ही सातत्याने नवनवीन सदरं सुरू केलेली आहेत. ‘नोबेल लेखिका’, ‘पाश्चात्य साहित्यिक’ या लेखमाला ‘ललित’ने चालवल्या. ‘लक्षवेधी’ ही तर युनिक योजना आहे. तिला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हे केवळ आम्ही ‘ललित’च्या मुखपृष्ठावरच छापत नाही, तर त्याची वर्तमानपत्रांमध्येही जाहिरात करतो. त्यामुळे त्याचा दुहेरी फायदा प्रकाशकाला होतो. ‘लक्षवेधी’बाबत काही लोकांचे मतभेद असल्याचं अधूनमधून कानावर येत असतं, पण त्याबाबतीत मी एकच सांगेन की, आम्ही शक्य तेवढं तटस्थ राहण्याचा प्रयत्न करतो.
* चांगलं लेखन मिळवण्यासाठी हल्ली ‘ललित’कडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे ‘लक्षवेधी पुस्तकं’, ‘मानाचं पान’ याविषयी टीकात्मक सुरात बोललं जातं..
– मला तसं वाटत नाही. ‘मानाचं पान’साठी मी जो समीक्षक निवडतो, सर्वसाधारणपणे त्याला ते पुस्तक आवडलेलं असतं. आणि आम्ही ‘मानाचं पान’ चोखंदळ वाचकांच्या निवडीतून आलेल्या पुस्तकांवरच शक्यतो घेतो. त्यामुळे चांगल्या पुस्तकाचीच निवड याकरता झालेली असते. नवोदिताला कुणाला आम्ही ती पुस्तकं देत नाही. ज्याला वाङ्मयाची चांगली जाण आहे अशाच व्यक्तींकडून आम्ही ते लिहून घेतो. ‘लक्षवेधी’मध्ये आम्हाला चार पुस्तकं निवडायची असतात. त्यामुळे त्यात एखादं पुस्तक तसं येतही असेल; पण ते अगदी नापास झालेलं पुस्तक नसतं, हे निश्चित. अगदी नव्वद नक्के नसेल, पण साठ-सत्तर टक्के तरी गुणवत्ता असलेलंच पुस्तक त्यात येतं. अन्यथा प्रकाशकांना त्यात आपलं पुस्तक यावं असं वाटणार नाही. ही काळजी संपादक म्हणून मला घ्यावीच लागते. एखाद् वेळी डावं पुस्तक लक्षात आलं तर मी ते लगेच बाजूला ठेवतो. माणूस पूर्वग्रहदूषित असतोच असतो. पण ते लक्षात आल्यावर तो प्रकार मी लगेचच थांबवतो.
* आपल्याकडे कुठलीही संस्था, उपक्रम किंवा नियतकालिक २५-५० वर्षांनंतर सुरुवातीच्या जोमाने आणि उत्साहाने चालत नाही. त्याला मरगळ येते. तसं ‘ललित’बाबतही झालं आहे, असं खुद्द ‘ललित’चेच वाचक बोलतात. काळानुसार आवश्यक ते बदल ‘ललित’मध्ये होत आहेत का?
– समजा, लेखनात बदल होत असेल, लेखक काहीतरी नवीन लिहीत असेल, तर ते लेखनाच्या स्वरूपात, मुलाखतीच्या स्वरूपात ‘ललित’मध्ये येणारच. बदलत्या काळाशी सुसंगत असे ‘ई-ललित’ही लवकरच येणार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. ‘ललित’ वाचनालयात जातो, महाविद्यालयांमध्ये जातो. तिथे त्याचे खूप वाचक आहेत. या वाचकांचा विचार करता ‘ललित’ विक्रीच्या कितीतरी पटीने वाचला जातो, हे वास्तव आहे. मराठीत सुजाण वाचकांची जी संख्या आहे, त्या तुलनेत ‘ललित’च्या वर्गणीदारांचा विचार केला तर हा खप ‘ओके’ आहे असंच मी म्हणेन. शेवटी विचार करणारी माणसं समाजात नेहमीच कमी असतात. ‘ललित’ हे काही मनोरंजनासाठी वाचलं जाणारं मासिक नाही. अजून तरी लोकांना तशी गरज वाटत आहे. नाहीतर ते बंद व्हायला वेळ लागला नसता. आमचे वर्गणीदार टिकून आहेत. नवनवीन वाचक सदस्य होत आहेत. मला अनेकजण सांगतात की, आम्ही सुरुवातीपासून ‘ललित’चे वाचक आहोत. २०-२५ र्वष ‘ललित’ वाचणारे लोक आहेत. असे वाचक असणे हेच ‘ललित’चे यश आहे.
‘ललित’चा वाचक सुजाण व विचारी आहे!
'ललित'च्या सध्याच्या स्वरूपाबद्दल आणि वाचकांकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांविषयी विद्यमान संपादक अशोक कोठावळे यांच्याशी केलेली बातचीत..* वाचनसंस्कृतीशी संबंधित असणाऱ्या महाराष्ट्रातल्या कुणालाही 'ललित'चं नाव ऐकून माहीत असतं. वाचनसंस्कृतीच्या संदर्भात 'ललित'चं नेमकं काय योगदान आहे असं तुम्हाला वाटतं?- वाचन संस्कृती वाढावी हे तर …
First published on: 30-12-2012 at 03:40 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reader of lalit is provocative and sapient