‘मारेकरी डॉक्टर!’ हा गिरीश कुबेर यांचा (लोकरंग- १ सप्टेंबर) लेख योग्य वेळी लिहिलेला आणि अत्यंत मुद्देसूद असा होता. पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी. चिदंबरम्, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया, कॉंग्रेसचे प्रवक्ते तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि नेते या सर्वाच्याच भाषणांतून एक प्रकारचा दर्प आणि उद्दामपणा जाणवतो. गरीबांची तोंडदेखली सेवा करण्याचा आव मात्र ते आणत असतात. ‘कोलगेट’ प्रकरणातील फाइली गहाळ झाल्या त्याला मी जबाबदार नाही, असे पंतप्रधान निलाजरेपणे सांगतात. खासदारांचा पाठिंबा विकत घेऊन त्यांनी आपले सरकार वाचविले आहे. लालूप्रसाद यादवांसारख्या भ्रष्ट राजकारण्यांचा पाठिंबा घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले आणि वेळोवेळी ते वाचवलेही. मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी प्रदीर्घ काळ भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खात आहेत. विरोधकांतील दुहीमुळे आपल्या सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका नाही, हे ठाऊक असल्याने अनेक मंत्री आणि रेणुका चौधरी व दिग्विजयसिंह यांच्यासारखे कॉंग्रेसचे वाचाळ प्रवक्ते रोज निल्र्लज्जपणे बौद्धिक उन्मत्तपणा पाजळीत आहेत.
संपत्तीची लूट करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचा गैरवापर केला जात आहे. या बॅंकांची कर्जे बुडविणारे बडे थकबाकीदार त्यामुळे सोकावले आहेत. सरकारपुरस्कृत कर्जे ही बुडित खाती जमा करण्याकरताच असतात असे मानले जाऊ लागले आहे. व्यावसायिक बॅंकांना वेठबिगारासारखी वागणूक दिली जात आहे. परिणामी त्यांची अवस्था बुडणाऱ्या जहाजांसारखी झाली आहे. काही प्रामाणिक अपवाद करता समाजाचे सारे आधारस्तंभ अशा तऱ्हेने भ्रष्टाचाराने पोखरले आहेत. एकीकडे लोकसंख्या आणि भ्रष्टाचाराची, संवेदनाहीनतेची चढती कमान आणि दुसरीकडे रुपया मात्र वेगाने घसरत चालला आहे. रस्ते आणि पायाभूत सुविधांचा दर्जा भयावह आहे. जनतेला शाळा, घरे, पिण्यायोग्य पाणी, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्यसुविधा पुरवायचे सोडून आपण जिथे काहीही हाती लागणार नाही अशा मंगळावर मोहिमा काढतो आहोत. श्रीमंत राष्ट्रांना असले चोचले परवडतील. तशात आपले सगळे राजकीय पक्षही जातपात व धर्म यांचा वापर करून आपली राजकीय पोळी भाजू इच्छितात. कुख्यात दहशतवादी भटकल याला अटक झाल्यावर मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने या प्रकरणाला राजकीय रंग देऊन म्हटले की, या देशात केवळ मुस्लीमधर्मीयांनाच लक्ष्य केले जात आहे. आणि हे सगळं आपण असहायपणे हताश होऊन पाहतो आहोत, हे आपलं दुर्दैव. या देशाचा विनाश आता कुणीही रोखू शकणार नाही.
– सुधीर भावे, जोगेश्वरी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा