१३ एप्रिलच्या अंकातील संजय पवार यांचा ‘दोन परफेक्शनिस्ट’ लेख वाचला. आता ज्यांच्यासाठी त्यांनी हा लेख लिहिला, ते सचिन तेंडुलकर व आमिर खान यांच्या वाचनात हा लेख येईल की नाही कुणास ठाऊक. मग तो कुणासाठी लिहिला? दर आठवडय़ाला सदर लिहिणं खरोखरच सोपं नाही. नियमित सदर लिहिणारा एकजण सांगत होता, ‘इट इज अ हार्ड वर्क. तुमचे ३०% लेख उत्तम जमतात. ५०% बरे जमतात. राहिलेले २०% अगदीच सो-सो असतात. आणि असं झालं तरी तुम्ही स्वत:ला चांगले लेखक म्हणवून घ्यायला हरकत नाही.’ पवारांना आपला हा लेख २०% मधला आहे हे माहीत असेल तर ठीक; पण जर त्यांना आपला ‘परफेक्ट पुरोगामी’पणा लेखातून दाखवायचा असेल तर चार गोष्टी त्यांनी समजून घ्यायला हव्यात.
सचिनला लोकांनी, राजकारण्यांनी, उद्योगपतींनी डोक्यावर घेतलं हा त्याचा दोष नाही. असलाच तर आपल्या क्रीडाविषयक धोरणाचा आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्याने गोल्फ खेळावे की नाही, हा त्याचा प्रश्न आहे. तो क्रीडाक्षेत्रात आहे, अजून वृद्ध झालेला नाही, तेव्हा तो नवीन नवीन गोष्टी करून पाहणारच. हा मनुष्यस्वभाव आहे. आधी एकांकिका लिहिणारे नंतर दोन अंकी नाटक लिहितात, मग प्रायोगिक चित्रपटांसाठी पटकथा-संवाद लिहितात. आधी मराठीसाठी लिहितात, मग हिंदीसाठी लिहितात. आता हे सगळं ते ‘जगतामध्ये समता प्रस्थापित व्हावी, अन्यायाचे निवारण व्हावे’ या उदात्त हेतूनेच करतात का? तसेच सचिनने काय करावे, हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो बाकी काय करत असेल-नसेल, पण त्याच्या पैशातून आज किमान शंभर मतिमंद मुलांना आयुष्याचा आधार मिळालेला आहे आणि त्यांच्या पालकांना आयुष्यभराचा दिलासाही!
जी गोष्ट सचिनची- तीच आमिरचीही. त्याच्या कार्यक्रमातून स्फूर्ती घेऊन आज अनेक तरुण, ज्येष्ठ स्वत:पलीकडे जाऊन काहीतरी विधायक काम करीत आहेत. एकटय़ा नगरच्या स्नेहालय संस्थेला त्याने एक कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. त्यातून अनेक पीडित महिला-बालकांची आयुष्यं उभी राहणार आहेत. ‘मुस्लीम मानसिकतेबद्दल तू बोल, मग आम्ही तुला मानू,’ असं त्याला सांगणं हा शुद्ध भंपकपणा आहे. महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांचे मेरुमणी प्रा. नरहर कुरुंदकर यांनी या विषयावर अत्यंत विवेकाने, पण परखडपणे लिहिले आहेच. पवारांसारख्यांनी यातलं स्वत: काय केलंय? त्यांचे लेख वाचून एका तरी तलाकपीडित महिलेला किंवा भरकटलेल्या अशिक्षित मुस्लीम तरुणाला न्याय मिळाला का? ‘सगळ्यांनी सगळंच करावं’ या न्यायाने उद्या मेधा पाटकरांनी फुरसुंगीच्या कचऱ्याच्या प्रश्नावर कविता केली नाही म्हणून तुम्ही त्यांना मोडीत काढाल. किंवा संजय पवारांसारख्या लेखकाला विस्थापित काश्मिरी पंडितांवर नाटक लिहायला सांगाल. त्यांनी तसं केलं तर चांगलंच आहे; पण तसं केलं नाही तरी त्यांचं काम कमी किंवा लहान ठरत नाही.
तेव्हा जरी तेंडुलकर आणि आमिर खानच्या वाचनात हा लेख आलाच, तरी त्यांनी या भानगडीत पडू नये. उगाच शब्दांचे बुडबुडे उडवण्यापेक्षा त्यांच्या विहित कामाने चार पीडितांचे अश्रू तरी पुसले जातील. मग ‘परफेक्ट पुरोगामी’ने त्यांना मानलं नाही तरी चालेल. कारण घरबसल्या तिरकस लिहिणं सोपं आहे, कृती करणं फार दुर्मीळ आणि अवघड आहे. पवारांसारख्या ‘चळवळी’तल्या माणसाला हे सांगायला नको. कळलंच असेल त्यांना- तिरकस लिहिणं तसं सोपं असतं.
शेवटची सरळ रेघ : परिवर्तनाच्या चळवळीतल्या लोकांनी व्यवस्था कशी बदलायची ते सांगावं; जे त्यांच्या परीने अरविंद केजरीवाल सांगत/ करत आहेत. उगाच माणसांना बदलायला सांगून काय उपयोग? आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांनी हे चळवळीतल्या लोकांना सांगावं?
– दत्ता वाईकर, सातारा
परफेक्ट पुरोगामी
१३ एप्रिलच्या अंकातील संजय पवार यांचा ‘दोन परफेक्शनिस्ट’ लेख वाचला. आता ज्यांच्यासाठी त्यांनी हा लेख लिहिला, ते सचिन तेंडुलकर व आमिर खान यांच्या वाचनात हा लेख येईल की नाही कुणास ठाऊक.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers expression on lokrang article